Friday, August 21, 2015

डेरिडा: चिन्हव्यवस्थेमार्गे छिन्न-अव्यवस्थेकडे


चिन्हव्यवस्था अस्तित्वात आहे आणि मानवी जीवनात ती फार महत्त्वाची आहे हे कोणीच नाकारणार नाही. पण फक्त चिन्हेच काय ती आहेत बाकी काहीच नाही अशी चिन्ह सत्यम जगन्मिथ्या भूमिका घेणे हे विक्षिप्तपणाचे लक्षण ठरेल. डेरिडा आणि कंपनी अशी भूमिका घेतात. या भूमिकेला आपण चिन्हसर्वस्ववाद हे नाव देऊ. हे करताना ते आपल्या एका (खरेतर मानीव) असहायतेचा गैरफायदा घेतात. आपण चिन्हेतर अशा कशाही विषयी काहीही सांगायला जावे तर ते सांगणे भाषेतच करावे लागते. यावर तुम्ही बोलताय तीही चिन्हेच आहेत की! असे म्हणून हे आपल्याला अडकवू पहातात. खरेतर भाषा म्हणजेच जीवन नव्हे हे सर्वांनाच विदित असते.

चिन्हव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी डेरिडा आणि मंडळी चिन्हक (सिग्निफायर) आणि चिन्हित(सिग्निफाइड) ही प्राथमिक जोडगोळी मानतात. आपल्याला वाटते की चिन्हवस्तू आणि चिन्हार्थ अशीच ही जोडगोळी असेल. पण अर्थापर्यंत पोहोचणे हेच अमान्य करीत
डेरिडा यात एक अनवस्था मानतो. त्याच्या मते चिन्हित हे स्वतः पुन्हा कशाचे तरी चिन्हक बनतेच मग त्याचे चिन्हित हे पुन्हा चिन्हक बनते व ही अंतहीन साखळी चालू रहाते. अंतिमतः चिन्हित (ट्रान्सेन्डेंटल सिग्निफाईड) काय? हा प्रश्न कायम अनुत्तरितच रहातो.

प्रत्यक्षात असे घडत नाही. तसे घडत असते तर आपण चिन्हव्यवस्था उपयोगात आणूच शकलो नसतो.

डेरिडा चिन्ह्कांच्या बाबतीतही एक अनवस्था मानतो. चिन्हक हे स्वतः कसे आहे याला महत्त्व नसून, चिन्हका-चिन्हकांमधील भेद व या भेदांची रचना हीच चिन्हव्यवस्थेला पुरेशी असते असा सिद्धांत डेरिडाचा पूर्वसुरी फर्दिनांद दि सोस्यूर याने मांडलेला होता. हे करताना चिन्हक हे केवळ संकेतानेच बनते व संकेत बदलताही येतात असे सोस्यूरने गृहीत धरले होते. हे गृहीत चक्क चुकीचे होते. चिन्हकाच्या निवडीवर इतर चिन्हकांशी भेद राखणे याचा एक दबाव असतोदेखील, पण तीच एक गरज असे नसते. 

साधर्म्य हे देखील महत्त्वाचे असते (उदा. तोडाशी संबंधित सर्व क्रियापदांचे उच्चार आणि त्या क्रिया यात निश्चित साधर्म्य असते जसे थुंकणे, गिळणे, शिंकणे, खाकरणे इत्यादी) तसेच कार्यकारण किंवा तत्सम संबंध असला तरी चिन्हकावरून चिन्हिताचे अनुमान काढता येते. तानाजीने दोर खेचून पाहिला व त्याला घोरपड घट्ट धरून आहे हे कळले यात लक्षणचिन्ह येते. गवताची गंज पेटवून देऊ तो जाळ दिसला की समजावे आम्ही गड घेतला आहे हे संकेतचिन्ह आहे. आणि गड आला पण सिंह गेला यात सिंह हे रूपकचिन्ह (साधर्म्याधिष्ठित) आहे. 

संकेतातील भेदांची रचना म्हणजेच चिन्हव्यवस्था हे सोस्यूरचे चुकीचे मत दुरुस्त करावयाचे सोडून डेरिडाने त्यावर आणखी एक सिक्सर मारली. भेदांची रचना ही स्थिर राहत नाही व गतीशील असते म्हणून नेमका भेद ओळखणे हे सतत लांबणीवर टाकावे लागते टु डिफर याचा एक अर्थ वेगळ्या वेळेसाठी राखून ठेवणे असाही होतो तो मधेच आणून डेरिडाने डिफरन्सच फक्त नसतो तर डिफेरान्स असतो असे म्हटले व त्यावरून चिन्हित(अर्थ) न सापडण्याला आणखी एक आधार शोधला. बुळबुळीत साबणाप्रमाणे अर्थ घट्ट धरायला जावा तर सटकतो, हा डेरिडाच्या सिद्धांताचा मुख्य मुद्दा आहे. 

आपण सामान्यतः असे समजतो की अर्थ हे मुळातच असतात व ते व्यक्त करण्यासाठी आपण भाषा वापरतो. डेरिडाच्या मते भाषा ही स्वयंभू व चंचल असून तीच आपल्याला नाचवत असते. अशा तऱ्हेने आपण माणसे म्हणजे कळसूत्री बाहुल्याच हे मत कायम राहते. खेळीया कोण याबाबत ईश्वराची जागा भाषेने घेतली जाते. तुम्ही म्हणाल की असे मानून आपण कुठे पोहोचणार? बरोबरच आहे. कुठेच पोहोचणार नाही. पण कुठे पोहोचू द्यायचेच नाही हीच उच्छेदवाद्यांची प्रतिज्ञा आहे व डेरिडा हाही एक उच्छेदवादीच आहे.

डेरिडाचे इतरही सिद्धांत आहेत ते म्हणजे

१. कोणताही विचार द्वय-विरोध-श्रेणी(बायनरी-ऑपोझिशन-हायरार्की) या त्रिकुटाने ग्रस्त असतो पण ही ग्रस्तता कधीच काढता येणार नाही किंवा श्रेणी उलटवूनही भागणार नाही अशी त्याचेच मत आहे. मग करायचे काय? तर हे त्रिकुट पुनःपुन्हा उघडकीस आणत रहाणे व द्वये-विरोध-श्रेण्या अमुकच प्रकारच्या आवश्यक नसतात हे दर्शविणे एवढेच विरचने(डीकन्स्ट्रक्शन)चे कार्य असते.

२. स्वतः मनातला अर्थ जाणवत असतानाच बोलणे व त्याच वेळी ती स्व-उक्ती ऐकणे ह्या अनुभवामुळे आपल्याला सत्य नावाचा एक आभास उत्पन्न होतो.(!) म्हणून वचनकेंद्री(फोनोसेन्ट्रिक) भाषाव्यवहारापेक्षा लेखन/वाचन-केंद्रित(ग्राफोसेन्ट्रिक) भाषाव्यवहार जास्त मोलाचा असतो. कारण एखादा मजकुर(टेक्स्ट) समोर असला की त्यासंबंधित सांगणारा व ऐकणारा हे दोघेही अनुपस्थित असतात व त्यामुळे त्या मजकुराला कसे वाचायचे किंबहुना मजकुराशी कसे खेळायचे याचे स्वातंत्र्य वाचकाला असते. उपस्थितीवर आधारित स्वरूपशास्त्र(मेटॅफिजिक्स ऑफ प्रेझेन्स) नाकारले पाहिजे.
हा डेरिडाचा मुख्य सिद्धांत आहे.

पण या इतर सिद्धांतांकडे वळण्याअगोदर त्याने भाषाशास्त्रातच चिन्हव्यवस्थेचे स्वरूप समजाऊन घेण्यात जो घोटाळा करून ठेवला आहे तो निस्तरणे उपयुक्त ठरेल. कारण चिन्हव्यवस्था म्हणजे काय हे समजून घेण्यात केलेल्या घोटाळ्यांवर त्याने केलेले नंतरचे घोटाळे अवलंबून आहेत.

जीवन-प्राथम्य
आपल्याला जी भूक लागते ती काही प्राण्यांना पोषण लागते या तथ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लागत नाही. चिन्हव्यवस्थेचा प्रश्नच नसणाऱ्या प्राण्यांनाही ती लागतेच व आपल्यालाही लागते. भूक हे चिन्हक नाही ती स्वतःच एक अर्थपूर्ण गोष्ट आहे. जीवनातील विविध गोष्टीना असणारी अर्थपूर्णता ही चिन्हनिरपेक्षपणेदेखील आहे. अर्थपूर्णतेवर चिन्हव्यवस्थेचा (कधी नको इतका) प्रभाव पडतो हे जरी खरे असले तरी अर्थपूर्णतेचे अस्तित्व मुदलात स्वयंभू आहे. खरेतर हे वाक्य मुद्दाम म्हणावे लागणे ही एक दुर्दैवाची बाब आहे. माणसाने संकेतांचा शोध लावून माणसामाणसांतले कम्युनिकेशन अधिक समृध्द केले कारण कशाचे प्रतिनिधित्व कशाने करावे याची कक्षा, नैसर्गिक आविर्भावांच्या तुलनेत खूपच विस्तारली हे खरेच. पण याचा अर्थ असा नाही की जीवन हे मात्र-संकेताधिष्ठित बनले.

मुळात कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहू. मला स्वतंत्र जाणीव आहे तशीच जाणीव समोरच्या व्यक्तीलाही आहे. त्याच्या जाणीवेत मला आणि माझ्या जाणीवेत तिला उपस्थिती आहे. मी काही कृती करण्याच्या आधीच, तशी कृती करू इच्छितो, हे जर तिला(म्हणजे त्या व्यक्तीला) कळले तर तिचे सहकार्य मिळविणे आणि सांघिक कामगिरी करणे शक्य होईल. माझ्या जाणीवेतले काही दुसऱ्याच्या जाणीवेत पोहोचवणे हे दोघानांही अत्यंत लाभदायक असते. इतकेच नव्हे तर अनुभव सहप्रचित(शेअर) करायला मिळणे याला स्वतोमूल्य देखील आहे.

माणसाहून कितीतरी कमी विकसित प्राणी सुध्दा त्याच्या मर्यादेत हे साधत असतात. कम्युनिकेशनला अगदी तत्त्वतः उचित शब्द अन्य-चित-संधान हा ठरेल. आपण चित्संधान एवढाच ठेवू (संद्यापन म्हटले तर त्यात संज्ञा आल्याच असे वाटू शकते. पारेषण म्हटले तर टेलिकम्युनिकेशन वाटू शकते. जाणीव ही गोष्ट एलीमिनेट होईल असे काहीही नको म्हणून चित्संधान म्हणावे. सांकेतिक चिन्हे हे साधन नसतानाही चिन्हेतर स्वरूपांत चित्संधान साधले जात असते. किंबहुना ते तसे साधले जात असल्यानेच आपण संकेत ठरविणे ही गोष्ट करू शकतो. संकेताचा ठराव मांडण्यासाठी संकेतपूर्व असे काही सहप्रचित लाभलेले असावे लागते. म्हणजेच चिन्हव्यवस्थेला अचिन्ह चित्संधानाचा आधार लाभतो म्हणूनच चिन्हव्यवस्था शक्य होते.

यात मी अंतर्ज्ञान किंवा टेलीपथी असले काही धरत नाहीये. किंबहुना सार्वजनिक प्रत्यक्ष हे प्रमाण ज्ञान बनते ते कोणालाही सहप्रचिती मिळू शकते म्हणूनच! चिन्ह सत्यम अर्थ मिथ्या असे मानणाऱ्याना ही साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही याचेच आश्चर्य वाटते.
दोन किंवा जास्तसुध्दा माणसांना एकाच वेळी तिसऱ्या एखाद्या गोष्टीची सहप्रचिती येऊ शकते (को-एक्स्पीरिअन्सिंग) तसेच त्यांना एकमेकांची थेट प्रचीती (डायरेक्ट म्युच्युअल एक्स्पीरीअन्सिंग) येणे देखील घडत असते.

समजा दोघे आर्म्सरेसलिंग करत आहेत. त्याचा जोर कमी पडू लागला आहे म्हणजेच मला आत्ता जोर करायला संधी आहे हे मला कोणत्याही अन्य माध्यमातून किंवा तिसऱ्या कशाने तरी त्याच्या जोराचे प्रतिनिधित्व केल्याने कळत नसते तर मला आलेला माझ्या प्रतिस्पर्ध्याचा थेट अनुभव असतो. जिवंत-परस्परानुभव येणे हे झगड्यात, प्रणयात वात्सल्यात व सांघिक श्रमात होतच असते. हे ट्रान्सअनिमेशन अचिन्ह-चित्संधानाचा महत्त्वाचा आधार असते.

चिन्हसर्वस्ववादी लोक या अनुभवांची देखील चिन्हांचाच आणखी एक प्रकार अशी संभावना करू पहातात. ते लक्षण/गमक/द्योतक (डीफाइनिंग फिचर, सिम्प्टम, इंडिकेटर) आणि चिन्ह (साईन) यात घोळ घालत असतात. लक्षणे ही कोणत्याच चिन्हव्यवस्थेवर अवलंबून नसतात. ती वस्तुतःच असतात.

सम्यक चिन्हमीमांसा  
निर्देशक आणि निर्दिष्ट हा संबंध मुळात वर म्हटलेल्या सहप्रचितीमध्ये जो अंगुलीनिर्देश केला जातो तेथून सुरु होतो. अंगुलीनिर्देश करणे हाही संकेत आहे असे चिन्हसर्वस्ववादी म्हणतात. म्हणून आपण कुत्र्याचे उदाहरण घेऊ. कुत्रा मालकापाशी येऊन भुंकू लागतो. त्याच वेळी तो मालकाची पँट तोंडात धरून ओढू लागतो. त्याला आपल्याला काहीतरी दाखवायचे असते. तो ओढत नेतो आणि मालकाच्या दृष्टीने लक्षणीय(सिग्नीफिकंट), अर्थात कुत्र्याच्या समजेनुसार, गोष्ट दाखवतो. कोणालाही नेऊन मूळ गोष्टच दाखवणे यात दुसऱ्या कशानेतरी तिचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रश्नच नसतो. बघा बघा तुम्हीही बघा हे कम्युनिकेशनचे आदिवाक्य म्हणता येईल. एखाद्या भाषापूर्व मानवाला दुसरा भाषापूर्व मानव हे फळ विषारी आहे. खाऊ नकोस. हे कसे सांगेल याचे माईमिंग शाळेतील पोरे सुध्दा करून दाखवतील! वाचकांनीही गंमत म्हणून करून बघायला हरकत नाही.   

जे मूर्त आणि समक्ष असेल व प्रस्तुत आणि लक्षणीयही असेल ते चिन्हव्यवहाराशिवायही अनुभवता येते. जे मूर्त नाही आणि समक्षही नाही पण प्रस्तुत आणि लक्षणीय आहे, ते व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच अन्यांच्या जाणीवेत आणण्यासाठी, प्रतिनिधित्व करणे हा प्रश्न येतो. म्हणून अमूर्त असमक्ष प्रस्तुत आणि लक्षणीय असे जे ते निर्दिष्ट होय व त्याचा निर्देश ज्या कोणत्या मूर्त समक्ष गोष्टीने करायचा ते निर्देशक ठरते. निर्देशक हा शब्द आपण ज्याला चिन्हक म्हणतात त्याच्या जागी व निर्दिष्ट म्हणजे ज्याला चिन्हित म्हणतात त्यासाठी वापरत आहोत. मग हे वेगळे शब्द का वापरायचे? याचे कारण असे की चिन्हक-चिन्हित यात चिन्हिताला स्वतःची अशी अर्थवत्ता आहे की नाही हे संदिग्ध राहते. तसेच चिन्हक हे संकेताने आहे रूपकाने आहे लक्षणाने आहे की भिन्नता टिकवण्यासाठी आहे हेदेखील चिन्हकातच गडप होते व चिन्हसर्वस्ववाद्यांना घोळ घालायला मोकळे रान मिळते.

मी चिन्हक-चिन्हित या जोडीच्या जागी एक चतुष्टक योजित आहे.  

१) निर्दिष्टाची (जीवनातली) लक्षणीयता सिग्निफिकन्स म्हणजेच अर्थ
२) निर्दिष्टाचे स्वरूप म्हणजे जागृत केली गेलेली संकल्पना (इनव्होक्ड कन्सेप्ट)
३) निर्देशकाचे स्वरूप म्हणजे समक्ष सादर केली जाणारी प्रतिमा(प्रेझेंटेड इमेज)  
४) निर्देशकाचे औचित्य(संकेत, रूपक, लक्षण आणि भेदरचनेसाठी लागणारे वेगळेपण) याला मी सिग्नीजियन्स असा इंग्लिश शब्द नव्याने बनविला आहे.

या चौपदरी रचनेमुळे चिन्हसर्वस्ववाद्यांनी घातलेला घोळ कसा दूर होतो ते आता पाहू.
निर्देशकावरून निर्दिष्टावर ही क्रिया होतेच. पण समजा त्या निर्दिष्टातून नवा निर्देशक उपटला आणि त्याचे निर्दिष्ट आणखी काही असले व असा चिन्हखेळ सुरु झालाच तरी त्यातील साखळ्यांपासून, दरवेळी, निर्दिष्टाची  लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) व निर्देशकाचे औचित्य(सिग्नीजियन्स) ही दोन्ही महत्त्वाची मंडळी बाहेर सुरक्षित राहतात. इतकेच नव्हे तर दरवेळी लक्षणीयता आणि औचित्य वेगळे कळत राहून ते साखळीत गडप होत नाही किंवा भेदांच्या रचनेतही गडप होत नाहीत. सोस्यूरने आपले १ व २ या दोन्हीला मिळून चिन्हित म्हटले आणि ३ व ४ या दोन्हीला मिळून चिन्हक म्हटले ही सोस्यूरची चूक होती. ही चूक केल्यानेच तो चिन्हव्यवस्था म्हणजे फक्त भेदांची रचना या संरचनावादी मांडणीत घुसला. ही संरचनावादी मांडणी गतीशील नाही असे म्हणत डेरिडाने उत्तर-संरचनावाद मांडून अंतहीन खेळ व सटकणारा अर्थ या भानगडी आणल्या. पण मुदलात चिन्हव्यवस्था आणि जीवन यांच्यात नेमका काय संबंध आहे हे दोघांनीही गुलदस्त्यात(ओब्स्क्युअर्ड) ठेवले. माझ्या पद्धतीत  लक्षणीयता(सिग्नीफिकन्स) या पदाने अर्थ चिन्हव्यवस्थेपासून स्वतंत्र राखला आणि औचित्य(सिग्नीजियन्स) या पदाने संकेत की रूपक की लक्षण की रचनेचा दबाव हे प्रश्न खुले ठेवले. म्हणजेच मी चिन्हव्यवस्थेच्या विचाराला जीवनात स्थापित करू बघतोय तर त्यांनी जीवनच चिन्हव्यवस्थेत गडप केले.

निर्देशकाचे औचित्य (सिग्नीजियन्स) हे त्या प्रतिमेशी यादृच्छिक साहचर्य(असोसियेशन) असलेल्या प्रतिमा व अशा प्रतिमांच्या वापराच्या परंपरेने बनलेली वापराने बनलेल्या एकूण रेखीव नसलेल्या (अमॉर्फस) संदर्भमयतेमुळे लाभत असतो. संरचनावादी भाषाविज्ञानामुळे नव्हे. तसेच निर्दिष्टाची लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) ही ज्यांच्यात चित्संधान चालू असते त्यांच्या जीवनातील प्रसंगांमुळे ठरत असते चित्संधानासमवेत ज्या कृत्ती घडतात त्या कृतीच अर्थनिर्णयन पक्के करतात किंवा प्रश्नांकित करून खुलेही करतात. अशा तऱ्हेने चिन्हव्यवस्था ही दोन्ही अंगांनी जीवनात बसती केली जात जात घडत असते. तिला जीवनबाह्य व आकारिक तार्किक बनवून तीत अनवस्था वगैरे दोष आहेत असे भासू लागते. समजून घेणाऱ्या जिवंत व्यक्ती अनवस्था होऊ देत नाहीत अन्योयाश्रय समजून घेतात द्विरुक्ती व व्याघातही आलंकारिक म्हणून उपयोगात आणतात.

संरचनावाद आणि उत्तर-संरचना वाद हे दोन्ही जीवनबाह्यतेच्या दोषाने ग्रस्त आहेत व नसलेल्या समस्या निर्माण करून जनतेला उगाचच भेडसावू पहात आहेत. भाषेतून जीवन काढून घेतले तर अर्थ कधीच गवसणार नाही हे खरेच आहे. पण निरर्थकतेतच किंवा  असारतेतच ज्यांना साफल्य वाटते त्यांना हे वाद म्हणजे विद्रोहाची थोर साधने वाटतात.

डेरिडाने कलुषित ठरविलेले(स्कँडलाईझ केलेले) त्रिकुट: द्वय-विरोध-श्रेणी(बायनरी-ऑपोझिशन-हायरार्की)

एखाद्या संहितेची(टेक्स्ट) विरचना (डीकन्स्ट्रक्शन) केली म्हणजे मूळ संहितेपासून विरचित झालेली संहिता हातात पडेल असे आपल्याला वाटते. पण विरचनेचा अर्थ तसा नसून रचना उघडकीस आणणे एवढाच आहे. संहितेच्या रचनेत वरील त्रिकुट कसे दडलेले आहे हे शोधून काढणे म्हणजे विरचना. पण त्रिकुट सापडले तर पुढे काय? पुढे एवढेच की संहिता नमुनेदार मान्यतांवर आधारित आहे आणि म्हणून तिच्या कोणत्याच अर्थांकनाला सार्विक अशी वैधता नाही. कारण वेगळी द्वये व त्याच्यातील विरोधी पदामध्ये वेगळी उच्चनीचता देखील असू शकते. माझ्या मते या त्रिकुटाला कलुषित ठरविणे आणि वैध अर्थांकन अशक्य मानणे म्हणजे मानवांमध्ये संवादाने सहमती होऊ शकते हेच नाकारणे ठरते. खरे तर या त्रिकुटात आक्षेपार्ह असे काही नाही.

डेरिडा म्हणतो हे त्रिकुट पाश्चात्य स्वरूपशास्त्रावर/अतिभौतिकीवर (वेस्टर्न मेटॅफिजिक्सवर) आधारित असते व त्याचा पगडा मनावरून काढला पाहिजे. मला यात खास करून पाश्चात्य व खास करून स्वरूप-शास्त्रीय(अतिभौतिक) असे काहीही दिसत नाही. हे त्रिकुट इतके स्वाभाविक आहे की त्यासाठी पाश्चात्यच काय पण मानव असण्याची सुध्दा गरज नाही. एखादा चित्ता आता पाठलाग करत असलेली शिकार सोडून देण्यात वाचणारी ऊर्जा आणि ती शिकार मिळाल्यास ती खाऊन मिळणारी ऊर्जा यात अधिक लाभदायक ऑप्शन कोणता याचा विचार किंवा गणित करून निर्णय घेतो. त्याला चिन्हव्यवस्था नसेलही पण बुद्धीच नसते असे नाही. 

प्राणी अनेक बुध्दिमान वर्तने करू शकत असतात. किंबहुना योग्य निर्णय न घेता चित्ता हा चित्ता म्हणून टिकूच शकला नसता. निर्णय घ्यावे लागतात हे सत्य एकदा मान्य केले की काय काय होते ते पाहू. उपलब्ध विकल्पांतून एक निवडून त्याचा संकल्प करावाच लागतो. विकल्प दोनापेक्षा अधिकही असू शकतात. पण त्यातील जास्तच त्याज्य विकल्प त्यागले जात जात दोन तुल्यबळ विकल्पांतून एक निवडायची वेळ येतेच. विकल्प किमान दोन असावे किंवा उरावे लागतात यातच द्वय म्हणजे बायनरी हा पदार्थ स्थापित होतो. एक त्यागायचा व दुसरा आंगिकारायचा आहे म्हणजे त्याच्यात विरोध म्हणजे ऑपोझिशन आलेच. त्यापैकी जो निवडला तो त्यागलेल्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातोच म्हणजेच श्रेणी म्हणजे हायरार्की आलीच! तेव्हा द्वय-विरोध-श्रेणी हे त्रिकुट निर्णय नावाच्या अपरिहार्य जीवनांगाचे अंगभूत स्वरूप आहे. हे त्रिकुट टाळता येत नाही हे तर खुद्द डेरिडाही खिन्नपणे मान्य करतो. यात खिन्न होण्यासारखे काही नाही असे मला वाटते.

श्रेणी म्हणजे हायरार्की ही गोष्ट समतावाद्यांना त्यामुळे विद्रोही विचारकांना आणि त्यामुळे उच्छेदवाद्यांना (सबव्हर्सिविस्ट्स) एका नकारात्मक भावनेनेच बघता येते. पुरुष आणि स्त्री हे द्वय आले की पुरुषश्रेष्ठत्ववादाचा वास आलाच. हा क्रम स्त्री आणि पुरुष असा बदलला तरी मुद्दाम क्रम बदलून जेन्डरसेन्सेटिविटीचा आव आणलाय असाही वास येतो! वाद आणि कथा म्हटले की वाद हा रॅशनल आणि कथा म्हणजे दुय्यम. इतकेच काय पण  शब्दापेक्षा भावार्थ महत्त्वाचा असे म्हटले तरी कोणतेतरी प्रभुत्व(हेगेमनी) किंवा बलधरता(डॉमिनेशन) शिरू लागले की काय असे भय हायरार्की म्हणजे वाईटच असे मानणाऱ्याना वाटू लागते. विशेष असे की जे सार्विक(युनिव्हर्सल) असते ते अभिजनांच्या बाजूने व जे गटविशिष्ट(पॅरॉकियल) असते ते जनांच्या बाजूने पडते असा एक सिद्धांतच गोपाळ गुरू या नावाच्या गुरुजींनी मांडला आहे. आधुनिकोत्तर या नावाने जे विविध प्रवाह आहेत त्यांत श्रेणी पकडा स्पर्धा आयोजित केल्यासारखे काम चालू असते. या साहित्यात हमखास येणाऱ्या काही जोड्यांची यादीच पुढे देत आहे. ही यादी कितीही वाढवता येईल.
तसेच कोणते पद श्रेष्ठ याची अदलाबदल करता येईल.        

     
Hierarchical-Oppositional-Binaries      श्रेणीमय-विरोधी-द्वये  
1)    Letter & Spirit                  शब्दशः अर्थ आणि भावार्थ
2)    Word & Meaning                शब्द आणि अर्थ
3)    Body & Soul                    शरीर आणि आत्मा
4)    Appearance & Essence         प्रतीयमान आणि सारभूत
5)    Appearance & Reality         प्रतीयमान आणि वास्तव 
6)    Opinion & Knowledge            मत आणि ज्ञान
7)    Appeal & Argument          आवाहन आणि युक्तिवाद
8)    Emotion & Thinking          भावना आणि विचार
9)    Senses & Intellect             संवेदना आणि बुद्धी
10)  Indirect & Direct             आडवळणी आणि थेट
11)    Want & Need                 आकांक्षा आणि नड
12)    Survive & Thrive                तगणे आणि फुलणे
13)    Form & Content                आकार आणि आशय
14)    Attribute & Substance            गुण आणि द्रव्य
15)    Absence & Presence           अनुपस्थिती आणि उपस्थिती
16)    Parochial & Universal           गटधार्जिणे आणि सार्विक
17)    Elites & Masses                 अभिजन आणि जन
18)    Masses & Elites              जन आणि अभिजन (उलटीही श्रेणीच)
19)    Particular & General              विशेष आणि सामान्य
20)    Concrete & Abstract               मूर्त आणि अमूर्त
21)    Profane & Sacred               अपवित्र आणि पवित्र
22)    Mundane & Extraordinary         लौकिक आणि अलौकिक
23)    Earthly & Heavenly                पार्थिव आणि दिव्य
24)    Essential & Contextual             सारभूत आणि संदर्भमय
25)    Induction & Deduction              विगमन आणि निगमन
26)    Contingent & Necessary           आपातिक आणि अनिवार्य
27)    Analytic & Synthetic            व्याख्यादत्त आणि तथ्यगामी
28)    A-posteriori & A-Priory   घटितावलंबी आणि घटित-अनावलंबी
29)    Down & Up                        खाली आणि वर
30)    South & North                                दक्षिण आणि उत्तर
31)    Background & Figure            पश्चभूमी आणि लक्ष्याकृती
32)    Approximate & Exact                 अदमासे आणि अचूक
33)    Associative & Logical       साहचर्याधिष्ठित आणि तर्काधिष्ठित
34)    Unknown & Known                    अज्ञात आणि ज्ञात
35)    Conditional & Unconditional      सोपाधिक आणि निरुपाधिक
36)    Practice & Theory                                     व्यवहार आणि सिद्धांत
37)    Rural & Urban                       ग्रामीण आणि नागर
38)    Vulgarity & Fineness             आडदांड आणि नजाकतदार
39)    Amorphous & Crystalline          ढिगार आणि स्फटीकवत
40)    Unconscious & Conscious       नेणीवेतील आणि जाणीवेतील
41)    Narrative & Discursive           कथनात्मक आणि चर्चात्मक

या सर्व जोड्या महत्त्वाच्या आहेत यात शंकाच नाही. पण द्वय म्हणजे तुटकपणाच, विरोध म्हणजे वैरच आणि श्रेणी म्हणजे कशाची तरी अवहेलनाच असे मानून बसण्याची गरज नाही. मात्र उच्छेदवादी तुटकपणा वैरात्मकता आणि अवहेलना असा या त्रिकुटाचा अर्थ लावून दुःखी होतात व इतरानाही दुःखी करतात. एखादी गोष्ट सलगपणे बदलती असली तरी तिचे विश्लेषण करताना टप्पे पाडावे लागतात. पण ही तार्किक गरज असते याचा अर्थ असा नव्हे की आपण तुटकपणे बघू लागतो. विरोध हे दरवेळी वैरात्मक तर नसतातच पण परस्परपूरकही असतात. चढ आणि उतार ही एकाच तथ्याची दोन अंगे आहेत. विरोध हे परस्परप्रवेशीसुध्दा असतात. कोणत्याही प्रसंगी कशाला महत्त्व द्यायचे याचा निर्णय करावा लागतो पण याचा अर्थ असा नव्हे की आपण कायमस्वरूपी कशालातरी हीन लेखण्यासाठी महत्त्व जोखतो.

ध्वनीकेंद्री(फोनोसेन्ट्रिक) आणि सार्विक-सत्य-केंद्री(लोगोसेन्ट्रिक) असण्यात वाईट ते काय?

आपण स्वतःच्या उक्तीला अर्थ देताना ती करण्यासाठी यत्न करताना आणि तिचे उच्चारण ऐकताना एकदमच साक्षी असतो हे तर वरदानच आहे. यत्न, भोग, बोध आणि सच्चेपणा यांची एकतानता अनुभवायला मिळणे हे आपल्याला एकसंध व्यक्तिमत्व घडवायला उपकारकच नाही काय? ध्वनीकेंद्री भाषाव्यवहाराला पाश्चात्य म्हणणे हे कोणाही भारतीयाला विनोदी वाटेल. मौखिक परंपरेचा नको इतका बडेजाव हा पाश्चात्य नसून उलट खास भारतीय आहे. मंत्रोच्चाराने निसर्गाचे पासवर्ड उघडतात ही अंधश्रद्धा तर फोनोमोर्फिक म्हणावी लागेल. 

सार्विक सत्य असते म्हणजे ते एकदाचे आणि कायमचे ठरून गेलेले असते असे मानण्याचे काहीच कारण नाही. ते आव्हानित होत रहाणे आणि अधिकाधिक सुधारित होत रहाणे हे महत्त्वाचेच आहे. पण सार्विक सत्य ही बातच नस्से म्हटल्यावर आरोग्यपूर्ण वादविवाद आणि त्यातून परस्परांना अधिकाधिक सत्याजवळ आणि एकमेका जवळ आणणे हा प्रकल्पच नाकारला तर दमनरहित मानवी समाज हा आदर्श सिद्धांततःच नाकारणे ठरेल. या प्रकल्पाला परिपूर्णता येईल असे मी म्हणत नाही पण हा प्रकल्प पुढे जात आहे की नाही? माझ्या मते तो धीमी गतीसे मगर निश्चित रूपसे (रनसंख्या बढती हुई हे हिंदी क्रिकेट कोमेंटरीवरून घेतले) पुढे जातो आहे. सहप्रचिती आणि परपस्परप्रचिती या आपल्याला लाभलेल्या शुभशक्ती आहेत. त्यांचे अस्तित्व नाकारून आणि लहरी सापेक्षतावादाच्या मागे लागून आपण काय साधणार? 

पण फोनोसेन्ट्रिक आणि लोगोसेन्ट्रिक हे शब्द डेरिडा आणि मंडळी शिव्यांप्रमाणे वापरतात. युरोपात काय चालले आहे याची जुजबी माहिती घेऊन एक/कितीतरी अंश हळकुंडाने पिवळे होणारे लोक जणू काही आपल्याला क्रांतीचे हत्यारच गवसले अशा थाटात डेरिडा फेकू लागतात तेव्हा आपण काय करतो आहोत याची पुरेशी जाणीव त्यांना नसते आणि जबाबदारीचे भानही नसते.

माझे डेरिडाविषयक आकलन कमी पडलेले असू शकते. हे लोक इतके किचकट व आडवळणी लिहितात की आपल्या कळले नाही? की कळणे ही गोष्टच थोडी कमअस्सल असते? हेही कळेनासे होते. परंतु भाषाविज्ञान आणि साहित्यसमीक्षा क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक डॉ हरिश्चद्र थोरात यांनी साहित्याचे संदर्भ या ग्रंथात डेरिडा जो लेख लिहिला आहे त्यातील निष्कर्ष माझ्या निष्कर्षांशी खूपच मिळता जुळता आहे हे पाहून मला एक दिलासा वाटतो.

  •        

No comments:

Post a Comment