हल्ली जणू वदनी कवळ घेता च्या चालीवर
मजकुर समजेना नाम घ्या देरिदाचे|
सहज वजन येते नाम घेता फुकोचे||
असा श्लोक म्हणून सेमिनारे झडत आहेत.
असंबद्धता हेच जीवनाचे सत्य स्वरूप आहे व सुसंबद्धता ही
मानीव किंवा कमअस्सल आहे असे मानण्याची प्रथा प्रथम अस्तित्ववाद आणि अलीकडे
आधुनिकोत्तरवाद (उच्छेदवाद) नावांनी वाढत आहे. आधुनिकोत्तर म्हणजे काय? असा
प्रश्न पडेल. सोपेपणासाठी मी व्यक्तीचा स्व-धर्म या मुद्याच्या अनुषंगाने तीन साध्या
व्याख्या सुचवतो.
आधुनिक-पूर्व= स्व-धर्म शोधावा लागत नाही कारण तो जन्माने ‘दिलेलाच’ असतो.
आधुनिक = स्वधर्म व्यक्तीने जमेल तितका शोधायचा व निभवायचा
असतो.
आधुनिकोत्तर= स्वधर्म शोधायचा नसतो कारण स्वधर्म असे काही
नसतेच
माणसांना समाईक अशा काही शक्ती/वृती असतात व त्यायोगे ती
विधायक संवाद करून कलह सोडवू शकतात हेच नाकारण्याची फॅशन अभ्यासकांत वाढत आहे. बरोबर
वा चूक असे काही नसतेच किंवा ते गटसापेक्ष, व्यक्तीसापेक्ष किंवा प्रसंगसापेक्ष
असते असे मानले की आपले म्हणणे सिद्ध करण्याची गरजच संपुष्टात येते!
विविध भंपकपणांना,
काहीच न करता ‘फॅशनेबल विद्रोही’ ठरण्याचे हुकमी मार्ग असे स्वरूप येते. याची अनेक रूपे
आहेत. विरूपतेलाच कलेचा निकष बनविणे, सौंदर्याकडे प्रस्थापितवादी म्हणून तुच्छतेने
बघणे, घातक लोकरूढींना ते ‘त्यांचे’ म्हणून योग्यच
असे समर्थन देणे, ‘मिडीयम इज मेसेज’ यासारख्या उटपटांग घोषणा करणे, सर्वच आधुनिक मूल्यांकडे
अभिजनवादी-मूल्ये म्हणून
बघणे अशा अनेक विपरीत गोष्टी वाढत चालल्या आहेत.
जर काहीही चालते? तर आम्हा प्रामाण्यशक्ती(रीझन) व
प्रामाण्यआस्था(रॅशनॅलिटी) मानणाऱ्यांचेही का चूक? याला सापेक्षतावाद्यांकडे कधीच उत्तर
नसते.[रीझनला योग्य शब्द म्हणजे प्रामाण्यशक्ती, विवेक नव्हे कारण विवेक म्हणजे
डिस्सर्नमेंट, भेद ओळखणे. येथे प्रामाण्याचा अर्थ इतरांच्या तत्सम शक्तीला पटणे
असा आहे. ग्रंथ/शब्द-प्रामाण्य नव्हे]
तसेच तुमची शस्त्रे तुमच्यावरच चालविली तर काय? या
आव्हानाला ते उत्तर देऊ शकत नाहीत. हे
सगळे कशाच्या आधारे तर ल्योतार, फुको, देरिदा, लाकॉ, दलझ, ग्वातारी इत्यादी आणि
मूळपुरुष नित्शे यांची नावे फेकली जातात.
सध्या तत्त्वज्ञानाच्या विद्यापीठीय क्षेत्रात जी फॅशनेबल
ठरते आहे ती भूमिका म्हणजे दर्शन (डॉक्ट्रिनल-कॉन्फिगरेशन) बांधायलाच नकार देऊन “आमचा विचार मुक्त आहे. तो म्हणजे दर्शन-बिर्शन नाहीये बरं का!” अशी आहे.
खरेतर माणसाला एकसंध व्यक्तित्व राखण्याकरिता, जीवनाला दिशा देण्याकरिता दार्शनिक निवड करावी लागते. कोणी
ती स्पष्टोक्तपणे व सुसंगत अशी करेल तर कोणी नकळत आणि तुटकतुटकपणे करेल. विविध
दर्शनात शास्त्रीय पातळीवर आणि जनजीवनातही, स्पर्धा असते. या स्पर्धेत होणारे वाद
कधीच ‘एकमेव दर्शनाचा विजय होऊन मिटणार नाहीत’ हे खरेच. पण तगड्या दर्शनाची आवश्यकता हीच मुळात चुकीची
गोष्ट असते असे मानणारे व दाखवून देऊन पहाणारे विचार हे दर्शन-ध्वंसी विचार म्हणता येतील.
फिलॉसॉफी या शब्दाचा मूळ अर्थ शहाणेपणाचे प्रेम असा होतो. अन्टी-फिलॉसॉफीला शहाणेपणाचा द्वेष किंवा धसका असे म्हणता येईल. विज्डम ही गोष्ट काहींना धूर्त वाटते तर काहींना बुळचट! अधिष्ठान
पाहिजे असे म्हटले की आपण कैद होतोय की काय असे वाटते. मला आधाराची गरज नाही असा
एक विद्रोही अहंकार जागा होतो.
‘तत्त्वज्ञान’ या शब्दातच तत्त्व जाणणे, म्हणजेच ‘ते जे आहे त्याचा ते-पणा कशात आहे?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवणे, असे अभिप्रेत आहे. ते-पणा म्हणजे इसेन्स!
‘तत्त्वज्ञान’ या शब्दाला इंग्लिश प्रतिशब्द इसेन्शियालॉजी हा नेमका ठरेल. पण अनेकांची
समजूत अशी होते की कसलाही इसेन्स मान्य करणे म्हणजे स्वातंत्र्य गोठवून टाकणे, गतिशीलता नाकारणे किंवा बनतेपण (बिकमिंगनेस) नाकारणे. पण
हे खरे नाही. उदाहरणार्थ हेगल बनतेपण नाकारतो असे म्हणता येईल काय? तो विश्वकथा घडायच्या
आधीच मांडून टाकतो हे वाईटच आहे. पण सारग्राही विचार हा गोठलेलाच असू शकतो असाही
धसका विनाकारण बाळगला जातो आणि मग ते-पण ठरविणे कसे अशक्यच असते हे सिद्ध करण्याची
जणू स्पर्धाच लागते.
अंशाला होणारे अखिलाचे चिंतनगम्य ज्ञान हे परिपूर्ण असणार
नाही आणि ते काहीसे एका दृष्टीला बांधलेले असेल हे खरेच आहे. म्हणूनच या साऱ्या
पसाऱ्या विषयी आंतरिक सुसंगती राखून बांधलेले चित्र हे अखिलाचे अनेकापैकी एक दर्शन
असते आणि दर्शने अनेक असू शकतात हा जैन अनेकांतवाद (स्वैर-सापेक्षतावाद नव्हे) मान्य करायला हरकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की
सुसंगत दर्शन बांधणे ही गोष्टच मुदलात नाकारली पाहिजे. दर्शनांनी दर्शनांवर
घेतलेले आक्षेप कसे तपासायचे आणि संगती(कोहेरन्स), सांगता(कम्प्लीटनेस) व स्व-अनाश्रय(नॉनसर्क्युलॅरिटी)
या तीन कसोट्यांवर कोणते दर्शन जास्त खरे उतरते हा दर्शनविद्येचा (भारतीय अर्थाने
फिलॉसॉफीचा) विषय असतो.
आंग्ल-भाषिक तत्त्वज्ञानातील मेटॅफिजिक्स हटाव मोहीम
तत्त्वज्ञानात सद्वस्तुस्वरूपचिंतन(मेटॅफिजिक्स) हा एक महत्त्वाचा
प्रांत आहे. आपल्याला प्रत्ययाला येणाऱ्या गोष्टींच्या मागे मूळ सद्वस्तुस्वरूप
काय मानायचे हा विषय स्वरूप-चिंतनात येतो. हे चिंतन प्रत्यक्ष-प्रमाणांनी सिद्ध
करता येण्याजोगे (एम्पिरिकली व्हेरीफायेबल) नसते. प्रत्यक्ष-प्रमाणवादी मंडळीनी
मेटॅफिजिक्स ही भानगडच नको अशी भूमिका घेतली.
सद्वस्तुस्वरूपाचा प्रश्न निकालात कसा काढता येईल(एलिमिनेट
कसा करता येईल) या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आंग्ल-भाषिक तत्त्वज्ञानात विश्लेषणवादी
म्हणून जी परंपरा निर्माण झाली तिचा भर मेटॅफिजिक्स निकालात काढणे हाच मुखत्वे
राहिला. विलार्ड व्होनआर्मन क्वाईन हे या वादाचे “शंकराचार्य” म्हणता येतील. “बहुतेक सारे सुधारलेत, काही क्रॉनिक मेटाफिजिशियन उरलेत.” हे क्वाइन साहेबांचे उद्गार मेटाफिजिक्सला कसा कडाडून
विरोध होता हे दाखवून देणारे आहेत. कोणी तार्किक गणिती भाषेत तर कोणी सामान्य
भाषेत हे काम केले. सामान्य भाषेत गिल्बर्ट राईल यांचे ‘मन नावाची कल्पना’ हे धमाल पुस्तक
आहे. त्यांनी, जाणीवेतील काहीही, बाह्य वर्तनाच्या भाषेत कसे वर्णिता येते, हे
दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे सर्वजण, खुलासा कोणता चांगला?, तर बाकी गोष्टी तशाच
असतील तर सर्वात सोपा खुलासा हा सर्वात चांगला (किंवा कमीत कमी संकल्पना जन्माला
घालाव्यात) हा ‘ऑखम’चा दंडक मानत होते व आहेत.
पण तत्त्वज्ञान हे केवळ खुलासे करण्यासाठी असते काय? माझ्या
मते जीवनदृष्टीला सुयोग्य अशी सद्वस्तुस्वरूपमीमांसा पुरवणे आणि जीवनदृष्टीला
स्थैर्य व धैर्य मिळवून देणे हेच तत्त्वज्ञानाचे खरे कार्य आहे. विशेषतः
मूल्यात्मक व ब्रीदात्मक प्रश्नात खुलासे हा मुद्दाच नसून समर्थने हा मुद्दा असतो.
तुम्ही ‘कारणमीमांसा’ करत नसून ‘प्रयोजनमीमांसा’ करीत असता. तुमची
चांगल्या मानवी जीवनाची कल्पना (या अनेक असतील) काय आहे यावर तुमच्या तत्त्वचिंतनात
सुप्तगृहीतके(प्री-सपोझिशन्स) पेरलेली असतातच. ही सुप्तगृहीतके उघड करून व
सुसंगतपणे मांडणे म्हणजे ‘परलोक मानून धर्माच्या आहारी जाणे’ नसते.
खरेतर परलोक न मानता मेटॅफिजिक्स असू शकते हे कान्ट नंतर कोणालाही
मान्य व्हायला हवे. पण तसे झाले नाही आणि मेटॅफिजिक्स हटाव मोहिमेत दर्शनविद्येचा
आत्माच हरवला गेला. दर्शनविद्येला विज्ञानाची रिसर्च असिस्टंट तरी बनविले गेले
किंवा भाषाशुध्दीची चळवळ तरी बनविले गेले. म्हणजे असे की ‘आपण आलंकारिक भाषा
वापरतो म्हणूनच केवळ मेटॅफिजिकल प्रश्न निर्माण होतात. एकदा का भाषा बिगर आलंकारिक
बनवता आली की मेटॅफिजिक्स संपलेच!’
आंग्ल-भाषिक तत्त्वज्ञान हे भारतीय माणसाला तत्वज्ञानच वाटत
नाही. आपण जीवनदृष्टीच्या शोधात निघालो आणि गणिती तर्कशास्त्राचे नोटेशन लिहित
बसलो असे होते. उदाहरणार्थ रसेल हे जेव्हा अधिकृत तत्त्वज्ञान मांडतात तेव्हा
सिद्ध काय होते तर “अंकगणित हेही
तर्कशास्त्रात विघटीत करता येते” इतकेच! उलट रसेल जेव्हा ललित निबंध लिहितात तेव्हा ते छानसे स्वातंत्र्यवादी
तत्त्वज्ञ दिसू लागतात.
पण पाश्चात्य दर्शनविद्येला जे ग्रहण लागले त्यात
रिडक्शनिस्ट, एलिमिनेटिविस्ट या प्रकारच्या आंग्ल-भाषकांचा पुढाकार होताच. इतकेच
नव्हे तर दर्शनविद्येला भाषाविज्ञानाच्या दावणीला बांधणारा लिंग्विस्टिक-टर्न हा
देखील आंग्ल परंपरेतच सुरू झाला.
गणिती तर्काची कमाल दाखविणारे ‘ट्रॅक्टॅटस’ हे पुस्तक विडगेनस्टाइन यांनी मागे घेतले. आपण मनुष्ये विभिन्न प्रकारचे भाषिक
खेळ खेळत असतो. कोणता खेळ हे स्पष्ट असले तर गोंधळ होत नाही अशा भूमिकेत ते आले.
कदाचित दर्शनविद्येचा हरवलेला आत्मा परत आणण्याकडे त्यांचा विचार गेलाही असता पण
त्यांचे अकाली निधन झाल्याने ते तिथेच थांबले.
आंग्लेतर युरोपीयांची (काँन्टिनेन्टल) समृध्द परंपरा
भारतात बुध्दीप्रामाण्यवाद म्हणून जो प्रचलित आहे तो खरे तर
अनुभव-प्रामाण्यवाद किंवा प्रत्यक्ष-प्रामाण्यवाद आहे. काँन्टिनेन्टल परंपरा
(मार्क्स वगळता) भारतात फारशी पोहोचलीच नसल्याने रीझन ही जी देणगी मानवाला लाभलेली
आहे तिचा ‘तर्क’ असा उथळ अर्थ घेतला गेला आहे. रॅशनॅलिझम हा मुळात चिद्वादी
होता, जीव-जगत-जगदीश या त्रिकुटाच्या परस्पर संबधांचे कोडे आपण श्रद्धेने
नव्हे तर प्रामाण्यशक्तीच्या बळावर उलगडू शकतो असा आत्मविश्वास असलेली ही परंपरा
आहे.
माणसाला रीझन लाभलेले आहे म्हणजे नेमके काय लाभलेले आहे याचा कान्टने केलेला
उलगडा समजाऊन घेणे याठिकाणी अगत्याचे आहे. मानवी जाणीवेला एक आयामिक प्रारूप असते.
हे सर्वांचे एकच असते. काळ कुठे असतो असे कोणीच विचारत नाही. जे उपप्रकारात मोडते
ते मुख्य प्रकारात मोडणारच ही खात्री कोणालाही असते. जे जे गुण असतात ते धारण
करणारे काहीतरी असणार हे सर्वजण स्वाभाविकपणे मानतात. कार्य-कारण, साध्य-साधन,
गम्य-गमक या जोड्या अंतर्निहित(इन्हेरंट) असतात. असा आयामिक घाट असतो याचा पुरावा
कान्ट पुढील प्रमाणे देतो.
जे सत्य, घटितावर अवलंबून असेल, ते निरीक्षणानेच पडताळता
येईल. घटित-अवलंबी सत्य पडताळणीने ठरते यात विशेष कौतुकाचे असे काही नाही. दुसरे
असे की काही विधाने आपण ज्या व्याख्या केलेल्या असतील त्या व्याख्यांमुळेच सिद्ध
होतात (अनॅलिटीक ट्रुथ किंवा जजमेंट). त्यामुळे ती सत्य ठरतात यातही कौतुकाचे असे
काही नाही. अशा विधानातून जगाविषयी नवीन माहिती काहीच मिळत नाही. याउलट फक्त
व्याख्यांवर अवलंबून न रहाता व्याख्यांच्या बाहेरचे नवे सत्य (सिंथेटिक ट्रुथ
किंवा जजमेंट) कळले तर ते महत्त्वाचे असते. जर ही दोन प्रकारची सत्ये वेगळालीच
रहात असती तर हा दुभंग तसाच राहिला असता.
पण आपल्याला अशीही
काही सत्ये पटतात की जी पटण्यासाठी एकही निरीक्षण लागत नाही. ही सत्ये
घटित-अनावलम्बी (अ-प्रायारी) असतात. त्याच्या सत्यतेचे थेट भान माणसांना असते.
याला स्वयंसिद्धकांच्या प्रचिती (अक्षियोमॅटिक इन्ट्यूशन्स) असे म्हणता येईल.
मानवाची कमाल अशी की तो त्याच्या स्वयंसिद्धकांच्या प्रचिती आणि त्याने बनविलेल्या
व्याख्या यांच्या संयोगातून जगाविषयी नवी माहिती देणारी आणि व्याख्यांमधून आपोआप
निष्पन्न न होणारी अशी, म्हणजेच व्याख्यांवरही अवलंबून नाहीत आणि
घटितांवरही अवलंबून नाहीत अशी सत्ये (सिंथेटिक अ-प्रायारी) निगमित (डिड्यूस) करू
शकतो. इतकेच नव्हे तर अशी निगमित सत्ये प्रत्यक्ष पडताळणीच्या परीक्षेसही उतरतात! दुभंग
सांधला जातो. उदाहरणार्थ
१.दोन बिंदूंमधील कमीत कमी अंतर सरळ रेषेत असते हे
स्वयंसिध्दक
२.कोणत्याही बिंदू पासून समान अंतरावर (त्रिमिती अवकाशात)
असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे घनगोलकपृष्ठ (स्फिअर) होय. ही व्याख्या.
३.यांच्या संयोगातून कमीत कमी पृष्ठक्षेत्रफळात जास्तीत
जास्त आकारमान मावणारा बंदिस्त आकार घनगोलक हाच असतो हे प्रमेयसिद्धतेने निष्पन्न
होणारे सिंथेटिक अप्रायारी
४.कर्ष(स्ट्रेस) असलेली वस्तू कर्ष किमान होईल अशी बले
लावते हे स्वयंसिद्धक ५.बंदिस्त अवकाशाचे कवच ताणलेले असल्यास ते कमीत
कमी आकारमान धारण करील हे निगमित केलेले सिंथेटिक अ-प्रायारी
६.अनुभवाला येणारे तथ्य म्हणजे साबणपाण्याचे फुगे
घनगोलकाकार बनतात हा पडताळा
जाणीवेचा घाट आणि जगातील वस्तुस्थिती या अनुरूप असतात. ही
जी चिंतनशक्तीची कमाल आहे ती म्हणजे प्रामाण्यशक्ती अर्थात रीझन होय. इतकेच नव्हे
तर ही क्षमता केवळ जिज्ञासेपुरती नसून निष्ठांच्या बाबतीत आपण जे वाद घालतो
त्यातही आपल्याला नैष्ठिक प्रामाण्यशक्ती (प्रॅक्टिकल-रीझन, येथे व्यावहारिक हा
अर्थ नव्हे) असते असा कान्टचा दावा आहे व तो खराही आहे. (उदा जर गुन्हा कबूल
म्हणालास तर किरकोळ शिक्षेत भागेल असा दम न्यायाधीशाने देणे हे गैर आहे हे
कोणालाही पटेल)
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ‘वादे वादे जायते तत्त्वबोधाः’ हे स्पिरीट किंवा माणसे चर्चेतून एकमेकांजवळ जाऊ शकतात हा आशावाद, काँन्टिनेन्टल
परंपरेने जपला होता. आंग्ल परंपरेत दर्शनविद्येला बायपास करणे ही रणनीती होती.
काँन्टिनेन्टल परंपरेतील उच्छेदवादी (प्रामाण्य असे नसतेच असे मानणारे) मात्र, रीझन
आणि रॅशनॅलिटी या गोष्टीच कशा अभिजनवादी, जाचक आणि निरर्थक आहेत हे दाखवून देत, दर्शनविद्येचा सरळ खूनच पाडायला
निघालेले आहेत.
उच्छेदवादाचा आधुनिक टप्पा
(अजून आधुनिकोत्तर पुढेच आहे)
आधुनिकतेच्याच पर्वात मार्क्स(१८१८-१८८३) आणि फ़्रॉइड(१८५६-१९३९)
यांनी मर्यादित अर्थाने प्रामाण्यशक्तीला आव्हानित केलेले होतेच. वर्गीय समाजात माणसांची जाणीव राज्यकर्त्या वर्गाच्या
विचारप्रणालीने बाधित झालेली असते. त्यामुळे जोपर्यंत वर्गविहीन समाजरचना अस्तित्वात
येत नाही तोपर्यंत कामगारवर्गाची जाणीव ही एका अर्थी भ्रामक जाणीव असते. मग
सार्विक-प्रामाण्यशक्तीला आवाहन करून काय उपयोग? लेनिनच्या शब्दात सांगायचे तर
व्यावसायिक(!) क्रांतिकारकांनाच (अंतिम?) सत्य समजलेले असते व त्यांनी
कामगारवर्गाच्या उत्स्फूर्ततेवर अवलंबून न रहाता कामगारवर्गाला क्रांतिकारकांच्या
जाणीवेनुसार हाकायचे असते. हे धर्मासारखे ठरते. ईश्वराचे निवडलेले दूतच किंवा
पुरोहितच खरा धर्म सांगू शकतात तसे हे होते.
परंतु कामगारवर्गाला भांडवलशाहीचे सत्य स्वरूप पटवून
द्यायचे ते युक्तिवादाने की दादागिरी करून? दादागिरी असेल तर धर्मापेक्षा वेगळेपण
रहात नाही आणि युक्तिवादाने असेल, तर कामगारांनादेखील तीच प्रामाण्यशक्ती लाभलेली
आहे जी की मार्क्सला किंवा कम्युनिस्टांना लाभलेली आहे, हे मान्य करावे लागेल.
इतकेच नव्हे तर सरंजामशाही वा भांडवलशाही या व्यवस्था दुष्ट आहेत हा एक नीतीशास्त्रीय
निवाडा आहे. असा नीतीशास्त्रीय निवाडा देण्याचा अधिकार आपल्याला कोठून प्राप्त
होतो? आपल्याला वर्गातीत व युगातीत अशी प्रामाण्यशक्ती आहे म्हणूनच आपण असे निवाडे
वैधपणे देऊ शकतो. मार्क्स त्याच्या सर्व वाड़्मयात रीझनलाच आवाहन करतो आणि कोणालाही
आपला वाद पुढे न्यायचा असेल तर रीझनला आवाहन करावेच लागते.
जर रीझन ही शक्ती
क्रान्त्युत्तर असणार असेल तर क्रांतीपूर्व काळात कशाच्या आधारे विचार पटवून
द्यायचे? परंतु बहुतेक मार्क्सवाद्यांनी (युर्गेन हाबेरमास सारखे सन्माननीय अपवाद
वगळता) सच्चा वादविवाद होऊ शकतो हे नाकारून भ्रामक जाणीवेचा सिद्धांत (ग्यॉर्जी लूकाच)
रेटत नेला.
फ्राईडने वेगळ्या अंगाने रीझनला आव्हानित केले. माणसे जर
रतिसुखात (किंवा एकूणच सुखात) मग्न राहिली तर ती श्रम करणार नाहीत. म्हणून समाजाला,
रतिसुखाबाबत निषिध्दतांचे अवडंबर माजवावे लागते. यामुळे व्यक्ती आपल्या ऊर्मी
दाबून टाकण्यासाठी स्वतःला स्वतःची खरी ओळख होऊच देत नाही. अबोधमनात साचलेल्या
गंडांमुळे माणूस खरा विचार करू शकत नाही. त्याला स्वतःची ओळख इतकी भिववणारी असते
की तो ती मिटवूनच टाकतो.
जर माणूस असे म्हटला की ‘मला बुवा आईविषयी तसे आकर्षण कधीच वाटले नाही’, तर फ्रॉइडवादी म्हणणार, ‘पहा किती दबले गेले आहे आत्मभान!’ चुकून एखादा
माणूस म्हणाला की ‘हो वाटले होते
बुवा कधीतरी’, तर फ्रॉइडवादी
म्हणणार, ‘पहा कधीतरी सत्य डोके वर काढतेच!’
जर कामगार म्हणाला की, ‘बऱ्यापैकी चालले आहे की माझे
भांडवलशाहीत’ तर मार्क्सवादी म्हणणार, हीच ती भ्रामक जाणीव! जर दुसरा एखादा म्हटला
की, ‘उध्वस्त करून टाकले पाहिजे हे सारे’, की मार्क्सवादी म्हणणार त्याच्यातला खरा
सर्वहारा क्षणमात्र का होइना पण जागा झालाच!
हे जे ‘चित भी मेरी आणि पट भी मेरी’ धोरण आहे, त्यालाच
कार्ल पॉपरचा आक्षेप होता. खोटा पडूच शकणार नाही अशी सिध्दांतातच सोय करून ठेवलेली
असेल तर तो सिद्धांत अवैज्ञानिक मानावा असा दंडक त्याने घालून दिला. सतत-दुरुस्ती या
मार्गानेच भांडवलशाही तिचे
कार्ल-पॉपरायझेशन करीत राहून तगली पण कामगाराचे ‘पॉपरायझेशन’ (भिकारीकरण-स्पेलिंग वेगळे आहे) झालेच नाही.
एका अर्थी मार्क्सने जाणीवेला बाह्य परिस्थितीची दासी मानली
तर फ्रॉइडने अंतर्गत परिस्थितीची. माझे असे म्हणणे नाही की या दोन्ही परिस्थित्या
माणसाला रीझनपासून ढळवतच नाहीत. माणूस रीझनपासून भरपूर ढळत असतो हे खरेच. पण
गाभ्यामध्ये रीझन जिवंत असते व ते सार्विक असते. विसंगती असतात पण सुसंगतीची ओढही
असतेच. ही ओढच जर नाकारली तर खरोखरच दर्शनविद्येला काही अर्थ रहाणार नाही.
नित्शे(१८४४-१९००): हिंस्र ओजस्वितेचा पूजक
आतापर्यंत आपण सुसंगतीची ओढ जरी कमी पडत असली तरी ती ओढ श्रेयपूर्ण
मानत होतो. आरपार विद्रोह असा की, सुसंगतीची ओढ हीच मुळात दुरितपूर्ण व बुळेपणाचे
लक्षण आहे, असे जाहीर करणे. हे महत्कार्य सर्वप्रथम हाती घेतले ते नित्शेने.
(उच्चार नीच्छं असा होतो म्हणतात आपण आपल्या ओळखीचा म्हणून नित्शे हा उच्चार कायम
ठेवू) नित्शे हा मार्क्सचा जवळ जवळ समकालीन असला तरी त्या काळातच त्याने, बऱ्याच
नंतर येणार असलेल्या आधुनिकोत्तर उच्छेदवादाचा पाया घातला हे निश्चित. तो
प्रतिभावान होता आणि त्याच्या इतका स्पष्टवक्ता, बेदरकार आणि तीक्ष्ण लेखक, मी तरी
अन्य पाहिलेला नाही. जशी थोडक्यात सुभाषिते असतात तशी कुभाषिते दे दणादण ठोकण्यात
कोणीच त्याला मागे टाकू शकणार नाही. तो कसलेच बंधन मानायला तयार नसे. सुसंगती
टिकतेय की नाही याची फिकीर नसल्याने त्याचे लेखन अत्यंत आकर्षक बनते.
सामान्य राजकारणातही असे काहीसे घडत असते. सडेतोड, आचरट आणि
असभ्य भाषा वापरणाऱ्या राजकारण्याविषयी आकर्षण एक खास आकर्षण वाटते.कारण असे असते
की बऱ्याचदा आपल्याही मनात तसे आले तरी आपण ते गिळून टाकत असतो. याउलट हा कसा
बिनधास्त बोलतो म्हणून हा ग्रेट!
सर्वच मूल्यांचे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे हा नित्शेचा
लाडका सिद्धांत. सर्वच मूल्ये म्हटल्यावर पुनर्मूल्यांकनासाठी आधाराला काय घ्यायचे?
तर काहीतरी आधार लागतो हाच तुमचा बुळेपणा आहे हे उत्तर. पण एक मूल्य तोही मानतो ते
म्हणजे, उत्फुल्लपणे रसरशीतपणे (एक्झुबरन्स) जगणे. हिंसा ही सुध्दा माणसाची स्वाभाविक
उर्मी आहे. तिच्यावर तरी बंदी कशाला? नोबल म्हणजे जीवावर उदार होऊन पराक्रम करणारा
आणि या हिमतीमुळे उदारही असणारा. मार्क्सच्या मते संस्कृती हा बलवानांनी बलहीनांविरुद्ध
केलेला कट असतो तर उलटपक्षी नित्शेच्या मते संस्कृती हा बलहीनांनी बलवानांविरुध्द
केलेला कट असतो!
डार्विनच्या उत्क्रांतीसिद्धांताचा सोशल डार्विनिझम म्हणून
प्रथम (दुरु)उपयोग केला तो नित्शेने. त्याच्या मते नोबल्सच टिकत गेले असते आणि
दुबळे एलिमिनेट होत गेले असते तर एव्हाना आपण उत्क्रांतीद्वाराच अतिमानव बनलो
असतो. पण या येशू ख्रिस्ताने ही करुणेची भानगड आणली म्हणून सगळी वाट लागली.
आपण जिला सदसद्विवेकबुद्धी (कॉन्शियन्स) म्हणतो ती
दुसरीतिसरी काहीही नसून समाजनिर्मितीच्या काळात प्रचलित असलेल्या अत्यंत क्रूर
शिक्षांची (ज्या नित्शेच्या मते जीवनात रोचकतासुध्दा आणत असत.) खोलवर रुजलेली भीती
आहे. म्हणजे कान्टप्रणित नैष्ठिक-प्रामाण्यशक्तीला (प्रॅक्टिकल रीझन) नित्शेने क्रौर्य-भयाचा आदिबंध
(आर्केटाइप) ठरवून टाकलेले आहे. अपोलो या समंजस देवतेच्या जागी डायोनिसस या पिसाट
देवतेची आराधना करा असेही आवाहन नित्शे करतो. निरनिराळे तत्त्वज्ञ त्यांचे काही लाडके सिद्धांत मांडतात. साऱ्या विश्वात
कार्यरत असणारे मुख्य ‘प्रयोजन’ कोणते? याला
नित्शेचे स्पष्ट उत्तर आहे बलाकांक्षा (विल टु पॉवर).
नित्शे कालचक्रीय नियतीवाद (इटर्नल रिकरन्स) सुध्दा मानतो.
म्हणजे जे घडते ते दर ठराविक कालावधीने जसेच्या तसे पुनःपुन्हा घडत रहाते.
(एकेकाळी प्रजापिताब्रह्माकुमारी या पंथात अशी पुनर्घटनात्मक काल कल्पना होती.
हल्लीचे माहित नाही.) हे अचानकपणे, ‘विश्वरचनेचे सत्य’, एरवी टोकाची व्यक्तिनिष्ठता
मानणाऱ्या नित्शेत, कोठून पैदा झाले हे मला तरी समजलेले नाही.
नित्शे हा आधुनिकोत्तर उच्छेदवाद्यांचा पूर्वसूरी कसा याचे
उत्तर त्याने मानलेल्या पर्स्पेक्टिविझम म्हणजेच द्रष्ट्रूसापेक्षतावादात आहे.
सर्वांच्या दृष्टीने योग्य/अयोग्य असे काही असूच शकत नाही. जो योग्यायोग्यता ठरवू
पाहत आहे त्याच्या स्वार्थाच्या दृष्टीने काय योग्य एवढेच ठरविता येते. ‘हे राम’ सिनेमात केवलरामची (कमलहासन) दुसरी बायको हिंदू-अतिरेकी असलेल्या श्रीराम
अभ्यंकरला (अतुल कुलकर्णी) विचारते, “अगर कोई भेडिया आपके नन्हे बच्चेको उठाकर ले जाय तो क्या यह ठीक रहेगा?” श्रीराम अभ्यंकर भेदक नजरेने पाहत तडक उत्तर देतो “अगर भेडियेकी नजरीयेसे देखा जाय तो, हाँ, बिलकुल ठीक रहेगा”.
अतिरेक्याची भूमिका नीतिध्वन्सी असणारच. नित्शे नेमके तेच
म्हणत आहे. बलवानांनी दया दाखवणे थांबवायला शिकले पाहिजे आणि बलहीनांनी आपले नियत
दास्य किंवा मरण किंवा वेदना मान्य करायला शिकले पाहिजे. कारण वेगळा इतिहास घडूच
शकत नाही हा धडा तो ठिकठीकाणी देत असतो. दुर्बलांविषयीचा तुच्छताभाव प्रकट करताना
नित्शे कोणतीही कसूर सोडत नाही. हे पौर्वात्य म्हणजे खरेतर माणूस म्हणण्याच्या
लायकीचेच नाहीत. पण आपण (युरोपियनांनी) त्यांच्या कडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे,
ती म्हणजे स्त्रीला तिच्या योग्य जागी ठेवण्याची कला! फॅसिझमचे तत्वज्ञान स्पष्ट
मांडण्याचे श्रेय नित्शेलाच द्यायला हवे.
नित्शेने ‘हाच तो माणूस’(असे उद्गार मुळात
ख्रिस्ताला जमावाच्या ताब्यात देताना ‘पॉंटीयस पिलाटे’ने काढले होते.)
या नावाने स्वतःवर जे पुस्तक लिहिले आहे, त्यातील प्रकरणांची शीर्षकेच “जगातील सर्वोच्च बुद्धिमान मीच” “जगातील सर्वोच्च दृष्टा मीच” अशी आहेत. नित्शे इतका टोकाचा एलिटिस्ट असूनही समतावादी व
जनवादी म्हणवून घेणाऱ्याना तो तत्त्वज्ञ म्हणून मान्य असतो व विद्रोही म्हणून
आकर्षकही वाटतो. पण उत्पादकतेबाबतचा एलिटिझम मानणारी वस्तुनिष्ठतावादी आयन रँड ही मात्र
तत्त्वज्ञानाच्या शब्दकोशातूनही गायब असते, हे सारे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे
आहे.
स्मशानवैराग्यातून झालेले अ-सार-सत्-ता वादी बंड:
अस्तित्ववाद
एखादा बॅट्समन आपण आउट झाल्याचा राग आपल्या बॅटीवरच काढू
लागावा त्याप्रमाणे रीझनचा डंका पिटणारे युरोप दुसऱ्या महायुद्धाच्या अनुभवातून
गेल्यावर ‘आपण इतके ढळू
शकतो?’ या धक्क्यामुळे रीझनरुपी बॅटीवर राग काढू लागले. सालं रीझन-बिझन काही नसतंच,
कशालाच काही अर्थ नसतो, अशा स्मशानवैराग्यात युरोपीय बुद्धिवंतांचा एक गट गेला. अस्तित्ववाद
उफाळून येणे आणि नंतर बाजूला पडणे ही घटना याच काळात घडली हा योगायोग नाही.
अस्तित्व हा शब्द अगदीच पसरट आहे. अस्तित्ववादात कशाचे
अस्तित्व अभिप्रेत आहे? तर आपण कसे बनायचे हे न ठरवता आलेल्या, ठरवले तरी भलतेच
होऊन बसणाऱ्या व ठरवण्याचा प्रश्न निरंतर अधांतरीच राहणाऱ्या, व्यक्तीच्या
जाणिवेचे अस्तित्व. प्रसंगोपात्त हा अनुभव कधी ना कधी येतो हे खरेच. पण हेच मानवी
जाणिवेचे सार्वत्रिक स्वयंभू स्वरूप असते आणि इतर प्रकारचे अनुभव (निश्चिती,
स्पष्ट कौल, सार्थकता वगैरे) कमअस्सल किंवा कृतकच असतात, असे मानणाऱ्यांना
अस्तित्ववादी असे म्हणतात.
आधी अस्तित्व आणि मग सारतत्त्व (एगझिस्टन्स प्रिसीड्स
इसेन्स) ही या वादाचे शिरोमणी सार्त्र यांची घोषणा आहे. आपण जे करतो तसे बनतो
एवढाच अर्थ घेतला तर ती योग्यही आहे. सार-शोधन ही होत जाणारी प्रक्रिया आहे आणि
मानवी व्यक्तीचे सार हे पूर्वनियत नसते हेही योग्यच आहे. किंबहुना व्यक्तीप्राथम्य
या तत्त्वाला (जे लिबरल तत्त्व आहे) ठासून उजाळा देण्याबाबत अस्तित्ववाद्यांचे आभारच
मानायला हवेत. मुद्दा असा आहे की हे सार, अंशतः का होईना पण सापडत जाते, असा
आशावाद तत्त्वतःच नाकारणे हा आग्रह अस्तित्ववादी का धरतात?
प्रिसीड्स इसेन्स, बट
प्रोसीड्स टू नोव्हेअर ऑर नेसेसरीली प्रोसीड्स टू अबसर्डिटी! कुठेच जात नाही आणि
गेला तर असंबध्दतेतच जातो हा आग्रह का? स्वातंत्र्य मानले पण स्वातंत्र्याचे
प्रत्यक्षीकरण करताना रीझनचे दिग्दर्शन उपलब्ध असू शकते हेच नाकारले. नीतिशास्त्र
असू शकते हेच नाकारले व त्यामुळेच मानवी स्थितीचे आकलन स्वरूपतः दिशाहीन व निरर्थक
असे केले गेल्याने अस्तित्ववाद हा कुठेच न नेणारा ठरला.
आता आपण सार्त्रचे कुठे हुकले एवढेच थोडक्यात पाहू. कारण
अभ्यासकांकडून अस्तित्ववादी मानले जाणारे जे सगळे विचारवंत आहेत ते बऱ्याच
वेगवेगळ्या दिशेने जाणारे आहेत. अनेक भावावस्था बिगर अस्तित्ववाद्यांनाही अनुभवता
येतात. मग अस्तित्ववाद्यांचे वेगळेपण काय तर ‘अत्यंत उत्कट’ हा शब्द एका
लेखिकेने पुनःपुन्हा वापरला आहे. ह्यांचे ते उत्कट आणि आमचे ते मातकट असे
म्हणण्याने काहीच हाती लागत नाही. (त्यात पिंड-नियतीवादी नित्शेचा समावेश कसा काय
होतो हे मला न उलगडलेले कोडे आहे.)
मुख्य प्रभाव म्हणून आपण सार्त्रच लक्षात घेत आहोत. ‘बीइंग
अँड नथिंगनेस’ हा ग्रंथच आत्ता ध्यानात घेत आहे (नंतर सार्त्र मार्क्सवादी इतकेच
नव्हे तर माओवादी बनला व तेव्हा त्याने ज्या कसरती केल्या त्या मला तरी अजिबात न
झेपणाऱ्या आहेत.) एडमंड हुस्सेर्ल या जर्मन तत्त्ववेत्याने चिद्व्यापारांचे
आयामिक-रचना-वर्णन (ट्रान्सेंडेंटल फेनामेनॉलॉजी) ही तत्त्वविचाराची नवी
कार्यपद्धती शोधली. सार्त्र ती मान्य करतो.
ह्यात काही घोटाळा नाही. पण ग्रंथाच्या
सुरुवातीलाच सार्त्रने एक घोटाळेबाज विधान केले आहे. “जर आपण चिद्व्यापारांचे असणे मान्य करतो तर आपल्याला असणे नावाचा एक (वेगळा)
चिद्व्यापारही मान्य करावाच लागेल.” ही तार्किक अनिवार्यता चक्क चूक आहे. उलटे खरे असतेच असे नाही (कनव्हर्स नीड
नॉट बी ट्रू) हे कोणीही सांगेल. दुसरे असे की असणे हे खऱ्या अर्थाने क्रियापद आहे
काय? होणे, घडणे, आढळणे, घडवून आणणे, करणे, भोगणे, वगैरे खरोखरच क्रिया आहेत. असण्याची
क्रिया नावाची एक वेगळी क्रिया घडते हेच खरे नाही.
असणे हे सहाय्यक क्रियापद किंबहुना
व्याकरणातला काळ दर्शविणारा तो एक ऑपरेटर आहे असे माझे मत आहे. मी जेवलो आणि
जेवताना मी एकीकडे असतही होतोच बरं का! असे म्हणणे निरर्थक आहे. अस्तित्ववाद म्हणजे
असणे या क्रियापदाचा गैरवापर आहे असे कार्ल पॉपरनेही म्हटले आहे.
मानवी जाणीव ही ओघगत (एंगेज्ड) आणि पर्यावलोकी
(रिफ्लेक्टीव) अशी दोन्ही असू शकते. जाणिवेतील आपले अस्तित्व हे स्व-मात्र-भाव आणि
स्व-लक्ष्यी-भाव (बीइंग-इन-इटसेल्फ आणि बीइंग-फॉर-इटसेल्फ) ह्या दोन प्रकारात
सार्त्र विभागतो. एकाच वेळी दोन्ही शक्य असतात हे नाकारतो. स्व-मात्र-भाव हा वस्तूसारखा
‘जान’ नसलेला असतो म्हणून त्या पवित्र्यात काही आशादायक घडणार नाही.
स्व-लक्ष्यी-भाव हा अपरिहार्यपणे आत्मवियोगग्रस्तच (एलियनेटेड) असू शकतो ही
सार्त्रची ठाम धारणा आहे. म्हणजे जेव्हा आपण खऱ्या (जिवंत) अर्थाने ‘असतो’ तेव्हाचे आपण हे खरेखुरे आपण नसतो आणि जेव्हा आपण खरेखुरे असतो तेव्हा आपण
खऱ्या (जिवंत) अर्थाने ‘असत’ नाही. हे
जाणिवेचे स्वरूपच आहे व या श्रुन्गापत्तीतून सुटका नाही असे सार्त्रचे मत आहे.
याच ग्रंथात ‘बॅड फेथ’ या नावाचे एक
उपप्रकरण आहे. ‘बॅड फेथ’ चे कु-श्रद्धा हे अगदी बॅड ट्रान्सलेशन आहे. कारण त्या
उपप्रकरणात सार्त्र जे सांगतो त्यात काही फेथही नाही आणि खरेतर बॅडही काही नाही. उदाहरणे
देऊन सार्त्रने जे सिद्ध केले आहे त्याला मराठीत कृतक-स्वाभिज्ञता (कंट्राइव्हड
आयडेंटिटी) हे योग्य भाषांतर ठरेल.
डेटवर गेलेली मुलगी मुलग्याने अचानक हातात हात घेतल्यावर झटकूनही
टाकत नाही पण अनुकूलताही दिसू देत नाही तेव्हा ती तिच्या लटकत्या स्व-अभिज्ञेचे
रूप दाखविते. (किंवा ‘तो वेटर अगदी वेटर
असण्याचा प्रयत्न करीत होता’ अशी उदाहरणे येतात) आता संक्रमणकालीन चाचपडण्याच्या फेज मध्ये असा
अर्धवटपणा असणारच! याला मानवी अस्तित्वाचा अभिशाप मानण्याची गरज नाही. ज्याअर्थी
आपण अमुकप्रकारचे असण्याचा प्रयत्न करतो त्या अर्थी आपण तसे नसतो. पण बनत जाऊ शकतो
की नाही?
सार्त्र कृतक-स्वाभिज्ञता ही गोष्ट स्वरूपदत्त आणि
अपरिहार्य मानतो ही खरी आक्षेपार्ह बाब आहे. कारण सार्त्रचा संदेश काय? तर
आत्मनिष्ठपणे जगा. पण आत्मनिष्ठ रहाणे कसे अशक्य आहे असे तोच सिद्ध करत असेल तर संदेशाचा
काय उपयोग?
आत्मवियोग म्हणजे एलीयनेशन. आत्मता जर अशक्यच असेल तर ‘आत्मवियोगाचा’ प्रश्नच येणार नाही. आपण मनापासून आणि कृतक असे दोन्ही पवित्रे
अनुभवू शकतो. ज्यात कृतकता कमी लागेल तो जास्त चांगला समाज असेल. पण
सार्त्रमतानुसार कृतकता, आत्मवियोग, असंबद्धता (अब्सर्डिटी) ही सगळी मंडळी
जाणीवेच्या स्वरूपानेच अपरिहार्य आहेत.
दुसऱ्याचे स्वातंत्र्य ही गोष्ट सुध्दा आपण
पेलूच शकत नाही. आपण एकतर दास्य-पवित्र्यात तरी जातो किंवा प्रभू-पवित्र्यात तरी
जातो हे सार्त्र ‘बीइंग फॉर अदर्स’ या प्रकरणात सिद्ध करतो. इतकेच नाही तर, परपीडन
तरी किंवा आत्मपीडन तरी, यापैकी काहीतरी स्वीकारावेच लागते असेही दाखवून देतो. हे
द्वंद्वात्मक विचार न करता द्वैतात्मक विचार करण्याचे दुष्परिणाम आहेत. मुख्य म्हणजे
यातून माणसाला दोषैवदर्शी (सिनिक) विचारसरणी प्राप्त होते.
माझे स्पष्ट मत असे आहे की वियोगही खरा आणि योगही खरा,
कृतकताही खरी आणि अस्सलताही खरी, सुसंबध्दताही खरी आणि असंबद्धताही खरी,
प्रामाण्यशक्ती कधी हरतेही पण कधी जिंकतेही या आणि अशा सगळ्याच श्रेय-दुरित
अक्षांवर उन्नयन शक्य आहे.
नसतेपणाचा अनुभव म्हणजे नेमके काय हे तर मला समजूच शकले
नाही. आपण बेशुध्द होतो, जन्मालाच आलेले नव्हतो, मरू त्यानंतर असणार नाही हे ठीक
आहे. पण जागृतावस्थेत नसतेपणाचा अनुभव (अहंविलोप आत्मयोग) हा एकतर अध्यात्मिक आणि
सुंदर असेल किंवा तसा अनुभव येणारच नाही. पण अस्तित्ववादी म्हणतात तसा किळसवाणा
नसतेपणा अनुभवाला कसा काय येणार? कधी कधी एकवेळ आपल्या असतेपणाची किळस येऊ शकेल.
पण किळस वाटली तरच ती खरी आणि छान वाटले तर मात्र ते कमअस्सल, ही काय कटकट आहे?
आपल्याकडे जे असार आहे ते असत् आहे अशी एक भूमिका आहे. जे
स-सार आहे तेच सत् आहे हेही ओघाने आलेच. अस्तित्ववाद हा असार आहे तेच सत आहे असे
सांगणारा आहे (म्हणून त्याचे नावच शीर्षकात दिल्याप्रमाणे अ-सार-सत्-ता-वाद हे असायला
हवे.)
मायावाद्यांना मी असे म्हणतो की समजा सारे स्वप्नच आहे पण
दुःस्वप्नाचे सुस्वप्न करण्यासाठी आम्हाला स्वप्नातल्या स्वप्नातच झटायचे आहे.
तोवर आम्हाला जग येणे नकोच आहे. रिअलिटी ही व्हर्चुअल आहे की नाही यापेक्षा ती
व्हर्च्युअस आहे की नाही हे महत्त्वाचे. जेव्हा नियतीवादी म्हणतात की आपल्याला जो
संकल्पस्वातंत्र्याचा प्रत्यय येतो तो भासमान आहे, खरे तर आपण कळसूत्री बाहुल्याच
असतो. मी म्हणतो की खरे म्हणजे स्वातंत्र्य नाही पण आपल्याला ते भासते आहे असे जग,
आणि खरे(मेटॅफिजिकली) स्वातंत्र्य आहे आपण आपल्याला सगळेच नाईलाजाने करावे लागते
आहे असे जग, यात मी पहिल्या प्रकारचे जगच पसंत करीन! म्हणे असत् असले तरी चालेल पण
सार पाहिजे.
आधुनिकोत्तर उच्छेदवाद: प्रामाण्याची ऐशीतैशी
ल्योतार(१९२४-१९९८): वादविवादाकडून कथाकथनाकडे
द पोस्ट मॉडर्न कंडीशन या ग्रंथात ल्योतार डिस्कर्सीव्ह
विरुध्द नॅरेटिव्ह असे द्वय मांडतो. एखाद्या प्रमेयाची सिद्धता किंवा
धोरणाचे/मागणीचे समर्थन चालू असते तेव्हा वादविवादाची भाषा वापरली जात असते.
तिच्यात नित्य वर्तमानकाळात विधाने केली जातात. जसे की त्रिकोणाच्या तीन कोनांची
बेरीज दोन काटकोनाइतकी असते, दिलेले वचन न पाळणे चूक असते, समाजरचना
उत्पादनपद्धतीवर अवलंबून असते, दूताचा वध करणे हे युद्धातसुध्दा वर्ज्य असते इत्यादी.
यात आतापर्यंत दूतांचे वध केले गेले होते की नव्हते? किंवा हा दंडक कधी अस्तित्वात
आला याच्या हकीकती येत नाहीत. दूताचा वध करणे का चुकीचे आहे याचे उत्तरही, ‘टळणार
असेल तर युध्द टाळलेच पाहिजे’ किंवा ‘सैनिक नसलेला नागरिक हा टार्गेट करता कामा नये’ असे सामान्य ब्रीदविधानच (नोर्मेटीव्ह जनरलायझेशन) असेल. त्यात जर अमुक
दूताचा वध झाला नसता तर तमुक युध्द टळले असते असे एकही उदाहरण न देता हे विधान केले
जाईल.
द्रौपदी दासी ठरते की ठरत नाही हा एक वादविषय होता.
त्यावरील वाद, द्यूताचे नियम पाळले जात आहेत अथवा नाही, पत्नी ही पतीची मालमत्ता
असते की नाही अशा सर्व गोष्टींचा उहापोह करून झडला. दासी जरी झाली तरी दरबारात
लज्जाहरण करणे योग्य की अयोग्य हा वाद उपस्थितच झाला नाही. समजा ही सर्व हकीकत
घडलेलीच नव्हती. पण तरीही आपण म्हणू शकतो की दुसरा वाद हा पहिल्या वादापेक्षा
जास्त मूलगामी आहे ‘दासी जरी झाली तरी’ हे दासी पेक्षा जास्त सार्विक आहे म्हणून ते ब्रीद म्हणून
उच्चतर आहे.
वरील सर्व वर्णन हे भाषेच्या डिस्कर्सिव्ह उपयोजनाचे वर्णन
आहे. प्रामाण्यशक्तीचा प्रत्यय येणे किंवा वापर होणे हे डिस्कर्सिव्ह पद्धतीत घडत
असते.
भाषेचा नॅरेटिव्ह प्रयोग अगदी वेगळा असतो. तो विशिष्ट
घटितापुरता आणि भूतकाळात होतो. त्याच्या क्रमाची सुरुवातही यादृच्छिक असते. पुढील
प्रसंगांची मालिकाही योगायोगानी युक्त असते आणि मुख्य म्हणजे कोणतातरी दंडक घालून
देणे हा हेतू (उघडपणे तरी) नसतो.
पायथागोरसचा काटकोन त्रिकोणवाला सिद्धांत सिद्ध होताना, ‘पायथागोरस’ या व्यक्तीची कहाणी कधीच प्रस्तुत ठरत नसते. सिद्धांताचा खरेपणा हा नेहमीसाठीचा
असतो व भाषा डिस्कर्सिव्ह असते. ‘भूमितीच्या इतिहासात असे एक घटित घडले होते की कोणाच्या तरी मते---’ हे नॅरेटिव्ह झाले.
ल्योतारसाहेबाचा मुख्य सिद्धांत असा की वरवर पहाता जे
डिस्कर्सिव्ह असते ते खरेतर पश्चभूमीवर घडत जाणाऱ्या खऱ्या तर नॅरेटिव्हच्या ओघातच
उद्भवते. असे म्हणून ल्योतार डिस्कर्सिव्हला नॅरेटिव्हच्याच पातळीवर खेचतो. ल्योतारच्या
मते नॅरेटिव्हच खरे असल्याने आपल्याला वाटणाऱ्या सार्विकता, सार्वकालिकता,
प्रामाण्यशक्ती वगैरे डिस्कर्सिव्ह गोष्टी तो आभासात्मक ठरवितो.
ल्योतारमतानुसार प्रबोधनयुगातले वैचारिक साहित्य हे खरेतर
मानवमुक्तीच्या घोषणेखाली चाललेल्या एका महाकथेच्या
कथनाचे भाग आहेत. आधुनिकोत्तर विचारवंताचे खरे कार्य हे आहे की डिस्कर्सिव्हमागे
दडलेले नॅरेटिव्ह बाहेर काढणे. असे केले की त्यातील सत्यांना जी अनिवार्यता
(नेसेसिटी) असते ती जाऊन यादृच्छिकता (कंटिनजन्सी) प्राप्त होईल. म्हणजे अमुकच एक
बरोबर असे काहीच राहणार नाही. आमच्या कथेत हे असे घडले तुमच्या कथेत ते तसे घडले म्हणजे
कोणाचीच कोणावर दादागिरी नको! (म्हणजे क्लिटेरॉक्टॉमी हा इसीसच्या कथेचा एक भाग
आहे! बस्स! ते कृत्य निर्विवादपणे निषेधार्ह असे काही नाही! असा अर्थ होतो.)
ल्योतारसाहेबाचा दुसरा मुद्दा असा की महाकथन धोक्याचे असते.
कथन जितके लघु तितके उत्तम म्हणजे त्यातून सामान्य तत्त्वे निष्पन्न व्हायला नकोत.
नीतिशास्त्र नैष्ठिकप्रामाण्य वगैरे गोष्टी ज्या डिस्कर्सिव्ह भूमीवर उभ्या राहतात
ती भूमीच काढून घेणे ही ल्योतारची रणनीती आहे. असे अराजक माजवून ल्योतार काय साधू
इच्छितात ते त्यांचे त्यांनाच माहीत. आधुनिकोत्तरवादी मंडळी, प्रामाण्यशक्ती (रीझन)
आणि प्रामाण्यआस्था (रॅशनॅलिटी) यांची शिकार वेगवगळ्या तऱ्हांनी करतात.
संज्ञाव्यूह हे सत्तेचे गुलाम, प्रामाण्यध्वन्साचा
व्युत्पत्तीमार्ग---फुको (१९२६-१९८४)
कोणताही वाद शक्य होण्यासाठी चर्चिकांत एक समाईक
संज्ञाव्यूह (डिस्कोर्स) असावा लागतो हे खरेच आहे. क्षेत्रानुसार, गटानुसार आणि
काळानुसार संज्ञाव्यूह विशेषीकृत झालेले असतात हेही खरेच आहे. पण खऱ्या वादातली
रीत, व्याख्या देऊन संज्ञाव्यूह स्पष्ट करून घेणे, ही असते.
फुको, ‘संज्ञाव्यूह काय आहे’ याकडून इतिहासात तो कसकसा बनत गेला किंबहुना घडवून आणला गेला याकडे आपले लक्ष
वळवतात. हा संशोधनाचा विषय म्हणून चांगलाच आहे. पण फुकोप्रेमी, कोणताही वाद
चाललेला असताना व्युत्पत्तीचा वाद उकरून काढतात. उदाहरणार्थ हा खून आहे की अहेतुकपणे
मृत्यूस कारणीभूत ठरणे आहे, यावर वाद चालू असेल तर, फुकोप्रेमी खून हा शब्द कधी
प्रथम आला, कसा रुळला, तोच शब्द का आला या व्युत्पत्तीच्या प्रश्नाकडे वाद वळवतात.
व्युत्पत्तीबाबत वाद सुरू झाला की मूळ वाद बाजूला पडतो. ज्या अर्थी संज्ञाव्यूहांना
इतिहास आहे त्या अर्थी त्यांना ‘प्रामाण्य’ कधीच नसते असे
मानणे ही प्रामाण्यशक्ती (रीझन) आणि प्रामाण्यआस्था (रॅशनॅलिटी) यांची शिकार
करण्याची फुकोप्रणित रीत आहे.
उदाहरणार्थ, मानसिक आजार या गोष्टीकडे कसे पहावे, हे कसकसे
बदलत गेले (मध्ययुगानंतर पण आत्ताची सायकीयाट्री सापडण्याअगोदर), याचा तपशीलवार
इतिहास मांडून फुको असा निष्कर्ष काढतात की, गैरसोईच्या लोकांना समाजापासून अलग
ठेवता यावे यासाठी सत्ताधाऱ्यांनी, पद्धतशीरपणे ‘मनोरुग्ण’ ही संकल्पना घडविली.
क्लिनिक म्हणजे जिथे एक माणूस दुसऱ्या माणसाकडे वस्तू म्हणून बघू शकतो ते ठिकाण!
(माझ्या मते माणसाचे जे वस्त्विक अंग आहे त्याकडे त्याने स्वतःसुध्दा वस्तू म्हणून
पाहणेच हिताचे आहे.)
दुसरे असे की फुकोंच्या मांडणीतून असे ध्वनित होते की
मनोरुग्ण ही संकल्पना निघण्याअगोदर समाज मनोरुग्णांना जणू काही अधिक मानवीय वागणूक
देत होता! अहो वस्त्वीकरण व्हायच्याआधी पिशाच्चीकरण/सैतानीकरण करून अत्यंत अमानुष
वागणूक दिली जात होती त्याचे काय? विच हंटिंग कालखंडात चेटकीण ही संकल्पना
सत्ताधाऱ्यांनी कशी उदयास आणली हे तुम्ही पाहणार की नाही? मध्ययुगानंतरच्या काळात
व क्लिनिकच्या उदयाआधी मनोरुग्णांना करमणुकीचा विषय बनविणे वा राबवून घेणे, इतर
अत्याचार करणे आणि ग्रस्त-व्यक्तीची साक्ष अवैध मानणे हे सारे चालू होतेच की नाही?
आधुनिक सायकीयाट्री बाल्यावस्थेत असताना तिच्यात काही खुळचट समजुती असतीलही. जिथे टॉन्सिल्स
काढल्याने उंची वाढते अशा समजुती नांदू शकतात तिथे चाचपडणाऱ्या अवस्थेत सायकीयाट्रीतही
दोष असतील. पण खरोखरीचे उपाय सापडण्याचे श्रेय आधुनिक सायकीयाट्रीलाच आहे. (फ्रॉइडला
नव्हे).
परंतु फुको साऱ्याच ज्ञानाला पुराततत्व विभागात नेऊन सोडतात.
त्यांच्या महत्वाच्या पुस्तकाचे शीर्षकच ‘आर्केओलॉजी ऑफ नॉलेज’ असे आहे. लैंगिकतेच्या
संकल्पना कसकशा बदलत गेल्या, अपराध आणि शिक्षा यांच्या संकल्पना कसकशा बदलत गेल्या
हे सारे संशोधन मोलाचेच आहे. प्रश्न हा आहे की संज्ञाव्यूह विकसित होतात त्यात
प्रामाण्यशक्ती (रीझन) आणि प्रामाण्यआस्था (रॅशनॅलिटी) यांना काही स्थान असते की नाही.?
फुकोप्रेमी मंडळी काहीही सार्विक आले की ते नाकारतात. विचार जितका संकुचित
गटापुरता तितका तो जनवादी आणि जितका वैश्विक तितका तो अभिजनवादी, असे समीकरणच डॉ.
गोपाळ गुरू यांनी प्रचलित केले आहे व ते आधुनिकोत्तर वादाचाच आश्रय घेत केले आहे.
डेरिडा(१९३०-२००४): चिन्हव्यवस्थेमार्गे छिन्न-अव्यवस्थेकडे
चिन्हव्यवस्था अस्तित्वात आहे आणि मानवी जीवनात ती फार
महत्त्वाची आहे हे कोणीच नाकारणार नाही. पण फक्त चिन्हेच काय ती आहेत बाकी काहीच
नाही अशी ‘चिन्ह सत्यम
जगन्मिथ्या’ भूमिका घेणे हे
विक्षिप्तपणाचे लक्षण ठरेल. डेरिडा आणि कंपनी अशी भूमिका घेतात. या भूमिकेला आपण ‘चिन्हसर्वस्ववाद’
हे नाव देऊ. हे करताना ते आपल्या एका (खरेतर मानीव) असहायतेचा गैरफायदा घेतात. आपण
चिन्हेतर अशा कशाही विषयी काहीही सांगायला जावे तर ते सांगणे भाषेतच करावे लागते.
यावर तुम्ही बोलताय तीही चिन्हेच आहेत की! असे म्हणून हे आपल्याला अडकवू पहातात.
खरेतर भाषा म्हणजेच जीवन नव्हे हे सर्वांनाच विदित असते. चिन्हव्यवस्थेचे विश्लेषण करण्यासाठी डेरिडा आणि मंडळी
चिन्हक (सिग्निफायर) आणि चिन्हित (सिग्निफाइड) ही प्राथमिक जोडगोळी मानतात.
आपल्याला वाटते की चिन्हवस्तू आणि चिन्हार्थ अशीच ही जोडगोळी असेल. पण अर्थापर्यंत
पोहोचणे हेच अमान्य करीत डेरिडा यात एक अनवस्था मानतो. त्याच्या मते चिन्हित हे
स्वतः पुन्हा कशाचे तरी चिन्हक बनतेच. मग त्याचे चिन्हित हे पुन्हा चिन्हक बनते व
ही अंतहीन साखळी चालू रहाते. ‘अंतिमतः चिन्हित’ (ट्रान्सेन्डेंटल
सिग्निफाईड) काय? हा प्रश्न कायम अनुत्तरितच रहातो. बुळबुळीत साबणाप्रमाणे, अर्थ घट्ट
धरायला जावा तर सटकतो, हा डेरिडाच्या सिद्धांताचा मुख्य मुद्दा आहे. प्रत्यक्षात
असे घडत नाही. तसे घडत असते तर आपण चिन्हव्यवस्था उपयोगात आणूच शकलो नसतो.
आपण सामान्यतः असे समजतो की अर्थ हे मुळातच असतात व ते
व्यक्त करण्यासाठी आपण भाषा वापरतो. डेरिडाच्या मते भाषा ही स्वयंभू व चंचल असून
तीच आपल्याला नाचवत असते. अशा तऱ्हेने, आपण माणसे म्हणजे कळसूत्री बाहुल्याच, हे
मत कायम राहते. खेळीया कोण याबाबत ईश्वराची जागा भाषेने घेतली जाते.
जीवन-प्राथम्य
आपल्याला जी भूक लागते ती काही, ‘प्राण्यांना पोषण लागते’ या तथ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लागत नाही. चिन्हव्यवस्थेचा प्रश्नच नसणाऱ्या
प्राण्यांनाही ती लागतेच. भूक हे चिन्हक नाही तर ती स्वतःच एक अर्थपूर्ण गोष्ट
आहे. जीवनातील विविध गोष्टींना असणारी अर्थपूर्णता ही चिन्हनिरपेक्षपणेदेखील आहे.
अर्थपूर्णतेवर चिन्हव्यवस्थेचा (कधी नको इतका) प्रभाव पडतो हे जरी खरे असले तरी
अर्थपूर्णतेचे अस्तित्व मुदलात स्वयंभू आहे.
खरेतर हे वाक्य मुद्दाम म्हणावे लागणे
ही एक दुर्दैवाची बाब आहे. माणसाने संकेतांचा शोध लावून माणसामाणसांतले
कम्युनिकेशन अधिक समृध्द केले कारण कशाचे प्रतिनिधित्व कशाने करावे याची कक्षा, ‘नैसर्गिक आविर्भावांच्या’ तुलनेत खूपच विस्तारली, हे खरेच.
पण याचा अर्थ असा नाही की जीवन हे केवळ संकेताधिष्ठित बनले.
मुळात कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहू. मला स्वतंत्र जाणीव आहे तशीच जाणीव
समोरच्या व्यक्तीलाही आहे. त्याच्या जाणीवेत मला आणि माझ्या जाणीवेत तिला उपस्थिती
आहे. मी काही कृती करण्याच्या आधीच, तशी कृती करू इच्छितो, हे जर त्या व्यक्तीला
कळले तर तिचे सहकार्य मिळविणे आणि सांघिक कामगिरी करणे शक्य होईल. माझ्या
जाणीवेतले काही दुसऱ्याच्या जाणीवेत पोहोचवणे हे दोघानांही अत्यंत लाभदायक असते.
इतकेच नव्हे तर अनुभव सहप्रचित (शेअर) करायला मिळणे याला स्वतोमूल्य देखील आहे.
माणसाहून कितीतरी कमी विकसित प्राणी सुध्दा त्याच्या
मर्यादेत हे साधत असतात. कम्युनिकेशनला अगदी तत्त्वतः उचित शब्द अन्य-चित-संधान हा
ठरेल. आपण चित्संधान एवढाच ठेवू (संद्यापन म्हटले तर त्यात संज्ञा आल्याच असे वाटू
शकते. पारेषण म्हटले तर टेलिकम्युनिकेशन वाटू शकते. जाणीव ही गोष्ट एलीमिनेट होईल
असे काहीही नको म्हणून ‘चित्संधान’ म्हणावे.)
सांकेतिक चिन्हे हे साधन सापडण्यापुर्वीही चिन्हेतर स्वरूपांत चित्संधान साधले जात
असते. किंबहुना ते तसे साधले जात असल्यानेच आपण संकेत ठरविणे ही गोष्ट करू शकतो.
संकेताचा ठराव मांडण्यासाठी संकेतपूर्व असे काही सहप्रचित लाभलेले असावे लागते.
म्हणजेच चिन्हव्यवस्थेला अचिन्ह चित्संधानाचा आधार लाभतो म्हणूनच चिन्हव्यवस्था
शक्य होते.
यात मी अंतर्ज्ञान किंवा टेलीपथी असले काही धरत नाहीये.
किंबहुना ‘सार्वजनिक
प्रत्यक्ष’ हे प्रमाण ज्ञान
बनते ते कोणालाही सहप्रचिती मिळू शकते म्हणूनच! ‘चिन्ह सत्यम अर्थ मिथ्या’ असे
मानणाऱ्याना ही साधी गोष्ट कशी लक्षात येत नाही याचेच आश्चर्य वाटते.
दोन किंवा जास्तसुध्दा माणसांना एकाच वेळी तिसऱ्या एखाद्या
गोष्टीची सहप्रचिती येऊ शकते (को-एक्स्पीरिअन्सिंग). तसेच त्यांना एकमेकांची थेट
प्रचीती (डायरेक्ट म्युच्युअल एक्स्पीरीअन्सिंग) येणे देखील घडत असते.
समजा दोघे आर्म्सरेसलिंग करत आहेत. त्याचा जोर कमी पडू
लागला आहे. म्हणजेच मला आत्ता जोर करायला संधी आहे हे मला कोणत्याही अन्य
माध्यमातून किंवा तिसऱ्या कशाने तरी ‘त्याच्या जोराचे प्रतिनिधित्व’ केल्याने कळत नसते तर माझ्या स्नायुतून मला आलेला प्रतिस्पर्ध्याचा तो थेट अनुभव
असतो. जिवंत-परस्परानुभव येणे हे झगड्यात, प्रणयात, वात्सल्यात व सांघिक श्रमात
होतच असते. हे ट्रान्सअनिमेशन अचिन्ह-चित्संधानाचा महत्त्वाचा आधार असते.
चिन्हसर्वस्ववादी लोक या अनुभवांची देखील चिन्हांचाच आणखी
एक प्रकार अशी संभावना करू पहातात. ते लक्षण/गमक/द्योतक (डीफाइनिंग फिचर,
सिम्प्टम, इंडिकेटर) आणि संकेतचिन्ह (कन्व्हेन्शन-साईन) यात घोळ घालत असतात.
लक्षणे ही कोणत्याच चिन्हव्यवस्थेवर अवलंबून नसतात. ती वस्तुतःच ‘असतात’.
सम्यक चिन्हमीमांसा (माझ्या मते)
निर्देशक आणि निर्दिष्ट हा संबंध मुळात वर म्हटलेल्या सहप्रचितीमध्ये
जो अंगुलीनिर्देश केला जातो तेथून सुरु होतो. अंगुलीनिर्देश करणे हाही संकेत आहे
असे चिन्हसर्वस्ववादी म्हणतात. म्हणून आपण कुत्र्याचे उदाहरण घेऊ. कुत्रा
मालकापाशी येऊन भुंकू लागतो. त्याच वेळी तो मालकाची पँट तोंडात धरून ओढू लागतो.
त्याला आपल्याला काहीतरी दाखवायचे असते. तो ओढत नेतो आणि मालकाच्या दृष्टीने
लक्षणीय (सिग्नीफिकंट), अर्थात कुत्र्याच्या समजेनुसार, गोष्ट ‘दाखवतो’. कोणालाही नेऊन मूळ गोष्टच दाखवणे यात दुसऱ्या कशानेतरी तिचे प्रतिनिधित्व
करण्याचा प्रश्नच नसतो. ‘बघा बघा तुम्हीही बघा’ हे कम्युनिकेशनचे आदिवाक्य म्हणता येईल. एखाद्या भाषापूर्व मानवाला दुसरा
भाषापूर्व मानव “ हे फळ विषारी
आहे. खाऊ नकोस.” हे कसे सांगेल
याचे माईमिंग शाळेतील पोरे सुध्दा करून दाखवतील! वाचकांनीही गंमत म्हणून करून
बघायला हरकत नाही.
जे मूर्त आणि समक्ष असेल व प्रस्तुत आणि लक्षणीयही असेल ते
चिन्हव्यवहाराशिवायही अनुभवता येते (भूक). जे मूर्त नाही आणि समक्षही(प्रेझेंटेड)
नाही पण प्रस्तुत आणि लक्षणीय आहे, ते व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच अन्यांच्या
जाणीवेत आणण्यासाठी, प्रतिनिधित्व(री-प्रेझेन्टेशन) करणे हा प्रश्न येतो. म्हणून अ-मूर्त
अ-समक्ष प्रस्तुत आणि लक्षणीय असे जे ते निर्दिष्ट होय व त्याचा निर्देश ज्या
कोणत्या मूर्त समक्ष गोष्टीने करायचा ते निर्देशक ठरते.
निर्देशक हा शब्द आपण
ज्याला चिन्हक म्हणतात त्याच्या जागी व निर्दिष्ट म्हणजे ज्याला चिन्हित म्हणतात
त्यासाठी वापरत आहोत. मग हे वेगळे शब्द का वापरायचे? याचे कारण असे की
चिन्हक-चिन्हित यात चिन्हिताला स्वतःची अशी अर्थवत्ता आहे की नाही हे संदिग्ध
राहते. तसेच चिन्हक हे संकेताने आहे, रूपकाने आहे, लक्षणाने आहे की भिन्नतांची
संरचना टिकवण्यासाठी आहे हेदेखील चिन्हकातच गडप होते व चिन्हसर्वस्ववाद्यांना घोळ
घालायला मोकळे रान मिळते.
मी चिन्हक-चिन्हित या द्वयाच्या जागी एक चतुष्टक योजित
आहे.
१) निर्दिष्टाची (जीवनातली) लक्षणीयता (सिग्निफिकन्स)
म्हणजेच ‘अर्थ’
२) निर्दिष्टाचे स्वरूप म्हणजे जागृत केली गेलेली संकल्पना
(इनव्होक्ड कन्सेप्ट)
३) निर्देशकाचे स्वरूप म्हणजे समक्ष सादर केली जाणारी
प्रतिमा(प्रेझेंटेड इमेज)
४) निर्देशकाचे औचित्य(संकेत, रूपक, लक्षण, प्रासंगिक
संदर्भ आणि भेदरचनेसाठी लागणारे वेगळेपण) याला मी सिग्नीजियन्स असा इंग्लिश शब्द
नव्याने बनविला आहे.
या चौपदरी रचनेमुळे चिन्हसर्वस्ववाद्यांनी घातलेला घोळ कसा
दूर होतो ते आता पाहू.
निर्देशकावरून निर्दिष्टावर ही क्रिया होतेच. पण समजा त्या
निर्दिष्टातून नवा निर्देशक उपटला आणि त्याचे निर्दिष्ट आणखी काही असले व असा
चिन्हखेळ सुरु झालाच तरी त्यातील साखळ्यांपासून, दरवेळी, निर्दिष्टाची लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) व निर्देशकाचे
औचित्य(सिग्नीजियन्स) ही दोन्ही महत्त्वाची मंडळी बाहेर सुरक्षित राहतात. उदा.
इतकेच नव्हे तर दरवेळी लक्षणीयता आणि औचित्य वेगळे कळत राहून ते साखळीत गडप होत
नाही किंवा भेदांच्या रचनेतही गडप होत नाहीत.
आपण हे सोदाहरण स्पष्ट करू. ‘लाल फूल’ ही प्रथमतः एक
रेखाकृती आहे. तिचे निर्देशन-कार्य हे सामान्यतः लाल फूल हा ध्वनी ‘मनातल्या कानात’ उत्पन्न करणे हे आहे.
पण जर प्रुफ रीडर, लिहिलेले आणि छापलेले एकच आहे ना, हे तपसण्यासाठी ‘वाचत’ असेल, तर आकाराशी आकार जुळला हे पुरेसे आहे. म्हणजे त्याच्या जीवनात लाल फुल या रेखीम-चिन्हकाची
लक्षणीयता (सिग्निफिकन्स) आहे ती प्रुफ रीडर म्हणून. त्याचा सिग्नीजियन्स त्याला
लेखकाचे अक्षर आणि जुळाऱ्याने निवडलेले टाईप यातील समकक्षता (कॉरस्पॉंडन्स) हा
आहे.
इंटरनेटवर कधी अतिशय वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलेला
आकडा/शब्द टाईप करायला लावतात. आकडा/शब्द सिग्निफीकंट नसतोच. इकडच्या बाजूला मशीन
आहे की माणूस एवढेच त्या साईटवाल्याला अजमावायचे असते. माणूसच आहे ही खात्री पटली
की त्या ‘चिन्हका’चे कार्य संपले.
आता आपण मनातल्या कानात उमटणारा लाल फूल हा ध्वनी निर्देशक
म्हणून घेऊ. तो लाल फूल या वस्तूचा निर्देश करतो. फूल विक्रेत्याच्या दृष्टीने
ग्राहकाला वस्तू पटली की सिग्निफिकंस संपला. चिन्हसाखळी तुटली. (ग्राहक चक्क बोट
दाखवून हे द्या असे म्हणाल्याने सिग्नीजियन्स लागलाच नाही असेही अचिन्ह
कम्युनिकेशन होऊ शकते)
गणपतीला लाल फुले आवडतात अशी धारणा असलेला समाज आहे, तसेच
मुलीला आपण तिच्यावर भाळलोय हे पोहोचवण्यासाठी लाल फूल देतात असाही संकेत आहे. आता
गणेशचतुर्थी आहे की रोझ-डे आहे या प्रासंगिक संदर्भाला सिग्निजीयन्स प्राप्त होतो.
‘सवय आहे, पद्धत
आहे, गणपतीची पूजा यथासांग केली आहे’ हे समाधान वाटले तर लाल फुलाचा सिग्निफिकन्स साधला गेला.
पण एखादा दार्शनिक आणि गणपतीभक्त असला तर त्याच्या मनात “गुणातीताय, गुणाधीशाय, गुणप्रविष्टाय धीमही” हे शंकरने म्हटलेले अजय-अतुलचे गाणे सुध्दा जागृत होऊ
शकते. अतीत असून प्रविष्ट? हा द्वंद्वात्मक विचार येऊन सर्वेश्वराचे स्मरण होऊ
शकते. दार्शनिक म्हणून जे सिग्नीफिकन्सेस व जे सिग्नीजियन्सेस तो बाळगून असेल
त्यावर पुढचे निर्दिष्ट अवलंबून असते. याची चिन्हसाखळी प्रुफरीडर पेक्षा जास्त
लांबीची आहे. डेरिडा वा सोस्यूर
रेखीम(ग्राफिम)-स्वनीम(फोनिम)-वस्तू(ओब्जेक्ट)-प्रतीक(सिम्बॉल)-उपास्य(वर्शिप्ड)-फल-फलातला
स्वार्थ-तसा स्वार्थ प्रेरित करणारी समाजव्यवस्था-------फलाना ठिकाना अशी अंतहीन
साखळी मानतात कारण त्यांनी सिग्निफिकन्स आणि सिग्नीजियन्स या गोष्टी गुलदस्त्यात
ठेवून फक्त चिन्ह्क-चिन्हित------त्यातून-नवे-चिन्ह्क-नवे-चिन्हित---त्यातून--- अशी
जीवनबाह्य आकारिक साखळी मानली आहे.
सोस्यूरने आपले १ व २ या दोन्हीला मिळून चिन्हित म्हटले आणि
३ व ४ या दोन्हीला मिळून चिन्हक म्हटले पण १ आणि ४ दुर्लक्षित ठेवून त्याने हे
केले. ही सोस्यूरची चूक होती. ही चूक केल्यानेच तो चिन्हव्यवस्था म्हणजे फक्त
भेदांची रचना या संरचनावादी मांडणीत घुसला. ही संरचनावादी मांडणी गतीशील नाही असे
म्हणत डेरिडाने उत्तर-संरचनावाद मांडून अंतहीन खेळ व सटकणारा अर्थ या भानगडी
आणल्या. पण मुदलात चिन्हव्यवस्था आणि जीवन यांच्यात नेमका काय संबंध आहे हे
दोघांनीही गुलदस्त्यात (ओब्स्क्युअर्ड) ठेवले. माझ्या पद्धतीत लक्षणीयता(सिग्नीफिकन्स)
या पदाने अर्थ चिन्हव्यवस्थेपासून स्वतंत्र राखला आणि औचित्य(सिग्नीजियन्स) या
पदाने संकेत की रूपक की लक्षण की रचनेचा दबाव की प्रासंगिक संदर्भ हे प्रश्न खुले ठेवले. म्हणजेच मी
चिन्हव्यवस्थेच्या विचाराला जीवनात स्थापित करू बघतोय तर त्यांनी जीवनच
चिन्हव्यवस्थेत गडप केले.
निर्देशकाचे औचित्य (सिग्नीजियन्स) हे त्या प्रतिमेशी
यादृच्छिक साहचर्य(असोसियेशन) असलेल्या प्रतिमा व अशा प्रतिमांच्या वापराच्या
परंपरेने बनलेल्या, रेखीव(क्रिस्टलाईन) नसलेल्या (अमॉर्फस) एकूण-संदर्भमयते-मुळे
लाभत असतो. संरचनावादी भाषाविज्ञानामुळे नव्हे! तसेच निर्दिष्टाची लक्षणीयता (सिग्नीफिकन्स) ही ज्यांच्यात चित्संधान चालू
असते त्यांच्या जीवनातील प्रसंगांमुळे ठरत असते चित्संधानासमवेत ज्या कृती घडतात
त्या कृतीच ‘अर्थ’निर्णयन पक्के करतात किंवा प्रश्नांकित करून खुलेही करतात.
अशा तऱ्हेने चिन्हव्यवस्था ही दोन्ही अंगांनी जीवनात बसती केली जात जात घडत असते.
तिला जीवनबाह्य व आकारिक-तार्किक बनवून तीत अनवस्था वगैरे दोष आहेत असे भासू
लागते. समजून घेणाऱ्या जिवंत व्यक्ती अनवस्था होऊ देत नाहीत अन्योयाश्रय समजून
घेतात द्विरुक्ती व व्याघातही आलंकारिक म्हणून उपयोगात आणतात.
संरचनावाद आणि उत्तर-संरचना वाद हे दोन्ही जीवनबाह्यतेच्या
दोषाने ग्रस्त आहेत व नसलेल्या समस्या निर्माण करून जनतेला उगाचच भेडसावू पहात
आहेत. भाषेतून जीवन काढून घेतले तर अर्थ कधीच गवसणार नाही हे खरेच आहे. पण
निरर्थकतेतच किंवा असारतेतच ज्यांना
साफल्य वाटते त्यांना हे वाद म्हणजे विद्रोहाची थोर साधने वाटतात.
डेरिडाने कलुषित ठरविलेले(स्कँडलाईझ केलेले) त्रिकुट:
द्वय-विरोध-श्रेणी(बायनरी-ऑपोझिशन-हायरार्की)
एखाद्या संहितेची(टेक्स्ट) विरचना (डीकन्स्ट्रक्शन) केली
म्हणजे मूळ संहितेपासून विरचित झालेली संहिता हातात पडेल असे आपल्याला वाटते. पण
विरचनेचा अर्थ तसा नसून रचना उघडकीस आणणे एवढाच आहे. संहितेच्या रचनेत वरील
त्रिकुट कसे दडलेले आहे हे शोधून काढणे म्हणजे विरचना. पण त्रिकुट सापडले तर पुढे
काय? पुढे एवढेच की संहिता नमुनेदार मान्यतांवर आधारित आहे आणि म्हणून तिच्या
कोणत्याच अर्थांकनाला सार्विक अशी वैधता नाही. कारण वेगळी द्वये व त्याच्यातील
विरोधी पदामध्ये वेगळी उच्चनीचता देखील असू शकते. माझ्या मते या त्रिकुटाला कलुषित
ठरविणे आणि वैध अर्थांकन अशक्य मानणे म्हणजे मानवांमध्ये संवादाने सहमती होऊ शकते
हेच नाकारणे ठरते. खरे तर या त्रिकुटात आक्षेपार्ह असे काही नाही.
डेरिडा म्हणतो हे त्रिकुट पाश्चात्य
स्वरूपशास्त्रावर/अतिभौतिकीवर (वेस्टर्न मेटॅफिजिक्सवर) आधारित असते व त्याचा पगडा
मनावरून काढला पाहिजे. मला यात खास करून पाश्चात्य व खास करून
स्वरूप-शास्त्रीय(अतिभौतिक) असे काहीही दिसत नाही. हे त्रिकुट इतके स्वाभाविक आहे
की त्यासाठी पाश्चात्यच काय पण मानव असण्याची सुध्दा गरज नाही. एखादा चित्ता आता
पाठलाग करत असलेली शिकार सोडून देण्यात वाचणारी ऊर्जा आणि ती शिकार मिळाल्यास ती
खाऊन मिळणारी ऊर्जा यात अधिक लाभदायक ऑप्शन कोणता याचा ‘विचार’ किंवा ‘गणित’ करून निर्णय घेतो. त्याला चिन्हव्यवस्था नसेलही पण बुद्धीच नसते असे नाही.
प्राणी अनेक बुध्दिमान वर्तने करू शकत असतात. किंबहुना योग्य निर्णय न घेता चित्ता
हा चित्ता म्हणून टिकूच शकला नसता. निर्णय घ्यावे लागतात हे सत्य एकदा मान्य केले
की काय काय होते ते पाहू. उपलब्ध विकल्पांतून एक निवडून त्याचा संकल्प करावाच
लागतो. विकल्प दोनापेक्षा अधिकही असू शकतात. पण त्यातील जास्तच त्याज्य विकल्प
त्यागले जात जात दोन तुल्यबळ विकल्पांतून एक निवडायची वेळ येतेच.
विकल्प किमान दोन
असावे किंवा उरावे लागतात यातच द्वय म्हणजे बायनरी हा पदार्थ स्थापित होतो. एक
त्यागायचा व दुसरा आंगिकारायचा आहे म्हणजे त्याच्यात विरोध म्हणजे ऑपोझिशन आलेच.
त्यापैकी जो निवडला तो त्यागलेल्यापेक्षा श्रेष्ठ मानला जातोच म्हणजेच श्रेणी
म्हणजे हायरार्की आलीच! तेव्हा द्वय-विरोध-श्रेणी हे त्रिकुट निर्णय नावाच्या
अपरिहार्य जीवनांगाचे अंगभूत स्वरूप आहे. हे त्रिकुट टाळता येत नाही हे तर खुद्द
डेरिडाही खिन्नपणे मान्य करतो. यात खिन्न होण्यासारखे काही नाही असे मला वाटते.
श्रेणी म्हणजे हायरार्की ही गोष्ट समतावाद्यांना त्यामुळे
विद्रोही विचारकांना आणि त्यामुळे उच्छेदवाद्यांना (सबव्हर्सिविस्ट्स) एका
नकारात्मक भावनेनेच बघता येते. पुरुष आणि स्त्री हे द्वय आले की
पुरुषश्रेष्ठत्ववादाचा वास आलाच. हा क्रम स्त्री आणि पुरुष असा बदलला तरी मुद्दाम
क्रम बदलून जेन्डरसेन्सेटिविटीचा आव आणलाय असाही वास येतो! वाद आणि कथा म्हटले की
वाद हा रॅशनल आणि कथा म्हणजे दुय्यम हेच निषेधार्ह आहे असे ते म्हणू लागतात. इतकेच काय पण शब्दापेक्षा भावार्थ
महत्त्वाचा असे म्हटले तरी कोणतेतरी प्रभुत्व(हेजिमनी) किंवा बलधरता(डॉमिनेशन)
शिरू लागले की काय असे भय हायरार्की म्हणजे वाईटच असे मानणाऱ्याना वाटू लागते.
विशेष असे की जे सार्विक(युनिव्हर्सल) असते ते अभिजनांच्या बाजूने व जे
गटविशिष्ट(पॅरॉकियल) असते ते जनांच्या बाजूने पडते असा एक सिद्धांतच गोपाळ गुरू या
नावाच्या गुरुजींनी मांडला आहे.
पण द्वय म्हणजे तुटकपणाच, विरोध म्हणजे वैरच आणि
श्रेणी म्हणजे कशाची तरी अवहेलनाच असे मानून बसण्याची गरज नाही. मात्र उच्छेदवादी
तुटकपणा वैरात्मकता आणि अवहेलना असा या त्रिकुटाचा अर्थ लावून दुःखी होतात व
इतरानाही दुःखी करतात. एखादी गोष्ट
सलगपणे बदलती असली तरी तिचे विश्लेषण करताना टप्पे पाडावे लागतात. पण ही तार्किक
गरज असते याचा अर्थ असा नव्हे की आपण तुटकपणे बघू लागतो. विरोध हे दरवेळी वैरात्मक
तर नसतातच पण परस्परपूरकही असतात. चढ आणि उतार ही एकाच तथ्याची दोन अंगे आहेत.
विरोध हे परस्परप्रवेशीसुध्दा असतात. कोणत्याही प्रसंगी कशाला महत्त्व द्यायचे
याचा निर्णय करावा लागतो पण याचा अर्थ असा नव्हे की आपण कायमस्वरूपी कशालातरी हीन
लेखण्यासाठी महत्त्व जोखतो.
ध्वनीकेंद्री(फोनोसेन्ट्रिक) आणि
सार्विक-सत्य-केंद्री(लोगोसेन्ट्रिक) असण्यात वाईट ते काय?
आपण स्वतःच्या उक्तीला अर्थ देताना, ती करण्यासाठी यत्न
करताना आणि तिचे उच्चारण ऐकताना, आपण एकदमच साक्षी असतो हे तर वरदानच आहे. यत्न,
भोग, बोध आणि सच्चेपणा यांची एकतानता अनुभवायला मिळणे हे आपल्याला एकसंध
व्यक्तिमत्व घडवायला उपकारकच नाही काय? ध्वनीकेंद्री भाषाव्यवहाराला पाश्चात्य
म्हणणे हे कोणाही भारतीयाला विनोदी वाटेल. मौखिक परंपरेचा नको इतका बडेजाव हा
पाश्चात्य नसून उलट खास भारतीय आहे. मंत्रोच्चाराने निसर्गाचे पासवर्ड उघडतात ही
अंधश्रद्धा तर फोनोमोर्फिक म्हणावी लागेल. सार्विक सत्य असते म्हणजे ते एकदाचे आणि
कायमचे ठरून गेलेले असते असे मानण्याचे काहीच कारण नाही. ते आव्हानित होत रहाणे
आणि अधिकाधिक सुधारित होत रहाणे हे महत्त्वाचेच आहे.
पण सार्विक सत्य ही बातच
नस्से म्हटल्यावर आरोग्यपूर्ण वादविवाद आणि त्यातून परस्परांना अधिकाधिक सत्याजवळ
आणि एकमेका जवळ आणणे हा प्रकल्पच नाकारला तर दमनरहित मानवी समाज हा आदर्श
सिद्धांततःच नाकारणे ठरेल. या प्रकल्पाला परिपूर्णता येईल असे मी म्हणत नाही पण हा
प्रकल्प पुढे जात आहे की नाही? माझ्या मते तो ‘धीमी गतीसे मगर निश्चित रूपसे’ (रनसंख्या बढती हुई हे हिंदी क्रिकेट कोमेंटरीवरून घेतले) पुढे जातो आहे.
सहप्रचिती आणि परपस्परप्रचिती या आपल्याला लाभलेल्या शुभशक्ती आहेत. त्यांचे
अस्तित्व नाकारून आणि लहरी सापेक्षतावादाच्या मागे लागून आपण काय साधणार?
पण
फोनोसेन्ट्रिक आणि लोगोसेन्ट्रिक हे शब्द डेरिडा आणि मंडळी शिव्यांप्रमाणे वापरतात. युरोपात काय चालले आहे याची
जुजबी माहिती घेऊन एक/भरपूरांश हळकुंडाने पिवळे होणारे लोक जणू काही आपल्याला
क्रांतीचे हत्यारच गवसले अशा थाटात डेरिडा फेकू लागतात तेव्हा आपण काय करतो आहोत
याची पुरेशी जाणीव त्यांना नसते आणि जबाबदारीचे भानही नसते.
माझे डेरिडाविषयक आकलन कमी पडलेले असू शकते. हे लोक इतके
किचकट व आडवळणी लिहितात की आपल्याला कळले नाही? की कळणे ही गोष्टच थोडी कमअस्सल
असते? हेही कळेनासे होते. परंतु भाषाविज्ञान आणि साहित्यसमीक्षा क्षेत्रातील
मान्यवर प्राध्यापक डॉ हरिश्चद्र थोरात यांनी ‘साहित्याचे संदर्भ’ या ग्रंथात डेरिडा जो लेख लिहिला आहे त्यातील निष्कर्ष माझ्या निष्कर्षांशी
खूपच मिळता जुळता आहे हे पाहून मला एक दिलासा वाटतो.
लाकां(१९०१-१९८१): फ्रॉईडचे मनोविश्लेषण डेरिडाच्या
चिन्हसर्वस्ववादासहित
प्रतीके आणि प्रतीकांत दडलेला बदलता अर्थ हा लाकां या
आधुनिकोत्तरवाद्याने आपला मुख्य विषय बनविला आहे. म्हणजे ते किती अवघड असेल याची
तुम्ही कदाचित कल्पना करू शकाल. फ्रॉईडने (कु)प्रसिध्द केलेले, मातेविषयी
बालकाला वाटणारे लैंगिक आकर्षण, या विषयात लाकां यांनी जास्त उदात्त उपपत्ती
मांडली आहे. त्यांच्या मते ती प्रेरणा लैंगिक नसते तर प्रेमाचीच असते. बालक हे
सरुवातीला आईशी एकरूप असते. आई हेच त्याचे जग असते. जसजशी आई दुरावत जाते तसतशी ही
एकात्मता परत मिळविण्याची (सुदैवाने प्रतीकात्मक) अशी एक युक्ती बालकाला सापडते.
आपली
प्रिय व्यक्ती ज्या पासून वंचित आहे ते तिला मिळवून देणे हा प्रेम करण्याचा एक
मार्ग निश्चितच आहे. फॅलस म्हणजे शब्दशः शिश्न पण ते बरेच व्यापक प्रतीक आहे. आईमध्ये
कमी काय आहे? तर फॅलस! आपल्याकडे तर ते आहे मग आपण ते आईला दिले पाहिजे! अशी एडीपस
कॉम्प्लेक्सची उदात्त उपपत्ती लाकां लावतात.
पहिले आश्चर्य असे की बालक हे पुरुष-बालकच असे ही मंडळी का
गृहीत धरतात? इतकी पुरुषकेंद्री भूमिका घेणाऱ्यांचे स्त्रीवाद्यांना कसे काय
आकर्षण वाटते? स्त्रीला आपल्याला शिश्न नाही असे दुःख असते काय? मेटॅफिजिक्स ऑफ
प्रेझेन्स म्हणजे उपस्थितीवादी सद्वस्तुस्वरूप मीमांसा या गोष्टीचा अर्थ लावताना
आधुनिकोत्तरवादी पुरुषाचे लिंग हे उपस्थित आणि स्त्रीचे लिंग हे अनुपस्थित असेही
मानतात! हे म्हणजे नाक उपस्थित आणि घसा मात्र अनुपस्थित असे म्हटल्यासारखे आहे.
बहिर्गामी म्हणजे उपस्थित आणि अंतर्गामी म्हणजे अनुपस्थित कसे काय ठरते?
मुख्य प्रश्न असा की पुरुष बालक गृहीत धरून सुध्दा ‘आईला काय आहे आणि काय नाही’ हे बालकाला कसे कळणार? या अफाट उपपत्तीमुळे लॅक-अॅन-ऑर्गन च्या अपभ्रंश लाकां
झाला की काय असे वाटू लागते.
या सगळ्या वादळात प्रबोधनयुगाचा प्रकल्प अजून पूर्ण
व्हायचाय व तोच पुढे नेला पाहिजे या भूमिकेवर ठाम राहून, प्रामाण्यशक्ती (रीझन)
आणि प्रामाण्यआस्था (रॅशनॅलिटी)याचा झेंडा फडकत ठेवून संवादी-प्रामाण्य हा शोध
लावणारे हाबेरमास(१९२९-) हे किती मोलाचे आहेत हे आपण ध्यानात घ्यायला हवे.
भारतात आधुनिकता पचवणे आत्मसात करणे हाच प्रकल्प चालू आहे. दुसरीकडे
विविध प्रकारचे विद्रोही त्यांच्या त्यांच्या कारणामुळे अडचणीत आलेले आहेत. आपला
विद्रोह आधुनिकता आत्मसात करण्याकडे कसा लावायचा? कारण मग तो पुरेसा विद्रोह
दिसणार नाही अशी कोंडी झालेली आहे. ही कोंडी मुळात का झाली हे शोधून ती आधुनिक
चौकटीत कशी फोडता येईल हे शोधायचे सोडून ही मंडळी एक आयता शॉर्टकट घेत आहेत. अतिविकसित देशातील सुख दुखणाऱ्या मंडळींच्या
ज्या वार्ता भारतात अर्धवट लीक होतात त्या घेऊन युरोपात तुरी आणि भटीण भटाला मारी
असा जो प्रकार चालू आहे, तो म्हणजे पोस्ट-मॉडर्निझम!
No comments:
Post a Comment