Friday, July 3, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ७ उत्तरे

प्रश्न
१)    नत्रवायूचे श्वसनसंस्थेतील महत्त्वाचे कार्य कोणते?

२)    मनुष्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याबाबत केलेला सर्वात मोठा अपराध असूनही ज्या अपराधाविषयी पर्यावरणवादी चकार शब्दही काढत नाहीत तो अपराध कोणता?

३)    आपण एखादी वस्तू ढकलू पहात असलो(सोपेपणासाठी घर्षण दुर्लक्षित ठेवा) तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपण जेव्हढे बल लावू तितकेच विरुध्द बल निर्माण होईल ही दोन्ही बले एकमेकाला कॅन्सल आउट करतील मग वस्तू हलेलच कशी?
  

४)    एक अधोर्ध्व रेषा (व्हर्टिकल लाईन) आणि एक क्षितिजप्रतलीय रेषा (हॉरीझाँटल लाईन) या एकमेकींना समांतर आहेत! हे कसे?

५)    सत्यम् शिवम् सुंदरम् चा अर्थ असा घेतला जातो की जे सत्य असते
तेच शिव(श्रेय) आणि सुंदरही असते. हे खरे आहे काय? किंवा तसे असायला हवे असे मानणे योग्य आहे काय?











उत्तरे 


१)      नत्रवायूचे श्वसनसंस्थेतील महत्त्वाचे कार्य कोणते?

प्राणवायू पुरेसा विरळ म्हणजेच डायल्यूट ठेवणे आवश्यक असते इथे नत्रवायूचा अंगभूत गुणधर्म कार्यरत नसून सहभागी गुणधर्म (पार्टीसिपेटिव्ह प्रॉपर्टी) लक्षात घेतली आहे. दुसरे असे की नत्रवायू हा हिमोग्लोबिनला लॅच होत नाही. कार्बनमोनॉक्साइड हा हिमोग्लोबिनला नुसता चिकटत नाही तर एकेका रेणूला कायमचे निकामी करून सोडतो. 

२)  मनुष्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याबाबत केलेला सर्वात मोठा अपराध असूनही ज्या अपराधाविषयी पर्यावरणवादी चकार शब्दही काढत नाहीत तो अपराध कोणता?

निसर्गात विविध प्रजाती एकमेकींच्या लोकसंख्या नियंत्रणात ठेवतात. त्यांच्यात तसे संतुलन निर्माण झालेले असते. माणसाच्या तांत्रिक प्रगतीमुळे त्याला कोणी भक्षकच उरला नाही. सर्व भौगोलिक परिस्थितीत तो तगू शकतो. औषधक्षेत्रातील प्रगतीमुळे आतून हल्ला करणाऱ्या परोपजीवींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणून व इतर आरोग्य-सुधारणांमुळे त्याचे आयुर्मान वाढले. परंतु जनसंख्या नियंत्रणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून उदाहरणार्थ गोडे पाणी पुरणार नाही अशा घातक पातळीवर जनसंख्या पोहोचत आहे. पर्यावरणवादी हे कधीच जनसंख्येचा प्रश्न हा पर्यावरणाचा मुख्य प्रश्न आहे हे मान्य करीत नाहीत

३)  आपण एखादी वस्तू ढकलू पहात असलो(सोपेपणासाठी घर्षण दुर्लक्षित ठेवा) तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार आपण जेव्हढे बल लावू तितकेच विरुध्द बल निर्माण होईल ही दोन्ही बले एकमेकाला कॅन्सल आउट करतील मग वस्तू हलेलच कशी?
अक्शन हज गॉट इक्वल अंड अपोझिट रिअक्शन हे तिसऱ्या नियमाचे चुकीचे शब्दांकन आहे. मूळ नियम असा की जर अ या वस्तूने ब या वस्तूवर बल लावले तर ब ही वस्तू अ या वस्तूवर तितकेच बल विरुध्द दिशेने लावते. वरील प्रश्नातील कॅन्सल आउट करतील हे विधान तेव्हाच खरे असते की जेव्हा दोन्ही बले एकाच वस्तूवर लागलेली असते. ढकलणारे आपण रिअक्शन झेलत असतो तर ढकलावायची वस्तू ही अक्शन झेलत असते. वस्तूची फ्री बॉडी डायग्रॅम काढली तर तिच्यावर एकच बल लागलेले असेल त्यामुळे ती हलण्यास काहीच प्रत्यवाय नाही.  

४)  एक अधोर्ध्व रेषा (व्हर्टिकल लाईन) आणि एक क्षितिजप्रतलीय रेषा (हॉरीझाँटल लाईन) या एकमेकींना समांतर आहेत! हे कसे?

पृथ्वीची कोणतीही त्रिज्या ही अधोर्ध्व असेलच. या त्रिज्येला काटकोनात (एक वर्तुळभर) त्रिज्या मिळतीलच. एखादी काटकोनातील त्रिज्या जेथे पृष्ठाला मिळते तेथे मूळ त्रिज्येला समांतर अशी स्पर्शिका काढता येईल. कोणतीही स्पर्शिका ही क्षितिजप्रतलीय असेलच. उदाहरणार्थ जर विषुववृत्तावरील कोणत्याही बिंदूतून दक्षिणोत्तर स्पर्शिका काढली (ही क्षितिजप्रतलीय असेलच) तर पृथ्वीचा अक्ष दक्षिणोत्तर असतोच व अक्ष ही रेषा (ध्रुवांतून निघणारी) अधोर्ध्व रेषाच आहे. सामान्यतः आपण बरेच व्यवहार  पृथ्वी सपाट धरूनच करतो. तसे पाहिले तर वळंबे हे समांतर नसून पृथ्वीच्या मध्याकडे एकवटत जाणाऱ्या त्रिज्या असतात!

५)  सत्यम् शिवम् सुंदरम् चा अर्थ असा घेतला जातो की जे सत्य असते तेच शिव(श्रेय) आणि सुंदरही असते. हे खरे आहे काय? किंवा तसे असायला हवे असे मानणे योग्य आहे काय?

तथ्य म्हणजे फॅक्ट. तथ्य-दावा हा खरा किंवा खोटा असू शकतो. छद्म दंभ छल खोटे बोलणे/वागणे हे कुणालातरी फसविणे असते व म्हणून अन्यायकारक आणि वर्ज्य असते. मनापसून नाही ते कृतक होय. ‘सत्याची बाजू असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला न्याय्य बाजू असेच खरेतर म्हणायचे असते. माणसातील सरळपणा म्हणजे ऋजुता (कोमलपणा नव्हे). ज्ञानाची वैधता म्हणजे प्रामाण्य. तसेच अस्तित्वाबाबत स्वावलंबी म्हणजे सत्. तसेच जे आपल्या इच्छे-अनिच्छेवर अवलंबून नसते व स्वीकारावे लागते ते वास्तव होय  या सगळ्या भिन्न गोष्टींसाठी सत्य हा एकच शब्द वापरण्याने बरेच घोटाळे होतात. न्यायाचा विजय होवो असे म्हणता येईल पण सत्याचा विजय होतोच हे शिस्तीला धरूनही नाही आणि प्रत्यक्षात खरेही नाही. माझे मत असे आहे की सत्य सारख्या सबगोलंकारी संज्ञांचा वापर टाळून नेमके तथ्य, प्रामाण्य, सत्, ऋजुता, प्रामाणिकपणा वगैरे शब्द योजले जावेत.

शिव म्हणजे शंकर हा विशिष्ट देव नव्हे तर शुभ, मंगल, पवित्र वगैरे. माझ्यामते श्रेय (प्रिय च्या संदर्भात) हा जास्त नेमका शब्द आहे. 

सौंदर्य म्हणजे फक्त रोचकता नव्हे. रोचकता हवीच पण सौंदर्य हे आपल्याला एका वेगळ्या मनोवस्थेत नेते. त्यात डौल, प्रमाणबद्धता, रसरशीतपणा असे वेगळे घटक येतात. सौदर्याची व्याख्या करणे हा तत्त्ववेत्त्यांनी जिथे हात टेकले असा विषय आहे.
हे सर्व लक्षात घेता, सत्य म्हणजेच शिव व शिव म्हणजेच सुंदर हे समीकरण चक्क खोटे आहे. ते तीन वेगळेच आयाम आहेत. 

कारागिरांचे हात तोडले(हे तथ्य असेल तर) ताजमहाल अश्रेय ठरतो पण असुंदर ठरत नाही. कर्तव्यनिष्ठेतील धन्यता हा सौंदर्यानुभव खचितच नसतो. एखादे मिथक अत्यंत श्रेयपूर्ण असू शकते. 

तेव्हा सत्य-शिव-सुंदर हे एकच नाही आणि एकच असण्याची गरजही नाही.      

No comments:

Post a Comment