(तांत्रिक कारणासाठी हा लेख दोन भागात केला आहे.)
प्रथम यमनियम हा शब्द समजावून घेऊ या. यमनियम हे कायदेकानू नसतात. म्हणजेच ते न पाळल्यास राज्य संस्थेकडून दंडात्मक कारवाई केली जाईल अशातला काही भाग नसतो. तसेच, ते आपोआपच खरे ठरणारे निसर्गनियम (लॉज ऑफ नेचर) असेही नसतात. ते जाणत्या व चांगल्या लोकांनी पुरस्कृत केलेले दंडक (नॉर्म्स) असतात. तसेच वादसभा फलदायी व्हावी म्हणून काय पथ्ये पाळावीत, असा हा प्रश्न आहे. अन्यथा वितंडवाद किंवा स्क्यू लाईन्समध्ये
चुकामुक होणे एव्हढेच हाती लागते.
खरे तर भारतात वाद कसा करावा याची अतिशय काटेकोर, चोख परंपरा आहे. परंतु ही परंपरा सामाजिक राजकीय जीवनातून बाजूला पडल्यासारखी झाली आहे व विशेषतः शास्त्री-पंडितांपुरतीच मर्यादित राहिली आहे. खरोखर महत्त्वाच्या विषयांवर ज्या गोंधळग्रस्त, घोषणाबाजीच्या, लेबले चिकटवून मोकळे होण्याच्या पद्धतीने वाद झडतात त्या पद्धतीने फारसे काही हाती लागत नाही. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’, म्हणजे तत्त्वबोध जन्माला येणे याऐवजी तत्त्वबोध जातो, अशी स्थिती झाली आहे. तत्त्वबोध तर सोडाच, पण ‘शिमगा जातो आणि कवित्व राहाते’ असेच याचे वर्णन करावे लागेल.
१) चांगला वाद होण्यासाठी किमान मतैक्य कोणकोणत्या मुद्द्यांवर हवे?
पूर्ण मतैक्य असेल तर वादाची गरजच राहत नाही. पूर्ण मतभेद असले तरी वाद होऊ शकत नाही. ज्या अर्थी वाद होतो, त्या अर्थी अंशतः मतैक्य आणि अंशतः मतभेद असेच असते.
पहिला प्रश्न असा आहे की चांगला वाद होण्यासाठी किमान मतैक्य कोणकोणत्या मुद्द्यांवर हवे? पहिले मतैक्य या मुद्द्यावर हवे की प्रामाणिक मतभेद असू शकतात. अन्य पक्षाचे (मताचे) लोक हे लबाड आहेत म्हणून असे म्हणत आहेत, असे मानता कामा नये. कदाचित आपल्याला अशी खात्रीलायक माहिती असेल की ते लबाड आहेत तरीही,
ते लबाड नाहीत, असे मानूनच वाद केला पाहिजे. कारण तसेच मत अन्य
कुणाचेतरी प्रामाणिक मत म्हणूनही असू शकते आणि ते तपासले गेले पाहिजे. जर अन्य पक्षाच्या सद्हेतूविषयीची शंका फारच तीव्र असेल तर वाद न केलेलाच बरा.
काही बाबतींत मतभेद किंवा विरोधही असला तरी दोन्ही पक्षांत काहीएक समाईक आस्था व समाईक मान्यता आहेत आणि ही समाईक भूमिका आधाराला घेऊन आपण भिन्न मते तपासणार आहोत अशा भावनेने वाद केला गेला पाहिजे. म्हणजेच दोघांनाही मान्य काय काय आहे, यापासून सुरवात करून मग दोघांना एकमेकांचे काय मान्य नाही, याकडे आले पाहिजे.
तिसरे मतैक्य असे हवे, की आपण जिंकण्यासाठी आलेलो नसून शिकण्यासाठी आलेलो आहोत. आपले अगोदरचे मत बदलावे लागेल
तर आकाश कोसळणार नाहीये किंवा कुणी आपल्याला फाशी देणार नाहीये.
चौथे मतैक्य असे हवे,की आपापली मते जरी बदलावी लागली नाहीत,
तरी ती कसाला लागण्याने आपली आपल्याला जास्त चांगली समजतात व हेही नसे थोडके,
सारांश ‘माझं तेच खर’ ही भावना सोडून ‘खरं तेच माझं’ ही भावना ठेवली पाहिजे.
२) निर्णय होऊ शकला नाही; पण वादसभा फलदायी झाली असे कधी म्हणता येते?
मतभिन्नता अनेक मुद्द्यांवर असू शकते. त्यांपैकी सगळेच मुद्दे एकदम वादासाठी घेता येत नाहीत. सध्याच्या प्रसंगाला प्रस्तुत ठरतील असे मुद्दे कोणते व त्यातील कळीचे मुद्दे कोणते, हे नेमके सापडले तरी बरीच प्रगती झाली असे म्हणता येईल. उत्तर सापडण्यासाठी आधी नेमक्या प्रश्नांची निश्चिती होणे आवश्यक असते. तसेच वादसभा ही अंतिम निर्णय करण्याची जागा असते असे नव्हे. एकूण जीवनसंघर्षात आणि समन्वयातसुद्धा सतत निर्णय होतच असतात. या प्रक्रियेचे एक अंग वादसभा आहे. वादसभेचे कार्य मर्यादित असते. या मर्यादा ओळखून वादसभेच्या यशापयशाबाबतच्या अपेक्षा ठरविणे उचित होईल. येथेच आपण पुढच्या प्रश्नाकडे येतो.
३) मतभेदाचे मूलभूत घटक कोणते? त्यांपैकी कोणते प्रश्न वादसभेत सुटू शकतात व कोणते वादसभेबाहेरील
जीवनात सुटू शकतात?
जीवनात सुटू शकतात?
या द्रावणात मी लिटमस पेपर बुचकळला तेव्हा तो निळ्याचा लाल झाला हे एक घटित आहे. हे मी खरे बोलत असेन
तर ते एक तथ्य-घटित आहे. तथ्य म्हणजे फॅक्ट. वादसभेत जर कोणी म्हणाले,
‘छे हो! काही तरी काय बोलताय. या द्रावणात लिटमस लाल होणे शक्यच नाही.’ येथे वाद खुंटतो. आता मी ताडकन उठून (किंवा शांतपणे उठून) ते चंचुपात्र व तो लिटमस घेऊन येतो. खरे म्हणजे भौगोलिकदृष्ट्या आम्ही वादसभेच्या ठिकाणी असलो, तरी तत्त्वतः आम्ही वादसभा सोडून प्रयोगशाळेत प्रवेश केलेला असतो. तेथे निर्णय होऊन आम्ही परत येतो. म्हणजेच तथ्यविषयक मतभेद वादसभेबाहेर सुटतात आणि सहनिरीक्षणाने सुटतात.
दारिद्र्यरेषेखाली किती लोक आहेत, हे प्रत्यक्ष जाऊन, लोक काय खातात,
पितात, नेसतात हे पाहूनच ठरवावे लागेल. पण ‘दारिद्र्यरेषा म्हणजे काय?’ हा प्रश्न कोणी उपस्थित केला, तर तो तथ्याचा प्रश्न नसून संज्ञेचा प्रश्न असतो. सांज्ञिक प्रश्न हे खासकरून वादसभेत सोडवायचे असतात.
जर मी डेमोक्रॅटिक हा शब्द जनतांत्रिक या अर्थाने वापरत असलो व समोरचा डेमोक्रॅटिक हा शब्द जनवादी या अर्थाने वापरत असला, तर बराच वेळ आमचे बोलणे एकमेकांना न भिडता स्क्यू रेषांत निघून जाईल. वाईड बॉल्स पडत राहतील. पण आम्ही जेव्हा जनांची पूर्वसंमती हे जनतंत्राचे लक्षण होय आणि अभिजनांविरुद्ध जनांची बाजू घेणे हे जनवादाचे लक्षण होय, असे स्पष्टीकरण देऊ तेव्हा आम्ही कोठे तरी एका लाईनीत येऊ.
जर कोणी म्हणला, की ज्या अर्थी दारिद्र्य आहे, त्या अर्थी शोषण असणारच. कारण दारिद्र्य हे शोषणामुळेच असू शकते. तर फक्त दारिद्र्य म्हणजे काय आणि शोषण म्हणजे काय, एवढेच स्पष्ट करून पुरणार नाही. तर ज्याअर्थी... त्याअर्थी हा संबंध आपण कधी यथायोग्यपणे वापरू शकतो आणि कधी तो अनुचित ठरतो, याविषयीचे प्रश्न उपस्थित होतील. हे तार्किक प्रश्न होत. सांज्ञिक प्रश्नांप्रमाणेच तार्किक प्रश्न हे देखील खासकरून वादसभेत सोडवायचे प्रश्न होत.
समजा न्याय (जस्टीस) महत्त्वाचा की अहिंसा महत्त्वाची असा वाद चालू आहे. येथे दोन्ही पक्ष कदाचित सारख्याच तर्कोचित व संज्ञोचितरीत्या आपापली बाजू मांडत
असतील. जेव्हा एक पक्ष म्हणेल ‘हिंसेने मिळालेला न्याय हा खरा न्याय नसतोच’ व दुसरा पक्ष म्हणेल ‘अन्याय चालू देऊन केलेली अहिंसा ही खरी अहिंसा नसतेच’ तर तेव्हा ती वादसभा ही तार्किकदृष्ट्या एका ‘रस्ता बंद’ जागी येईल.
आता न्याय व अहिंसा या मूल्यांत निर्णायकपणे अग्रक्रम देण्याचे मूल्य कोणते हा प्रश्न उपस्थित होईल. याची निवड ज्याची त्याने अंतरीचा कौल घेऊन करायची असून जीवनव्यवहारातच कसाला
लागून त्याचा बोध होऊ शकेल. हे मौलिक प्रश्न होत. मौलिक प्रश्न हे अंशतः वादसभेत व अंशतः वादसभेबाहेर सुटू (किंवा न सुटू) शकतात.
समजा न्यायवाले आणि अहिंसावाले भांडत असताना तिसराच एक जण येऊन म्हणला, “कसली मूल्य-चर्चा करताय? मूल्यांबिल्यं काही नसतातच. सर्व काही कार्यकारण नियमाने ठरलेले आहे. जे व्हायचे तेच होईल, मूल्यनिर्णय घेणारे तुम्ही कोण?” असे झाल्यावर मात्र न्यायवाले व अहिंसावाले आपला विरोध
विसरून या नियतीवाद्यावर (अहिंसकपणे!) तुटून पडतील.
नियतता मानली तर नीती अप्रस्तुत ठरते. येथे प्रश्न फक्त चांगल्या-वाईटाचा उरत नाही तर एकूण जीवनविश्वाकडे बघण्याचा मूलभूत दृष्टीचा पॅराडिग्मिक प्रश्न बनतो. मूलभूत दृष्टी
(दार्शनिक निवड) ही अशी गोष्ट असते की तिच्या बाजूने आणि विरुद्ध असे दोन्ही सिद्ध होऊ शकते. जेव्हा असा विप्रतिषेध
(अँटिनॉमी)
सापडतो तेव्हा दार्शनिक निवडीचा प्रश्न आला असे समजावे. दार्शनिक निवड ही गोष्ट वादसभेच्या बाहेरची असते.
अशातर्हेने मतभेदाचे पाच घटक किंवा पाच पातळ्या दिसतात. ताथ्यिक, सांज्ञिक,
तार्किक, मौलिक, दार्शनिक यांपैकी सांज्ञिक व तार्किक गोंधळांचे निवारण करून एका बाजूने प्रश्नाचा ताथ्यिक तळ गाठणे व दुसर्या बाजूने मौलिक व दार्शनिक बिंदू गाठणे हे वादसभेचे खरे कार्य होय. वादसभेकडून जास्तीत जास्त अपेक्षा तेवढीच ठेवलेली बरी!
No comments:
Post a Comment