Friday, June 12, 2015

जागतिकीकरणाचे अर्थशास्त्रीय समर्थन -भाग १

[गेल्यावेळी राजीव दीक्षित यांच्या विचित्र विश्वाची ओळख करून दिली. त्यांचे आचरट दावे जरी बाजूला ठेवले तरी गंभीरपणेदेखील जागतिकीकरणा पासूनच्या धोक्यांमुळे अनेक नागरिक चिंतित असतात. साम्राज्यशाहीतील शोषण आणि आज बदलेल्या आर्थिक वास्तवामुळे भारताला मिळणारी संधी (जी चीन व्हिएतनाम इत्यादिनी पुरेपूर घेतली) यात फरक करणे सर्वांना जमत नाही. त्यात डावे व भगवे स्वदेशीवादी अर्थशास्त्रीय अज्ञानाचा फायदा घेऊन बरेच गैरसमज पसरवीत असतात. असे नमुनेदार गैरसमज एकेक करून दूर करणारे एक प्रकरण मी युगांतर या पुस्तकात घेतले होते. सध्या ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट असल्याने त्यातील ते प्रकरण पुढे देत आहे.]

(तांत्रिक कारणामुळे ह्या लेखाचे तीन भाग केले आहेत.) 
  
                  भाग १  

वर वर पाहता, सोप्या आणि सुटसुटीत, चटकन खर्या वाटणार्या अशा अनेक गैरसमजुती जनमानसात पसरलेल्या आहेत. हितसंबंधांमुळे आणि/ किंवा मताग्रहांमुळे काही लोक मुद्दाम अपप्रचार करीत आहेत. त्याच वेळी आपली एकंदरीतआर्थिकसाक्षरताबेतास बात असल्याने या समजुती मनात घर करून राहत आहेत. ज्या अगदीच हास्यास्पद समजुती आहेत त्या आपण सोडून देऊ. पण अगदी उच्चशिक्षित लोक सुद्धा जिथे चकव्यात सापडतात, अशा काहे नमुनेदार गैरसमजुतीच विचारात घेऊ.

1. ‘भारताचा पैसा भारताबाहेर जाणे हीच लूट होय

मुळात पैसा हे फक्त माध्यम आहे. पैसा म्हणजे संपत्ती नव्हे. पैसा हा वापरला तरच वसूल होतो. समजारुपयेया चलनातच पैसा बाहेर गेला. अशा वेळी हे रुपये भारतातून काही ना काही खरेदी केली तरच वसूल होतील. म्हणजेच कोणातरी भारतीयाला निर्यातीची संधी मिळेल त्या मालाच्या बदल्यात हे रुपये परत भारतात येतील. यावर अशी शंका घेता येईल, की रुपये बाहेर नेणार्याने नेतानाच ते डॉलर, येन, मार्क किंवा अन्य चलनात रूपांतरित करून नेले तर काय? यासाठी आपण उदाहरणार्थ डॉलररूपात पैसा बाहेर नेण्याचे उदाहरण घेऊ.

पैसा (डॉलर/रुपायात) बाहेर कोण नेईल? जो कोणी भारताकडे आयात (जी अमेरिकेकडून निर्यात आहे) करेल तो डॉलर बाहेर पाठवेल. मग ही आयात वस्तू/सेवा किंवा भांडवल/श्रम यांपैकी कशाचीही असो. आता या आयातदाराला आयात केलेली संपत्ती भारतात विकावी लागेल. तिचे ग्राहक (उपभोक्ता असेल किंवा उत्पादन साधन आयात झाले असल्यास ते वापरणारा उद्योजक असेल. म्हणूनच आकृतीत ग्राहक म्हणता उपयोजक(युजर) म्हटले आहे) या वस्तूची किंमत रुपयांत देतील. अशा तर्हेने भारतातील आयातदार हा डॉलर खर्च करतो, पण रुपये कमावतो. म्हणूनच त्याला त्याच्या रुपयांचे डॉलर करून हवे असतात.
या उलट भारताकडून अमेरिकेकडे निर्यात करणारा निर्यातक, अमेरिकेतील आयात उपयोजकांकडून डॉलर्स कमावतो. येथे उदाहरण जरी अमेरिकेचे घेतले असले तरी युरो, येन इ. चलनांच्या बाबतीत त्या त्या देशाला हेच लागू आहे. 

पण भारतातील निर्यात मालाचे जे उत्पादक आहेत त्यांना मात्र त्याला रुपयेच द्यावे लागतात. कारण निर्यात उत्पादकांना आपली वेतने, नफे, कर, इत्यादी गोष्टी रुपयांत द्याव्या लागत असतात. अशा तऱ्हेने भारतीय निर्यातकाकडे डॉलर जमा होतात पण रुपये खर्च होतात. म्हणून भारतीय निर्यातकाला डॉलरचे रुपये करून हवे असतात.

साहजिक आयातदार आणि निर्यातदार एकमेकांशी चलनाचा विनिमय करतात. डॉलर बाहेर पाठवणारा आयातदार हा तेव्हाच डॉलर बाहेर पाठवू शकतो, जेव्हा मुळात तेवढे डॉलर्स कोणातरी निर्यातदराने कमावलेले असतील. ही प्रक्रिया रिजर्व्ह बँकेद्वारे पार पडली, तरीही मूलत: ती आयातक-निर्यातक यांच्यात होणारा चलनविनिमय अशीच असते.

भारतातले निर्यात उत्पादक निर्यातीइतके रुपये आपल्या घटकांना (श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, उद्योजकाला नफा) देतात. हे घटक कोठेतरी ग्राहक असतातच. या मार्गाने हे रुपये आयातीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतात. तसेच उलटपक्षी अमेरिकेतल्या निर्यात उत्पादकाने केलेला उत्पादन खर्च अमेरिकेतील ग्राहकांना उत्पन्न म्हणून पोहोचतो त्यांची आयात खरेदी करण्याची क्रयशक्ती निर्माण होते.
अशा तर्हेने एकीकडे रुपयाचे चक्र फिरत राहते दुसरीकडे डॉलरचे चक्र फिरत राहते. ही दोन्ही चक्रे पूर्ण होत असतील तर भारताचापैसाभारताबाहेर जाऊच शकत नाही. तो भारतातच फिरत राहतो.
(पैशांच्या प्रवाहाच्या बरोबर उलट दिशेने वस्तू/सेवा यांचा प्रवाह वाहतो. किंवा श्रम, उत्पादन साधने इत्यादी घटकांचा प्रवाह वाहतो.)

अमेरिकन ग्राहक-उत्पादक भारतीय ग्राहक-उत्पादक यांचा एकमेकांशी वस्तुविनिमयच होतो. वस्तुविनिमय होण्यासाठीचे माध्यम म्हणून आयातदार निर्यातदार यांचा एकमेकांशी चलनविनिमय होतो.

दोन्ही चक्रे नीट पूर्ण होत असतील, तर पैसा बाहेरही जात नाही आतही येत नाही. आतला आत फिरतो. बाहेरचा बाहेर फिरतो. जेव्हा भारताकडे होणारी आयात (रुपयात मोजलेली असो वा डॉलरात मोजलेली असो) भारताकडून होणार्या निर्यातीइतकीच असते, तेव्हा व्यापार समतोल साधला जातो. परंतु आता अशी शक्यता लक्षात घेऊ, की ज्यात व्यापारसमतोल ढळलेला आहे.

भारताचे वर्षानुवर्षे असेच रेकॉर्ड आहे की नेहमीच आयात जास्त होते निर्यात कमी होते. व्यापारी तूट येते. पण चक्रे पूर्ण व्हावीच लागतात. यासाठी, ही तूट भरून काढण्यासाठी, परकीय कर्जे घेतली जातात. हे कर्ज सातत्याने वाढतच गेलेले आहे. म्हणजेच आपण जेवढा पैसा खरोखर इतर जगाकडूनकमावतोत्यापेक्षा जास्त पैसामिळवतो’ (वुई गेट मोअर दॅन व्हॉट वुई अर्न) म्हणजेच आपले खरे दु:भारताचा पैसा भारताबाहेर जातोहे नसूनभारताचा नसलेला पैसा भारतात येतोहे आहे! 

यात भारताचा आणखीही एक फायदा असतो. तो असा की प्रगत देशातील व्याजदर पडलेले असल्याने परकीय कर्ज हे भारतीयाला स्वस्तातच पडते. म्हणजे वस्तुरुपात आयतही जास्त करायची आणि फेड करताना मात्र त्यांच्या पडेल व्याजदरांचा फायदा घ्यायचा हा एक दुटप्पीपणा आहे. व असे पाहता आपणच प्रगत  देशांना लुटत आहोत! दुसरे असे की स्वदेशीवादी असाही प्रचार करतात की हे कर्ज ‘देशाला’ आहे व प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर तो बोजा आहे. प्रत्यक्षात फक्त आयातदारच परदेशी बँकांचे देणे लागत असतात.

म्हणजेच आपण जितक्या एकूण किमतीच्या वस्तू पाठवतो त्यापेक्षा जास्त एकूण किमतीच्या आणतो. जर किमती योग्य मानल्या, तर कोण कोणाची लूट करते आहे? जर भारताची लूट होते असे सिद्ध करायचे असेल तर आपल्याला असे सिद्ध करावे लागेल, की आपल्या निर्यातीलाखर्या मूल्यापेक्षा कमी किंमत मिळते आयातीलाखर्या मूल्यापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. हेखरे मूल्यवाले प्रतिपादन प्रत्यक्ष किमती-पैसा या गोष्टींच्या पलीकडे जाणारे आहे. ते प्रतिपादन वेगळ्या रीतीने सिद्ध/असिद्ध करावे लागेल. पैसा प्रत्यक्ष किमती यांच्या भाषेत बोलायचे तर मात्रभारताचा पैसा भारताबाहेर जातो हीच लूटहे प्रतिपादन पूर्णपणे खोटे ठरते.

2.‘चलनांच्या विनिमय दरात रुपया लहान डॉलर मोठा असल्याने लूट होते.’

प्रथम यातला अगदीच बाळबोध असा गैरसमज बाजूला काढूया. नाणे हे पैसा मोजण्याचे एकक आहे. एकक लहानसे घ्यायचे रकमांचे आकडे मोठे लिहायचे, की एकक मोठे वापरून आकडे लहान मांडायचे हा प्रश्न केवळ सांकेतिक आहे. सेंटिग्रेड पेक्षा फॅरनहाइट छोटा असल्याने आपल्याला ताप आलेला नसतानाताप आलाअसे होत नाही. एखादे अंतर किलोमीटर ऐवजी मैलात मोजल्याने आपण लवकर पोहोचत नाही. तसे पाहिले तर, येन हे जपानी एकक इतके लहानगे आहे की ते रुपयापेक्षाही कमी भरते पण म्हणून जपानी लोक भारतीयांपेक्षा गरीब ठरत नाहीत. त्यामुळे एकक लहान की मोठे, हा प्रश्न नसून कोणत्याही एका एककात रूपांतरित करून घेऊन, उत्पन्ने जास्त होतात की कमी होतात हा महत्त्वाचा प्रश्न असतो.

आता याहून जरा वरच्याइयत्तेतलाप्रश्न उपस्थित करूया. विनिमयदर किती, यापेक्षा तो घसरत जातो की वधारत जातो, हे महत्त्वाचे असे मानू. रुपया हा डॉलरच्या तुलनेत घसरत गेलेला आहे हे खरे आहे. हे देशाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे आहे? आपली निर्यात ही आपल्या आयातीपेक्षा कमी पडते त्यामुळे परकीय कर्ज चढत जाते. साहजिकच निर्यातीला प्रोत्साहन आणि आयातीला निरुत्साहन देणे आपल्या हिताचे आहे. रुपयाचे धीम्या गतीने अवमूल्यन होण्याने नेमके हेच उद्दिष्ट साधले जाते. आयातदारांना तेवढ्याच डॉलरच्या वस्तू आणण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात. त्यामुळे आयात टाळण्याकडे कल होतो

याउलट निर्यातदारांना तेवढेच रुपये उत्पादनखर्च करून कमी डॉलरला वस्तू विकता येतात त्यामुळे त्यांना जास्त ग्राहक मिळतात (किंवा जास्त किमती तरी मिळतात) यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळते. अवमूल्यनाने परकीय कर्जाचा बोजा जास्त ठरतो हे खरे आहे, पण आपल्याला परकीय कर्ज काढण्याची वृत्ती रोखायचीच आहे. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन हा शब्द जरीदेशाचेच काही तरी कमी होतेअसा वाटला तरी खरे पाहता अवमूल्यन हे जास्त स्वदेशीवादी आहे. कारण अवमूल्यन हे आयातखोरीवर पायबंद घालते.

बडी राष्ट्रे, विश्वबँक, नाणेनिधी वगैरे खलपात्रे आपल्याला अवमूल्यन करायला भाग पाडतात, अशीही एक समजूत आहे. खरे तर रुपयाचे अवमूल्यन आपण मुळात देशांतर्गतच करतो. कारण आपण बेसुमार तुटीचे अर्थकारण करून चलनातिरेक-भाववाढ (इनफ्लेशन) करतो म्हणजेच रुपया अंतर्गतरित्या स्वस्त करतो. साहजिकच निर्यात उत्पादकांचा उत्पादन खर्च या भाववाढीमुळे वाढतो. त्यात (श्रम स्वस्त असूनही) कार्यक्षमता-उत्पादकता कमी असण्याची भर पडते. निर्यात स्पर्धायोग्य राहत नाही. आपले चीनसारखे स्पर्धक चलनातिरेक-भाववाढ टाळतात उत्पादकता वाढवतात. आता आपल्या निर्यातकाला संरक्षण देण्यासाठी आपल्याला अवमूल्यन करून (होऊ देऊन) त्याचा माल स्पर्धायोग्य बनवावा लागतो. म्हणजेच आपल्या देशात उत्पादकतेपेक्षा चलनातिरेक जास्त आहे याची फक्त कबुली देण्याचाच प्रश्न असतो

तसेच आपल्या देशात चलनातिरेक झाल्याने, जर रुपयाचा डॉलर मधील भाव धरून ठेवला तर, आयातदारांचे नफे अवाजवीपणे वाढतील. कारण भरपूर रुपये कमवूनही त्यांना कमी डॉलर द्यावे लागतील. त्यामुळे महागडी आयात करणारी आयातखोरी वाढेल. रुपयाचे अवमूल्यन करण्याने यालाही पायबंद बसतो.

सारांश, अवमूल्यन करणे हे हिताचेही असू शकते ते करावे लागणे हे आंतरराष्ट्रीय दबावामुळे नसून आपल्याच अंतर्गत भाववाढीमुळे उत्पादकता वाढल्यामुळे होत असते. आपण जर अंतर्गत भाववाढ रोखू शकलो, तरआपल्याला अवमूल्यन करतादेखील स्पर्धायोग्य निर्यात करता येईल त्यामुळे मुळातच असलेले कर्ज आणखी फुगत जाणार नाही.

३. विनिमय दर आणि क्रयशक्तीची समतुल्यता

काहीजण असे समजतात, की चलनाचा विनिमय दर हे देशांच्या समृद्धीचे/दारिद्य्राचे द्योतक आहे. हे अजिबात खरे नाही. एका डॉलरला उदा. साठ रुपये पडतात याचा अर्थ सरासरी अमेरीकन हा सरासरी भारतीयाच्या साठपट श्रीमंत असतो असा नव्हे. कारण ज्या कामाला इथे १०० रु. मिळतात त्याच कामाला अमेरिकेत १०० डॉलर मिळत असतील असे नाही. याहीपेक्षा महत्त्वाचे असे, की भारतात रुपयांना जितपत वस्तू/सेवा मिळतात त्याच्या साठपट वस्तू/सेवा एक डॉलर देऊन अमेरिकेत मिळत नाहीत. भारतीयाने एक डॉलर मिळवला, तर तो भारतात राहून साठ रुपयांच्या वस्तू/सेवा खरेदी करू शकेल. पण अमेरिकनाने साठ रुपये मिळवले त्याचा डॉलर घेऊन तो अमेरिकेत गेला तर तेथे त्याला, भारतात ६० रुपयांत जेवढ्या वस्तू, सेवा मिळाल्या असत्या, तेवढ्या मिळत नाहीत. तर फक्त १३ रुपयांत भारतात जेवढ्या वस्तू/सेवा मिळाल्या असत्या तेवढ्याच मिळतात. अशा तुलनेला क्रयशक्ती समतुल्यता (परचेसिंग पॉवर पॅरिटी-PPP) म्हणतात

विनिमय दर :६० असला, तरी क्रयशक्ती समतुल्यता दर हा :१३ आहे. १९९५ साली जेव्हा भारताचे दरडोई उत्पन्न वर्षाला फक्त ३४० डॉलर (विनिमय दराने पाहता) होते त्याच वर्षी भारताचे दरडोई उत्पन्न क्रयशक्ती समतुल्यतेने पाहता १४०० डॉलर होते. आज जपान्यांचे येनमधील उत्पन्न इतके प्रचंड आहे, की रुपया:येन विनिमय दराने पाहता सरासरी जपानी हा सरासरी भारतीयाच्या १०० पट श्रीमंत ठरला असता. पण प्रत्यक्ष राहणीमानात म्हणजेच क्रयशक्ती समतुल्यतेने पाहता तो फक्त १५ पटच श्रीमंत आहे. १०० पट नव्हे. यावरून हेच दिसते, की चलनविनिमय दर हे राहणीमानाचे द्योतक नव्हे. जर स्वदेशीवादी समजतात त्याप्रमाणे आंतराष्ट्रीय व्यापार आपल्याला हानीकारकच असता, तर आपली समतुल्यतादेखील चलनविनिमय दराच्या वेगाने घसरली असती. पण ती तशी घसरली नाही. अशा तर्हेने चलनविनिमय दर हे लुटीचे द्योतक आहे किंवा लुटीचे कारण आहे हे प्रतिपादन खोटे ठरते.              .......भाग २ पहा

1 comment:

  1. "जो कुणी भारता कड़े आयत करील तोच डॉलर बाहेर पाठविल " हे विधान पटत नाही. हेज फण्ड, म्यूच्यूअल फण्ड, venture capitalist ही मंडळी कुठे आयात करतात?
    बाकी सर्व मुद्द्यांशी सहमत...!

    ReplyDelete