Friday, September 25, 2015

मद्य! आसक्तीहूनही अवैधता भयंकर


प्रथम हे स्पष्ट केले पाहिजे की दारूच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची व ते टाळण्यासाठीच्या पथ्यांची वैद्यकीय माहिती मला आहे. त्यानुसार चोख आचरण राखणे सर्वांना शक्य नसते हेही माहित आहे. तसेच दारुडे, म्हणजेच जे विकृतीग्रस्त मद्यासक्त असतात, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची काय दैना होते हेही मी पाहिले आहे व आकडेवारीही वाचली आहे. त्यांना वाचविण्याची जितकी तळमळ दारूबंदीवाद्यांना असेल तितकीच मलाही आहे. मात्र या संकटाचे निवारण करण्याचा मार्ग, सरसकट दारूबंदी हा असू शकत नाही असे अनेक कारणांनी माझे मत आहे.

एकतर बऱ्याच मोठ्या संख्येने असणारे संयत मद्यपी, जे व्यावसायिक कौटुंबिक व नागरी कर्तव्ये जबाबदारीने पार पाडत आहेत त्यांनाही, इतर काही बेजबाबदार वागणाऱ्यांच्या  दोषापायी, मद्यापासून वंचित ठेवणे हे मला अन्यायकारक वाटते. वंचित ठेवणे असे म्हटल्याने, दारूपासून असे काय सुख आहे? असा प्रश्न मद्यसेवनाचा अनुभव नसणाऱ्या व दुष्परिणामांबाबत रास्त चिंता असणाऱ्या, सहृदय नागरिकांना पडणे स्वाभाविकच आहे.
हे सुख नेमके कोणते ते आपण डोळसपणे पहिले पाहिजे.

दारूबंदीवादी लोक अल्कोहोल हे उत्तेजक नसून खिन्नता आणणारे आहे असे म्हणतात. हे दिशाभूल करणारे आहे. मूलतः अल्कोहोल हे काहीसे मेंदूसक्रियता कमी करणारे द्रव्य आहे हे खरेच. पण त्याचा उत्साहवर्धक परिणाम कसा घडतो हे नीट समजावून घेतले पाहिजे.

गोष्ट अशी आहे की, सामान्यतः आपला मेंदू जास्त सक्रीय असताना, त्यात सहजभावनांचे दमन करणाऱ्या आणि सुप्तपणे कर्ष (स्ट्रेस) कोंडून ठेवणाऱ्या प्रक्रिया, सातत्याने व अजाणतेपणे चालू असतात. जसे आपण बाह्य मनाईला प्रोहिबिशन म्हणतो, तसेच आपल्याला इनहिबिशनला अंतर्मनाई किंवा नित्यसंकोच म्हणता येईल. मेंदूत चालणारे हे दमनाचे कार्य मनाचे स्थैर्य राखण्याकरिता व सामाजिकदृष्ट्या सुयोग्य वर्तन राखण्यासाठी उपयोगी पडते देखील. परंतु या छुप्या लादणूकीला विवेक-शक्ती म्हणणे हे अत्यंत अ-वैज्ञानिक आहे. तरीही आदरणीय डॉ. अभय बंग हे असे म्हणतात, हे एक आश्चर्यच आहे.

जागृतपणे मूल्यमापन करून त्यानुसार निर्धार राखणे वेगळे आणि सततच कोंडलेला कर्ष बाळगत रहाणे वेगळे असते. इतकेच नव्हे तर अशा संकोचांमुळे आपण मान्यताप्राप्त पण आत्मघातकी प्रथांतही अडकून रहात असतो.  
अल्कोहोल जेव्हा मेंदू-सक्रियता कमी करते तेव्हा आपले डायनॅमिक-ब्रेक हे रिलीज होऊ लागतात. त्यामुळे ओझे उतरल्याचे, तरलतेचे, निर्धास्तपणाचे ते विशिष्ट फिलिंग येते. जास्त मोकळेपणाने व सच्चेपणाने संवाद होतो. असा विश्राम मिळणे हे आरोग्यदायकच असते.  

मद्यासक्ती एक विवक्षित न्यूरॉसिस

संध्याकाळ आम्हाला खायला उठते म्हणून आम्ही प्यायला बसतो. असा नाईलाज न रहावा यासाठी, संध्याकाळ व्यतीत करण्याचा अर्थपूर्ण कार्यक्रम सापडणे, महत्त्वाचे असते. अल्कोहोलिक अनॉनिमस या संघटनेचे कार्य अर्थपूर्ण कार्यक्रम देऊन ती वेळ टळविणे याच युक्तीने चालते. तसेच नॉशियेटिंग(नकोसेपणा वाटणे), सबस्टिट्यूट रिलॅक्संट(पर्यायी विश्रामदायक) आणि लाँगटर्म(दूरगामी उपाय) औषधे वापरूनही सुटका करता येते. पण खरा प्रश्न हा दारू सोडण्याचा नसून पुन्हा न धरण्याचा असतो!

जी अस्वस्थता कृतीने तरी जाते वा नुसतीही निवळते ती नॉर्मल अस्वस्थता असते. परंतु अस्वस्थता ही नेहमी नॉर्मलच असेल असे नाही. प्रत्येक पिंडाचा मेंदूरासायनिक समतोल हा वेगवेगळा आणि कमीअधिक असतो. कोणतीही एरवी रास्त अशी भावना जर प्रमाणाबाहेर व अनावर (न्युरॉटिकली) उद्भवत असेल तर ती, जीवनातील किरकोळ निमित्त शोधून, पण मेंदूरासायनिक दुर्भाग्यानेही उद्भवत असू शकते.

आज मेंदूरासायनिक दुर्भाग्यावर रासायनिक साधनाने मात करण्याचे मानस-वैद्यक(सायकीयाट्री) सापडलेले आहे. चिंताक्रांतता, पुनरावृत्ती, क्षोभ, धसका असे काहीही जर उगाचच चालू रहात असेल तर न्युरॉसिसची शक्यता असते. विशेषतः रसग्लानी (डिप्रेशन, याला नैराश्य म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणणे अ-वैज्ञानिक आहे) हा न्युरॉसिस अत्यंत धोक्याचा आहे. जर विकार-ग्रस्ततेवर उपाय केला नाही तर माणूस अनेक आत्मघातकी व नंतर परघातकी गोष्टी करू शकतो. अशा अप-वर्तनाला हजार वाटा असतात. मद्यासक्ती ही त्यापैकी केवळ एक वाट आहे.

त्याहूनही महत्त्वाचे असे की ज्यांचा पिंड मद्यासक्ती-प्रवण नाही ती माणसे ठरवूनही दारुडे बनू शकत नाहीत! विकृतीचे प्राकृतिक आधार काढून न घेता केवळ सांस्कृतिक भडिमार करून उपयोग नसतो. मद्य आणि डिप्रेशन यांचे दुष्टचक्र बनते. किंबहुना जर न्युरॉसिसची जोड नसेल तर मद्यासक्तीच्या फासाचे वेटोळे हे नुसत्या मद्याने पूर्ण होऊच शकत नाही. कोणत्याही दुष्टचक्रात सुरुवात कशाने झाली याला महत्त्व नसून ते तोडण्याचा दुवा कोणता हेच महत्त्वाचे असते.

मानवी किंमत आसक्तीची व अवैधतेची

डायनॅमिक-ब्रेक रिलीज झाल्याने दुराचारच घडतो ही अंधश्रध्दा आहे. अल्कोहोल म्हणजे ज्याने जाणिवेचे स्वरूपच बदलते असे(एल.एस.डी.छाप) द्रव्य नाही. दुराचारी माणूस दारूमुळे जास्तच बिनधास्त होईल हा धोका खरा आहे. पण सदाचारी माणूस नुसत्या दारूने दुराचारी होत नसतो. तेवणारी ज्योत भडकण्याचा धोका असतो म्हणून ती विझवूनच टाकावी काय? भडकवणारा वारा अडवाल की तेलाचा पुरवठाच थांबवाल? जसे चेहेरा मोहक असू शकतो म्हणून बुरखा घालायला लावणे हे प्रतिगामी असते तसेच सरसकट दारूबंदीबाबतही म्हणता येईल. अतिप्रसंग नको म्हणून प्रसंगच टाळणे हे जीवनविरोधी असते. ज्याप्रमाणे काही सराईत दंगलखोराना उत्सवाचे वेळी प्रतिबंधक स्थानबध्दतेत टाकावे लागते त्याप्रमाणे निवडक लोकांना दारू न मिळू देणे हे समर्थनीय आहे. सरसकट दारूबंदी म्हणजे सर्वांवर सर्व दिवशी कर्फ्यू लादण्यासारखे ठरेल.

अपघात करणाऱ्या ड्रायव्हरांत, प्यायलेल्याची टक्केवारी समजा ७०% आढळली, तर त्यातून असा तर्क काढणे की एकूण मद्यसेवन करणाऱ्यांपैकी ७०% लोक अपघात करतात, हे साफ चुकीचे आहे. हेच स्त्रीवर अत्याचार करणाऱ्यांबाबतही म्हणता येईल. तरीही बंदीवादी लोक असे आकडे फेकत असतात.

खरेतर दारुड्यांचे पुनर्वसन करण्याची डी-अडिक्शन सुविधा उपलब्ध न करताच त्यांचे विस्थापन करणे हे आधी पुनर्वसन आणि मगच विस्थापन या तत्त्वाला सोडून होणार नाही काय? बंदीने सैरभैर झालेले दारुडे हे आपोआप जबाबदार व कार्यक्षम बनणार आहेत काय? जे संयत मद्यपी आज कर्तव्यदक्ष सदाचारी व कर्तृत्ववान आहेत ते आपापल्या मानसिक ऊर्जेची अर्थव्यवस्था निगुतीने सांभाळून आहेत. त्यांचे रास्त सुख हिरावून घेतल्याने जर ती अर्थव्यवस्था विचलित झाली व अरिष्टात सापडली तर काय काय विस्कटेल हेही सांगता येत नाही.

बेजबाबदारपणा आणि दुराचारापायी मानवी किंमत मोजावी लागत असते हे खरेच आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की ती किंमत रुपये आणे पै मध्ये मोजता येईल. आपण केलेल्या कामाने किती राष्ट्रीय उत्पन्न झाले हे सांगता येते पण आपण न केलेल्या कामाने ते किती बुडले हे कसे सांगणार? जर अमूक दारू पीत नसता तर त्याने किती अधिक योगदान केले असते व ते इतक्या इतक्या रुपयांचे ठरले असते असे गणित करताच येत नाही. सर्वच सुखांचेच नव्हे तर दुःखांचेदेखील रुपयात गणित करणे ही तद्दन भांडवली विचारसरणी, सरकारी समाजवाद मानणारे कसे काय मानू शकतात?

दारू न पिणाऱ्या पण अत्यंत कटकट्या माणसानी इतरांना दिलेला मानसिक त्रास हा किती रुपयाचा धरणार? दारूबंदीच्या बाजूने किंवा विरोधात आर्थिक युक्तीवाद मांडणे हेच असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. फक्त दारू ही एक गोष्ट काढून घेतली तर बेजबाबदारपणा आणि दुराचार या गोष्टी नष्ट होणार आहेत काय?

जेव्हा आपण एखादे दुरित अवैधाच्या प्रांतात ढकलून देतो तेव्हा त्याचे निवारण तर होत नाहीच पण सगळाच व्यवहार दोन नंबरचा झाल्याने ते दुरित आणखीच तीव्र होते. कोणतीही बंदी म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला आमंत्रण असते. मुख्य म्हणजे, 'लोकांना त्यांचे हित कळत नाही ते आम्हालाच कळते म्हणून आम्ही ते त्यांच्यावर लादणार ही हुकुमशाही लादेनवृत्तीच असते. नैतिक कोतवालगिरी करणाऱ्या डुढ्ढाचार्यामुळे मानवी स्वभावाला झेपतील असे सौम्यीकरणाचे उपाय हे अपवित्र मानले जाऊन दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो.


जी आयातुल्ला खोमेनीलाही जमली नाही ती दारूबंदी, आपल्या सरकारला जमेल असे वादापुरते गृहीत धरले तरी कर्ष-कोंडी वा न्युरॉसिस या मूळ कारणांना हातच घातला गेलेला नसेल.                     

10 comments:

 1. डा. अभय बंग यांचे दारू बंदी विषयीचे विचार लॉजिक प्रेरित नसून आयडीयोलॉजी ग्रस्त आहेत. माझे कामा निमित्त गोव्याला अनेकदा जाणे होते. गोव्यात दारू मुबलक, सहज, आणी स्वस्त उपलब्ध आहे. तरीही गोव्यात दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेला माणूस क्वचितच आढळतो. पुण्यात हे नित्याचेच आहे. मी एकदा माझ्या ड्रायवरला हे बोलून दाखविले. तो म्हणाला गोव्यात अती दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेला माणूस सापडला तर तो बहुतेक टूरिस्टसणार. आम्हा गोयंकरांना दारू कशी, केव्हां, व किती प्यावी याची समज असते. अमेरिकेत आणी रशियात दोन्ही कडे दारू सहज उपलब्ध होती. पण रशियात जसा वोडकाचा अतिरेक झाला तसा अमेरिकेत झाला नाही. माणसे दारूडे होतील का दारूचा सयंम पाळून वापर करतील हे त्यांना आयुष्यात काही उद्दिष्ट आहे, का आयुष्य दिशाहीन झालेले आहे, या वर अवलंबून आहे.
  Chetan Pandit

  ReplyDelete
 2. Vyasan waait goshtnche waaitch tyala kuthlahi tarkik aadhar dene waaitch jase subuddhi changli durbuddhi waait he amchya purwajjani lihun thewale aahe tyamule waait goshtila kitihi sugandhi drawyanne chopadle tarihi tyala durgandhch yenar tyamule communism jya pramane shikawani gheunach mansala kahi goshti shikawalya jatat tyapramane aaplya deshat asshya kahi goshti lahanpanich manawar bimbawalya jawyat arthat manawachya kahi hajar warshachya itihaasat Jamie nahi te hone ashakya asle tari kamitkami waait goshtinche samarthan karne waaitch ewaddhe kele tari pure

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. Very nicely written. Prohibition has not worked in Iran, USA or another country Indian states.

  ReplyDelete
 7. Very nicely written. Prohibition has not worked in Iran, USA or another country Indian states.

  ReplyDelete
 8. Few days back, Prohibition was imposed in Bihar too. Hope that this will also fail like US Prohibition imposed long back. Now in US, Marijuana is completely legal in more than half(25) states. Efforts of noted celebrities like Carl Sagan & Bill Maher caused this to happen.

  ReplyDelete
 9. Few days back, Prohibition was imposed in Bihar too. Hope that this will also fail like US Prohibition imposed long back. Now in US, Marijuana is completely legal in more than half(25) states. Efforts of noted celebrities like Carl Sagan & Bill Maher caused this to happen.

  ReplyDelete