Tuesday, October 25, 2022

 

नोटा-बदली अर्थात मुद्रांतर योजना,

(काळी-संपत्ती जप्त करण्यात वा तिचे स्रोत बंद पाडण्यात),

का यशस्वी ठरली नाही?

“ज्या अर्थी सर्व नोटा परत आल्या त्या अर्थी मुद्रांतराचा उपद्व्याप पूर्णतः वाया गेला.” हे म्हणणे दोन कारणांनी चूक आहे. एक म्हणजे सामान्यतः जो नागरिक बँकेतून उलाढाल फारशी करत नाही, त्याने अचानक बऱ्याच नोटा परत केल्या तर तो दुसऱ्या कोणाचे काळे पैसे देखील परत करत असू शकतो. लागेबांधे अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे अचानक जास्त नोटा परत करणाऱ्याचा धनी कोण? याचा पुरावा मिळत नाही. पुरावा नसला तरी सुगावा मिळू शकतो! कोणावर लक्ष ठेवले पाहिजे, याचे अगदी ढोबळ मानाने सूचन सरकारला मिळते. पुढे जो मर्माघात करावयाचा आहे, त्यावेळी यापैकी काहीएक सूचन उपयोगी पडू शकते. दुसरे असे की एका मुद्रेचे चलन आरपार काढून घेतल्याने, काळी-संपत्ती धारकांना, मुद्रांतरा नंतर सुरुवातीच्या काळात, त्यांच्या काळ्या संपत्तीला जे “प्रवाहीपण” लिक्विडिटी हवी असते, ती नव्या नोटांत रूपांतरित होईपर्यंत अडखळते. त्यामुळे ‘पुरता’ फटका बसला नाही तरी ‘तात्पुरता’ फटका बसतोच. पुरेसा काळ गेला की नव्या चलनात काळी-संपत्ती-धारकांना पुन्हा प्रवाहीपण (लिक्विडिटी) प्राप्त होते आणि बरीचशी काळी-संपत्ती पुन्हा काळे-फायदे उकळण्याला उपलब्ध होते.

इतकेच नव्हे तर, ‘नोटा-बदली’मुळे इ-पेमेंट्स व रिटर्न्स भरणे यात लक्षणीय वाढ झाली, हा योग्य दिशेनेच झालेला परिणाम होता. तसेच एका विशिष्ठ तारखेनंतर तुमची पुढील तपासणी झाल्यास कुठलाही जुना संदर्भ देता येणार नाही.

अशा तऱ्हेने जे लोक, मुद्रांतरा ‘मुळे’ सर्व काळी संपत्ती कायमची नष्ट होईल, व तिचे स्रोत  कायमचे बंद पडतील, अशीही भाबडी आशा बाळगत असतात, त्यांचा हिरमोड होतो आणि ‘सरकारच निर्णय चुकीचा होता’, असा प्रचार करायला विरोधकांना आयते मोकळे रान मिळते! तरीही हे सरकार ‘बड्या-चोरांवर हात घालण्याची हिम्मत तरी करतेय!’ या भावनेमुळे, मते मिळवण्यात हे सरकार जेव्हढा फटका खाईल, असे वाटले होते, तितके राजकीय नुकसान झाले नाही. प्रामाणिक असूनही प्रोसीजर अवघड असल्याने रिटर्न भरण्याबाबत टाळाटाळ करणारे, देखील कमी होतात.   

काळी संपत्ती म्हणजे काळा-‘पैसा’(च फक्त) नव्हे!

‘संपत्ती आणि पैसा’ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याचे भान पत्रकारांना व त्यांनी बोलावलेल्या भाष्यकारांना नसते. (संपत्तीमध्ये एकेकाकडे असणाऱ्या पैसेतर वस्तूही गणल्या जातात) पण काळे धंदे करणाऱ्यांना हे भान लखलखीतपणे असते! मग ही काळी संपत्ती असते तरी कोणत्या स्वरूपात? सोयीसोयीने ज्यांचे मूल्यांकन (व्हॅल्यूएशन) ‘चढे किंवा उतरे’ करता येते अशी स्थावर मालमत्ता, स्त्री-धन मानले जाणारे अथवा दडविलेले सोने, तसेच वहिवाटीचा हक्क म्हणून, मालकीच्या असणाऱ्या वस्तू आणि केलेल्या गुंतवणूका सुध्दा काळ्या संपत्तीत मोडतात. यात जमीन, इमारती (रिअलइस्टेट), कुणालातरी मेहेरबान बनून दिलेले बिनव्याजी कर्ज, अशा स्वरूपात व नोंदली न गेलेली संपत्तीसुध्दा मोडते. काळी संपत्ती या सर्व स्वरूपात बाळगली जात असते. काळ्या संपत्तीतील, प्रसंगी वापरण्याचा भाग, प्रवाही ठेवण्या इतपतच ती ‘पैसा’ बनत असते. जेव्हढी संपत्ती उपयोगात आणायची तेव्हढ्यावर आयकर भरला, की ती पांढरी होते. रेकोर्डवरून गायब झालेली पुन्हा रेकॉर्डवर येते.

मनी-लॉड्रींग, अर्थात काळ्याचे पांढरे करून घेणे

स्थिर काळी संपत्ती ही शेअर्समध्येही दडलेली असू शकते. समजा माझ्याकडे भरपूर काळी संपत्ती आहे. माझा एक विश्वासू मित्र (किंवा आश्रित) आहे. त्याला थोडे पैसे देऊन औपचारिकता पूर्ण करून मी एक कंपनी काढायला सांगतो. ती  डबघाईतच चालवायची असते. मग मी त्याला नाममात्र किमतीचे शेअर काढायला सांगतो. त्याला कर्ज देऊन मी त्याला देणेकरी बनवतो. ‘त्याच्या’ कंपनीचे शेअर ५०० पट किमतीचे होतील असे पहातो. यासाठी माझाच काळा पैसा वापरतो. कर्जाची परतफेड अशक्य आहे असे तो मला सांगतो. मग मी दिलेल्या फेस व्हॅल्यू-किमतीला, तितके शेअर मला दे! असे मी त्याला सांगतो. तो देऊन टाकतो. पण आता मला माझ्या काळ्या गुंतवणुकीइतका पांढरा-नफा झालेला दिसतो. ह्या नफ्यावर मी कर भरून टाकतो. अशा लूप मधून घालवून मी काळ्याचे पांढरे करतो! उत्पादन काहीच न करता काळ्याचे पांढरे करणे हाच उदयोग असलेल्या कंपन्यांना, “शेल” (टरफल) कंपन्या म्हणतात. पण डबघाईवाला हे करण्यास का तयार होतो? कारण मुळात त्याच्याकडे काहीच नसते. काळी संपत्तीवाला त्याला ‘धुलाईचे चार्जेस’ देतो. जे त्याला एरवी मिळाले नसते. असे अनेक ‘धोबी’ किंवा ‘तोतया उद्योगपती’ फक्त कागदांची फिरवा फिरव करतात. उत्पादन काहीच करत नाहीत! शेल कंपन्या पकडणे हे कार्य अलीकडे अतोनात प्रसिद्धीस आलेली ‘ईडी’ नावाची पोलिसी व न्यायिक अधिकार असलेली यंत्रणा करत असते. मोदीपूर्व काळातही ‘ईडी’ होती पण तिला झोपवून ठेवलेले होते.  

आपल्या काळ्या कृत्याच्या बदल्यात, आपल्या नियंत्रणातील सेवा-भावी ट्रस्टला देणगी पोहोचेल, असेही बघता येते. वशिलेबाजी हा काळा धंदा बार्टर स्वरूपात चालतो “ तुम्ही हे चढ्या भावात आम्हाला दिलेत तर आम्ही “तुमची” दहा माणसे नोकरीवर घेऊ” इत्यादी. हे मार्ग किती आहेत व कुठे वापरले जात आहेत हे मला माहित नाही. काळी-संपत्ती अनेक रूपात दडलेली असते. या तोतयेगिरीला अधिक वाव मिळतो कारण फर्म ही सुध्दा ‘आर्थिक व्यक्ती’ असते. अशा अनेकानेक आर्थिकव्यक्तींमध्ये काही एकशरीरी(नॉर्मल) व्यक्ती सहभागी असतात व त्यांचे राजकीय ‘वजन’ वाढत असते.

मुळात काळी संपत्ती उत्पन्न होते कोठून?

बेकायदेशीर उद्योगातून मिळणारा नफा हा स्वाभाविकपणे काळा असतो. भ्रष्टाचारातून मिळणारे उत्पन्न काळ्या संपत्तीत ठेवावे लागते. करचुकवेगिरी हा नक्कीच एक स्रोत आहे पण जणू काही तोच एक स्रोत असल्याची समजूत काहीजण करून घेतात. त्यांना असे वाटते की अल्पदराचा, बँकेतील डेटा वापरून ऑटोमॅटिकली सरकारकडे जाणारा असा एकच कर बसवला तर करचुकवेगिरी बंद होईल. पण हा काळ्या संपत्तीचा एक लहानसा भाग असेल. याखेरीज सामान्यतः कायदेशीर अर्ज करणारा नागरिक, त्याची मागणी रास्त असूनही जी चिरीमिरी देतो, तिलाच भ्रष्टाचार मानले जाते. हा चिरीमिरी-भ्रष्टाचार रोखला पाहिजेच. पण त्यामुळे मोठ्ठया भ्रष्टाचारांकडे दुर्लक्ष होते.

मोठ्ठे भ्रष्टाचार वेगळ्याच ठिकाणी होतात. या भ्रष्टचाराचा मुख्य स्रोत म्हणजे सरकार-रूपी कामधेनूचे दोहन करून, अर्हता नसताना (करुणार्हता वा योगदान-अर्हता) उकळली जाणारी संपत्ती! हा होय. उदा. उद्योग तोट्यात घालवायचा व दिवाळे जाहीर करून घेणेकऱ्यांना बुडवायचे. राजकीय आश्रयाद्वारे भली मोठी टेंडरे मिळवायची, त्यात खर्च वाढवून घ्यायचे, आणि गुणवत्ता मारायची. सरकारवर दबाव आणून अनुदाने वा सवलती मिळवायच्या. बँकांत ‘नॉन-परफॉर्मिंग असेट’ म्हणजे वसुलीची आशा सोडून दिलेली कर्जे बुडवायची व बोजा पुन्हा सरकारवरच टाकायचा. बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर-म्हणून नोद्वून घ्यायच्या. यात कामगार आणि ग्राहक यांच्यावरही अन्याय होतोच पण मुख्य म्हणजे सरकारच्या खजिन्यावर डाका घातला जातो. गरीब अप्रत्यक्ष कर आणि श्रीमंत त्याशिवाय प्रत्यक्ष कर भरत असतात. करदाता हा अशा भ्रष्टाचारांचा मुख्य बळी असतो. पण हे सारे त्याच्या दृष्टीआड चालते व मुख्य म्हणजे सारेच करदाते असल्यामुळे, अमुक एक गट म्हणून, त्यांना संघटित करता येत नाही. जी जमीन अमुक-कोणाची नाही ती सरकारची! ती कोणत्या तरी सत्कार्याच्या नावाखाली स्वस्तात पदरात पडून घ्यायची आणि रास्त/अरास्त वापरकर्त्याकडून तिचे भरपूर भाडे उकळायचे. हा एक मोठा भ्रष्टचार आहे. असे कितीतरी प्रकार सार्वजनिक निधीचे दोहन करणारे असतात.

येथे प्रश्न अभ्यासाचा नसून प्रत्यक्ष कृतीचा आहे. अशा कृती ईडी, सीबीआय अशा संस्था करू शकतात पण त्यांना ‘सुगावे पुरवणे’ हे कार्य आपण (जसेकी उदा. किरीट सोमय्या व अनेक माहितीच्या अधिकारातले कार्यकर्ते) करू शकतो. विरोधी पक्षनेतेही हे काम करू शकतात असे आपण नुकत्यात पाहिलेच आहे. सुगाव्यापासून पुराव्यापर्यंत कसे पोहोचायचे हे अशा यंत्रणांचे खास कौशल्य असते.

म्हणूनच शेल कंपन्या ओळखणे, त्यांची किरकोळ मालमता जप्त करणे व तोतया संचालकांना तुरुंगात पाठवणे हा पांढरीकरणाचा मोठा मार्ग आहे.

काळा पैसा रिचवायचा आणखी एक मार्ग म्हणजे, काही धंदे तोट्यात चालवायचे. तोट्यातील धंद्यात बरेच किरकोळ घेणेकरी असतील असे पाहायचे व त्यांची देणी देऊन तोट्यात धंदा चालवायचा. चित्रपटक्षेत्र या कामी उपयोगी येते. बरेच सिनेमे पडलेला निर्माता सिनेमे काढतच राहतो व ते पडतच रहातात. इथे आर्थिक तोटा झाला तरी सदिच्छा मित्र मंडळ विस्तारता येते. क्लबांच्या निवडणुका जिंकणे, स्वतःला पुरस्कार-चिन्हे मिळवणे असे बिगर आर्थिक फायदे मिळत असतात. बिगर आर्थिक मध्ये ‘राजकीय’ वजन हेही येते.

बिगर-आर्थिक लाभव्यवस्था

बिगर-आर्थिक फायदा मिळवून देणारा नव्याने ध्यानात आलेला मोठा उद्योग म्हणजे राजकारण! त्यात होणारा खर्च व ‘कार्यकर्ते’ पोसणे हे छोट्या छोट्या रकमात चालते, व हे ‘सामान्य-जन’ रिटर्न भरण्याइतक्या उत्पन्नाचे कधीच नसतात. पण ते उपकृत होऊन राजकीय मालकासाठी, पोस्टरे चिकवणे, गर्दी जमवणे, जेलभरो करणे, मतदारांना पैसे किंवा इतर काही देणे, अशा अनेक गोष्टी करत असतात. ‘ज्याचा गाजावाजा अधिक’ त्याला मतेही अधिक मिळतात. यात होणारा खर्च म्हणजे रिचत असलेली काळी संपत्तीच असते. एवढी मोठी स्कॅमे करून मिळवलेला पैसा हा वैयक्तिक उपभोगासाठी तुच्छच असतो. राजकारणात करण्याची गुंतवणूक मुळात काळी, पण ती मोठ्या संख्येने कार्यकर्ते जी किरकोळ कामे करतात त्यांच्या खर्चाद्वारा रिचवली जाते.

आधुनिकोत्तर चित्रकलेत एखाद्या चित्राला किती किंमत मिळावी याला पारावारच नाही. जिथें जिथे कॉस्टिंग/प्राईसिंग अवघड असते तिथे तिथे हा वाव असतो. ज्याला रिटर्न भरणे ही भानगडच नसते असा महान उद्योग म्हणजे शेती! जमीन जर ‘शेतजमीन’ म्हणून नोंदलेली असेल तिथे तुम्ही काहीही केले (उदा हॉलिडे रीझॉर्ट्स) तरी ते भ्रष्टाचाराने शेतीतच घुसडता येते. कृषिउत्पन्न बाजार समित्या टिकवायच्या असतात, कारण त्यांच्याद्वारे शोषण करून ते धन ग्रामीण राजकारणात गुंतवण्यासाठी वापरायचे असते. सहकारी कारखाने, सहकारी बँका या गोष्टी कर्जे बुडवून सरकारी तिजोरीचे विक्रमी दोहन करत असतात व हा प्रचंड मोठा आणि सतत चालू राहू शकणारा भ्रष्टाचार आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष विकासाचा वेग या सगळ्या भानगडीत मंदावतो ते याहून महत्वाचे आहे.

बिगर आर्थिक उपयोगासाठीची, एकेका वेळी नोटांत रुपांतरीत केलेली, काळी संपत्तीच फक्त एका नोटा-बदलीत शून्य होते. जी काळी संपती वापरली जात असताना जेव्हढी नोटांत लागते, तेव्हढीच नोटा-बंदीत अडकते. मात्र बरीच काळी संपत्ती नोटेतर रूपांत भक्कमपणे शिल्लक राहते. “सर्वच नोटा परत आल्या म्हणजेच मोदींची फजिती झाली” असा प्रचार करणारे लोक, किंवा ‘नोटाबदलीमुळे भ्रष्टाचारावर पुरताच अंकुश बसला’ असे मानणारे लोक ‘काळ्यासंपत्तीचे भांडवली खातेही असते व ते चलनबाहय असते’ हे आरपार विसरतात. मोदींनी आत्ताच इडी-अस्त्र का वापरले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी अगोदर, इतकी वर्षे ईडीला कोणी झोपवून ठेवले? हा प्रश्न आपापल्या नेत्यांना विचारला पाहिजे.

भ्रष्टाचार म्हणजे सत्तेचा उपयोग करून काळी संपत्ती मिळवणे व काळ्या संपत्तीचा उपयोग करून सत्ता मिळवणे असे चक्र होय. अवैधाला वैधात नोंदवणे, किंवा अजिबात न नोंदवणे, हे भ्रष्टाचाराचे औपचारिक स्वरूप होय.

 

 

 

 

   


Friday, April 29, 2022

 

"पुरुषार्थ विचार २०२२" 

श्रेयात्मक सार्थकतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी: 

आठ आघाड्यांवरील साधना-संधी

सार्थकता म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या उद्दिष्टाची पूर्ती झाल्यावरची मनःस्थिती. महत्त्वाची उद्दिष्टे कशी ओळखायची? आणि त्यापैकी एखादे साध्य करण्याकरिता, उचलण्याचे कोणते पाऊल ‘आत्ता’ उपलब्ध आहे, हे कसे बघायचे? हे समजले पाहिजे. उद्दिष्टे भलीबुरी कशीही असू शकतात. पण त्यापैकी जी श्रेयात्मक असतील तीच शक्यतो पूर्तीसाठी घ्यायची! व दुरितात्मक शक्यतो कशी टाळायची! यालाच आपण नैतिक-ध्यास म्हणतो. (श्रेय/दुरित निकष ओघात येतील.) अर्थ म्हणजे याठिकाणी प्रयोजन. एखाद्या प्रयत्नाचे सार्थक झाले, म्हणजेच त्यामागील प्रयोजन पुर्त/प्राप्त झाले! म्हणजेच प्रयोजन श्रेयात्मक तर हवेच, पण ते यशस्वीरित्या गाठताही यायला हवे.

शीर्षकात सार्थकते ‘कडे’ म्हटले आहे, ‘पर्यंत’ म्हटलेले नाही. म्हणजेच, श्रेयात्मक-सार्थकतेची  परिपूर्ण-अंतिम स्थिती असू शकते असे मानलेले नाही. पाऊले, झेपा, उड्डाणे, असू शकतील पण थेट अंतिम गंतव्यस्थान प्राप्त होऊ शकते, ही शक्यता नाकारलेली आहे. अंतिम-गंतव्य-स्थान गाठणे माणसाला शक्य नाही. इतकेच नव्हे तर ‘तसे काही’ असू शकते काय? याविषयीही शंकाच आहे! माझी भूमिका अचानक क्रांती (वा एकदाचा आणि कायमचा मोक्ष) अशी नाही. धीम्या गतीने सतत सुधारणा, (सुधारणेच्या कल्पनेतही सुधारणा) असे अंतहीनपणे चालणार. (मध्येच मनुष्यजातीचाच अंत झाला नाही तर). अर्थात ही माझी दार्शनिक भूमिका आहे, तीच असायला हवी, अशी सक्ती मला करायची नाहीच आहे. किंबहुना माझ्या असेही लक्षात आले आहे की आठही आघाड्यांवर, तसे मुद्दाम न मानतादेखील, आपण या साधना तुकड्या तुकड्यांनी करतच असतो! त्यांच्या मागे एक सुसंगत, या साधना परस्परपूरकरित्या पुढे नेणारा, सर्वांगीण विचारव्यूह उभा करणे एवढेच काम मी करीत आहे. 

आठ आघाड्या म्हणजे मानवी जीवनातील आठ महत्त्वाची आव्हाने. (ही आठच का आहेत याचे उत्तर माझ्या चिंतनातून आठ सापडली, इतकेच. कोणी अधिक सूक्ष्म किंवा अधिक स्थूल विचार करूही शकेल व संख्या बदलूही शकेल. ‘आघाड्या’ म्हणण्यामागे आपण तिथवर पोहोचलो आहोत, पण आता आव्हान ‘हे’ आहे, असे सांगायचे आहे. (आपण तिथवर पोहोचलो आहोत हेसुध्दा सरासरीनेच!) उत्क्रांतीतून (क्रूर व यादृच्छिक) व नंतरच्या इतिहासात, मानवी स्वभाव (सरासरीने) जो काय बनला आहे, तोच अपेक्षित ठेवून, तो अधिक सुधारण्याच्या शक्यतांची आशा बाळगून, हा प्रस्ताव देत आहे. (आठ) आघाड्या म्हणण्यामागे असेही व्यक्त करायचे आहे की, एकाच वेळी आठहींवर वाटचाल करणे शक्य असेल असे नाही. पण कोणत्याच आघाडीबाबत फार मागे पडून चालणारही नाही. एखाद्या आघाडीवरील संधी सोडायची नाही, पण वाटचाल सर्वांगीण रहावी यासाठी, कधी अग्रक्रम बदलावाही लागेल.

शिवाय असेही प्रसंग येऊ शकतात की, कळत असूनही पीछेहाट पत्करावी लागते. जास्त मोठा धोका टाळण्यासाठी, काही पाऊले मागे सरकणे, हेही रणरीतीदृष्ट्या योग्य असू शकते. संधीची आस इतकी तीव्र असते की धोक्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. पण धोकेच बघायचे आणि संधी बघायच्या नाहीत, हे जीवनविरोधी आहे.

भारतीय ‘पुरुषार्थविचारा’तील तोकडेपणा व दिशाभूल  

मानवी जीवनोद्देश काय आहेत? या प्रश्नाला पारंपरिक उत्तर ‘पुरुषार्थ विचाराद्वारे’ दिले गेले आहे. धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत. परंतु ‘मोक्षे’तर पुरुषार्थांच्या आशयांत ‘पद्धतशीर मार्गक्रमणेविषयी उपदेश’ फारच धूसर व आडवळणाने दिलेले दिसतात. उदाहरणार्थ धर्म या पुरुषार्थाचा अर्थ, त्या त्या काळातील धुरिणांनी सांगितलेल्या आचरण-नियमांचे’ पालन एवढाच राहतो. त्या आचरण-नियमांना उचितता-प्रामाण्य काय? याचे उत्तर नाही. कित्येक आचरण-नियम हे ‘स्वतःच अनैतिक’ होते!  ‘अर्थ’ पुरुषार्थात, राजाला दिलेले डावपेचात्मक सल्ले येतात, ते नैतिक असतीलच असे नाही आणि सामान्य माणसाला मार्गदर्शन उरतच नाही. ‘काम’ म्हणजे कोणतीही इच्छा, हिला पुरुषार्थात घेतले हेच एक आश्चर्य आहे. कारण काम हा माणसाचा ‘शत्रू नंबर एक’ असेच बहुतेक ठिकाणी येते. धर्मात बसेल तितकाच काम असा एक अर्थ दिला जातो. पण यामुळे ‘कामा’ला अंगभूत मूल्य असे काही उरत नाही. बहुतेक सर्व नैतिक-विचार (?) हा मोक्ष पुरुषार्थातच सापडतो. पण तो दुय्यम, म्हणजे मोक्षसाधनेत ‘व्यत्यय’ येऊ नये, यासाठी! मी चोरी करू नये कारण माझी चित्तशुद्धी बिघडते. मूळ मालकाला काही अधिकार होता म्हणून नव्हे! मी हिंसा करू नये ते ‘मी हिंसक न रहावे म्हणून’ ज्याची हिंसा करतो त्याला काही जगण्याचा अधिकार आहे, हा भाग येतच नाही. नीतिशास्त्र हे अधिकार, कर्तव्ये, अर्हता, प्राप्तव्ये, उत्तरदायीत्व वगैरे मुद्दे न घेताच, कसे बांधता येईल? म्हणजेच भारतात खऱ्या अर्थाने नीतिशास्त्र विकसित झालेच नाही. पुरुषार्थ-विचारात काही सापडेल अशी आशा होती. पण पुरुषार्थ-विचार मोक्ष-ऐकांतिकतेमुळे बव्हंशी निवृत्तीवादी, वैराग्यवादी, समर्पणवादी राहिलेला आहे. जीवनाची विविध अंगे कोणकोणत्या आदर्शांनुसार समृध्द करत न्यावीत हे सांगितल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुरुषार्थविचार विकसित होत नाही. कोणत्या आदर्शांच्या दिशेने (परिपूर्णतेपर्यंत नव्हे) जीवन बदलत नेले असता, जीवनसार्थकाचा आपापल्या काळातील व आपापल्या भूमिकेतील आविष्कार कसा असेल हे, आपण कसे शोधू शकू? व कसे प्रत्यक्षात आणू शकू? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. तसेच हे सारे ‘शक्य’ आहे या आत्मविश्वासाने, माणूस उत्साहित झाला पाहिजे! ‘शकू’ हे क्रियापद पुनःपुन्हा येतेय, त्यातून असे सूचित करायचे आहे की, जमेलच असे नाही, पण न जमल्यास एखादे संकट ओढवेलच, असेही नाही. मी सक्ती सांगत नसून संधी सांगतोय.

एवढेच नव्हे तर ‘पुरुषार्थ’ हा शब्दही मी टाळणार आहे. पुरुष चा मूळ अर्थ आत्मा असा होता. म्हणजेच स्त्रीचा आत्मा हा देखील पुरुषच. परंतु ‘पुरुष’चा सध्या प्रचलित अर्थ मानवी-नर असा झाल्याने ‘नारींसाठी साधना/फल तरतूद काहीच नाही की काय? असा प्रश्न पडतो.’ मला अभिप्रेत असलेल्या साधना (परस्यूट्स) सर्वच मानवी व्यक्तींसाठी आहेत. त्याहून मोठा प्रश्न असा की हा शब्द सध्याच्या काळात ‘पुरुषार्थ-गाजवणे’ असा पराक्रमदृष्टीचा बनला आहे. तो आपल्याला अभिप्रेत तर नाहीच किंबहुना बाधकच ठरेल.

भारतीय विचारात बहुजन्ममालिकेतील कर्मविपाक हे गृहीतक आहे. माझ्या मते, मी जेव्हा जसा जिथे आहे तेव्हा, मी श्रेयात्मक सार्थकतेच्या दिशेने जमतील तितकी पाऊले टाकली, याचीच धन्यता वाटली पाहिजे. या धन्यतेत, ‘पुढच्या डावासाठी भांडवलसुध्दा जमवले’ हे प्रोत्साहन नसले तरी पुरेल.(त्यातून ज्यांना संचित-प्रोत्साहन हवेसे वाटेल त्यांनी ते मानावेही, पण याचा न्यायातील अर्हतेशी संबंध जोडू नये व वसूल करण्याचा भाव येऊ नये.

भारतीय विचारात ‘तपश्चर्यावाद’ हा एक घातक सिध्दांत पसरलेला आहे. यानुसार सुख भोगण्याने पुण्यक्षय होतो व दुःख सोसल्याने पाप-विमोचन होते! खरेतर, न्याय्य असे आहे की, सुख निर्मिणाऱ्याला सुख व दुःख निर्मिण्याऱ्याला दुःख असे (त्या त्या प्रमाणात) पोहोचले पाहिजे. दुःख‘भोगा’ने श्रेय मिळते व सुख‘भोगा’ने अपश्रेय मिळते ही धारणा, व्यक्तीला दुःखी व समाजाला क्रूर व दरिद्री बनवते. कोणत्या प्रकारचे सुख श्रेयस्कर आणि कोणत्या प्रकारचे दुरितवर्धक हा विवेक हवा आहे. दुःख हा अपाय आहे पण ‘उपाय’ नाहीये! मी तपश्चर्यावाद निखालसपणे नाकारतो.

श्रेयात्मक-सार्थक-साधना म्हणजे परमार्थ-साधनादेखील नव्हे. परम म्हणजे टोकाचे आणि अर्थ म्हणजे प्रयोजन. म्हणजे त्याहून लाभदायक असे काही असूच शकत नाही! सुखमात्यन्तिकं यत्तद् बुध्दिग्राह्यमतीन्द्रियम्---यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः(गीता ६.२१/२२) हे एक वर्णन झाले. परंतु परमार्थ साधला जाणे ह्या घटनेचे वर्णन, अनेकानेक तऱ्हांनी करूनसुध्दा ते अपुरे वा अप-अर्थ-सूचक रहाते (अनिर्वचनीय!), असे सर्वच परमार्थ-सिद्धांचे (निदान दावेदारांचे) निरीक्षण आहे. 

हिंदुंत ‘मोक्ष’ हाच परमार्थ मानलेला आहे. व्यक्ती जेव्हा तो गाठते तेव्हा तिचा ‘स्व’, विश्वात्म्यात विलीन होतो. ती व्यक्ती खुद्द ‘सच्चिदानंदस्वरूप परब्रह्मच’ बनते. इतकेच काय? पण खरेतर आपण नेहमीच ‘तसे’ होतो असेही ध्यानात येते! ही घटना एकदाची आणि कायमची असते. ह्या घटनेच्या आधी लागणारी मुमुक्षुता (मोक्षेच्छुता) ही सुध्दा एक इच्छाच नव्हे काय? ते काहीही असो, आपण मोक्षसाधना करावी काय? हे ज्याने त्याने ठरवायचे असते. पण ह्या निबंधात दिलेल्या विविध श्रेयात्मक-सार्थक-साधना, म्हणजे मोक्षसाधना नक्कीच नव्हेत. एकूणच माझा रोख समस्या एलीमिनेट करण्याकडे नसून त्यांचे सौम्यीकरण करण्याचे उपाय शोधणे याकडे आहे.  

या मांडणीची एक ढोबळ कल्पना यावी यासाठी मी ‘आघाड्यांची’ नावे क्रमाने देत आहे.      

१.रस २. उद्योग ३. स्वातंत्र्य ४. न्याय. ५. अनसूया/अवैर ६. समावेश. ७. संवाद ८. आत्ममैत्री  

     

रस हीच पहिली आघाडी का घेतली?

भक्ष्य-भक्ष्यक संघर्ष किंवा जीवो जीवस्य जीवनं या नैसर्गिक वास्तवापासून, ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे असे कोणा एका महात्म्याला ‘वाटण्या’ची शक्यता हा केवढा मोठा प्रवास आहे! टीमवर्क, फूड शेअरिंग, चिन्हांद्वारे मने (जणूकाही) जोडण्याची शक्ती या मार्फत सदगुणांची बीजे आपल्यात खोलवर रोवलेली आहेत. जसजशी उत्पादक शक्ती वाढली तसतसा तगण्याची त्वरा कामी होऊन नवनवीन सुचण्याचा अवकाश प्राप्त झाला. ‘काम’हेच दुरित ठरवण्यापेक्षा, भगवान बुद्धांनी जी तृष्णा सांगितली ती जास्त अर्थवाही वाटते. परंतु तिच्या पासून मुक्त फक्त असे फक्त निर्वाणच उरते. इतर प्राण्यापेक्षा खास करून माणसालाच असलेला शाप गरज हा नाही. माणूस हा कंटाळा येणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला नुसती तृष्णा नसून तृष्णेची तृष्णा आहे व त्यामुळे आव्हाने ओलांडता ओलांडता नवनवी आव्हाने उभी करणे या पासून त्याला सुटका नाही. सृजनशक्तीमुळे माणूस सर्वच बाबतीत म्हटले तर अनावश्यक ध्येये ठेवतो. यातील श्रेय/दुरित विभागणी आत्तापुरती बाजूला ठेवून एक सत्य मान्य केलेच पाहिजे की मनुष्याला कशात ना कशाततरी स्वारस्य वाटण्याची मूलभूत गरज आहे. त्यामुळे समस्या इच्छा ही नसून स्वारस्य ही आहे. काम हा पुरुषार्थ ठरत नाही तर रसनिर्मिती ही एक मूलभूत कामगिरी ठरते. आपल्याला रसनिर्मितीतून सुटका हवी आहे? की रसनिर्मिती कसकशी करायची, म्हणजे ती श्रेयात्मक राहील हे शिकायचे आहे? रस म्हणजे सध्याच्या भाषेत ‘इंटरेस्टिंगनेस’! कशात ना कशात स्वारस्य वाटलेच पाहिजे. कैवल्यवादी लोक तुम्हाला दुःखरहित-सुख नको आहे का? असा प्रश्न विचारतात. याचे प्रमाणिक उत्तर जर इंटरेस्टिंग ठरणार असेल तर दुःखमिश्रितही चालेल. असे असते.  जरी प्रत्येक क्षणी नाही तरी बऱ्यापैकी सातत्याने स्वारस्य वाटणे व यातून एखादे भविष्य-घटित रंगवणे, एखादी घटना घडेल याची आशा वाटणे (समथिंग टु लुक फॉरवर्ड टु) हे मनुष्याला, त्याच्या त्याच्या व त्या त्या वर्तमानात आवश्यक ठरते. मग कधी कधी निराशाही पदरी येईल! रस घेता येण्याच्या शक्तीसाठी ‘जीव’ म्हणून असणाऱ्या सहजोर्मी (इन्स्टिंक्ट्स) हे मुख्य ‘इंधन’ असते. परंतु जीव म्हणून टिकण्यासाठी आवश्यक इतकीच पूर्ती होऊन, माणसाला ती ‘पुरत’ नाही. तो उदाहरणार्थ, विविध प्रकारच्या शृंगारचेष्टा किंवा प्रणयक्रीडा विभिन्न प्रकारे तो विकसित करतो. त्यांना जवळीकीच्या संवादांची जोडही देतो. (जीन्स ची ‘मागणी’ गर्भधारणा व अपत्यपोषण इतकीच असते.) जर प्रजोत्पादनाचा स्पष्ट हेतू मनात असेल तरच प्रणय धर्म्य मानणे हा प्रकार कर्मदरिद्री वैराग्यवादातून येतो. पण या ‘वर्ज्यते’ला फारसे कोणी बळी पडत नाहीत.

प्रणय हे फक्त उदाहरण आहे. सर्वच संVEDNENDRIIवेदनेंद्र्यिातून मिळणाऱ्या संवेदनांबाबत देखील, जीवरक्षणार्थ जितपत लागतात, त्यापेक्षा कितीतरी जास्त/वेगळी संवेदनारूपे माणसाने निर्मिलेली, अनुभवलेली व संपादन केलेली असतात व ती त्याला सद्यजीवनात लाभतही असतात. यातूनच तो ध्वनीचे संगीत, रंग-आकारांचे चित्र, कृत्रिम सुगंध, नृत्यप्रकार, ललित साहित्य असे अनेक, तगण्यासाठी ‘अनावश्यक’ पण ‘रसपूर्ण’ व्यवहार विकसित करतो. हे करताना कधी तो वास्तवापासून फारकत घेतो. मात्र स्वप्नरंजनाला चुकून ‘योजना’ मानले तर मोठाच घोटाळा होतो.

रस घेता येण्यामुळेच, माणसाला विविध गोष्टींमधील मूल्ये/प्रतिमूल्ये ‘ओळखता’ येतात. नवीन मूल्यकल्पना सुचून तो नवनवीन मूल्ये निर्माणही करतो. कधी मूल्ये प्रक्षेपितही करतो. यात आव्हानमूल्य, थरारमूल्य अशी मूलतः सुखद नसलेली मूल्येही येतात. मनुष्य निरनिराळी क्रीडने (हरण्या-जिंकण्याचे खेळ) व कलाप्रकार विकसित करतो. वस्तूंत, ऊर्जारुपांत, चिन्हमय मजकुरात, नैसर्गिक स्रोतात त्याला मूल्यवानता आढळू लागते. ही सवय इतकी अंगवळणी पडते आहे की त्याला ‘मूल्ये ही वस्तुंचेच गुणधर्म’ वाटू लागतात. अर्थात, यद्यपि-बिगरमूल्यवान गुणधर्मांचा बोध(शुध्द-जिज्ञासेने) घेणे, हे त्यामुळे बंद पडत नाही. जिज्ञासेला स्वतोमूल्यही (जिज्ञासा-रस) असतेच. मूल्यकल्पनांच्या निर्मितीसाठी स्वप्नरंजन करणे, कल्पितकथा रचणे, कल्पित अस्तित्वे आरोपित करणे, संकेत व प्रतीके निर्माण करणे, सौदर्य-अनुभव घ्यायला शिकणे, अशा अनेक गोष्टी माणूस करत असतो. काही रस हे दुष्परिणाम करणारे असू शकतात. त्यामुळे लागणारी पथ्ये व पाळावयाच्या वर्ज्यताही शिकाव्या लागतात. आव्हानमूल्य, थरारमूल्य, युद्धस्य कथा रम्याः, इतकेच नव्हे तर, परपीडनात वा स्वपीडनात अंगभूत सुख मिळणे! अशा सारख्या अनेक विकृत(?) गोष्टीसुध्दा रसातच मोडत असतात. दुरितगामी-रस दुरित-कृत्येही घडवत असल्याने, अभिरुची-उन्नयन हाही प्रकल्प रससाधनेत घ्यावा लागतो. असे असले तरीही, वास्तवात दुरित ठरू शकणाऱ्या गोष्टींचे, कलेद्वारा विरेचन होऊन वास्तव सुरक्षित रहाते, असे मुद्देही लक्षात घ्यावे लागतात. तसेच रस-वांछी असल्यामुळेच माणसात ‘असेल ते नेटवा आणि नसेल ते भेटवा’ ही प्रवृती असते’. ती कधी हितावह आहे आणि कधी अहिताची आहे, यावर लक्ष ठेवावे लागते. पण ती मारून टाकता येईल असे कदापि समजता कामा नये. माणूस हा ‘घडविणारा प्राणी’(होमो-फॅबर) त्याचे नूतनता-प्रेम सहजासहजी सोडू शकत नाही. नाट्यपूर्णता ही माणसाची एक अत्यंत आवडती गोष्ट आहे. पर्फोर्मिंग आर्टस तर झाल्याच पण माणूस व्यावहारिक गोष्टीतही नाट्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न करतो. कित्येक संघर्ष हे जर नाट्यपूर्णता टाळली तर टळण्याजोगे वा कमी त्रासात मिटवण्याजोगेही असतात. नाट्यपूर्णते आवडीमुळे ते चिघळतात. विविध आन्हिके वा औपचारिक गोष्टीना रसयुक्तता असते. अशा गोष्टींचे पारलौकिक (असल्यास) अर्थ निमित्तापुर्ते असून त्यांचा आकार (फॉर्म) महत्त्वाचा असतो. बंडखोरीलासुध्दा एक रसयुक्तता असते. विशेषतः प्रचलित आचरण-नियमात निषिध्द मानलेल्या गोष्टी करून पहाण्यात विशेष रस असतो. ‘चाळा’ हा रसनिर्मितीचा सर्वात गरीब प्रकार असतो. इतर आघाड्यांमध्ये पुढे सरकत असतना रस आघाडी दुर्लक्षित ठेवून चालत नाही. रस आघाडीचे सूत्रमय रूप इथे देत आहे. त्याच्या घनतेमुळे ते जड वाटेल. पण सारांश लक्षात ठेवण्यास ते उपयोगीही आहे

रस=मूल्यवत्ताजनक[ऊर्मी+अभिज्ञा+सृजन+प्रक्षेप]>स्फूर्ती[पूर्ती/कल्पनारंजन/दमन/विरेचन/निवृती]   

३.उद्योग

अमुक एक ‘संकल्पित’ मूल्यवान ठरणे, हे कार्य रस-साधनेतच होते. पण उलटपक्षी मूल्यांना वस्तुवत्ता देणे किंवा त्यांचे प्रत्यक्षीकरण करणे, प्रत्यक्ष वस्तूंत बदल घडवून, त्यांना मूल्यवत्ता आणून देणे, हे मात्र ‘उद्योग’ या दुसऱ्या क्रमांकाच्या साधनेद्वारे मनुष्याला साधता येते. वास्तवाला स्वतःची अशी एक ताकद असते. ते तुमच्या इच्छेमुळे(विश) बदलणार नसते. त्याला बदलवण्यासाठी यत्न आणि पद्धती आवश्यक असते.

काही उपलब्ध वस्तूंना मूल्य नसले तरी त्याचे आकारगुण(शेप्स), वा इतर अनेक गुणधर्म श्रमाद्वारे कृत्रिमरीत्या बदलता येतात.(मार्क्स श्रम या गोष्टीला मध्यवर्ती बनवतो व ते मर्यादित अर्थाने योग्यही आहे.) जितक्या कारण-कार्य शृंखला, माणूस त्याच्या वेदनेंद्रियातून आत आणि यत्नेंद्रियातून बाहेर, नेऊन पूर्ण करू शकतो; तितक्या प्रमाणात तो अधिक सक्षम होतो असे म्हणता येईल. मूल्यवान गोष्टी प्रत्यक्षात आणल्याने त्यांच्या यत्नाना फल मिळत असते. फले वा फलनिर्मितीची साधने उपलब्ध असणे म्हणजेच समृद्धी होय. समृद्धी वाढविण्यासाठी श्रम लागतात तशी उद्योजकताही लागते. म्हणजे श्रमविभागणी, साधनांत प्रगती. विनिमय म्हणजे ग्राहक-उत्पादक यांच्यातील मोबदला परतावे. सांघिककार्य व त्यासाठी सूत्रसंचालन, जबाबदाऱ्या व अधिकार यांचे समुचित वाटप, काहींच्या काही गरजा आणि इतर काहींच्या काही क्षमता ओळखून त्यांच्यात अनुसंधान जोडून देणे . त्यासाठी जरूर तर दूरवर व्यापार, करार, वगैरे अनेक गोष्टी साधाव्या लागतात. यशद-व्यावहारिकता (प्रूडन्स) ही विद्या खासकरून उद्योग-साधनेत विकसित होते. (पण ती सर्वच साधनांमध्ये आवश्यक असते.)  प्रूडन्स व मोरॅलिटी या गोष्टी नेहमीच एकमेकी विरुध्द जातात असे अजिबात नाही. प्रूडन्स दुर्लक्षित करण्याने दोन्ही गमावल्या जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो मोरॅलिटीत बसणारा पण प्रूडन्स असे पथ्य पाळावे लागते. उद्योगसाधनेसाठी यत्न करणे इतरांच्यात यत्न प्रेरित करणे, यत्न सुगम वा सुलभ होतील हे बघणे आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या माणसांचे यत्न, हे एकमेकांना पूरक कसे होतील हे बघणे, आवश्यक असते. याला ‘यत्न-संयोजन’ असेही म्हणता येईल.

विविध उत्पादितांचा विनिमय (देवाण घेवाण) केल्याशिवाय श्रमविभागणीतून आणि उत्पादकतेतून येणारे फायदे प्रत्यक्षात वसूल होऊ शकत नाहीत. हा विनिमय जर एकदाच नेमून दिलेला असेल तर तो उत्पादकतेला स्थगित ठेवतो. आर्थिक-कर्ते या नात्याने माणसे एकमेकाशी व्यवहार करतात त्यातून त्यांचे कमी अधिक लाभ होतात. हे यत्न स्वार्थप्रेरित असूनही जास्तीतजास्त सर्वार्थ कसा साधला जाईल हे पाहण्याला आधुनिक काळात अर्थशास्त्र मानले जाते.

परंतु अर्थव्यवस्था तिची ती एकट्याने सुरळीत चालू शकत नाही व राज्य संस्थेला तिचे नियमन करावे लागते. किती मुक्त आणि किती नियमित याचे इष्टतम संतुलन शोधावे लागते. याला समष्टीय पातळीवरची उद्योग-साधना म्हणता येते. आर्थिक कर्त्यांना कसे आणि किती स्वातंत्र्य असावे हा प्रश्न आपल्याला पुढील साधनेकडे घेऊन जातो. सर्वच गोष्टींकडे साधन म्हणून बघणे वा मोबदला म्हणून बघणे हां दोष उद्योगसाधनेतून उद्भवत असल्याने तिची इतर अक्षांवरील मुद्द्यांनिशी चिकित्साही करावी लागते. मात्र समृद्धी काहीच नाही आणि तिची काल्पनिक चिकित्साच जास्त असे अडकून पडणेही योग्य नाही. उद्योग या आघाडीचे सूत्रमय वाक्य--- उद्योग=यत्न[शीलता+प्रेरकता+सुगमता+पूरकता+यशदव्यावहारिकता(प्रूडन्स)+योजकता]-> समृद्धी

४.स्वातंत्र्य

अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी आर्थिककर्त्यांना स्वातंत्र्य असावे लागते व त्याच वेळी एकून परिणती सर्वार्थात व्हावी यासाठी राज्यसंस्थेने केलेले कायदे, योजना, कर-अनुदान याही गोष्टी मान्य कराव्या लागतात. परंतु स्वातंत्र्याचा प्रश्न हा अर्थ-राज्य ह्या जोडगोळीपुरता मर्यादित नाही. कारण स्वातंत्र्याची आकांक्षा आणि सुरक्षिततेची हमी या दोन्ही गोष्टी मिळवताना स्वातंत्र्य हे काही बंधनांत राहूनच शक्य असते. स्वातंत्र्य या आघाडीचे सूत्रमय रूप अगोदरच दिले तर त्याची व्यापक संकल्पना ध्यानात येईल म्हणून ते सूत्र इथेच देत आहे.

स्वातंत्र्य= संकल्पशक्ती[सक्षमता+स्वनियंतात्व+विधीसंमतता]->स्वयंउत्तरदायीत्व(क्षतिभरणक्षमता)

स्वातंत्र्य हे एक नीतिसूत्र आहेच पण त्याहीपेक्षा कोणत्याही नीतिशास्त्रामागे स्वातंत्र्य हे पूर्व-गृहितक म्हणूनही आवश्यक असते. कारण असे वाग असे सांगणे कोणाला उद्देशून करणार?जो तसे वागायलाही स्वतंत्र असतो, त्यालाच ‘असे वाग’ हे अर्थपूर्णरित्या सांगता येते. ज्याला स्वतंत्र्य नाही त्याला नीतिशास्त्राचा काय उपयोग आहे? 

 सक्षमता, सृजन, स्व-अभिक्रम(इनिशिएटिव्ह), स्वतःच्या कृत्यांची जबाबदारी घेणे व ही जबाबदारी घेता येईल असे, अधिकार प्राप्त असणे, यापासून स्वातंत्र्य बनते. प्रत्येकाच्या स्वातंत्र्यात, इतरांच्या स्वातंत्र्यांवर अतिक्रमण न करणे हे तत्त्वतःच आवश्यक ठरते. एकमेकांना नाकारणारी किंवा संकुचित बनवणारी स्वातंत्र्ये, एकत्र नांदूच शकत नाहीत.(स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे अति-वापराने गुळगुळीत झालेले वाक्य असले तरी ते निश्चितच महत्त्वाचे आहे.) काहीवेळा स्वतःच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी म्हणून; हिंसा, बळ व फसवणूक, हे उपयोगी येतील असे तात्कालिक वाटू शकते. पण ही कोणाच्यातरी स्वातंत्र्यावर गदा असणारच. म्हणूनच दूरगामी स्वातंत्र्यरक्षणासाठी; हिंसा, बळ व फसवणूक हे त्रिकुट, वर्ज्य असावे लागते. म्हणजेच अहिंसा हे तत्त्व स्वातंत्र्यात अनुस्यूतच असते. अवरुध्द-हिंसा, कोंडलेली हिंसा वा स्व-हिंसा, यांच्यापासून खरी अहिंसा बनत नाही, हे इथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. पण तात्कालिक लाभांसाठी, ‘हिंसा, बळ व फसवणूक’ यांचा सतत पुनरुदभव होत रहातो आणि त्यातून कोणा ना कोणाच्या तरी स्वातंत्र्याची गळचेपी होत रहाते.                                             एकेका व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे इतरांपासून विशेषतः समूहांपासून संरक्षण करणे हे राज्यसंस्थेचे मूलकर्तव्य होय. पण तसे न होता खुद्द राज्यसंस्थाच लक्षणीय प्रमाणात अन्यायकर्ती बनू शकते. कारण तिच्यापाशी प्रचंड बळ जमा होते. कारण नागरिकांनी आपापली बले तिला समर्पित केलेली असतात. (तसेच ‘कल्याणकारी’ राज्य हे आपण समावेश नामक पुढील साधनेत बघणार आहोत. पण कल्याणाच्या न झेपणाऱ्या बांधिलकीमुळेही, मूलकर्तव्यात अपयश येऊ शकते याचा इथे फक्त उल्लेख करून ठेवतो. हा प्रश्न निःशेष कसा सोडवायचा, हे अद्याप सापडलेले नाही. लोकशाही हा नक्कीच काहीसा उश्शाप आहे. म्हणूनच व्यक्तीला स्वतःचे स्वातंत्र्य टिकवणे आणि लोकशाही जपणे, असे दुहेरी(व कधी कधी विरोधी) कार्य करावे लागते. हिंसा आणि स्वहिंसासुद्धा ‘शक्यतो’ न करणे हे स्वातंत्र्यसाधनेत खासकरून लागते व इतर सार्थक-साधनांतही अप्रत्यक्षपणे लागते. किंबहुना ‘साधन-शुचिता’ हा शब्द ह्या गोचीतूनच मिर्माण झालेला आहे. येथे हिंसा म्हणजे हत्या नसून ‘दुःखनिर्मिती’ (अन्याच्या मनात वा स्वतःच्या मनात) होय. नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये ठरवून घ्यावी लागतात व न्याय-संस्थेला पाचारण करावे लागते. स्वतःच्या भक्षणासाठी प्राण्याचा हलाल(यातनामय)-बळी देणे, छंद म्हणून शिकार करणे, या गोष्टी ‘दुःखनिर्मिती नको’ या तत्त्वासाठी वर्ज्य मानल्या पाहिजेत. ‘डॉक्टरला इंजेक्शन द्यावे लागते!’ अशा उदाहरणात वट्टात(नेट) दुःखनिवारण जास्त असते, अशा गोष्टीही नीट समजावून घेतल्या पाहिजेत.

न्याय  

न्याय=[अपुरी(मेयता+सिद्धता)+विवाद्यता]->सर्वपक्षीय-तितिक्षा]->योगदानार्हतेसमीप-फलनिवाडा  

मनुष्याला त्याच्या ‘प्रामाण्यआस्थे’मुळे सुफल-निर्मात्याला सुफल तर दुष्फल-निर्मात्याला दुष्फल, (निर्मितीच्या प्रमाणात) मिळाले पाहिजे असे ठामपणे वाटते. इतकेच नव्हे तर स्वतःला सुफल मिळाले असूनसुद्धा आपण त्यासाठी ‘अर्ह’ होतो का? ही चिंता ‘प्रामाण्यआस्थे’मुळेच वाटते (श्रेयचक्षु, जमीर, कॉन्शन्स अशा थेट प्रचितीसुध्दा असतात.) अर्हतेनुसार फल हे न्यायाचे गाभ्याचे तत्त्व आहे. किंबहुना अर्हता हा शब्द टाळून न्यायाची कल्पनासुध्दा उभी रहात नाही. योगादानात्मक अर्हता हे तत्त्व काही एका मर्यादेपर्यंत सर्वहितकारकही आहे. पण कर्कश्य ‘जशास तसे’ वृतीने सौहार्द नष्ट होते.. त्याहूनही मोठी समस्या अशी की योगदाने अचूक मोजता येत नाहीत. कृत्याचे परिणाम तपासता येतात पण कृत्यामागील हेतुकता कर्त्याच्याच मनात ‘साक्षात’ असते. त्यामुळे अन्य हेतू नव्हता हे सिध्द करून दुष्ट हेतूची क्रमविरूध्द सिद्धता करावी लागते. संशयाचा फायदा आरोपीलाच द्यावा लागतो कारण तसे न केल्यास खुद्द राज्यसंस्थाच अन्यायी बनू शकते. दोषी शिक्षेविना सुटणे हा न्यायाचा फक्त अभाव असतो. पण न केलेल्या अपराधाबद्दल न्यायसंस्थेकडून शिक्षा हा अन्यायाचा गुणाकार असतो.

सकारात्मक योगदानाबाबत, उणीव असलेल्यानाही, काही प्रमाणात, अन्याय्य पारितोषकही मिळत रहाते. योगदानाहून जास्त पारितोषक हाही अन्याय असतो पण त्याचा फारसा गाजावाजा होत नाही. कारण अधिक-लाभप्राप्त (व कमी संवेदनशील) माणसांना ते आपोआप डाचत नाही. जे संवेदनशील व नीतिवान असतील त्यांना तर डाचतेसुध्दा. पण इतरत्र औदार्य दाखवून ते असे डाचणे ‘फेडू’(?) शकत असतात. योगदानापेक्षा अधिक-लाभ अतीच किंवा ठळक असेल तर ध्यानात येतो. पण योगदान ठरवताना कोणत्या प्रयत्नांना किती वेटेज द्यायचे? हा प्रश्न खुला राहतो. याची भरपाई म्हणून, संधीच्या अभावी किंवा अन्य दुर्भाग्यापोटी, योगदान कमी असलेल्यांनादेखील, वाटा द्यावा लागतो. ह्याला पारितोषक बाजूकडचा संशयाचा फायदा म्हणता येईल. मापनातल्या अडचणींमुळे पारितोषक विषमता तीव्र होत असेल तर ती सौम्य करून घेता येते. पण फलसमता म्हणजे न्याय्यच! असे, (आपाततः अर्हताही समान असतानाची केस सोडून)  म्हणता येणार नाही. (बंद पडलेले घड्याळ दिवसातून दोनदा ‘बरोबर’ असते! पण म्हणजे ते चालू असते असे होत नाही!)  निःपक्षपात (फेअरनेस) राखता येतो. पण निःपक्षपात म्हणजे सममूल्यन नव्हे. तसेच ‘सूड म्हणजे न्याय नव्हे’ हे तत्त्व न्याय-साधनेत स्पष्ट होत जाते. ‘उत्तरदायीत्व’ हे न्याय साधनेचे अंगभूत वैशिष्ट्य असून तेही सर्वच साधनांमध्ये लागते. स्वातंत्र्यातील अधिकार हा रास्त ठरण्यासाठी अधिकार/उत्तरदायीत्व हे एकमेकांना पुरेसे पडणारे असावे लागतात. अन्यथा अधिक अधिकारप्राप्ताकडून अधिक उत्तरदायीत्ववानांवर अन्याय होतो. कोणाच्यातरी स्वातंत्र्यावर अतिक्रमण होते आणि शिवाय प्रचंड कार्यहानी देखील होते. अधिकार देताना त्या विशिष्ट अधिकारासाठीची ‘क्षमता’ बघावीच लागते. सत्कृत्याचे पारितोषक फलांमध्ये असावे, पण अधिकार देताना क्षमताच बघितली जावी. काही व्यक्तींचे योगदान जरी प्रचंड(अफेड्य) असले, तरी अशा उदाहरणात बहुतेकवेळा कार्यातच अंगभूत-फल (इंट्रिंझिक रिवॉर्ड) मिळत असल्याने ते योगदानाच्या प्रमाणात दावा करीतच नाहीत व शिवाय औदार्याचे अभिक्रम करतात.

द्वेष, हिंसा, युद्धखोरी, पराक्रम-प्रेरणा, हौतात्म्य हे उदात्तीकरण ही सर्व अन्यायमूलक कारणे, तशीच राहून ‘न्याय’ उपाय करत रहावा लागणे हा स्वतःच एक शाप आहे. वर आपण न्यायातल्या अडचणी पाहिल्या पण आता, अन्यायकारक अशी बल-विषमता कशामुळे पुनःपुन्हा निर्माण होत राहते? या प्रश्नाला हात घातला पाहिजे.

५ अनसूया/अवैर:

अनसूया/अवैर=[पूर्वदुर्भाग्य+पूर्वअन्यदत्तक्षती]उमदा-स्वीकार->(दोषी=द्वेष्यनव्हे)->कटुताविसर्जन

हे असे माझ्या वाट्याला का यावे? हा प्रश्न हमखास पडत असला तरी तो चुकीचा प्रश्न आहे. ‘का?’ हा प्रश्न व्याकरणदृष्ट्या जरी कारण विचारत असलेला भासला, तरी येथे तो ‘अर्हता’ विचारत आहे. म्हणजे ‘का’च्या जागी खरेतर ‘कशाबद्दल?’अभिप्रेत आहे. कशाबद्दल? हा प्रश्न तेव्हाच विचारता येतो की जेव्हा ‘कोणी’तरी निवाडा देऊन ते भागधेय तुम्हाला अधिकृतपणे प्रदान केले आहे. पण निवाडा देणारे कोणी आहे आणि आपल्यावर नेम धरून थोपले आहे अशी स्थिती नाहीच आहे. दुसरी चूक माझ्या मध्ये आहे. त्याजागी कोणीही असू शकत होते आता यदृच्छया ‘उदाहरणार्थ तुम्ही’ आहात ‘खास करून तुम्ही’ नव्हे.! अमुक सत्कर्मा/दुष्कर्मा बद्दल अमुक सुफल/दुष्फल दिले गेले ही प्रसंगस्थिती, आपण न्याय विचारातून उचलून, अवैधपणे यादृच्छिक घटितावर लादतो आहे. जे काय आपल्या वाट्याला येते ते १.स्व-अर्जित २.अन्य-दत्त आणि ३. भाग्यवशात, असे तीनही प्रकारचे असते. यदृच्छे बाबत अर्हानार्हतेचा प्रश्नच नसतो ‘माझ्या वाट्याला कशाबद्दल’? हा प्रश्नच चुकीचा आहे. पण या मुळातून चुकीच्या प्रश्नाची काल्पनिक उत्तरे (दिव्यकथा) ऐकून समाधान वाटून घेणे एवढेच काम या आघाडीवर केले गेले आहे.  

असूया वाटणे ही गोष्ट स्वाभाविक वाटते. पण एकदा भाग्याचे स्वरूप नीट लक्षात आल्यास असुयेच्या ट्रॅप मध्ये न अडकता अनसूया ही साधना शक्य होते. येथे कळीचा मुद्दा असा आहे की बहुतेक द्वेषमूलक भावना या प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असूयेतून उद्भवतात. कोणाशीतरी तुलना करून आपला आत्मधन्यता(एस्टीम) मिळवणे हे भ्रामकही असते आणि उगाचच फरफटवणारेही असते. शिवाय आत्म-अतुच्छता (डिग्निटी) न टिकवता येणे, याला अन्य कोणी जबाबदार नसतो. कोणीच तुच्छतार्ह नसतो हे महासत्य विसरलेले असते. त्यामुळे तुच्छतेने वागविणे वा वागविले जाणे, हे फक्त मूळ अपसमज (डिग्निटी-विषमता) दूर करताच सर्वांनाच निरर्थक ठरते. आपण तुच्छ नाही हे स्वतःशीच ‘जाहीर’ केले की झाले! याउलट ‘विशेष-सन्मान (ऑनर)’ हा स्वरूपतः विषमच असू शकतो व वादग्रस्तही असतो. ‘तुच्छतोदगार’ या मूलतः निरर्थक गोष्टीला, ‘अन्याय’ समजल्याने अन्यायांचे प्रमाण प्रचंडपणे जास्त दिसू लागते. ते इतके जास्त दिसते की त्यावर काही उपाय करता येईल ही आशाच नष्ट व्हावी. यातूनच दुर्भाग्यवंतांनी सुभाग्यवंतांवर सूड घेऊन त्यालाच ‘न्याय’ समजणे हे सर्वात मोठी चूक प्रस्थापित होऊन बसते. विशेषतः ‘समता’वाद्यांनी ‘अर्हता व भाग्यवशता’ हे प्रकरण तातडीने समजावून घेणे आवश्यक आहे. न पेक्षा त्यांचे प्रयत्न व्यर्थ तर ठरतातच, पण स्वतःच एक ‘नवे आधुनिक दुरित’ बनतात. 

स्पर्धा जर आवश्यक आहे तर तुलना कशी टाळणार? हा सकृतदर्शनी बिनतोड प्रश्न विचारला जातो. येथे हे मुळातच विसरले जाते की स्पर्धा ही ‘योगदान-यत्नांत’ आवश्यक असते. सुफलभोगात नव्हे. अधिकलाभ प्राप्तकांचे अधिकभोग सहजच दृश्यमान होतात, पण यत्न अदृश्य राहतात. शिवाय जास्त यत्न म्हणजे जास्त योगदान हे सूत्र, श्रम-वर्धक असून कष्टांचे उदात्तीकरण करणारे आहे. उलट कमी-यत्नात जास्त निष्पत्ती(उत्पादकता) कशी करावी हे मानवहिताचे आहे. उत्पादकता शोधण्यात जे योगदान असते. ते योगदान क्षमतांचा गुणाकार करणारे व म्हणून फारच मोठ्या मात्रेचे असते.

असूया ही एकच मर्यादित भावना नसून एकमेकीच्या जवळच्या भावनांचा पट आहे. हा पट, कमी दुरित ते जास्त दुरित, असा आहे. दुसऱ्याच्या सदगुणांचा हेवा वाटणे हे प्रेरकच आहे.  लाभ-हानी या अक्षावर ‘तुझ्या लाभयत्नापायी माझी हानी होतेय त्याचे काय?’ हा न्याय्यच प्रश्न आहे. ‘माझ्या लाभाहून तुझा लाभ जास्त कसा?’ ह्याचे मला वाईट वाटणे ह्यातून संधी गमावण्याचा धोका असतो. कमी का होईना पण मला लाभ आहे आणि माझ्या व्यवहारा-पूर्वीच्या स्थितीपेक्षा व्यवहारातून मिळणारी स्थिती, जर सुधारत असेल, तर मी व्यवहार नाकारणे हे माझ्या हिताचे ठरत नाही. यानंतर मत्सराची छटा सुरु होते. माझ्या योगदानाच विचारच न करता, जर ‘तुझी स्थिती जास्त चागली आहे’ ह्याचेच दुःख होत असेल, तर मत्सराला सुरुवात होते. त्याचा राग येत असेल तर मत्सर हिंसकतेकडे झुकू शकतो. ‘मला लाभ नाही मिळाला तरी चालेल पण ‘त्याला’ लाभ मिळू देणार नाही’ हा ‘विघ्नसंतोषीपणा’ ठरतो. त्याचा लाभ घटावा म्हणून मुद्दाम काही करणे हे घातपाताकडे जाते. त्याची हानी झाली पाहिजे ही वैरभावनेची सुरुवात असते. त्याची जास्त हानी होणार असेल तर माझी थोडी हानी सुध्दा सोसेन, ही जराशी समजूतदार वैरभावना असते. पण ‘माझी एकवेळ जास्त हानी झाली तरी चालेल पण त्याची थोडीशी तरी हानी करूनच सोडेन!’ हे पुरते वैर आहे. याही पुढे जाऊन त्याची हानी होणे, यातच माझा ‘अंगभूत लाभ’ आहे, हे खुन्नसवाले वैर झाले.

अन्यायाविरुध्द संघर्ष केलाच पाहिजे. पण त्यातून वैर न धरता अन्याय कमी होण्यावर भर दिला पाहिजे. जगात जोवर विविध विषमता) आहेत तोवर वैर हीच योग्य भावना आहे हे तत्त्व सुटसुटीत शब्दात सांगायचे तर माओवादी आहे. वैराने युद्धे होतात. युध्दनिष्पत्तीतून जेता-जित संबंध निर्माण होतात. म्हणजेच दमक-दमित सबंध तयार होतात. त्याचे रुपांतर शोषक-शोषित संबंधात होते. युद्ध जिंकून ‘शोषणबंदी’ घालूया असे म्हणणारे, युध्द जिंकल्यावर स्वतःच नवे शोषक बनतात!. समाजसत्तावाद (कम्युनिझम) हे वैरवादाचे फलित आहे. भांडवलशाहीत रोग आहेत हे खरेच, पण रोगांपेक्षा उपाय जास्त भयंकर! यात काय शहाणपणा आहे? आक्रमकाचा प्रतिकार करू नये असे अजिबातच नाही. पण जर तो प्रतिकार, शौर्याने पण वैरभावना न जागवता केला. तर दूरगामी अनाक्रमण शक्य होईल. शौर्य प्रेरित करायचे असेल तर वैर प्रेरित करावेच लागते, हे भूतकालात बऱ्याचदा घडलेले असले, तरी ते अपरिहार्य नाही. दया धरमका मूल है हे माझ्या मते चूक आहे. मुळात दयनीय स्थिती निर्माणच कशाला होऊ द्यायची? दया ही चॅरिटी म्हणून ठीक. पण मला क्षमा धरमका मूल है हे जास्त बरोबर वाटते. कारण क्षमा ही वैराचे दुष्टचक्र तोडणारी गोष्ट आहे. अन्यायग्रस्ताने वैराचा त्याग करून, पण सामाजिक कर्तव्य भावनेने, अन्यायाविरुध्द लढलेही पाहिजे. अशा अवैरयुक्त लढ्यात कधी पराभवसुध्दा होईल. पण हा पराभव सूडभावनेला उत्तेजन देणार नाही. अवैरयुक्त लढे सनतशीर व अविश्वंसक मार्गाने शक्य होतात. तसेच माझ्यावरील अन्यायापेक्षाही तीव्रतर अन्यायांविरुध्द लढण्यात सर्वच अन्यायग्रस्तांशी बांधिलकी निर्माण होते. असूया व वैर हे असे शाप आहेत की जे न्याय या आघाडीची वाटलावून ठेवतात. फेअरनेस म्हणजे निःपक्षपात. कोणीच पक्षपाताचा किंवा मूल्यन-बाह्य भेदभावाचा बळी ठरता कामा नये हे निश्चित. पण यासाठीच न्यायसंस्था कमी-कडक रहाते हे लक्षात घेऊन न्यायसंस्थेलाच शत्रू ठरवणे चूक ठरते.

  

६ समावेश

सूत्र=अर्हतानिरपेक्ष-बृहद्वात्सल्य(क्षमा+करुणा+औदार्य+मुदिता)->वंचितता-निवारण->सर्वोदय 

मुळात दुष्कृत्ये करण्याच्या मोहांमुळे खूपच प्रकारचे आणि तीव्रतांचे अन्याय निर्माण होतच असतात.  न्यायासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्रुटी राहतात. मापनाच्या मर्यादा आणि पुरावे मिळवण्याच्या मर्यादांमुळे चुका अपरिहार्य ठरतात. चुका भरून काढताना जितकी चूक तितकीच भरपाई असेही जमत नाही. तसेच भाग्याचा जो घटक येतो तो तर मोजताच येत नाही. यासाठीच अर्हतेनुसारीच फल हा आग्रह सोडावा लागतो.

सूड म्हणजे न्याय नसून दुप्पट अपराध असतो व दुष्टचक्र निर्माण करणारा असतो. त्यामुळे प्रतिबंध, प्रतिभरण आणि दुर्गुणनिवारण अशी कार्ये ‘न्याया’ला करावी लागतात. यामुळेच माणूस जरी कर्तव्ये चोख पार पाडत असला, तरी त्याला कर्तव्यापलीकडे जाऊन, इतरांसाठी काही करावेसे वाटणे, हे योग्यच असते व वाटतेदेखील. ह्यांना मी कर्तव्यातीत-सदगुण (इंग्लिशमध्ये सुपरएरोगेटरी व्हर्च्युज असा शब्द आहे) म्हणतो. हे सदगुण मुख्यतः चार क्षमा, करुणा, औदार्य, मुदिता, ( मुदिता = इतरांना आनंदात पाहून वा आनंद देऊन, त्याचाच आनंद होणे व त्यापायी इतरांना तो द्यावा ह्यासाठी प्रयत्न करणे) यांना मिळून मी बृहदवात्सल्य असे नाव दिले आहे. कारण वात्सल्यात ह्या वृत्ती अपत्यांप्रति बहुतेक वेळा साहजिक असतात. पण या वृत्तींनाच सर्व मनुष्यजातीकडे (झेपतील तितपत) वळवणे, असा या सदगुणांचा अर्थ लावता येईल. म्हणून कर्तव्यातीत सदगुणांना मिळून बृहदवात्सल्य हा शब्द मी निर्माण केलेला आहे. हे कर्तव्यातीत सदगुण स्वयंतोषित असतात. ज्याला क्षमा केली जाते त्याला दंडापासून सुटका मिळतेही पण याहून महत्वाचे असे की क्षमा करणाऱ्याला सूडाग्नीत जळत रहावे लागत नाही हा क्षमा करणाऱ्याचा मोठाच लाभ असतो. (व्यक्तिशः क्षमा करून, पण दुष्प्रवृतीला निरुत्साहित करण्यासाठी, सामाजिक कर्तव्य म्हणून कर्तव्यभावनेने न्यायसंस्थेला आवाहन करता येते.) समावेश या साधनेमुळे समाजरचनेत कोणालाही वगळल्याची भावना येत नाही. वगळणूक झालीच आणि सत्ता बलदंड नसली तर विद्रोह होऊन समावेश सुधारला जातो.

मुख्य म्हणजे समावेश हा न्यायासारखा हिशेबी असून चालत नाही. जमेल तितके आर्तिनाशन हा भर राहिला पाहिजे. कोणाचे कमी झाले व कोणाचे जास्त झाले, तर तिथे न्यायदेवतेची तलवार उपसून, एकूण आर्तिनाशनच रोखणे हे नक्कीच शहाणपणाचे नाही. 

७.संवाद

सूत्र=समस्तरीय/श्रेणीय+दंभरहित+पुनरार्थांकनीय>[मानवीसहविश्व’युंजन+भावनिक-पोषण

संवाद म्हणजे फक्त संज्ञापन(कॉन्टक्ट व कम्युनिकेशन) नव्हे तर खऱ्या अर्थाने ‘संवाद’! प्रत्यक्षातले कित्येक संवाद ‘संवाद’साधनेपासून ढळलेले आढळतात. इथेच फक्त नव्हे, तर कोणतीही ‘ढळलेली गोष्ट वर्ज्य’ करण्यापेक्षा तिचे ‘ढळलेपण कमी करणे’ जास्त श्रेयस्कर असते. संपर्क, चिन्हरचना BHAVNIUK आणि पुनर्रचित-आकृतीबंध उत्पन्न करणे, या क्रियांत मानवाने अतुलनीय प्रगती केलेली आहे. कमी पडतो आहे तो संवादाचा ‘आशय’. सार्थकसाधना म्हणून पहाताना आशयच महत्त्वाचा आहे.

आशयातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सहभावना-भावनाचेतन-भावनाशमन भावनिक-देवाणघेवाण हा व्यक्तीच्या जीवनातला प्रेरणा-संयोजक भाग असतो. यात जर व्यक्ती दरिद्री राहिल्या तर भौतिकसमृद्धी असूनही त्या दुःखी, दुबळ्या, दुष्टही बनतात. व्यक्तींचे भावनिक-स्वास्थ्य हे समष्टीच्या यशापयशात मोठ्ठे फरक पडते. काही प्रभावी वा गारूड घालणाऱ्या व्यक्ती इतिहासाची दिशाच बदलू शकतात. बाह्यकार्यक्षमता वाढवण्याचा नादात आंतरिक सदगुण खुरटतात आणि बाह्यकार्यक्षमतेवरही बोला फिरवतात.जितकी तांत्रिक प्रगती होईल तितके महत्व भावनिक-पोषणाला असते. कारण परिणामकारकता वाढते ती दुर्गुणांची देखील!

संपर्क-जाल, हे कोणाचाही संपर्क कोणाशीही शक्य होईल, असे खुले झाले आहे. एकेकाळी (व काही प्रमाणात आजसुद्धा) त्यावर इतर कारणांनी बंधने घातली जात. पण तंत्राचे यश, हे ‘कोणाचाही कोणाशीही’ या पातळीवरचेच आहे. गुप्तता, दंभ, छ्द्म, अज्ञान आणि अनास्था हे (सार्थक)संवाद साधनेतील मोठेच अडसर आहेत/असतात. संवादाचा प्रयत्न हा ‘सारगर्भ’ असण्यासाठी काटेकोर असावा लागतो. पण संवादाचा प्रयत्न, ‘संदर्भपुष्ट’ होण्यासाठी मोकळा ढाकळा व लक्षणेने (उक्तपेक्षा अन्य गोष्ट सूचित करण्याची शक्ती म्हणजे लक्षणा) जास्त आशय व्यक्त करणारा असतो. गैरअर्थांकन (गैरसमज) होणे हे अटळ असले तरी संवादाच्या अधिक फेऱ्यांनी जास्तीत जास्त उचित अर्थांकनाकडे जाता येते. मूळ-स्वरूप-संदेशापेक्षाही, दोन्ही वक्ते अर्थ लावण्याबाबत सहमतीकडे सरकणे, हे जास्त महत्त्वाचे असते. कारण विरोधीसमज हे दमनकारिता वाढवणारे असतात. पहिल्या फटक्यात अचूकतेपेक्षा, अनेक फेऱ्यात परस्पर-समीप व परस्पर-प्रतिदायी आकलन (म्युचुअल अंडरस्टँडिंग) येत जाणे, जास्त शक्य व महत्त्वाचे असते. संवादाचे सर्वात महत्त्वाचे प्रयोजन म्युचुअल अंडरस्टँडिंग हेच असते. ते पुरेसे असले तर सहकार्य आणि सांघिक कामगिरी शक्य होते(उद्योग). शिवाय आपण एकाकी नाही, जोडलेले आहोत, ही भावना महत्त्वाची असते (रस).                                                                       आपण जे बोलतोय ते, आकलनीय आहे ना? तथ्यांनुरूप आहे ना? तर्कयुक्त आहे ना? उभयमान्य आचरणनियमांना धरून आहे ना? किंवा उभयमान्य आचरण नियम निर्माण करणारे आहे ना? आपला हेतू समोरच्याला पारदर्शक होत आहे ना? आपले बोलणे मनापासून (ऑथेंटिक) आहे ना? ह्या काळज्या दोघांनीही घेणे, म्हणजेच सुनैतिक वा उतरदायित्वयुक्त संवाद! अशी व्याख्या युर्गेन हाबेरमास यांनी केली आहे. अमुक एक विधान प्रमाण आहे का? किंवा अमुक एक व्यक्ती सत्शील आहे का? हे ठरवत बसण्यापेक्षा, प्रामाण्यआस्थेचा निकषच त्यांनी वरील निष्ठांपासून बनवून संवाद-प्रामाण्य हेच नवे व जास्त व्यापक प्रामाण्य म्हणून बघावे असा संदेश हाबेरमास यांनी दिला व तो मला पटतो. यामुळे वाद हे, घट लाल आहे की काळा? शब्द हा नित्य असतो की अनित्य? अशा तांत्रिक प्रामाण्यआस्थेपेक्षा मानवहिताला संवाद-प्रामाण्यच जास्त अनुकूल आहे. अर्थात असा आदर्श संवाद दरवेळी शक्य नसतो. परंतू मनात आदर्श राखल्याशिवाय त्यांच्या जवळ जातो आहोत की नाही हे कसे ठरवणार? आपले ध्येय परिपूर्णता हे नसून, सतत सुधारणा हे आहे, हे तत्त्व मी मानतो, हे या आधीच सांगितलेले आहे. आश्चर्यकारक संख्येने असणारे संवाद-दोष (अनेक तर्कदोष हा त्यापैकी एक प्रकार झाला.) जसजसे आपल्या लक्षात येत जातील आणि तशी तळमळ असेल, तरच आपण ‘संवाद’ ही जीवनसार्थक साधना म्हणून समजावून घेऊ. समूहभावना-आवाहक घोषणा करणे (ऱ्हेटॉरिक) आणि विरुध्दबाजूचे सगळेच उधळून लावणे (पोलेमिक) यात वीररस निर्माण होतही असेल. पण विरुध्द बाजूचे ग्राह्य-अंशही गमावून बसणे, ही मोठी चूक असते व ती आपण सांप्रतकाळी जास्तीच करत आहोत. आरपार बरोबर तरी किंवा आरपार चूक तरी, असे सहसा काही नसते. आपले आकलन समृध्द, खुले आणि विधायक कसे बनवता येईल हा तातडीचा प्रश्न आहे.

संवादांची गुणवत्ता सुधारणे हा प्रश्न काही वेळ बाजूला ठेवू. ये हृदयीचे ते हृदयी अशी गरज बऱ्याच व्यवहारांत नसते. संवादांचे कार्यात्मक प्रकार अनेक असतात. वाटाघाटी, मान्यता देणे, वचन देणे. माहिती देणे, उलटतपासणी घेणे असे कितीतरी प्रकार आहेत. त्यात्या प्रकारानुसार संवादात कोणती पथ्ये पाळावी लागतील हे वेगवेगळे असते. काही देऊ करणे(ऑफर) किंवा कशावर तरी दावा सांगणे ‘क्लेम’. काही काळ तरी अपरिहार्य असणारे प्रकारही असतात. वचन देणे ह्यातच ते पाळणे अनुस्यूत असते. परंतु तसे झाले नाही तर तो प्रश्न न्यायाचा बनतो. न पटणाऱ्या किंवा न झेपणाऱ्या मागणीवर आक्रमक न होता तिला ठामपणे नकार देणे ही गोष्ट स्वातंत्र्य या साधनेशी जोडलेली आहे. जवळ जवळ कोणत्याही साधनेत संवाद हा लागतोच.त्यामुळे या साधने च महत्त्व लक्षणीय आहे.    

८ आत्ममैत्री

सूत्र=[अनाग्रह+अयशसज्जता]>वैफल्यनिरास+[स्वगामीबृहद्वात्सल्य]>शल्यनिरास<साक्षीत्व  

आपल्यात भरपूर वैविध्य असलेल्या, भरपूर व कित्येकदा परस्परविरोधी, प्रेरणा ठासून भरलेल्या असतात. त्यापैकी खरोखर ‘आपल्या’ कुठल्या आणि नको असताना ‘घुसडून दिलेल्या’ कोणत्या हे ठरवणे दुरापास्त व्हावे इतक्या त्या मिसळून गेलेल्या आहेत. ‘खरोखरचे आपण’ हे अस्तित्व कसे शोधणार हा अवघडच प्रश्न आहे. जेव्हा आपले आपल्याशी तंतोतंत जुळले आहे अशी भावना होते तेव्हा जे असतो ते खरोखरचे आपण. आत्मा नावाचे द्रव्य मानायची गरज नाही. उलट आत्मवियोग (एलियनेशन) नावाचा कर्ष ओळखता आला तर ‘आत्मता’(जास्तीत जास्त) कशी साधायची? या जास्त योग्य प्रश्नापर्यंत आपण पोहोचतो. आपल्या प्रेरणा नुसत्या परस्परविरोधी नहियेत तर त्यांचे श्रेय-प्रेरणा आणि दुरित-प्रेरणा असे विभागही असतात. यामुळेच आपण ‘वास्तविक कसे आहोत’ आणि ‘आपण आपल्यालाच कसे असायला हवो’ आहोत या दोन गोष्टी भिन्न बनतात.(हवो या क्रियापदरूपा बद्दल क्षमस्व. पण प्रथमपुरुषीपणा ठळक व्हावा म्हणून तसा प्रयोग केला.)

आपण जर व्यावहारिक-यशलक्षीत्वात (प्रूडन्स) मध्ये चुकलो तर फक्त पश्चात्ताप होतो. पण आपण जर आपणच मानत असलेल्या नैतिकतेत चुकलो तर स-अपराध-पश्चात्ताप होतो. पण जर आपण स्वतःच मानत असलेल्या नैतिकतेबाबत दुविधेत किंवा श्रुंगापत्तीत सापडलो तर जी तगमग होते तिला इंग्लिशमध्ये अँग्विश असा शब्द आहे. मी पापशंका-व्याकूळता असा शब्द बनवला आहे. हे ‘पाप’ हे कर्मविपाकातले नव्हे तर अगदी इहवाद्यालादेखील, एकतर त्याच्या काही गोष्टी हुकलेल्या वाटतात, काही गोष्टी चुकलेल्या वाटतात, पण काही गोष्टी ‘पाप’(घृणास्पद) वाटतात. माणूस असण्यातले ‘पावित्र्य’ गमावल्या सारख्या वाटतात. पावित्र्य हाही शब्द इहवादी अर्थाने वापरता येतो असे माझे मत आहे. ज्याचा भंग झाल्यास काही अर्थच राहिला नाही असे वाटते ते पावित्र्य होय. नुसता पश्चात्ताप, अपराधभावना आणि पापशंकाव्याकूळता असे तीन तीव्रतर होत जाणारे टप्पे मी मानतो. पण तीनही टप्प्यात, आपण स्वतःच स्वतःच्या विरोधात उभे रहातो, हे मात्र नक्की. ही अवस्था असह्य तर आहेच पण शिवाय सगळ्यावरचाच विश्वास उडेल व माणूस दोषैवदर्शी बनेल हा मोठाच धोका आहे. एक्झिस्टेन्शिअलिझम व पोस्ट-मॉडर्निझम या प्रवाहांत ही लक्षणे दिसत सुध्दा आहेत.

या तीनही टप्प्यात ‘आपला आपल्यावर लगाम राहिला नाही’ हे समाईक असते. आपल्यात निर्धारशक्ती असतेच पण ती कमी पडली असे हे प्रसंग असतात. अश चुका किंवा प्रमाद, तत्सम  प्रसंगी कसे टाळता येतील याचा शोध घेणे, हे आपले नैतिक कर्तव्यच आहे. एका अर्थाने ते न्यायसाधनेत मोडते. आत्ममैत्री ही वेगळ्या स्वरूपाची साधना आहे. जरी आपण मूर्ख मतलबी आणि दुष्ट ठरलो असलो (जे नको होते), याबद्दल आपलीच अधिक-क्षती (डॅमेज) करून घेण्यात सुधारणाही नाही आणि तो न्यायही नाही. बधीरीकरण वा पलायनवाद न करता आपल्यातील स्व-विरोधामुळे आलेला कर्ष स्ट्रेस कसा काढून टाकता (किंवा कमीतकमी राखता) येईल? नकळत ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग न करता, होय मी अपराधी आहेच पण तरीही माझे माझ्यावर निरपेक्षप्रेम आहे, अशी भूमिका घेणे हे शक्य आहे व असे मानल्याशिवाय आत्ममैत्री ही साधना सुरूच होऊ शकत नाही. 

आपल्यात उत्स्फूर्तता(स्पाँटॅनिटी) विरुध्द निर्धारशक्ती(व्होलीशन) हे द्वंद्व असतेच. तसेच निवाडाशक्ती(जजमेंट) विरुध्द स्वीकारभाव(अक्सेपटन्स) हेही द्वंद्व असते. उत्स्फूर्तता मनःशक्ती वाढवणारी असते तर निर्धार मनःशक्ती खर्ची पाडणारा असतो. तसेच निवाडाशक्ती काहीतरी वर्ज्य करून दुसरे काही आंगीकरणारी असते. तर स्वीकारशक्ती अटीनिशी स्वीकार न करता विनाअट स्वीकार करणारी असते. निर्धारशक्ती कमी पडल्यामुळे उत्स्फूर्तता शोकमग्न झालेली आहे असा हा ‘आत्मवियोगाचा’ प्रसंग असतो. आत्मवियोग दूर करून पुन्हा आत्मयोग साधणे हे आत्ममैत्री या साधनेचे कार्य आहे. या साधनेत साधनाकाल आणि व्यवहारकाल यात भेद करावा लागतो. आत्ममैत्रीच्या साधनेत ‘अडमिट’ झालेलो असताना व्यवहारातून निवृती-रजा घ्यायची असते.!

आपले विषयीत्व (सब्जेक्टहुड) आकांक्षा व प्रसंग यांच्या अनुसार विशिष्ट भावना धारण करत असते. त्या भावनेनुसार, एकतर निवाडाशक्तीचा अभिप्राय देण्यासाठी आणि निर्धारशक्तीचा रेटा लावण्यासाठी, आपले विषयीत्व त्या भावनेत व त्यादिशेने दृढ होते. अशा विषयीत्वानिशी आपण आपलाच विनाअट स्वीकार करू न शकल्याने उत्स्पूर्तता दाबली जात रहाते. विषयीत्व हे कृध्द, आकर्षित, भयभीत, हौतात्म्योत्सुक, कसेही असो! काहीतरी नाकारणे आणि काहीतरी दाबणे हे विषयीत्वाचे रुटीन असते. विषयीत्वाचा एकच प्रकार या पासून मुक्त असतो व तो म्हणजे निरभिप्राय साक्षीत्व.

पण असा साक्षीभाव प्रयत्न करून जमत नाही तर प्रयत्न थांबवून येऊ-द्यावा लागतो. पण त्यासाठी अगोदरच आपण सौम्य केलेल्या कर्षात वावरायचे असते. एकूणात जास्तीत जास्त अनाग्रही (निरीच्छ नव्हे) अपयशसज्ज (यशयत्न न सोडता) रहाणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःप्रति बृहद्वात्सल्य अवलंबिणे म्हणजेच स्वतःला क्षमा, स्वतःची स्थिती सुधारू पाहणारी करुणा, स्वामित्वभावना सोडणारे औदार्य, आणि जरा जरी आनंदी असलो तर त्याबद्ल आणखी आनंद, हे कर्तव्यातीत सदगुण जागवणे, असे जर आपण जगत असलो, तर साधनाकाळात ‘कर्तव्यभावना निलंबित’ ठेवता येते. यामुळे निवाडा व निर्धार यांना कमी वाव रहातो, उत्स्फूर्तता व स्वीकार यांस जास्त वाव रहातो आणि कर्ष अल्प राहिल्याने साक्षीभाव शक्य होतो. साक्षीभावात कर्षरहितता अनुभवायला मिळते. मुख्य म्हणजे साक्षीभावात, आपण दुर्गुणी ठरण्याची भीती वा सदगुणी ठरण्याची आशा, उरत नसल्याने खरे कसे आहोत हे मोकळेपणी बघता येते. त्यात निरनिराळ्या व्यर्थता ध्यानात येतात. एरवी आपले कर्ष आपल्याला ह्या ना त्या दुराग्रहाकडे खेचत असतात व म्हणून व्यर्थता ध्यानात येत नसतात. त्या ध्यानात आल्या की दुराग्रही कर्ष  आपोआप गळून पडतात. हीच आत्ममैत्री नामक साधना होय.

बिगर-आत्मवादी व व्रताढ्य ‘नैतिक’, हे ‘आत्मसंघर्ष’ हा उपाय म्हणून सांगतात. आत्मसंघर्षातील घर्षणात ऊर्जाही जाते आणि ‘ताप’मानही वाढते. त्यामुळे तो उपाय, दोष निवळू देण्याची संधी न ठेवता, उलटेच कार्य करतो. असे नसते तर आजपावेतो केले गेलेले आदर्श उपदेश हेच माणूस बदलण्याला पुरेसे पडले असते. पण तसे अजिबात झालेले दिसत नाही. म्हणूनच निवळू देण्याचा अप्रोच महत्त्वाचा ठरतो.

आठही साधनांना अप-वळण लागण्याचे धोके

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, हे अरिस्टॉटल असो वा भगवान बुध्द असोत, बहुतेक ज्ञानी लोकांनी सागितले आहे व तेच योग्य असल्याचे आपण आपल्याच अनुभवावरून म्हणू शकतो. रस, उद्योग, स्वातंत्र्य, न्याय, समावेश, संवाद, अनसूया/अवैर आणि आत्ममैत्री या साधनापथांही हे तत्त्व लागू आहेच. पण या साधनांनासुध्दा अप-गत वळणे लागू शकतात व त्यांपासून सावधही राहिलेच पाहिजे. भलतीकडे वळलेल्या साधनेला आपण कंसात (अपगत) असे म्हणार आहोत.

रस(अपगत): भांडणे लावून देणे, अफवा पसरवणे, गॉसिप करणे, कोणाचेतरी अपयश साजरे करणे, आत्मघातकी साहसे (आवश्यक नसताना) करणे, व्यसने व निरर्थक सवयी, आन्हिकांचा बडेजाव, कंटाळ्याची भीती, काही प्रमाणात कंटाळा अटळ आहे हे विसरणे, अनावश्यक कतूहल, विकृती, जुगार, हीच-व्यक्ती नाहीतर जीवन=०, असे आकर्षित होणे, अशा अनेक गोष्टी रस साधनेला अपवळण लागून उद्भवतात. जेव्हा एखादे भांडण मिटवून वाटाघाटीत रुपांतरीत करायचे असेल, तर प्रथम नाट्यपूर्णता नष्ट करावी. थांबा! मी एकेका मुद्यावरची एकेकाची मते लिहून घेतो. दोघांनी आळीपाळीने एकच मुद्दा सांगा कित्येकदा प्रश्न न सुटताच ‘भांडण मिटते

उद्योग(अपगत) अंगभूत सुखाकडे पूर्ण दुर्लक्ष, मोबदल्यात काय मिळेल अशी हिशेबीवृती जीवनाच्या काही क्षेत्रात अगदीच अर्थहानी करणारी असते. स्वतः सकट इतरांकडे फक्त साधन म्हणून बघणे, उत्पादकता मिळतीय म्हटल्यावर बाकी काय बिघडतेय याकडे दुर्लक्ष, सत्तेच्या जोरावरच कामे करून घेता येतात असा समज. पैसा हे साधन आहे साध्य नव्हे याचा विसर पडणे, भक्तीचे सुध्दा आउटसोर्सिंग करणे, उद्दिष्टपूर्तीसाठी साधनशुचिता साफ विसरणे. मनपलटाउ(मॅनिप्युलेटिव्ह) बोलणे. नसलेल्या गरजा उगाचच निर्माण करणे, सर्व प्रश्न कधीतरी गणितानेच सुटतील, जे मोजता येत नाही त्यावरील प्रश्नच टाळणे, इत्यादी. तंत्रवैज्ञानिक-प्रगतीमुळे बऱ्याच गोष्टी आपल्या ‘हातात’ आल्यात. पण हातात न आलेल्या गोष्टी कितीतरी जास्त आहेत, त्याकडे लक्ष वेधले असता, उद्योग-आत्मविश्वास आटोक्यात येऊ शकतो. तसेच ज्या गोष्टींचे मात्रात्मक मूल्यन करताच येत नाही त्यांकडे लक्ष वेधावे   

स्वातंत्र्य(अपगत): ‘जास्तीत जास्त मुभा’ इतकाच स्वातंत्र्याचा अर्थ काढणे, लहरीपणा हा कौतुकाचा विषय बनवणे. इतरांचे मत न घेणे,  मतभेदाला दगा समजणे. एकतर दास्यवृती अंगीकारून स्वातंत्र्याचा प्रश्न निकालात काढणे, नाहीतर प्रभू वृती स्वीकारून इतरांचे दमन करू पहाणे. स्वयंनियंतात्व ही गोष्ट म्हणजे लादलेपणच असे मानणे. अधिकार/उत्तरदायीत्व या जोडगोळीत संधिसाधूपणा करणे, आपणही चुकू शकतो किंवा अज्ञानी असू शकतो हे लक्षातच न घेणे. व याउलट आपल्याला काय फरक पडतो? असे मानून अनास्था जोपासणे. स्वातंत्र्य टिकवले पण सौहार्द हरपले याहीकडे लक्ष वेधले पाहिजे.

न्याय(अपगत): सूड म्हणजे न्याय हे भयानक समीकरण फारच पसरले आहे. अन्यायग्रस्ताच्या कल्याणा पेक्षा अन्यायकर्त्याचे पारिपत्य महत्त्वाचे मानले जाते. बऱ्याच केसेसमध्ये रेस्टिट्यूशन (पुनर्वसन, मानसिकसुद्धा) ही तरतूदच नाही किंवा ते सरकारनेच करायचे असते असे गृहीत धरले जाते. दोषी  व्यक्ती सुटली तरी चालेल पण निर्दोषीला शिक्षा होऊ नये, हे तत्त्वच अन्यायांना मोकाट सोडते अशी समजूत. सकारात्मक बाजूत योगदान आणि अर्हता(पदवी नव्हे) ह्या गोष्टी दुर्लक्षित ठेवणे. जे मोजता येत नाही ते समानच वाटले पाहिजे हा दुराग्रह. थोडे कमीजास्त झाले तरी चालेल पण विनिमय शक्यतो विश्वासावर करावा हे सोपे उत्तर विरून जाणे. कर्मविपाकाला ‘न्याय’ समजणे. न्यायालासुध्दा उत्पादनखर्च असतो (व तो कोणी भरायचा?) हे विसरून जाणे. इत्यादी. न्यायालयेच नव्हेत तर सर्वत्रच एक रोग पसरला आहे. कोणाच्या डोक्यावर खापर फोडायचे? याचा निष्कर्ष मिळालाच पाहिजे (आणि पुढे काहीच करायचे नाही!). असा तापलेला वाद दोष हा कुणाचा यावरून उपाय काय करता येईल? याकडे नेणे नेहमीच श्रेयस्कर ठरते..

अनसूया/अवैर(अपगत): कलह, विवाद, मतभेद, हितभेद व अगदी संघर्षसुध्दा चालूच रहाणार. प्रत्याशी (अँडव्हसरी) म्हणजे वैरी नव्हे पण हे लक्षात रहात नाही व कलहाच्या भरात वैरे निर्माण होतात. समजा मी आणि तो असे प्रत्याशी आहेत. वैराची प्रतिज्ञा अशी, संघर्षात माझी हानी/क्षती त्याच्या हानी/क्षतीपेक्षा कितीही जास्त झाली तरी चालेल, पण त्याची थोडीशी तरी हानी/क्षती करून दाखवेनच! हे विघातक आहे व म्हणूनचा अवैर ही आपण सार्थक-साधना मानतो. याचा अर्थ असा नव्हे की संघर्षच नकोत. अनेक चुकीच्या गोष्टी कुणाच्यातरी ‘संघर्ष-टाळू’ (नो कनफ्रंटेशन) वृत्तीमुळे चालूच रहातात. हा पलायनवादाचाच एक प्रकार आहे. परिवर्तनात संघर्ष अपरिहार्य असतो मात्र विधायक तोडगा नसेल तर तो चिघळतो.

असूया नसेल तर स्पर्धाच रहाणार नाही हीसुध्दा एक गैरसमजूत आहे. माझ्या सुफल-भोगापेक्षा त्याला सुफल-भोग जास्त मिळाला म्हणून त्याला द्वेष्य ठरवणे हे असूया झाली. पण माझ्या योगदान-कारक यत्नापेक्षा त्याचा यत्न जास्त कुशल ठरला याचे मला कौतुक वाटले पाहिजे. कौतुक वाटून तसा प्रयत्न करणे ही अनसूया होय. (निरोगी-स्पर्धा) होय. तुलनाच नको हे अशक्य आहे. कारण आपली प्रचीतीव्यवस्था तौलनिकतेवर आधारित आहे. तुलनेचा परिपाक स्वहिंसेत व अन्य हिंसेत होणे ही असूया-ग्रस्तता होय. असूया नको असेल तर तुलनाच नको हे या साधनेला लागणारे अपवळण होय.

समावेश(अपगत):  जशास-तसे-वाद हळू हळू त्याचे नसलेले प्रामाण्य गमावत चाललेला आहे.  मनुष्यात उत्क्रांतीने भरपूर दुर्गुण भरले असले तरी कंपॅशन(आत्मौपम्यभाव) हा सदगुणही ठेवलेला आहे. न्यायाची सर्व प्रकारची अपयशे पचवण्याची शक्ती (निदान सिद्धांततः) माणसात आहे. म्हणूनच माणूस क्षमा, करूणा, औदार्य, मुदिता(म्हणजेच बृहद्वात्सल्य) न्यायाची सर्व अपयशे पचवण्याची शक्ती समावेश यासाधनेत आहे. पण हे ‘कर्तव्यातीत सदगुण’ बऱ्याच नायकांना सदगुण-विकृतीत नेऊन त्याचा घात करतात. सावरकरांनी सदगुण-विकृती हा शब्द काढला. मी वरील परिभाषेत असे म्हणेन की अर्हता फक्त योगदानातच न पाहता अपात्री बृहदवात्सल्य नको. खरोखर व जास्तीत जास्त क्षमार्ह, करुणार्ह, औदार्यार्ह कोण आहे याचीही पात्रता पाहिली जावी. मुदितेला कसलीच अर्हता लागत नाही. कल्याणकारी राज्यात कल्याणसुध्दा ‘न्याय्य’ होते आहे का? हे कटाक्षाने पहिले जावे. हे देखील अवघड काम आहे पण ते शक्यतो करावे. अनर्हाला सुफल गेले तरी चालेल शेवटी भाग्य आहेच की! कोणी बृहदवात्सल्याचा देखावा करून स्वतःच्या अपराध भावावर पांघरूण घालतो आहे काय हाही प्रश्न येतो पण त्यात निवाडा देणे अधिक अवघड आहे. किंवा कोणी सकृतदर्शनी दुःस्थित खरे तर सुस्थित आहे का? है प्रश्न येतो. पण फार किचकटपणा न करता, आपले बृहद्वात्सल्य अपात्री गेले हे आपलेच दुर्भाग्य म्हणून सोडून द्यावे

संवाद(अपगत): सध्या आपण तद्दन खोटेपणा, हेतुपूर्वक दुष्प्रचार ह्या गोष्टी बाजू ठेवू. प्रामाणिक संवादात सुध्दा सांगणारा आणि ऐकणारा यांच्यात गैरसमज होतात. तत्त्वज्ञानात हेरमेन्यूटिक्स ही नवी शाखा निर्माण झाली आहे. अर्थांनिर्णयनशात्र असे म्हणता येईल. जेव्हा दोघेही समोरसमोर असतात, तेव्हा म्हणजे तुला असे म्हणायचे आहे का? नाही तसा अर्थ नाही, मला लक्ष वेधायचे आहे ते ‘ह्या’ मुद्या कडे अशा अर्थनिर्णयनाच्या फेऱ्या करता येतात. अनुपस्थित किंवा मृत किंवा प्राचीन वक्त्याचे अर्थनिर्णयन यात मूळच्याला विचारण्याची सोय नसते. त्या मुळे अनेक अर्थ प्रचारात राहू शकतात. त्यात अर्थनिर्णयाच्या फेऱ्या जास्त लागतात. जो वाद असतो तो मिटे पर्यंत म्हणजेच, दोन्ही वक्ते एक अर्थ मान्य करत असले तर, मूळच्या वक्त्याला असेच म्हणायचे होते काय? हा प्रश्न सोडून द्यावा नव्याने जन्मलेले अर्थक्षितीज स्वीकारावे असे एक मत आहे. माझ्या मते आधीचे म्हणणे मागे घेण्याची व ते नव्याने मांडण्याची सोय असली पाहिजे. एकदा बोललास तेच तुझे म्हणणे असा आग्रह धरू नये. तसेच अर्थ घेताना आपल्या युगाला, प्रसंगाला, नितीतत्वाना महत्व दिले पाहिजे. कारण मूळ म्हणणे काहीही असले तरी काहीतरी करयचे असते ते आत्ताच!

आत्ममैत्री: या साधनेचे जितके म्हणून फसवे प्रकार असू शकतात ते सर्व आहेत. एखाद्याचे भाषण कळत नाही पण अगदी छान वाटते! यात आपण काहीच शिकत नाही. एक कम्फर्ट झोन शोधतो इतकेच. स्व-ची स्व-शी मैत्री असे आपण म्हटले नाही कारण ती असतेच! आपल्याला पटणारा, आवडणारा, आदर वाटणारा, धन्य वाटणारा, ‘याहून काहीच नको असे वाटणारा जो गाभा आहे; त्याच्याशी, आख्या स्व(दुर्गुणांसह, लांच्छनांसह) ची मैत्री होणे असे येथे अभिप्रेत आहे स्व-च विरून जाणे असे नाही. गूढ सिद्धांतांचे आकलन होणे, आपण अमर होणे, आपण परिपूर्ण होणे, आपण शुध्द (कशापासून?) होणे, आपण दिव्य होणे या अशक्य आकांक्षा बाळगणे म्हणजे अध्यात्म असे शिकविले गेले आहे. माझ्या मते नित्यत्वमोह, पूर्णत्वमोह, शुद्धत्वमोह आणि दिव्यत्वमोह हे चार उदात्त-भासी मोह सोडले पाहिजेत. जेव्हा मर्त्यतेचा स्वीकार होतो तेव्हा मर्त्यतेचे ओझे उतरते. आदर्श हे कल्पना म्हणून परिपूर्ण असतात पण ते दिशादर्शक ध्रुव असून प्रत्यक्षात अपेक्षिण्याचे नसतात. शुद्धत्व जे ज्या पासून असते त्या गोष्टीला नाकारणारे असते.   शुद्धत्व हे तत्त्वतःच अ-स्वीकारवादी असते. आपल्याला स्वीकारशक्ती हवी आहे! दिव्य-कल्पना रम्य आणि आधार वाटण्यासाठी आवश्यक असतात पण याचा अर्थ असा नव्हे की त्या वास्तवातल्या वस्तू असतात. जास्तीत जास्त आत्म-मैत्री राखता येणे हे अनुदात्त वाटले तरी शक्य कोटीतले व म्हणून ध्यास्य आहे.

आपल्या व्यवहारात तशी नावे न देता, वरील साधनांचे अंश असतीलही, पण ते ‘साधना’ म्हणून ओळखले गेले, तर वरील व्यूहात आणून अधिक सुसंगत करून घेता येतील व ‘जाणतेपणाने केलेल्या साधना’ ठरतील.