Wednesday, January 6, 2021

दिल्लीची कोंडी करणारे तथाकथितत ‘किसान आंदोलन’

 

तीनही कायदे पूर्णतः रद्द करा आणि तोवर आम्ही एकेका तरतुदीवर चर्चाच करणार नाही!अशी भूमिका भारतीय शेतकऱ्याच्या प्रतिनिधीत्वाचा दावा करणाऱ्यांनीघेतल्यामुळे ४ जानेवारीला त्यांची सरकारशी चर्चाच बंद पडली.

एकतर शेतकरी हा एक वर्ग नसून ती अनेक वर्गस्तरांची उतरंड आहे. त्या त्या स्तराचे हितसंबंध वेगळे व काही बाबतीत विसंगतही आहेत. तसेच पंजाब-हरियाणातील विशिष्ट स्थिती भारतभर नाही. दिल्लीत आंदोलन करणारे उच्चस्तरीय अर्ध-दलालभारतभरच्या लहान शेतकऱ्याचे हित होत असताना ते होऊ देत नाहीत ही गोष्ट अन्यायकारकही आहे व लोकशाहीतत्त्वाला हरताळ फासणारी आहे.

पार्श्वभूमी: शहरी गरीबांना स्वस्त ध्यान्य पुरवता यावे

यासाठी शेतीमालाचे भाव पाडण्याची वेळ विविध सरकारांवर आली याचे कारण असे आहे की जितकी सूट शहरी गरीबाला द्यायची तिच्या चौपट खर्च अन्न-महामंडळ व रेशनदुकाने यांच्या अकार्यक्षमतेमुळे व भ्रष्टाचारामुळे सरकारवर पडत असे. जी काय सबसिडी द्यायची ती अंतिम लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये थेट द्यावी हे तत्त्व मान्य केले की चौपट खर्च वाचून शेतकऱ्याला परवडतील असे भाव देणे खरेतर शक्य आहे. हे भाव कसे ठरवावेत याबद्दल स्वामिनाथन आयोगाची शिफारस (उत्पादनखर्च + ५०%) सर्व पक्षांनी मान्य केली आहे.

हमीभाव आणि सरकारी-मंडी

मोदी-सरकारने जे कृषिसुधारणा कायदे केले त्यात तसे बंधनही स्वीकारले आहे. इतकेच नव्हे तर अधिकाधिक पिकांना हमीभाव देणे व ते सरकारी-मंडी (ए पी एम सी कृषि-उत्पन्न-बाजार-समिती) या राजकीय यंत्रणेतून देणे हे प्रत्यक्ष चालूच आहे. इतकेच नव्हे तर सरकारने हमीभाव देऊन केलेल्या मालाच्या उचलीत (प्रोक्युयरमेंट) नवे कायदे आल्यानंतर काही पटींनी वाढ झाली आहे व होत आहे. सरकारी मंड्यांचे आधुनिकीकरण करणे व संख्या वाढवणे यातही सरकार गुंतवणूक करत आहे. यावरून सरकारी-मंड्या नष्ट होतील व हमीभाव रहाणार नाहीत ही पूर्णतः काल्पनिक भीती असल्याचे दिसते. कायद्यानुसार व प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही. आज हमीभाव असतीलही पण उद्या तुम्ही (वा अन्य सरकार) ते रद्द कशावरून करणार नाही?” याही काल्पनिक भीतीला तसे लेखी व कायद्यात घालून द्यायला सरकार तयार आहे.

मंड्या-चालवणारे गावातील उच्च वर्ग अस्वस्थ का झालेत? कारण लहान शेतकरी मुळात मंडीपर्यंत पोहोचू शकत नाही व बडे शेतकरीच त्यांचा माल (अनधिकृतरित्या व हमी पेक्षा कमी भावांत उचलतात. मंडीत पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मंडी-टॅक्स, अडत्यांचे कमिशन. दलालांचे कमिशन वगैरे हमीभावातून वजावट करून द्यावे लागतात लहान शेतकरी हमीभावांपासून वंचितच रहातो. हे मंड्याधीश व बडे शेतकरी मधल्यामध्ये जे शोषण करतात त्यावर सरकारने (मोदींच्या अगोदरच्या) काहीच उपाय योजला नाही. मंड्याधीशांना डाचणारी कृषि-सुधारणा अशी की माल सरकारी-मंडीतच विकला पाहिजे हे सक्ती काढून लहान शेतकऱ्याला विक्री-स्वातंत्र्य देण्यात आलेले. (शरद जोशीचा लढा मूलतः विक्री-स्वातंत्र्यासाठीच होता पण सध्या शक्य अशी तडजोड म्हणून त्यांनी हमीभाव योजना मान्य केली होती)

मंड्याधीश/बडे-शेतकरी यांना डाचतेय ते काय? तर त्यांची मक्तेदारी संपेल व लहान शेतकऱ्याचे शोषण त्यांना करता येणार नाही. म्हणजे हमीभावातून लचका हे तोडत असतात आणि वर हमीभाव जातील अशी अफवा पसरवत असतात. पंजाब-हरियाणामध्येच जास्त अस्वस्थता का? याचे कारण जास्त उत्पादनखर्च जास्त वेतने व जास्त हमीभाव (उत्पादनखर्च+५०%) अशी मिनी-अमेरिका तेथे निर्माण होऊन बसली आहे. त्यामुळे तेथील मंड्याधीश/बडे-शेतकरी स्पर्धेला जास्त घाबरतात. थोडक्यात दिल्लीतले आंदोलन हे मंड्याधीशांचे आंदोलन आहे शेतकऱ्यांचे नाहीच.

डावे व काँग्रेस आज अशी भूमिका घेत आहेत की शेतकऱ्याला खरे संरक्षणसरकारी-मंडीच देऊ शकते व खासगी व्यापारी लूटच करतात. जर हे खरे असते तर केरळ या राज्यात (जेथे डावे व काँग्रेस यांचेच सरकार आलटून पालटून आलेले आहे) कधीच सरकारे-मंड्या नव्हत्या व आजही नाहीत. ही किती भयानक विसंगती आहे!

पीक-करार शेती (काँट्रॅक्ट फार्मिंग)

कमाल जमीनधरणा कायदा, पिढ्यांनुसार वाढती तुकडेबाजी, बाहेरच्या शेतीत येण्यास मज्जाव अशा गोष्टींमुळे शेते इतके लहान होतात की ती किफायतशीर तंत्र वापरूनच शकत नाही. जमिनीची मालकी शेतकऱ्यांन हवी आहे व ती रहाणारच आहे. अनेक शेतकरी एकत्र आले आणि एका पिकापुरते काँट्रॅक्ट त्यांनी उद्योजकांशी केले तर उत्पादकता बरीच वाढू शकते. कोणते इनपुट उद्योजकाने द्यायचे किती पीक शेतकऱ्यांनी उद्योजकाला द्यायचे (जर हमीभावापेक्षा जास्त सवलत मिळत असेल तरच) याचे करार नव्य कायद्यानुसार शक्य आहेत. करार न्याय्य आहे ना? हे तपासणारी ट्रायब्युलन्स उभी रहाणार आहेत. यात शेतकऱ्याच्या बाजूने एक मोठीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शेतकरी त्याला वाटेल तेव्हा काँट्रॅक्टमधून बाहेर पडू शकतो. उद्योजकाने मात्र करारातील दायीत्व पूर्ण केलेच पाहिजे! या तरतुदीमुळे उद्योजक शोषण करील ही शक्यताच रहात नाही (व जमीन हडपेल ही नाहीच नाही.) काँट्रॅक्ट-फार्मिंग कायदा जरी आज आला असला तरी ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी व न्याय्यरीत्या अस्तित्वात आहेच. अमूल, व्यंकटेश्वर हॅचरी इतर सहकारी कंपन्या आहेत. परंतु अशा योजनांचा लाभ फारच कमी शेतकऱ्यांना मिळत होता. आता विशेषकायदा आल्याने अनेक शेतकरी समूहांना हा लाभ घेता येईल. यात जमीन बळकावली जाईल असा धादांत खोटा प्रचार मात्र चालू आहे.

चर्चेविना पास केले?

या विषयावर प्रदीर्घ चर्चा गेली वीस वर्षे चालूच होती. किंबहुना या योजना पटल्यामुळेच व लहान शेतकऱ्यांची मते मिळतील या आशेने कित्येक पक्षांनी आपापल्या निवडणूक जाहीरनाम्यात याच सुधारणांची आश्वासने दिली पण पाळली नाहीत. कारण ग्रामीण भागात राजकारणावर मंड्याधीशांची मजबूत पकड होती. मोदी सरकारने प्रथम हे धाडस केले. इतकेच नव्हे तर श्रेय मोदींना मिळेलएवढे एकच दुःख संबंधिताना आहे.

लहान शेतकऱ्याकडे पैसा उरत नाही व त्याला लिक्विडिटीची (खावटी म्हणजे जगण्यासाठी व तगाई म्हणजे इनपुट्ससाठी) त्याला सारखी कर्जे काढावी लागतात. मोदींच्या किसान सम्मान योजनेत ही रोकड कोणत्याही मध्यस्थाविना थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. पण पुन्हा तेच! श्रेय मोदींना मिळेल! म्हणूनच विरोधकांनी अॅब्सटेन (न बाजूने ना विरोधी) केले स्वतःला पटते तर आहे पण श्रेय तर मिळू द्यायचे नाही यासाठी मतदानच केले नाही. अॅब्सटेन हा अधिकार लोकप्रतिनिधींना असतो आणि सरकार त्यांना पकडून आणून मत द्यायला लावू शकत नाही. विश्वासात घेतले नाही असा आरोपही केला जातो. पण जर विरोधकांचा खरेच वोरोध असता तर सहा महिन्यापूर्वी आंदोलन उसळले असते. अकाली-दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजकीय निर्णय घेतल्या नंतर हे आंदोलन झाले आहे व योगेंद्र यादवछाप कोणीही उपटसुंभ त्यात घुसत आहेत. भारतातील सरासरी शेतकरी म्हणाल तर त्याचा कोठे पत्ताच नाही!

 

Thursday, March 21, 2019


समता: सम्यक आणि वैषम्य
समतेत दडलेल्या अनेक अर्थांपैकी कोणते अर्थ नीतितत्त्व म्हणून मान्य करता येतील? तर कोणते अर्थ मानवहितासाठी घातक आहेत?

          फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने ज्या समतेची उद्घोषणा झाली तिचा अर्थ नियम-सार्विकता (आयसोनॉमी) हा होता. सर्वासांठी तेच कायदे! कारण तेव्हा मध्ययुगीन रूढी (आपल्याकडे मनुवाद म्हणून गाजत असलेली) होती. काहींना कायमसाठी काही विशेषाधिकार (प्रिव्हिलेजेस) आणि काहींना कायमसाठी विशेष-कर्तव्ये (बर्डन्स) आणि तीही जन्माधिष्ठित किंवा वंशाधिष्ठित! ती स्पष्टपणे नाकारली गेली. न्यायनिवाडा करताना पक्षपात असू नये हेही तत्त्व मान्य झाले. राज्यसंस्थेने नागरिकांत भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) न करता, त्यांना समान वागणूकद्यावी, हे तत्त्वही याच ओघात येते. या अर्थाने समता हे नीतितत्त्व स्वीकारार्हच आहे.     समाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यामध्ये जे समतेचे तत्त्व पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे. राज्यसंस्थेचे काम नागरिकांना समान बनवून सोडायचेहे आहे व त्यासाठी तिला नागरिकांना असमान वागणूक द्यावीचलागेल. म्हणजेच उच्चस्तरांना प्रतिकूल आणि निम्नस्तरांना अनुकूल वागणूक द्यावी लागेल, तरच त्यांना समान बनवून सोडता येतील. समान वागणूक देणे आणि समान बनवून सोडणे ही उद्दिष्टे परस्परविसंगत आहेत. नंतरही समतेच्या कल्पनेत अनेक प्रकारची भर पडत गेली आहे.

      अशी भर घालणाऱ्या उप-संकल्पनादेखील परस्परविसंगत आहेत. समता ही गाठोडेवजा (एक्लेक्टिक) संकल्पना बनली आहे. जेव्हा आपण समता मानतो असे म्हणतो, तेव्हा या गाठोड्यातील काय मानतो आणि काय नाकारतो, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. अशी स्पष्टता न केल्यास समताहे संदिग्ध/संमिश्र तत्त्व आपल्याला सतत चकवे देत रहाते.

       समतेची तपासणी करायची असेल तर आपल्याला प्रथम, “स्तरीकरण व श्रेणी(हायरार्की) या गोष्टी अनिवार्यपणे अन्याय्यच असतात आणि म्हणून समान बनवून सोडणे हे अनिवार्यपणे न्याय्यच असते.हा दुराग्रह सोडावा लागेल. तसेच सर्व व्यक्ती ह्या मुळात समान असतातच पण व्यवस्थेने त्यांना असमान बनवलेले असतेहेही गृहीत तपासावे लागेल. यासाठी अगोदर सर्वच व्यक्तींत समाईक’ (कॉमन) काय काय असते हे स्पष्ट करून घेतले पाहिजे. त्या समाईक गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्रत्येक व्यक्ती अनन्य(युनिक) असते.
२. प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला वेळोवेळी येणारी स्थिती ही अंशतः स्वअर्जित, अंशतः  
  अन्य-दत्त आणि अंशतः भाग्याधीन असते.
३. निरुपाय नसताना, प्रत्येक व्यक्तीला तिच्या कृतींची जबाबदारी स्वतः घेणे
   आवश्यक असते, पण तशी ती घेईलच असे नाही. 
४  प्रत्येक व्यक्तीला आकांक्षा काहीही असू शकतात पण क्षमता मर्यादित असतात.

५. व्यक्ती एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदरही करू शकतात किंवा कोणी कोणाच्या
  स्वातंत्र्यावर अतिक्रमणही करू शकते.

यातील एकाही समाईक गोष्टीबाबत, प्रत्यक्षात व्यक्ती एकमेकींशी समान नसतात! हे आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.

समतावादातील अंगभूत गोच्या 

      श्रेणी ही गोष्ट वाईटच असते असे मानण्याचे कारण नाही. जर व्यक्ती एकमेकींशी समान नसल्या पण एकमेकीना पूरक असल्या व स्वयंस्फूर्तीने पूरक नात्यात उतरत असल्या तर त्यात वाईट काय आहे? उलट लादलेली नाती आणि परस्परमारकता ही गोष्ट वाईट आहे. स्पर्धा असूच नये हे शक्यही नाही आणि हिताचेही नाही. स्पर्धा न्याय्य (फेअरप्ले) आणि विधायक राखली पाहिजे हे बरोबरच आहे. या अर्थाने समता मान्य करता येईल.

     पण सर्वांची स्थिती समान करायची म्हणजे काय करायचे? कारण वेगवेगळी सुभाग्ये/दुर्भाग्ये वेगवेगळ्या क्षमता, वेगवेगळ्या रुची व आकांक्षा आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या वृती असल्यावर, कोणकोणत्या बाबीत कोण कोणाच्यापेक्षा जास्त किंवा कमी सुस्थित असेलहेही वेगवेगळे असते. शिवाय अर्हता हा वेगळाच मुद्दा आहे. त्यामुळे श्रेणी लावायची म्हटली, तरी त्यातून एकेका मुद्यावर एकमेकीना छेद देणाऱ्या (क्रिसक्रॉस) श्रेण्या मिळतील. म्हणूनच समग्र अर्थाने श्रेणी लावणे हेच मुळात शक्य नाहीये. असे असूनही समता ही घोषणा इतकी सर्वमान्य (मनापासून नव्हे!) का झाली असेल?

     मक्तेदारी ही गोष्ट न्यायबुद्धीला खटकणारी आणि उत्पादकता कमी करणारी आहे. मक्तेदाऱ्या नष्ट करून स्पर्धा स्थापित केलीच पाहिजे. तसेच नैसर्गिक संसाधनांची मालकी आणि वारसाहक्काने मिळणारी संपत्ती या गोष्टी अर्हतानिरपेक्ष असतात. त्यामुळे कर-सवलती या मार्गाने उत्पन्नाचे फेरवाटप समर्थनीयच आहे. परंतु अशा फेरवाटपाचे उद्दिष्ट किती समतावादी असावे? हा खरा प्रश्न आहे. समतावाद्यांचा वाटपावर इतका भर असतो की प्रश्न उत्पादनाचा आणि उत्पादकतेचा सुध्दा आहे याचे भान सुटते. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा या तीनही गोष्टीचे कितीहीफेरवाटप करता येईल असे ते समजतात.

       सत्ता ही गोष्ट समान वाटता येईल असे मानणे हे तर स्वयंव्याघातीच आहे. सत्तेला वैधतेची जोड असली तरी तिचा गाभा बल हाच असतो. माणसे गट करून एकेका माणसापेक्षा बलशाली ठरतातच. अनेकांच्या संख्याबलाशी एकाला तुल्यबळ व्हायचे तर त्याचे प्रतिकारक बल संख्याबलाहून वेगळे पण संख्याबलाइतके असावे लागेल. म्हणजेच बलसमता हे अराजक/निरंतर-युध्द ठरते. काहीजण विशेष बलिष्ट बनणे, त्यांच्याशी निष्ठावान गट जमणे, अशा गटांत तह होणे असे होत राहून बलांची उतरंड (पिरॅमिड) बनणे अटळ असते. यावर खरा उपाय पिरॅमिडची उंची कमी करत नेणे हाच असतो..

      स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त असते तेव्हाच सक्तीची कार्यात्मक गरज लागत नाही. म्हणून स्वातंत्र्य व स्वयंशिस्त जोपासणे हा प्रयत्न असला पाहिजे. पण या गरजेपेक्षा जास्त बल युद्धांमधून निर्माण होते आणि युद्धे ही द्वेषांमधून उद्भवतात. म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त यांना द्वेषरहिततेची जोड असली पाहिजे. ही प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतशी पिरॅमिडची उंची कमी होईल. पण पिरॅमिडमध्ये समतावाद्यांनी उच्चस्थान पटकावले(!) की ते समता आणतील, हे सपशेल खोटे आहे.

      उत्पन्नांतील विषमता कमी होणे हे समृद्धीनंतरच होऊ शकते. लोकसंख्येने ग्रस्त आणि अनुत्पादक अर्थव्यवस्थेत दारिद्र्य टिकते व श्रमिकांची सौदाशक्ती क्षीण रहाते. दारिद्र्य-निवारणाआधी आर्थिक विषमता कमी करणे हा क्रम अशक्य असतो. अमर्त्य सेन यांचे गुरू जॉन रॉल्स यांनी मांडलेला अग्रक्रमवाद (प्रायारिटेरियनिझम) हाच विकसनशील राष्ट्रासाठी उपयोगाचा आहे. स्पर्धा फेअर राखणे हे काम न्यायसंस्थेने करायचे आणि कल्याणकारी राज्याने उत्पन्नाचे फेरवाटप करताना अंत्योदयाला अग्रक्रम द्यायचा असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. अशी विषमता निवडा की जी तळच्या माणसाला वर काढण्यात सर्वोत्तम असेल.” (थिअरी ऑफ जस्टिस--- जॉन रॉल्स). वरच्या उत्पन्न गटांत अंतर्गत विषमता किती वाढतीय? याची चिंता न करता खालच्या उत्पन्न गटांचे दारिद्र्यनिवारण आणि सक्षमीकरण हे कल्याणकारी राज्याचे आद्य कर्तव्य आहे.

प्रतिष्ठा: डिग्निटी की ऑनर/प्रेस्टीज

      डिग्निटी चा अर्थ असा की कोणालाच तुच्छतेने न वागवणे व कोणाचीच विटंबना न करणे. हे सार्विक आहे. त्यामुळे डिग्निटी ही सर्वांचीच जपली गेली पाहिजे. ऑनर म्हणजे बहुमान! प्रेस्टीज म्हणजे मुद्दाम दाखवण्याचे श्रेष्ठत्व! त्याचा ऑनरशी घोळ घातला जातो. 

     एखाद्या व्यक्तीबाबत विशेष आदर वाटेल ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत घडूच शकत नाही. यामुळे बहुमान ही गोष्ट श्रेणीयच असते. समान-बहुमान हा चक्क तार्किक-व्याघात आहे.

     पण सामाजिक समते, ऑनरमध्ये/प्रेस्टीजमध्ये समता आणण्याचा प्रयत्न होतो! खरे सार्विक मूल्य डिग्निटी हे असताना, ऑनर आणि प्रेस्टीज यांचा समान वाटप करायला बघणे, हे मुदलातच चुकीचे असते. परंतु जनमानसावर, ऑनर आणि प्रेस्टीज यांचा समान वाटप व्हावा, असे समतावाद्यांनी ठसवून ठेवलेले आहे. यातून टोकनिझम म्हणजे नाममात्र बहुमान देण्याचे प्रकरण चालू रहाते. टोकनिझम करण्याला खर्च येत नसल्याने राज्यकर्ते तो सढळ हाताने चालू ठेवतात.

     किती व्यक्तींचे सत्कार करणार किंवा त्यांना पद्मपुरस्कार देणार? त्यामुळे टोकनिझम व्यक्तीकेंद्री न रहाता समूहकेंद्री बनवला जातो. आपल्याकडे गोतगटीय समूहांना समाजम्हणण्याची आणि आख्या समूहाला बहुमान देण्याची प्रथा पडली आहे. यातून जातीजमातवाद आणि इतर सर्व प्रकारच्या जमातवादांना अधिमान्यता मिळते.

      मत्सर हा दुर्गुण माणसात असतोच. त्याला कशाचेही वैषम्य वाटू शकते. वैषम्य वाटले की विषमतादिसू लागते. यातून वैषम्यांचे सांत्वन करायचे हे जणू कर्तव्य होऊन बसते. वैषम्य वाटण्याला मर्यादा नसते पण सांत्वन करण्याला सुध्दा (जरी खर्च येत नसला तरी) मर्यादा असते. सांत्वन कधीच पूर्ण होणार नसते. म्हणजे सामाजिक समतेच्या नावाखाली प्रत्यक्षात वैषम्य-भावनाच पोसली जाते. जमातवादी द्वेषभावनेला जास्त जास्त इंधन पुरवले जाते. म्हणून अशी समता ही सम्यक नसून वैषम्यक असते.


Friday, November 10, 2017

‘विरोधासाठी विरोध’---- चले जाव

[सकाळ' २०१७ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख. थीम होती ‘आज तुम्हाला भारतातून कोणत्या गोष्टीला "चले जाव" म्हणावेसे वाटते?’]

३५ वर्षांपूर्वी मी या कम्प्युटरमध्ये दडलंय काय?’ हे पुस्तक लिहीत होतो तेव्हा चळवळींचा प्रश्न असायचा या कम्प्युटरवाचून अडलंय काय?’ ३५ वर्षांनंतर पाहतो तर कम्प्युटरविना घडलंय काय?’ असा प्रश्न पडतो. माझ्या वडिलांच्या(स्ट्रक्चरल डिझायनर) हातात जर स्टॅड, कॅड आणि मोबाईल फोन असता तर ते किती पट काम करू शकले असते? असा विचार केला तरी जीव दडपायला होते. (आजही सर्व्हर डाऊन होऊन विद्यापीठाचे निकाल अडतात, शेतकऱ्यांच्या अर्जांची छाननी रखडते. पण तो दोष तंत्राचा नसून हार्डवेअरला उपेक्षित ठेवण्याचा आहे.) पण तेव्हा आम्ही कम्प्युटरायझेशनला जो विरोध केला तो चुकीचा होता अशी कबुली कितीजणांनी दिली? आमचं कधी चुकत नसतंच. आमचे फक्त पराभव होतात इतकेच. त्यामुळे आता कशाला विरोध करावा बरे? या दिशेनेच विचार चालू होतो. नया दौर या जुन्या सिनेमात बस पेक्षा लवकर पोचायला टांगेवाला निदान शॉर्टकटचा रस्ता बांधतो तरी. नव्या नया दौरमध्ये बसवर स्टे आणला की झाले.

टिळकांनी संमतीवयाला आणि फॅक्टरी अक्टला विरोध केला होता. त्याकाळी कामगारांना आठवड्याची सुट्टीसुध्दा नसे. नारायण मेघाजी लोखंडे आणि ना.म.जोशी यांनी ती मिळवली. यावर रविवार ख्रिश्चनांचा म्हणून विरोध सुरू झाला. हेही चुकले याची कबुली कोणी दिली? कारण लोखंडेनी रविवार खंडोबाचा असे सांगून सुट्टी पदरात पडून घेतली होती आणि निर्णय झाल्यावर वाद थांबतो. रघुनाथराव कर्व्यांना विरोध झाला त्यांची शोकात्मिका माडंलीही गेली पण त्यांना विरोध करून देशाची जे शोकात्मिका झाली ती कोणी मांडतही नाही.

सुधाकरराव नाईकांच्या काळात झालेला एन्रॉन करार, जो शरद पवारांचा करार म्हणून ओळखला जातो, त्यात मुख्य चूक काय होती? आम्ही कमी वीज घेऊ शकलो तरी बिल आख्या कपॅसिटीचे देऊ हे कलम. त्यावर टीका मात्र, पाणी गरम होईल, मासे मरतील अशा छापाची. यावर सरकार पाडून आलेल्या जोशी-मुंडे सरकारने एन्रॉनला समुद्रात बुचकळून बाहेर काढले ते तिप्पट करून! आणि चूक होती तशीच ठेवली आणि ते मासेबिसे हा विषय निघालाही नाही. पण हे कोणी कबूल केल्याचे दिसत नाही.

भाजपने डाव्याचे शेपूट बनून अणुकराराला विरोध करत मनमोहनसिंग सरकार पाडतच आणले होते. मुलायमसिंगांनी ते वाचवले. (का? ते माहित नाही) आज अणुकराराचे फायदे घेताना त्यावेळी आमची चूक झाली हेही कोणी म्हणत नाहीच. मनमोहनसिंगांनी काही अणुभट्ट्यावर आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षण मान्य केले. म्हणजे बॉम्ब बनवत नाही आहोत याचे.

ट्रॉटस्कीइस्ट प्रफुल बिडवई यांचे म्हणणे होते सगळ्याच भट्ट्यांवर पर्यवेक्षण हवे! आपल्याकडे बख्खळ बॉम्ब आहेत!! पण बातमी काय तर प्रफुल बिडवईचा अणुकराराला विरोध. अहो पण हा विरोध नेमक्या उलट्या बाजूने होता हे कोण सांगणार?

ज्योती बसू यांनी प्रामाणिकपणे मुलाखती देऊन आमचे खाउजाचे विश्लेषण चुकले हे कबूल केले. पण बाकी कोणी त्यांचे मत उचलूनही धरत नाही वा खोडूनही काढत नाही. १९९२ सालचे मत तसेच चालू ठेवतात. भोपाळ दुर्घटनेनंतर फॅक्टरी अक्टमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या पण कामगार किंवा शेजारचा नागरिक थेट खटला घालू शकत नाही हा त्या कायद्यातला मुख्य दोष तसाच राहिला आहे. हे कोणी बोलतही नाही. ज्या बिल्डिंगा पडणार असे जाहीर झाले आहे त्या पडायच्या आधी मोकळ्या करून नव्या बांधल्या पाहिजेत. पण हे घडण्यात बऱ्याच कायदेशीर अडचणी येतात. मग त्या पडतात. लोक मरतात. सरकारे भरपाया देत रहातात.

जैतापूर हा तर विरोधासाठी विरोधचा आदर्श(!) नमुना आहे. ज्या जमिनीतून काडीचेही उत्पन्न नव्हते तिच्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विक्रमी भरपाई द्यावी लागली. शिवसेना हा प्रकल्प जणू कॉंग्रेसचाच आहे अशा थाटात विरोध करत होती. हा प्रकल्प वाजपेयीजींच्या सरकारने आणला आणि त्यात आपणही होतो हे विसरूनच गेली होती. 

दणकून भरपाई दिल्यावर किरणोत्सर्ग, फुकुशिमा(येथील स्फोट हायड्रोजन वायूचा रासायनिक होता ड्यूटेरियम बॉम्बचा नव्हे), सुनामी आली तर, जम्बोजेट आपटवले तर(११-९ नंतर आल्यामुळे ही चिंता) हे सगळे विषय मागे पडले. कारण त्यातल्या कशातच दम नव्हता. सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी घेतली गेली होती.

स्थानिकांना न्याय देण्याच्या नादात ते 'संस्थानिक' असल्यासारखे बनू नयेत. राजाभाऊ पटवर्धन या एकाच ग्रस्ताने प्रकल्पाच्या बाजूने लढत दिली. ते मोहीम चालवायचे तेव्हा मी त्यांना विचारले तुम्ही स्वतःच्या खिशातून एवढा खर्च कसा करू शकता. यावर ते म्हणाले म्हणजे काय? मी प्रकल्पग्रस्त आहे! गरीब नाही.नारायण राणे यांनीसुध्दा लोकप्रियतेची किंमत देऊन प्रकल्पाची बाजू घेतली होती. या लोकांची पुण्याई आज कोणी मानताना दिसत नाही.

सरकारने कामगारांसाठी पेन्शन स्कीम आणली. तेव्हा ही प्रॉव्हिडंट फंडाची लूट आहे अशी अफवा पद्धतशीरपणे पसरवली गेली. अरविंद श्रौती आणि किसन तुळपुळे यांना गणितात गडबड आहे हे लक्षात आले होते. त्या गडबडीची सिद्धता आणि कोष्टके मी मांडल्यानंतर उलटेच सिद्ध झाले. स्कीम कामगारांच्या फारच फायद्याची किंबहुना प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनला गोत्यात आणणारी ठरेल आणि तशी ती ठरली देखील. पेन्शनस्कीमला विरोध करणाऱ्या कोणीही तेव्हा आमचे चुकले ही कबुली दिलेली नाही.

कर्जमाफी द्यायची, तर ती खरोखर अडचणीत असलेल्याला आणि खरोखर शेतकरीच असलेल्याला दिली पाहिजे, यात चूक काय? फडणवीस साहेबांनी तसा आग्रह धरला तर बाकी सगळ्यांनी त्यांचा अभिमन्यू करत आणला. हा अभिमन्यू बाहेर कसे यायचे हेही शिकलेला निघाला म्हणून वाचला! कोणी म्हणतंय थकितनाही तर अगदी ताजे कर्जसुध्दा माफ करा. कोणी म्हणताय तासगावच्या द्राक्ष बागाईतदाराला १० लाख गुंतवणूक लागते तीही माफ करा. वर्षानुवर्षे लूट केलीत.हे वाक्य टाकता येतेच. पण ती ह्याच वर्षी भरून मात्र निघाली पाहिजे! हे कसे शक्य आहे? पण समजून घ्यायला गेले तर सदाभाऊ खोत हे व्हिलन ठरले. उलट स्वामिनाथनची अशक्य शिफारस गणित न करताच उचलून धरणारे हिरो ठरतात.

सरदार सरोवर होऊच न देण्यावर भर देत एकीकडे पुनर्वसनावरचा फोकस सुटला आणि तिकडे गुजरात पूर्ण उंचीचे होणार या वर श्रध्दा ठेवून कालवे बांधून तयार होते. डाऊ कंपनीची फक्त लॅब येणार आहे हे लक्षात न घेता, रसायनशास्त्राचे तज्ञ असल्याच्या थाटात वारकऱ्यांनी ती बंद पाडली.

बुलेट ट्रेन येऊ घातली आहे. ०.१ % व्याजदर, मुदत पन्नास वर्षे, पहिला फेड हप्ता १५ वर्षांनी, हे प्रसिध्द आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन, ट्रॅक आणि कंट्रोल्सचे उत्पादन भारतात होणार आहे. जे भारतीय, बुलेट ट्रेन बनवायला शिकतात ते फक्त बुलेट ट्रेनच बनवू शकतात असे नसून, त्या निमित्ताने ते बरेच काही शिकतात जे ते इतरत्र वापरू शकतात. या ट्रेनमुळे व्यवहारांना जो वेग येईल त्याचा फायदा गुजरातला जास्त होईल की महाराष्ट्राला? उद्योजकतेला फायदा होईल. आता ती कोणी अंगी बाणवायची? याचे उत्तर ट्रेन नाही देऊ शकत.

पुण्यात म.न.पा ने बालगंधर्व थिएटर बांधले(मी शाळकरी मुलगा असतानाची गोष्ट) तेव्हा त्याची काय गरज? हा वाद झालाच होता. नंतर ते एक दिवसही मोकळे पडले नाही. म.न.पाने भरपूर उत्पन्न मिळवले आणि एकदा बालगंधर्वला प्रयोग झाला की इतरत्र बरेच प्रयोग मिळतात. आता पुण्यात बालगंधर्वच्या तोडीची आणखी थिएटरे बनलीत आणि तीही चालतायत हे तर तेव्हामाहित नव्हतेच.

एखादी नवीन गोष्ट जेव्हा येते तेव्हा तिचा पूर्वनियोजित फायदा काहीना काही असतोच पण अनपेक्षित फायदे बरेच असतात जे तेव्हा माहित नसतात. उपग्रह सोडले तेव्हा हे माहित नव्हते की जवळ जवळ प्रत्येकाला आपण नेमके कुठे आहोत कुठे जायचे आहे आणि त्यासाठी आत्ता कुठे वळा, हे इतक्या कमी किमतीत बघायला आणि ऐकायला मिळेल. इतकेच नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीनीसुध्दा कोण कुठे आहे हे कळणे महत्त्वाचे असते. घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे.अशी दृष्टी ठेवून चालत नाही.

नवीन गोष्ट असताना तिच्यात सुरुवातीला काही दोष असतात व ते लक्षात आल्यानंतर दूर केले जातात. जसे फ्रीज मधले रसायन ओझोनस्तराला धोकादायक नसलेले असेच आता वापरतात. किंवा टू स्ट्रोक इंजिन वापरत नाहीत वगैरे. काही दोष हे काल्पनिक आणि नवता-विरोधकांनी बागुलबुवा उभा केल्याने लोकांना वाटत असतात. पण खरे तर ते नसतात. उदाहरणार्थ जनुकीय बदल संकराद्वारे होत होता तोवर तो निर्धोक मानला जात होता. पण जेव्हा नेमकी जीन कापून दुसऱ्या जीवात घालण्याचे तंत्र जी एमसापडले तेव्हा त्याच्या विरोधात बऱ्याच अफवा पसरवल्या गेल्या. त्या अफवा आहेत हे अजूनही कित्येकांना पटलेले नाही. विरोधासाठी विरोध वाल्यांचा हा एक विजय आहे आणि ग्राहक व शेतकरी यांचा पराजय.

संदेशवहनासाठी आपण ज्या लहरी वापरतो त्या प्रकाशाहून कमी फ्रिक्वेन्सीच्याच असतात. धोकादायक लहरी प्रकाशापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीच्या असतात. पण संदेशवहनामुळे घातक रेडिएशन पसरले आहे असे जुही चावला नुकत्यातच जाहीररित्या म्हणाली तिला फिजिक्सचे ज्ञान असणे अपेक्षितच नाहीये. पण आपल्याला नसलेले आणि ऐकीव ज्ञानआपण बिनधास्त सांगत असतो. धसका भरवणे हे प्रगतीविरोधकांचे जुने तंत्र आहे. धरणाच्या पाण्यातून शक्तीकाढून घेतलेली असते असाही प्रचार एकेकाळी होता. विरोधासाठी विरोधवाले लोक हमखास प्रगतीविरोधी अफवा पसरवण्यात अग्रभागी असतात.

जिथे आपण सरकारला देणे लागतो किंवा सरकारकडून काही घेणे लागतो तिथे खासगीपणाचा प्रश्न कसा येतो? मग आधार लिंक करणे या गोष्टीला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचे नेते कसा काय विरोध करू शकतात. जे अगदी खासगीच असेल ते खासगीतूनच भागवावे ही साधी गोष्ट आहे. तिथेही आपण आडवे लावणारच.

खुद्द राजकीय क्षेत्राचे विरोधासाठी विरोध या तत्त्वामुळे भरपूर नुकसान झाले आहे. एन टी रामाराव यांना बहुमत असूनही इंदिराजींनी डिसमिस केले. आंध्रप्रदेश कायमचा दुखावला गेला. राज्यामधील नेतृत्वाना मोठे होऊ द्यायचे नाही हाही विनाकरण अट्टाहासच ना? हे एक उदाहरण झाले पण याची परिणती प्रादेशिक पक्षांची चलती होणे ही सर्वत्र दिसते. ममता बॅनर्जी या कॉंग्रेसमध्ये राहून का नाही कम्युनिस्टाना शह देऊ शकत? असेच द्रमुक जिंकते की अण्णाद्रमुक यावर केंद्रात कोण येणार हे ठरू लागते. अकाली दलाला मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून भिंद्रनवालेकडे कानाडोळा करायचा हे केवढ्याला पडले? विरोधात असताना मनरेगाला दूषणे द्यायची आणि राज्यावर आल्यानंतर मनरेगाचे बजेट दणकून वाढवायचे हेही विनोदी नाही काय?

अनेकदा वैयक्तिक हेव्यादाव्यांना उगाचच वैचारिक मतभेदात रुपांतरीत केले जाते. कोणाला तरी बाहेर पडावे लागते. धनंजय मुंडे, राज ठाकरे किंवा वेळोवेळी खुद्द शरद पवारसुध्दा किंवा रालोदमधून नितीशकुमार अचानक सेक्युलरिझम म्हणत बाहेर पडतात. सीपीआय सीपीएम होण्यामागे डांगे मोठे की रणदिवे हा वाद असतो? की भारत विरुध्द चीन हा वाद असतो? हे कळेनासे होते. स्पर्धा ही अटळ गोष्ट आहे ती निकोप कशी ठेवायची आणि मुख्य म्हणजे तिचे समर्थन देण्याच्या भरात वैचारिक कसरती करणे कसे टाळायचे ही शिकण्याचीच गोष्ट आहे.

विरोधासाठी विरोध हे दुरित २०१४ साली मोदीसाहेब निवडून आल्यापासून फारच विकोपाला गेले आहे. तुम्ही मोदीभक्त किंवा मोदीद्वेष्टे यापैकी एक काहीतरी असलेच पाहिजे हा काय ताप आहे. पत्रकारिता ही स्वभावतः काहीशी नकारात्मक असतेच पण ती सध्या विशुध्दपणे नकारात्मक बनत चालली आहे. एकदा टार्गेट ठरवले की कसेही करून दूषणे द्यायचीच अशी सक्ती होऊन बसली आहे. त्यात म्हणायचे पण म्हणलो नाही असेही दाखवायचे (याला इंग्लिशमध्ये पॅरालेपिसिस अलंकार म्हणतात) यासाठीच्या वाक्यरचना फार होत आहेत. असे म्हणल्यास फारसे वावगे ठरू नये.” “असे कोणी म्हटले तर ते अगदीच अस्वाभाविक म्हणता येणार नाही.अशी कुशन्स घालून भूमिका मात्र टोकाच्या घेतल्या जात आहेत. पर्याय न देता टीका करणे हे जरी कायदेशीर असले तरी हिताचे नाही. लाभ हानी संकट संधी याचे वास्तव चित्र प्रस्तुत करणे हे कर्तव्य असले पाहिजे हेत्वारोप करून टाळ्या मिळवणे हे नव्हे. पण ही पथ्ये विसरली जात आहेत.
थेट इलेक्ट्रानिक माध्यमांत तर सारेच संपादक होऊन अग्रलेख ठोकत आहेत. दोषारोप करणे, निषेध करणे किंवा निर्भर्त्सना करणे हे कधी आवश्यक असतेही. पण ते कधीच पुरेसे नसते. उपाय शोधले पाहिजेत. विधायक आणि व व्यवहार्य पर्याय शोधले पाहिजे. शिमगा जातो आणि कवित्व रहाते असे म्हणतात. पण सध्या अंतहीन शिमगा चालू झाला आहे आणि तो इतका यांत्रिकपणे द्विधृवीय झाला आहे, की त्यात ज्याला चांगल्या अर्थाने कवित्व म्हणावे अशी तरलता कोठून सापडणार? पण दिशाहीनता देखील परवडण्यासारखी नाही. उदाहरणार्थ जो हिंदुत्ववादी नाही पण विकासवादी मात्र आहे त्याने काय करायचे?


Sunday, December 25, 2016

आपण मेंदूचे गुलाम? नव्हे. तर मालक!


एखाद्या सांगकाम्याने शब्दशः अर्थ घेऊन घोळ घातला तर वरिष्ठ त्याला म्हणेल की अरे जऽऽरा डोकं चालवलं असतंस तर----. पण वरिष्ठ असे म्हणू लागताच त्याने मी कोण डोकं चालवणार साहेब डोकंच मला चालवतंय असे उत्तर दिले, तर जो वैताग येईल तोच वैताग, प्रगत मेंदुविज्ञानाचे काही निष्कर्ष ऐकून दार्शनिक जडवादाचा विजय झाला आहे असे समजणायऱ्या काही मंडळींनी आणलेला आहे.

हमको मिटा सके ये जमानेमे दम नही| जमाना हमसे खुद है जमानेसे हम नही||
या चालीवर हमको नचा सके ये मेंदूमे-------”  असे म्हटले पाहिजे. करता करविता तो आहे. आपण त्याच्या कळसूत्री बाहुल्या! या धारणेत, फक्त ईश्वर काढून मेंदू घातला की ठरलोच आपण विज्ञान-निष्ठ, असे मानणे म्हणजे विज्ञानही समजले नाही आणि मी ही समजला नाही एवढेच दिसून येते.

अगदी सेव्हन हॅबिट्सवाला कोवे सुध्दा सुरवातच अशी करतो की, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स च्या मध्ये, रिस्पॉन्स निवडणारे आपण असतो. म्हणून आपण घटनाक्रम बदलू शकतो आणि स्वतःलाही बदलू शकतो. बाह्य निसर्गाबाबत, उदा. आत्ता वाळवून ठेवले तर नंतर खायला मिळेल, अशी पोस्टपोनमेंट करता येते., तशीच शरीर-अंतर्गत निसर्गाबाबतही करता येते. आत्ता मी काही बोलणार नाही पण नेमकी वेळ आल्यावर सुनावल्याशिवाय सोडणार नाही असे ठरवून, सुनावताना लागणारा आवेशही, आपण नेमक्या वेळेसाठी राखून ठेवू शकतो. ही पोस्टपोनमेंट करताना आपण शरीर-अंतर्गत निसर्गात इन्होवेशन करत असतो.  

मी निर्णय घेतो, रेटून तडीला लावतो आणि त्याची जबाबदारी घेतो या, मानवी भावविश्वातील अनिवार्य अशा घटिताला, एक शारीरिक व विशेषत्वाने मैंद्विक बाजूही असते, हे कोणीच नाकारणार नाही. पण यावरून या गोष्टीचे वर्णन मेंदू निर्णय घेतो असे करणे अनुचित आहे. मेंदू जरी झाला तरी, तो म्हणजे एखादे, निर्णय घेणे या अर्थाची क्रिया करणारे व प्रयोजन-भान असलेले अस्तित्व, (टेलिओलॉजिकल एन्टीटी), नाही. मेंदूत अनेक विकल्प शक्य असणाऱ्या प्रक्रिया घडू शकतात व त्या पैकी काही प्रक्रियांचे पर्यवसान, इतर विकल्पात न होता, विशिष्ट विकल्पात होते एवढेच म्हणता येईल. अन्यथा, नुसता फ्यूज उडाला असे न म्हणता तारा जळतील इतका प्रवाह वाहण्याची शक्यता निर्माण होताच ते न होऊ देण्यासाठी फ्यूजने आत्मसमर्पण केले असे म्हणण्यात जी चेतन-गुणोक्ती केली जाते तीच मेंदू बाबत केली असे होईल. कम्प्युटरजी ये आन्सर लॉक कीजीये असे अमिताभ गमतीने म्हणतो, तेव्हा सर्वांना हे माहीत असते की निर्णय हा खेळाडूनेच घेतला आहे आणि तो फायनल म्हणून नोंदविण्याचे काम कोणीतरी ऑपरेटरजीच करणार आहे.

दृष्टीने होणारी सृष्टी : आय डीम देअरफोर इट सीम्स
जीवनाच्या भाषेतील भावप्रत्ययाला जोडून असणारे विज्ञानाच्या भाषेतले जडघटित बदलले तर भावप्रत्यय बदलतो ही बाजू जडवादी लोक ध्यानात घेतात. पण नेमकी उलट प्रक्रियाही घडविता येते हे मात्र ते विसरतात. जीवनाच्या भाषेतली गरम वस्तू म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत जिचे रेणू जोरात कंप पावत आहेत अशी वस्तू. आपल्याला थरथर जाणवत नसून गरमपणाच जाणवतो. आपण गरम वस्तू गार करण्यासाठी तिला गार वस्तूच्या संपर्कात आणतो आणि ती गार होतेही. हेच विज्ञानाच्याच्या भाषेत असे म्हणता येईल की, अधिक कंपायमान वस्तुतील गती-उर्जा कमी कंपायमान वस्तूत जिरते. आपण पिवळा आणि निळा रंग मिसळून हिरवा बनवू शकतो हीच गोष्ट अमूक फ्रिक्वेन्सी परावर्तित करणारी रेणूंची रचना बदलून------- असेही म्हणता येईल. तसेच आपण तार लावताना ती स्वराशी लावतो, कंपद्रुती(फ्रिक्वेन्सी)शी नव्हे. पण मग यामुळे तिची कंपद्रुती निश्चित होते की नाही? अर्थात होतेच. 

थोडक्यात जीवनाच्या भाषेतले भावप्रत्यय आणि विज्ञानाच्या भाषेतली जडघटिते यांच्यात समकक्षता(कॉरस्पॉंडन्स) असते; एकस्वरूपता(आयडेन्टिटी) नव्हे.
हे जसे शरीरबाह्य जड जगाबाबत खरे आहे तसेच ते शरीरांतर्गत जड-जगाबाबतही खरे आहे. पोटात गोळा येतो हेही खरे आणि अड्रेनलीन पंप होते हेही खरे. धक्कादायक बातमी ही अफवा होती असे कळताच हुश्श होते जीवात जीव येतो हेही खरे आणि स्ट्रेस रीलीजिंग हार्मोन स्रवते हेही खरे.  

कृत्रिम-हास्य-क्लब हे तेव्हाच यशस्वी होतात की जेव्हा त्या खोटे हसणाऱ्यांना खरे हसू येऊ लागते व खऱ्या हास्याशी समकक्ष अशी जी काही जैवरासायनिक घटिते असतील तीही त्यांच्या मेंदूत व ग्रंथीत इ. ठिकाणी घडतात. विनोदामुळे हसणे, एन.टू.ओ(लाफिंग गॅस) मुळे हसणे आणि कृत्रिम-क्लब मधले हसणे यात फरक नक्कीच आहेत(त्यापैकी विनोदामुळे हसणे हे उत्तम असे माझे वैयक्तिक मत आहे) पण साम्येही आहेतच. (लहान मुलांचे काही डेंटिस्ट मुलांना चक्क सोम्य एन.टू.ओ(लाफिंग गॅस) देतात. त्यामुळे मूल रिलॅक्स्ड राहून व चुळबुळ न करता दातांवरचे काम करू देते. ही एक अधिकृत व मान्यताप्राप्त पद्धत आहे.

विविध भावनांचे आकार(फॉर्म्स) तेच असतात व त्यांची मैद्विक बाजू समान प्रकारची असते पण या भावनांचे आशय काय असतील हे चिन्हमय जगातल्या संदर्भांवर अवलंबून असते. एम्बरॅसमेंटने उदा. भिवईच्या वर दुखणे, हे दोन व्यक्तीत समान असेल पण कोणाला कशाची एम्बरॅसमेंट वाटेल याचा आशय अगदीच वेगळा असेल. आणि मुख्य म्हणजे हा आशय मैंद्विक टर्म्समध्ये रिडयूसिबल नसेल.

इतकेच नव्हे तर एखाद्या जास्त वयाच्या व्यक्तीने, जरी नव्याने वाद्य शिकायला घेतले आणि भरपूर रियाझ केला, तरी तिच्याही कानांशी तसेच हात-बोटे यांच्याशी संबंधित मेंदू-पेशींचे चक्क रीवायरिंग होते. म्हणजेच जाणिवेतल्या निर्णयांनी मेंदूचे हार्डवेअरसुध्दा बदलता येते. अर्थात आपण रीवायरिंग करत आहोत अशी जाणीव मेंदू-विज्ञानाच्या अभावी नसे पण आता ती होईल. म्हणजेच, कारण-संबंध म्हणून पहाता जाणीवेतून जडात, असेही कारणत्व नेहमीच अस्तित्वात होते. पॅरॅलिसीसच्या रुग्णांना जर फिजिओथेरपी करायला प्रेरित केले तर त्यांच्या मृत नर्व्हज् चे काम जिवंत नर्व्हज् स्वतःकडे घेतात. तसे पहाता फिजिओथेरपी हा हस्तक्षेप शारीरच आहे पण त्यासाठीची मनःपूर्वकता(सिन्सिरीटी) निर्माण होईल की नाही हे ती व्यक्ती जाणीवेत काय धारणा बाळगून आहे यावर अवलंबून असणार आहे. यावर तुम्ही पण त्या धारणा रुजण्यासाठी आवश्यक अशी मेंदू-वैशिष्ट्ये होतीच की असे म्हणू शकाल व त्यावर मीही म्हणेन की ती मेंदू-वैशिष्ट्ये शाबूत राखण्यासाठी त्या व्यक्तीने लहानपणापासून घेतलेले जाणिवेतले निर्णय कारणीभूत आहेत. ही अनवस्था किंवा चक्रीयता टाळता येणार नाही कारण ती खरी आहे. जाणीवेने अंतर्गत जडाला घडविणे ही बाजू वजा करून चालणार नाही एव्हढेच मी म्हणत आहे. अंतर्गत जड-वैशिष्ट्ये जाणीव घडविण्यात योगदान करतच नाहीत असे माझे अजिबात मत नाही.

आपले संवेद्य-प्रत्ययसुद्धा (पर्सेप्शन्स) आपण ठरवून बदलू शकतो. पूर आलेल्या नदीच्या पुलावर उभे राहून नदीकडे पाहिले की कधी पूलच हलतो आहे असा विचित्र प्रत्यय येतो. तर कधी पूल स्थिर आहे व नदीच हलते आहे असा वास्तवोचित प्रत्ययही येतो. हे का होते आहे याचे बौद्धिक आकलनही होते. पण विशेष महत्त्वाचे असे की आपण त्या दोहोंपैकी कोणता प्रत्यय यावा हे ठरवू शकतो. पूल हलतोय असे बघायचे ठरविले तर तसे दिसते आणि नदी हलतेय असे बघायचे ठरवले तर तसेही दिसते.
कागदावर काढलेले एलिप्स हे कागदाच्याच(वा समांतर) पातळीतल्या एलिप्सचे चित्र आहे की तिरक्या नजरेने पाहिलेल्या वर्तुळाचे चित्र आहे हे इतर संदर्भ न मिळाल्यास ठरविताच येणार नाही. असेच ठोकळा की कोपरा? वगैरे अनेकार्थी आकृत्यांचे आहे. फिगर कुठली व बॅकग्राउंड कुठली हे ठरवून एकाच चित्रात दोन भिन्न चित्रे (चेहेरे की प्याला, म्हातारी की तरणी वगैरे) बघता येतात. प्रत्यय हा अर्थपूर्ण असतो. एकच संवेद्य हे अनेक अर्थांनी प्रत्ययाला येते. आय डीम देअरफोर इट सीम्स असे हे अनुभव असतात.

असेच भविष्यकालीन घटनांच्या कल्पितांचे वर्तमानात येणाऱे प्रत्ययसुध्दा आपण ठरवून बदलू शकतो. जेव्हा आपण एखादा हट्ट सोडून देतो तेव्हा हा अनुभव येतो. हट्ट असताना आपण अपयशाने होणारया फजितीचेही प्रतिमा-रंजन करत असतो. हट्ट पुरा न झाल्यास, आपले हितचिंतक, हितशत्रू, स्पर्धक किंवा ज्यांनी आपल्या यशावर आंस लावली आहे असे लोक व बघे लोक यांचे चेहेरे कसे होतील याच्या प्रतिमाही आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात. हट्ट सोडल्या क्षणी सगळेच चित्र बदलते. त्याचवेळी या काल्पनिक भीतीमुळे घडणाऱ्या सर्व शारीर/मैद्विक गोष्टीही बदलतात. मोकळा श्वास, इतर गोष्टीत रस वाटून येणाऱ्या अनुकूल संवेदना, हार्मोन्स, मेंदूतील वाहक-रसायने या सगळ्याची वस्तुनिष्ठ रीडिंगज् देखील बदलतात. त्या हट्टाच्या अनावश्यकपणाचा बोध होण्याचा क्षण सगळी कलाटणी देतो. इतकेच नव्हे तर, हट्ट चालू राहावा यासाठी हा बोध टाळला जाईल असे युक्तीवादही आपण मनातल्या मनात करत होतो व ते फसवे होते, हेही आपल्याला उमगते. मानसिक आजारात औषधोपचारांनी मेंदूतील रसायने, इतर हार्मोन्स आणि शारीरिक मापदंडातही जे फरक पडतात, तेच फरक वर्तनात्मक उपचार, बोधात्मक उपचार, योगसाधना या जाणीवेच्या अंगाने केलेल्या बदलांमुळेही पडतात. (अर्थात याला मर्यादा आहेत, तीव्रतेनुसार व शारीर कारणे असल्यास औषधोपचारच लागतात.)

निर्णय ही घटना मेंदूत अगोदर घडते आणि आपल्याला नंतर कळते?
आधीची घटना ही नंतरच्या घटनेमुळे कशी घडू शकेल? हा वर वर पहाता बिनतोड वाटणारा युक्तिवाद वापरून मेंदुवाद्यांनी खळबळ माजवली आहे. या प्रयोगात माणूस निर्णय होताच एक बटन दाबतो पण त्याच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये निर्णयाची झळाळी अगोदर दिसलेली असते.  पण हे दाखवले जाते तितके चमत्कारिक नाहीच.

उदा. वीज अगोदर चमकते, गडगडाट नंतर ऐकू येतो. जर कोणी गडगडाटामुळे वीज चमकते असे मानले तर त्याला कारण-नंतर व कार्य-अगोदर या विसंगतीत पकडता येईल. पण आपल्याला हे माहीत आहे की या घटना दोन नसून ती एकच घटना आहे. प्रकाशाचा वेग हा ध्वनिच्या वेगापेक्षा फारच जास्त असल्याने दृक-प्रत्यय आधी येतो व श्रुत-प्रत्यय नंतर येतो. तद्वतच निर्णय व्हायला लागणारा वेळ आणि त्याचे आकलन होऊन तो द्यायला लागणारा वेळ यात फरक पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आकलन हे इतर अनेक धारणांमध्ये सुसंगत ठरून व्हावे लागते. अनुमोदन मिळून निर्णय पास होताना त्याचे आकलन पुरे होत असते. अनेकजण गुंतलेले असतानाचा निर्णय हा आपण दृष्टांत म्हणून घेऊ. फॉंर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतात इतर खात्यांच्या एन.ओ.सी.ज् घ्याव्या लागतात. समोरच्या पार्टीला आपला प्रस्ताव पटणे आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंट हाती पडणे यात वेळ जातोच. साहेबांनी हो म्हटलेलंच आहे ही बातमी प्युनने फोडायची नसते! मेंदूचा स्कॅन करणाऱ्या चुंबकीय लहरी तोंडाळ प्युनचे काम करतात व त्यामुळे स्वतःच्या’ अगोदर शास्त्रज्ञांना बातमी लागते. ही बातमी त्यांनी बातमी म्हणून छापायला काही हरकत नाही. पण ते त्याच अंकात निर्णाता मी हा केवळ एक भास असा अग्रलेखही ठोकायला लागले तर त्याला माझा आक्षेप आहे. 

निर्णायक  मज्जापेशींमध्ये फ्लॅश होणे आणि इतर सर्व मज्जापेशींकडून तो फ्लॅश पचवला जाणे यात दुसरी प्रक्रिया वेळखाऊ आहे. आकलनाला कॉम्प्रिहेन्शन’ म्हणतात ते उगीच नाही ते एकुणात(कॉम्प्रिहेन्सिव्हली) व्हावे लागते. दुसरे असे की स्कॅनमध्ये फ्लॅश पडण्या अगोदरपासून अनिर्णीत काळातली दोलायमानता(अम्बिव्हॅल्न्स) किंवा ही केस कशात मोडते या माहितीचा शोध(स्क्रुटिनी) या गोष्टी चालू नसतात की काय? ही दोलायमानता व स्क्रुटिनी भोगणारा मी म्हणजेच निर्णाता मी. तो कार्यरत असल्याचे चित्र स्कॅनमध्ये अगोदर पासून दिसत नाही काय?  म्हणजे  शोध, दोलायमानता, निर्णायकता आणि आकलन हा कालक्रम तर अजिबात मोडला गेलेला नाहीये. त्यामुळे काळाच्या संदर्भात उलट्या दिशेने कारणत्व हा त्या प्रयोगाचा योग्य निष्कर्ष नसून गैर-अर्थ-लावणे (मिसइंटरप्रिटेशन) आहे.

याखेरीज मेंदू अगोदर ठरवतो या मताला माझा आणखी एक स्वतंत्र आक्षेप आहे. पुन्हा आपण, निर्णयात अनेकजण गुंतलेले असतानाचा दृष्टांत घेऊ. समजा मला हे खात्रीने माहीत आहे की उदाहरणार्थ दर पौर्णिमेच्या दिवशी मी अनावर होऊन एक खून करणारच. एरवी मी सज्जन आहे. मी माझ्या हितचिंतकांना सांगेन, की त्या दिवशी मला कोंडून ठेवा मी कितीही आरडाओरडा केला तरी अजिबात सोडू नका. आता त्या दिवशी मी मनासारखे वागायला स्वतंत्र नसेन. पण हा माझाच निर्णय असेल व म्हणूनच एकूण घटनेचा निर्णाता मीच असेन. ही टोकाची परीस्थिती झाली म्हणून त्यात इतरांचे साह्य लागले. परंतु, मला ऐन प्रसंगी कोणते मोह होतात हे ओळखून, मी माझ्या उत्स्फूर्ततेला एरवीच काही वळण लावून ठेवतो. ऐन प्रसंगी म्हणाल तर मी या मीच लावलेल्या वळणाला वश असतो व त्या क्षणी स्वैर नसतो. पण एकुणात मी स्वनियंता असतो व म्हणजेच स्वतंत्र असतो. मी माझ्या इन-व्हॉलेंटरी(वस्तुतंत्र) अंगाला (नेणीव हा शब्द टाळावा) व्हॉलेंटरीली (पुरुषतंत्ररित्या) घडविलेले असते. मी माझ्याच शिस्तीचा गुलाम असल्यामुळे मला आकलन व्हायच्या आधीच माझा निर्णायक प्रतिसाद उमटेल व नंतर मी त्यावर शिक्कामोर्तब करीन. याही मार्गाने आपण, स्कॅनमध्ये फ्लॅश अगोदर पडणे आणि कळूनसवरून बटन नंतर दाबले जाणे, या गोष्टीला फ्रीविल नसल्याचा पुरावा म्हणून बाद ठरवू शकतो व मेंदुनियततावादी मताचे खंडन करू शकतो. खरेतर फ्रीविल या शब्दातल्या फ्री मुळे मुक्त हा चुकीचा शब्द घेतला जातो. खरा प्रश्न व्यक्त करण्यासाठी ऑटोनॉमी=स्वयम्-नियामकता हा अधिक योग्य शब्द आहे व त्यातही परफेक्ट-ऑटोनॉमी अभिप्रेत नाही. आपली स्वयम्-नियामकता बाह्य रेट्यांपुढे(जसेकी सत्तेपुढे शहाणपण) व अंतर्गत रेट्यांपुढे(जसेकी व्यसन सोडता न येणे) अनेकदा थिटी पडते हे तर उघडच आहे. पण थिटी पडणे आणि मुदलातच नसणे (किंवा आभासी असणे) या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.

त्याने त्याप्रसंगी जे केले त्यापेक्षा तो तेव्हा वेगळे करू शकला असता(च) का?
सध्याचे कडवे इहवादी सॅम हॅरिस यांनी त्यांच्या ब्लॉगवर फ्रीविलचे अस्तित्व नाकारून मोठाच धक्का दिलेला आहे. अत्यंत क्रूर गुन्ह्याचे वर्णन करून, माझे मलाच कळले नाही की मी हे कसे करू शकलो? असे उद्गार देऊन व त्या गुन्हेगारावर बालपणी कसे अत्याचार झालेले होते हे सांगून हॅरिससाहेब म्हणतात. अणू अणू पर्यंतचे तपशील चोख पाळून जर माझ्यातील अणूंपासून तो गुन्हेगार बनवला तर मीही तेच करेन की जे त्याने केले. अहो पण जर अशी सर्वांशाने अदलाबदल झाली तर तुम्ही सॅम हॅरिस असणारच नाही आहात. तुम्ही तोच असणार आहात याचे काय? तुमच्या मेंदूत उभवलेला जाणीव-स्वरूप सॅम हॅरिस तसाच राहून अदलाबदल केली तर तुमच्यावर बालपणी अत्याचार झालेले असणार नाहीयेत. तुम्ही त्याच्या जागी असतात तर या प्रश्नाला कट्टर-चिद्वादी विनोबाजींनी बऱ्याच काळापूर्वी अगदी हेच उत्तर दिले होते. सर्वांशांनी त्याच्या जागीचा मी म्हणजे तोच! मी नव्हेच.

जेव्हा आपण एखादा माणूस वेगळी निवड करू शकला असता असे म्हणतो त्या वेळी आपल्याला तसे सिध्द करण्याची जबाबदारी येते काय? त्याला इतर कोणी दमनाने भाग पाडले नव्हते ना इथपर्यंत आपण(निदान सिद्धांततः) जबाबदारी घेऊ शकतो. पण तो माणूस त्याच्या आंतरिक निसर्गाच्या किती आधीन असेल आणि त्यावर कितपत स्वार असेल यावर बाहेरून फार खात्रीने बोलू शकत नाही. पॅट्रिका चर्चलँड यांनी ब्रेन ट्यूमरचा दाब पडून लैंगिक विकृती उद्भवल्याचे व त्यातून स्वतःच्याच आठ वर्षाच्या मुली वर बलात्कार केल्याचे उदाहरण दिलेले आहे. मुद्दा असा आहे की अनावर होऊन स्वतःवरील ताबा सुटण्याअगोदर त्या व्यक्तीला दुविधा जाणवलीच नव्हती काय? ट्युमर होण्या आधी त्याची जी स्व-प्रतिमा होती, आपलीच आठ वर्षाची मुलगी हे जे भान होते त्यामुळे त्याला काहीच अडथळा आला नाही? केस स्टडीत असे तर कोठे म्हटलेले नाही. ट्यूमर नसलेल्यांनाही, जर पश्चात्ताप होत असेल तर, त्यांचीही त्यांना नको ती प्रेरणा वरचढ ठरलेलीच असते. स्व-निर्णातेपण असणे म्हणजे नेहमीच ते यशस्वी ठरणे असे कोणीच म्हणणार नाही. 

जेव्हा अयशस्वी ठरते तेव्हा ते स्व-निर्णातेपणच नव्हे असे जर मानले तर मग कोणत्याही गुन्ह्याला नेहमीच इनसॅनिटी-डिफेन्स मान्य करावा लागेल. जसे मला कायदाच माहित नव्हता हा डिफेन्स (प्लीडिंग इग्नरन्स) चालत नाही तसाच  माझ्यातील निसरड्या जागा मला माहीतच नव्हत्या हाही डिफेन्स चालणार नाही. शिक्षेची तीव्रता ठरविताना गुन्हेगाराचे त्याच्या हातून गुन्हा घडण्यामागचे दुर्भाग्य हे जमेस धरता येईल. पण दोषी ठरविणे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता लावणे, आणि शक्य असल्यास बळी ठरलेल्यांना भरपाई पुनर्वसन देणे, इतकेच नव्हे तर गुन्हेगाराला सक्तीने वैद्यकीय उपचार देणे व त्याचेही पुनर्वसन करणे हे सारे न्यायप्रक्रियेत असावेच लागेल.. सूडाचे समाधान मिळवू नये हे तत्त्व तर मेंदू-विज्ञानाचा अजिबात पत्ता नव्हता तेव्हाही योग्यच होते. पण स्वतःच्या दुर्भाग्यापोटी, दुसऱ्यावर दुर्भाग्य लादण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकत नाही हे निश्चित. कोणत्याच न्यायदानाने वा उपचाराने, झालेल्या गुन्ह्याच्या वेळचा स्व-निर्णातेपणा, काळात मागे जाऊन सुधारता येत नाहीच. पुढे होणार असलेले गुन्हे टाळता येण्यासाठी आत्ताच काही बाह्य बंधने आणि आंतरिक उपचार करून ठेवणे हाच खरा मुद्दा आहे. तसेच एखाद्याने चांगले काम केले असेल तर ते काही त्याने पारितोषिकाच्या वा सन्मानाच्या आशेने केले असेल असे नाही. पण काय म्हणजे चांगले याचा सार्विक कौल देण्यासाठी पारितोषके वा सन्मान दिले जातात. तेव्हा तो वेगळे वागू शकला(च) असता हे सिध्द करायची ना आवश्यकता आहे ना शक्यता.

फ्रेडरिक हायेक या विचारवंताने त्याच्या कॉंन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी या ग्रंथात मार्मिक मांडणी केलेली आहे. हायेकच्या मते मुळात चिद्वाद्यांनी एक घोळ घालून ठेवल्याने जड-नियति-वाद्यांचे फावले आहे. हायेकच्या मते तो घोळ असा, निर्णाता-स्व हा जर कार्यकारण भावाच्या कक्षेत असेल व प्रभावाखाली असेल तर मग तो स्व-निर्णाता राहणारच नाही व जबाबदारी घेणे या गोष्टीची शक्यताच राहणार नाही. जर जबाबदारी घ्यायची असेल तर निर्णाता-स्व हा कार्यकारण भावाच्या बाहेर राहणारा प्रभावमुक्त-अतीत-आत्मा असायला हवा हायेकच्या मते उलट निर्णाता-स्व हा अतीत-आत्मा नसून तो कार्यकारणभावाच्या कक्षेत येतो म्हणूनच तो सुधारण्याची आशा असते!  हायेक म्हणतो की अनावर होणे/ढेपाळणे हा दोषच मानला पाहिजे. स्वतःला आवरता आले नाही तर शिक्षा होते किंवा निदान निंदा होते या अनुभवातूनच माणूस स्वतःला आवरायला शिकतो. तेव्हाचा जो तू होतास तो तू कदाचित तेच करू शकत होतास की जे तू केलेस. मग तरीही मी तुला कां झापतो आहे? तेव्हाचा तू हा न झापलेला तू होतास. आता झापल्याने तुझ्यावर काहीतरी परिणाम होईल व यापुढे तत्सम प्रसंग आला तर झापलेला तू वेगळा असशील व वेगळे करशील या आशेने मी तुला झापतो आहे. तू जर निंदा-स्तुती, लाज-गौरव, शिक्षा-बक्षीस या साऱ्यापासून अविकारी राहणारा असा आत्मा असतास तर नैतिक निवाडयांना व्यवहारात अर्थ उरला नसता. तू कार्यकारणभावाच्या पार नाहीस हेच बरे आहे! हायेकने तो तेव्हाच वेगळे वागू शकला असता (च) का? या, काळाला रिवाईंड करून वेगळ्या घटनाक्रमाने फास्ट फॉरवर्ड करायला भाग पाडणाऱ्या, प्रश्नापासून नैतिक निवाडे देणे या मानवी व्यवहाराची अशी सुटका केली आहे.[कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी ग्रंथातील रिस्पॉन्सिबिलिटी हा चॅप्टर]

आंतरिक-स्वातंत्र्याबाबत असेच म्हणता येईल. आपल्याला पूर्णतः आंतरिक-स्वातंत्र्य असते असे (अस्तित्ववादी वगळता) कोणीच मानत नाही. निवड करताना जे द्वंद्व अनुभवास येते ते द्वंद्व जर आपण पूर्णतः निसर्गाधीन असतो तरी आले नसते आणि उलटपक्षी जर आपण पूर्णतः स्वाधीन असतो तरी आले नसते. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती नव्हे. तर स्वातंत्र्य म्हणजे बंधनातील वाव वापरून नव्या प्रसंगीच्या बंधनांची निवड करण्याची/तसा कौल देण्याची संधी( किंवा कौल देण्याचे संकट) होय. ही मानवी स्थिती, भौतिक खुलासा होऊ शकण्याने टळत नसते व एकेकाळी भौतिक खुलासा नव्हता, म्हणून ती उद्भवली होती, असेही नाही.

अनुल्लंघ्य नियमबद्धता म्हणजे आधीच लिहून ठेवलेले कथानक नव्हे.
टळलेल्या, टाळलेल्या वा सोडून द्याव्या लागलेल्या, म्हणजेच प्रत्यक्षात न आलेल्या शक्यता या अस्तित्वातच नसतात कारण त्या होत्या तेव्हा केवळ शक्यता म्हणून होत्या व आता त्या शक्यता म्हणूनही शिल्लक नाहीत. हा एक फसवा युक्तिवाद आहे. केलेली निवड हा इतर विकल्पांचा त्याग असते पण त्यामुळेच ती काहीएक किंमत देऊन केलेली निवड असते. सोडलेले लाभ वा टाळलेली हानी यांचे मूल्य खरे असते. कारण त्यांच्याशी तुलना केल्याशिवाय माणसाला त्याने केलेली निवडही मूल्यवान वाटणारच नसते. मूल्य ही निसर्गविज्ञानाची विषयवस्तूच नव्हे. त्यामुळे जड-जगातल्या घटना म्हणून जरी त्या कधीच घडलेल्या नसल्या तरी जीवनचरित्रात त्या न घडलेल्या म्हणून असतातच. नियतिवादी मंडळी भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात जी असममिती आहे तिचा गैरफायदा घेतात. ज्या अर्थी घडले आहे त्या अर्थी त्यासाठी पुरेशी कारणे उपस्थित होतीच व ज्या अर्थी पुरेशी कारणे उपस्थित होती त्या अर्थी ते घडणारच होते. यातून जे व्हायचे असते ते झाल्याशिवाय रहात नाही या लाडक्या मताप्रत ते पोहोचतात.(मग टाळण्याची धडपड करताच कशाला? बघत राहा ना!) मी उलट असा प्रश्न विचारतो की घडणारच असणे या क्रियापदाचा काल कोणता. भूतकाळात ज्या अर्थी ते घडले नव्हते त्या अर्थी पुरेशी कारणे जमा झालेली नव्हती म्हणजेच ते घडणारच होते असे नाही. आता ते घडणारच असणे शक्यच नाही कारण ते अगोदरच घडलेले आहे आणि प्रत्यक्ष घडत होते तेव्हा ते घडणार-असणारे नसून घडत-असलेले असणार. त्यामुळे घडणारच असणे हे कोणत्याच काळात नसते.

एखादी अगदी निरपवादपणे नियमबध्द अशी व्यवस्था असली तर त्या व्यवस्थेत नव्या व वेगळ्या अशा काही घटनाच घडू शकत नाहीत असे मानायचे काय कारण आहे? बुद्धिबळाचे नियम तंतोतंत पाळून काय एकच एक डाव पुनःपुन्हा घडत रहातो? किंबहुना इतक्या प्रचंड संख्येने संभाव्य डावांना वाव असतो की त्यामुळेच हा खेळ संपलेला नाही. तो चालूच आहे. पूर्णपणे व्हॅलिड-मूव्ह ही अत्यंत स्टुपिड मूव्ह असू शकते. अशी कल्पना करा की एका निरीक्षकाला फक्त व्हॅलिड की इनव्हॅलिड? एव्हढेच कळू शकते आहे. तो म्हणतो की काय तेच तेच चालवलय. केव्हाही पहा, तुम्ही तंतोतंत तेच नियम पाळत आहात’. आता बुद्धिबळाच्या जागी निसर्ग आणि रंगतदार डावांच्या कथेच्या जागी इतिहास (जीवोत्पत्तीचा, मानवोत्पत्तीचा, मानवी वगैरे) ठेवून बघा. म्हणजे विज्ञानाच्या विजयाला नियतिवादाचा विजय समजणारे लोक, कोणत्या प्रकारची चूक करत आहेत, याचा काहीसा अंदाज येईल (हा फक्त दृष्टांत आहे. निसर्ग-नियमांच्या बाबतीत बनविणे, पाळणे, मोडणे, बदलणे अशा गोष्टींचा प्रश्नच नसतो)
निसर्ग हा कारणबद्ध असण्याने त्यात ऑप्शन्सच राहणार नाहीत हे म्हणणे खोडून काढायला फार वरच्या दर्जाचे सिद्धांतन अजिबात आवश्यक नाही. एकाच मोमेंटमने  सोडलेले तोफगोळे हे दोन मार्गांनी (क्वाड्रॅटिक इक्वेशन ला दोन उत्तरे असल्याने) जाऊ शकतात व यामुळे तटावरून पलीकडे मारा करणारी उखळी तोफ आणि तटावर मारा करणारी कुल्पी तोफ हे ऑप्शन्स असतात एवढेच उदाहरण यासाठी पुरेसे आहे.

निसर्ग-नियम हे कितीही समजले तरी नुसत्या नियमांपासून प्रत्यक्ष घटितांची भाकिते करता येत नाहीत. कोणताही नियम जर वापरायचा असेल तर त्यात आरंभिक स्थिती(इनिशियल कंडिशन्स) दिलेल्या असाव्या लागतात आणि या आरंभिक स्थिती नेहमीच ऐतिहासिक असतात, वैज्ञानिक नव्हेत. पृथ्वीवर पाणी आहे हे एक आपातिक (कंटिंजंट) तथ्य आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हेही एक आपातिक (कंटिंजंट) तथ्य आहे. अशा अनेक दिलेल्या गोष्टी घेऊनच विज्ञान मांडावे लागते. 

निसर्गाचा इतिहास ही गोष्ट निसर्गनियमांचा व्यूह या गोष्टी पेक्षा अगदीच वेगळी गोष्ट आहे. मोठे रेणू झाले, स्व-मुद्रक रेणू झाले, जनुके झाली, त्यांनी जीव बनवले( जनुके हेतुपूर्वकपणे काही करतात अशातला भाग नाही. पण येथे व पुढे आलंकारिक भाषा वापरून आपण त्याना कर्तेपण बहाल करीत आहोत), बराच काळ जीवांवर जनुकांचे थेट नियंत्रण राहिले, मग जनुकांनी सगळा खटाटोप स्वतः करण्यापेक्षा मेंदू नामक पेशवा नेमला व जनुके मुख्यतः आपली गादी चालवत राहिली. बा मेंदवा! कसेही करून आमचे संतान(सातत्य)चालू ठेव मग त्यासाठी लागेल ते कर (जास्तच आलंकारिक). मेंदूतील प्रक्रिया तगण्यापुरती न राहता तिला स्वतःचीच भिंगरी लागली. गरज नसताना गोष्टी कल्पिल्या जाऊ लागल्या. कल्पिते आकर्षक वाटू लागली आणि महाराजा काय सांगावे? प्रयोजनांसाठी वखवखलेला मनुष्य नामक दुष्ट प्राणी की हो बनला. त्याने चिन्हांचे जग रचले. चिन्हांसाठी तो मरू मारू लागला. एकूण काय तर आपली केस ही निसर्गदेवाच्या पार हाताबाहेर गेलेली केस आहे. या कथेतील तात्पर्य असे की हे जरी मेंदू जड-जगातलाच असला तरी मानवी भावविश्व हे जड म्हणून उलगडता येणारे नाही. जसे सजीव हा वस्तूही असतो पण वस्तूचे नियम त्याला पुरेसे नसतात. तसाच माणूस हा प्राणीही असतो पण प्राण्याचे नियम हे त्याला पुरेसे नसतात.

जेव्हा जेव्हा साध्या घटकांपासून उच्चतर पातळीवरचा संघात(कॉम्पोझिट) बनतो तेव्हा तेव्हा त्या संघाताला असे काही उद्भूत-गुण(इमर्जन्ट प्रॉपर्टीज्) लाभतात की जे निम्न्तर घटकांच्या गुणांत घटविता येत नाहीत. तरीही ते तसे घटविण्याचा अट्टहास म्हणजे रिडक्शनिझम(निम्नघटनवाद) होय. विज्ञानाने विश्लेषण करायचे असते निम्न-घटन नव्हे.

यामुळेच कारणमीमांसा ही कितीही केली तरी ती प्रयोजनमीमांसेची जागा घेऊ शकत नाही.
वरिष्ठ-अरे काल माझी बी पी ची गोळी घ्यायची राहून गेली होती त्यामुळे मी तुझ्यावर जास्तच भडकलो
कनिष्ट-चालायचच साहेब. पण मी जो मुद्दा मांडला होता तो तुम्हाला आता पटतोय की नाही?
साहेबाच्या क्रोधाची मात्रा(डिग्री) अनाठायी कां होती याची कारणमीमांसा मिळाली पण क्रोधाचा आशय योग्य होता की अयोग्य याचे उत्तर मात्र असे मनो-वैग्यानिक(हिंदी) असून चालणार नाही. आशयासाठी प्रयोजन मीमांसाच लागेल. कनिष्ट सुचवत होता तो मार्ग कंपनीच्या उद्दिष्टांशी जास्त सुसंगत होता काय? कंपनीची उद्दिष्टेच चुकत होती की काय? ही प्रश्न-मालिका कशासाठी ची प्रश्न-मालिका आहे. ती कशामुळे च्या भाषेत बोलताच येणार नाही.

उदाहरणार्थ स्वतःच्या प्राणांचे बलिदान करावयास तयार असणाऱ्यांचा मनःपिंड हा एका प्रकारचा असेल व तो तसा का बनला याची कारणे जमेल तितकी शोधताही येतील. पण ज्या प्रयोजनासाठी हे बलिदान दिले जात आहे ते प्रयोजन मानव-हिताचे आहे किंवा कसे याचे उत्तर कधीच मनःपिंड असा कां बनला? यांच्या कारणांमध्ये सापडणार नाही. हे दोन विषयच किंबहुना आयामच अगदी वेगळे आहेत.

कारणमीमांसा उपलब्ध होण्याने मूळ अनुभवाच्या स्वरूपात फारसा फरक पडत नाही. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध हा विज्ञान म्हणून पहाता, जे उष्णतेतच व कोरड्या स्थितीतच जगू शकतात असे जीवाणू मरून त्यांचा प्रेतांचा जो दुर्गंध(!) पसरतो, तो असतो. पण हे ज्यांना समजले आहे त्यांचाही अनुभव सुंदरच राहतो
हिरा शुध्द कार्बनच असतो, जसे की ग्राफाईट असते. पण हे कळल्याने हिऱ्याचे आकर्षण कमी होत नाहीच उलट टेट्राहेड्रॉन रचने मुळे येणारे काठिण्य आणि षटकोनी पातळ्यांमुळे येणारी मृदुता समजण्याने दोन्हीची अद्भूतता अधिकच खुलून दिसते. या संदर्भात आपण रिडक्शनिझमने केलेला मोठा दावा तपासून पाहिला पाहिजे. तो दावा असा की,

आपल्या जाणिवेत घडणारे कोणतेही भाव-घटित हे दुसरे तिसरे काही नसून मात्र एक मेंदू-घटितच असते

भावविश्वाची स्वायत्तता आणि त्याचे मेंदुविज्ञानात न् मावणे
कोणत्याही अगदी साध्या भाव-घटिताशी समकक्ष(कॉरस्पॉंडिंग) असे बरेच गुंतागुंतीचे काही ना काही मेंदु-घटितसुध्दा अस्तित्वात असणार ही गोष्ट मान्य करता येण्याजोगी आहे. इतकेच नव्हे तर जर कोणाला आपली मेंदु-घटिते नियंत्रित करता आली तर त्या द्वारे तो हुकुमशहा आपल्या भाव-घटितांवरही नियंत्रण मिळवू शकेल अशीही कल्पना करता येईल. पण हुकुमशहा-नियंत्रित असोत वा निसर्ग-नियमित आपली भाव-घटिते ही त्यांच्या मागील मेंदु-घटितांपासून अगदीच भिन्न स्वरूपाची असतात हे कधीच विसरून चालणार नाही. तसेच जर आपण समजा पूर्णतः या डॉ. वाटवे नामक हुकूमशहाच्या कह्यात गेलो व त्याने आपल्याला, आपणच आपली प्रयोजने ठरवत आहोत असेही आपल्याला वाटवले, तर फक्त डॉ. वाटवे यांनाच असे अनुभवास येईल की इतर माणसे स्वयंनिर्णयाचा भ्रम बाळगीत आहेत. पण डॉ. वाटवे यांना मात्र, त्यांच्या कोणत्या प्रयोजनासाठी आम्हा कठपुतळ्यांना नाचवायचे, याचा निर्णय करण्यासाठी, प्रयोजनेच ठरवावी लागतील. त्यांची कारण-मीमांसेवरची फुल-टू मास्टरी त्यात त्यांना काहीही मदत करू शकणार नाही.
ही दिव्यकथा आता सोडून देऊ.

नॉर्मल माणसांचा मेंदू कसकसा विकसित होतो यातही रचना आणि कार्य यांच्या अगदी भिन्न जुळण्या संभवतात मनाचे अमूक एक कार्य हे माझा मेंदू ज्या हार्डवेअर मार्गाने साधतो त्यापेक्षा अगदीच वेगळ्या हार्डवेअर मार्गाने तेच कार्य तुमचा मेंदू साधत असेल पण यांचा प्रत्यय आपल्याला कधीच येणार नाही. कारण युजरफ्रेंडली पातळीवरच आपल्याला मनाचा अनुभव येतो मशीन-लँग्वेज मध्ये नव्हे.(दृष्टांत म्हणून घ्यावे. तसेच माझ्या हाताने ठोसा मारला मी नव्हे असे म्हणणे आणि माझ्या मेंदूने मत्सर केला मी नव्हे असे म्हणणे हे आपले एकूण अस्तित्व फक्त जड-वस्तूंच्या विश्वात ढकलणेच ठरेल.)  इतकेच काय पण माझा लाल/हिरवा हा तुमच्या लाल/हिरव्या पेक्षा प्रत्यय म्हणून वेगळाही असू शकतो. जोवर आपण पानासारखा सिग्नल हा जा या अर्थाने व रक्तासारखा सिग्नल हा थांबा या अर्थाने घेतो तोवर आपण भावविश्व शेअर करतो. समजा दोन चिंतातूर आहेत. एकाची अति-चिंता एका औषधाने तर दुसऱ्याची अतिचिंता ही दुसऱ्या औषधाने आटोक्यात येऊ शकते. पण दोघांच्या चिंतांचे आशय, हे समान असतील की भिन्न? हे त्यांना समान औषध लागू पडते की भिन्न, यावर अजिबात अवलंबून नसते. चिंतांचे आशय हे भाव-विश्वातल्या घटितांवर अवलंबून असतात. मेदू-विश्वातल्या घटितांवर नव्हे.  

आपल्याला जेव्हा विराटाचा अनुभव येतो तेव्हा समकक्ष मेंदु-घटित मात्र कवटीत मावणारे व म्हणून उघडच अ-विराट असणार.(विश्वाचा आकार केवढा| ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा|| ही कविता चमकदार असली तरी चूक आहे.) निळ्या रंगाच्या अनुभवाचे समकक्ष  मेंदूघटित हे काही निळ्या रंगाचे असणार नाही. तसे काय एकेक रंग ही खरेतर एकेक फ्रिक्वेन्सी असते असे म्हणून रंगांचे रंग-पण जाणार आहे काय? रातराणीचा सुगंध जी मोहक अस्वस्थता आणतो, ती तो कां आणतो यावर घनघोर संशोधन करून कोणत्या चेतापेशीत काय घडते हे सांगितलेच तर फारतर त्याचा उपयोग एखादे कृत्रिम अत्तर बनविण्यास होईल. अस्वस्थतेचे काय करायचे याचे उत्तर मात्र मिळणार नाहीच! मानवाची उत्क्रांती आणि रातराणीची उत्क्रांती यातील भाव-घटित-बाह्य कारण मीमांसा करून कोणी खुलासा केलाच तरी ती अस्वस्थता रातराणी याच प्रकारची असणार. त्याचे सी टी ए जी मधील वर्णन काही सुगंधी/अस्वस्थ करणारे असणार नाही.

इतकेच नव्हे तर आपण जे मेंदु-विज्ञान विकसित करीत आहोत त्यातील गोष्टीसुध्दा भाव घटिते या स्वरूपातही आपल्या भाव-विश्वात सामील होत चालल्या आहेत. पण त्या गोष्टीं सुद्धा स्वतःसारख्या असत नाहीत. उदा. सायनॅप्स चे ज्ञान काही खुद्द सायनॅप्स मध्ये स्टोअर होत नसते किंवा सायनॅप्सच्या आकृतीचा मेंदूतील ठसा हा सायनॅप्सच्या आकृतीसारखा असत नाही. सिरोटोनिन डोपामिन इत्यादी घटत चालले असल्याची घटना आपल्यावर, डिप्रेशन या स्वरुपात आदळते. डिप्रेशनग्रस्त जाणीव कोणाला मीच जगायला नालायक आहे अशी होते तर कोणाला जग हेच माझ्या लायकीचे नाही अशीही होऊ शकते. हे आशय भावविश्वातलेच असतात मेंदुविश्वातले नव्हेत. पण मेंदूतील रासायनिक वाहकांबाबत जर ज्ञान असले तर आत्ता जरी मला निरर्थक वाटत असले तरी खरे म्हणजे जीवन निरर्थक नाही. मी जर उपचार घेतले तर अर्थपूर्ण वाटणारा मी अजूनही माझ्यातच  पुन्हा उभा राहू शकेल. मुख्य प्रश्न रसायने कमी पडतायत हा आहे अशी जाणीव होईल. पण बऱ्या झालेल्या डिप्रेशनवाल्याला कशात सार्थक वाटेल हे मात्र  सिरोटोनिन/डोपामिन च्या भाषेत सांगता येणार नाही. सारांश आपली कोणतीही भाव घटिते ही मेंदु-घटितापासून भिन्न स्वरूपाचीच राहतात.
जेव्हा माझा मेंदु बंद पडेल तेव्हा माझ्यापुरती मानवी भाव-विश्वाची मी-विशिष्ट-आवृत्ती  विझेल पण शेवटच्या क्षणीसुध्दा माझे तोवरचे आत्मचरित्र हे भाव-घटित स्वरूपातच असेल ते कधीच मेंदु-घटितांबाबतच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणांचा अहवाल असणार नाही.

टीप:याविषयावरील तत्त्वज्ञान समजण्यासाठी सखोल वाचन करायचे असल्यास काही ग्रंथ
पुढे सुचवत आहे.
१.     फिनॉमिनॉलॉजी ऑफ पर्सेप्शन--- मॉरिस मेर्लोपॉंन्ति
२.     फ्रीडम ऍन्ड नेचर---------------- पॉल रिकर
३.     एलबो रूम----------------------- डॅन डेनेट
४.     कन्सेप्ट ऑफ माइंड------------- गिल्बर्ट राईल