Friday, July 3, 2015

निसटून जाणारी अर्धसत्ये


लव्ह दाय नेबर अँज दायसेल्फ असे ख्रिस्तवचन आहे. त्यातला शेजाऱ्यावर प्रेम करा हा भाग प्रसिध्द आहे. पण स्वतःप्रमाणेच (अँज दायसेल्फ) हा उत्तरार्ध अंधारात राहून गेलेला आहे. तुम्ही म्हणाल स्वतःवर प्रेम करा हे मुद्दाम सांगायची काय गरज आहे? माणूस स्वाभाविकपणे ते करतोच. माफ करा! हे तितकेसे खरे नाही. महत्त्वाकांक्षी माणूस स्वतःचासुध्दा वापर करतो; स्वतःची सुध्दा फरफट करतो. आपण महत्वाचे ठरतोय की नाही हेच बघण्याच्या नादात तो आपण आनंदात, स्व-स्थ आहोत का? स्वतःलाच आपलेसे वाटतोय का? हे बघायचेच विसरतो. एखादी आकांक्षा जीवनात महत्वाची ठरणे याला ध्यास घेणे म्हणता येईल. महत्वाकांक्षा हा शब्द स्व-चे महत्व वाढवण्याची आकांक्षा यासाठीच राखून ठेलेला बरा.

दुसऱ्या बाजूला, स्वार्थ हा शब्द तथाकथित नीतिमत्तेने बदनाम केल्यामुळे, बिगर-महत्वाकांक्षी माणूससुध्दा स्वतःवर प्रेम करायला बिचकतो. एकतर्फी-स्वार्थ हा अनैतिक ठरतो. पारस्परिकता राखून साधलेला स्वार्थ हा वाईट अर्थाने स्वार्थ नसतो. तात्कालिक स्वार्थ हा मूर्खपणाचा असू शकतो पण दूरगामी असेल तर तो शहाणा स्वार्थ ठरतो. असे अनेक भेद न पाडता सरसकटपणे स्वार्थालाच वाईट ठरवून टाकले जाते. मात्र तो  सोडता तर येत नाही. यातून दांभिकपणा वाढतो. म्हणूनच ख्रिस्तवचनाचा निसटलेला उत्तरार्ध पुनर्स्थापित केला जायला हवा.

उत्तरार्ध कसला? तो तर खरा पूर्वार्ध आहे. आधी ‘दाय-सेल्फ’ आणि मग ‘दाय-नेबर’ हाच क्रम योग्य आहे. स्वतःपासून सुरुवात करा(चॅरिटी बिगिन्स अँट होम) हे तत्त्व प्रेम करणे याही गोष्टीला लागू असायला नको कां?

स्वतःविषयी जरा काही चांगले सांगायचे झाले तर दरवेळी, आत्मस्तुतीचा दोष पत्करून ही सावधगिरी बाळगली जाते. आत्मस्तुती हा दोष कधी ठरतो? जो माणूस फालतू गोष्टींच्या डिंगा मारत फिरतो तेव्हा त्याचे जे काय हसे व्हायचे ते होतेच. आपण तसले नाही ही ज्याला खात्री आहे आणि ज्याने इतरांना दाद देण्यात कधीच कृपणता दाखवलेली नाही, त्याने स्वतःला दाद देताना अवघडून जायची काय गरज आहे? औपचारिकता पाळण्यात बऱ्यापैकी वेळही जातो आणि ऐकणाऱ्यांना कंटाळवाणेही होते. औपचारिकता हे प्रकरण जरा आवरते घेतले पाहिजे.

धर्म ही अफूची गोळी आहे असे मार्क्सने म्हटले हे सुध्दा अर्धसत्यच आहे. ज्या वाक्यात धर्माचा गुंगीत ठेवणारा गुणधर्म त्याने सांगितला त्याच वाक्यात त्याने धर्माला शापितांचे निःश्वास, हृदयशून्य जगाचे धडधडते हृदय, इत्यादीही म्हटले आहे. मार्क्स धर्मवादी नक्कीच नव्हता पण जिच्यामुळे धर्माची गरज पडते त्या मानवी स्थितीची सखोल जाण त्याला होती. पण हे अर्धवट उद्धृत गाजल्याने धर्माला केवळ कारस्थान समजणे नाहीतर थेट धर्मवादी बनणे हेच दोन पर्याय असल्यासारखे भासू लागते.

धर्माच्या मानवीकरणाचाही प्रकल्प असू शकतो हे लक्षातच घेतले जात नाही. तसेच एकुणातच कट्टरता विरघळवायची आहे. एका कट्टरतेला तोडीस तोड दुसरी कट्टरता हा उपाय असू शकत नाही हेही विसरले जाते.    

 “जो जे वांच्छील तो ते लाहो एवढाच चरण घेतला तर ती अशक्य मागणी ठरेल आणि अराजकाला आमंत्रणही ठरेल. एका व्यक्तीच्याच दोन वांच्छा म्हणजे इच्छा एकमेकींना छेद देत असतात, तिथे सगळयांच्या सगळ्या इच्छा कुठून पुरवणार? पण ज्ञानदेवांनी अगोदर दोन अटी घातलेल्या आहेत. जेव्हा दुरितांचे तिमिर गेलेले असेल म्हणजेच दुष्प्रवृत्ती गळून पडल्या असतील, प्रत्येकाला स्वतःचे खरे हित उमगलेले असेल( खरे हित म्हणजे स्वधर्म आणि सूर्ये पाहो म्हणजे आत्मज्ञानातून उमगो) तेव्हासाठीच वांच्छील ते लाहो लागू आहे. कदाचित या दोन अटी पूर्ण झालेल्या आहेत असे कधीच होणार नाही. पण इतरांच्या व आपल्या इच्छा कशा सुसंगत बनतील याचा विवेक आणि आपल्यात अनावश्यकपणे टिकून राहणाऱ्या दुरीतांची व्यर्थता उमगेल असे आत्मनिरीक्षण करीत राहणे नक्कीच आपल्या हातात आहे. 


आपण आज तीन अर्धवट उद्धृते पाहिली. कित्येक सर्वमान्य सत्ये ही अशी अर्धसत्ये असू शकतात. त्यातून निसटून गेलेला उर्वरित अर्धा अंश शोधल्याशिवाय, जरी सर्वमान्य गणली गेलेली असली तरी ती सत्ये ठरत नसतात.        

No comments:

Post a Comment