Thursday, May 7, 2015

जसे सापळे तशा सुटका


ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टांत, आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे. त्यांनी सांगितले आहे की पोपट पकडण्याची एक खास पध्दत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू असेच त्याला वाटत रहाते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे ज्ञान त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला रहातो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भय-सापळा असे म्हणता येईल. जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पहावे. हा आधार गेला तर? अशी भीती असते तेव्हा, जर काहीकाळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते तो उडू शकत नाही!

माकडे पकडायची देखील एक खास पद्धत आहे.(हा दृष्टांत ओशोंकडून ऐकला पण मुळात कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते. असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. पण फळासकट हात बाहेर काढायला जावे तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या अवस्थेत माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोह-सापळा असे म्हणता येईल. आपले ज्या परिस्थितीत माकड झाले  असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये? हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुध्दा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने फलत्याग नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

एकजण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय हातानी पाणी खळबळवतोय. या हौदाने माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय असे त्याचे म्हणणे. अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल! कोणीतरी समजावत आहे. पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेले ठेवत नसेल?

दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच.” 
नाही गुरुजी. मी दमलोय. पण आपण इतके वर आलोय. आज शिखरावर पोहोचायचेच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय असं झालंय मला
माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन असं म्हटलो होतो मी
होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे
कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?
ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊया
शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो
पण शिखर न येताच?
तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना? तेच खरं पोहोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथे जाऊ. जिथे आपण असतोच. फक्त पोहोचलो असं वाटत नसतं. इतकंच!


पोपटाने एकदा तरी आधार सोडून पहावा. माकडाने एकदा तरी फळ सोडून पहावे थयथयाट करणाऱ्याने एकदा तरी खळबळ थांबवून तळ पहावा. चढणाऱ्याने एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.  

7 comments:

  1. राजीव blog सुरु केल्याबद्दल अभिनंदन ! मस्त !!
    काही माहीत असलेल, काही नव्याने माहीत जालेल. वाचून छान वाटल. रोज नव्याने आपण कोणत्या सापल्यात अडकत जातो याचा शोध घेण्याचा नाद मला आहेच !

    ReplyDelete
  2. अभिनंदन राजीव!

    ReplyDelete
  3. फारच छान. विचार कमीत कमी शब्दात पण तरीही अचूकपणे मांडण्याचे तुमचे कौशल्य हेवा वाटावा असे आहे.
    चेतन पंडित

    ReplyDelete
  4. I liked it very much. You think & write very differently.

    ReplyDelete
  5. यामधली पोपटाची गोष्ट माहीत होती . बाकीच्या नव्याने कळल्या. वाचलेलं , नव्याने कळलेलं रोजच्या जीवनात apply करता आल पाहिजे. आणि त्यासाठी हा लेख जणु एक reminder म्हणून समोर आला. लिखाण नेहेमीप्रमाणेच उद्बोधक , सुटसुटीत, पट्कन समजेल अस.

    ReplyDelete
  6. खूपच छान रोजचे अनुभव.पण वेगळा विचार खूपच छान.सहज सोप्या गोष्टीतून मोठा
    संदेश.सर्वांनाच आवश्यक

    ReplyDelete