१) दोरावरून तोल राखत चालणे ही कसरत उत्तम करू शकणाऱ्या
कलाकाराला जर, ताठ आणि सरळ रेषेत असलेला दोर (किंवा तेवढ्या जाडीचा लांबीचा
पृष्ठभाग) जमिनीलगतच उपलब्ध करून दिला तर तो/ती पाऊल एकदाही इतरत्र न पडू देता पूर्ण
लांबी चालू शकेल काय? (पडण्याचा धोका तर नाहीच!) का?
उत्तर: ‘टाइट रोप वॉकिंग’ हे नाव दिशाभूल करणारे आहे. दोराला थोडा झोळ दिलेला असतो. कलाकाराचे वजन
पडतातच एक थोड्याशाच उंचीचा लांबलचक उलटा त्रिकोण तयार होतो. (उदाहरणार्थ कलाकार
लांबीच्या मधोमध असताना हा त्रिकोण समद्विभुज असेल.). त्याच्या दोन्ही बाजू टाईट
होतात.
परंतु हे दृश्य आता टोकाकडून (एंड व्ह्यू) पाहू. कलाकार पाठमोरा
दिसेल. दोन्हीकडच्या आधारबिंदूंपेक्षा खाली त्याची पाउले (त्रिकोणाच्या उंचीइतकी)
रुतलेली असतील. चालण्याच्या दिशेशी काटकोनात हा छोटासा झोका आडवा हलवण्याचे
स्वातंत्र्य कलाकाराला असते व तो ते भरपूर वापरतही असतो त्याचे जुळलेले पाय तो
खालच्याखाली हलवत असतो. यातूनच त्याला जाणार असलेला तोल परत परत सावरण्याची
मुभा त्याला मिळते.
जमीनीलगत सरळसोट पृष्ठ दिले तर हा आडव्यादिशेने झुलवण्याचा
झुला गायब होतो आणि ढळता तोल परत आणण्यासाठी हालचालच उरत नाही त्यामुळे जी करामत
तो उंचावर करतो तीच तो जमीनीलगत करू शकत नाही.
लूज-रोप-लॅटरल-मुव्हमेंट-वॉकिंग हे ‘टाइट रोप वॉकिंग’चे उचित नामकरण ठरेल.
२) थंडीत वाहक पदार्थ धातूच्या वस्तू हाताला गार लागतात.
अवाहक पदार्थ गार लागत नाहीत. परंतु तापमापक लावून पाहिले असता दोन्ही पदार्थ एकाच
तापमानावर आढळतात. ही विसंगती का यावी?
उत्तर: आपण स्वतः
उष्णतेचा स्रोत असतो. आपला स्पर्श होताच जेवढे पृष्ठ बोटाला टेकलेले आहे ते आपण
तापवू लागतो. वाहक पदार्थ आपली उष्णता त्यांच्यात सर्वत्र वितरीत करीत असल्याने
वाहक पदार्थाच्या पृष्ठाला आपल्या शरीराइतक्या तापमानावर आणणे हे फारच वेळखाऊ (आणि
वाहक प्रदार्थाच्या वस्तुमानावर अवलंबून असते) यामुळे बोट लावल्यावर बराच काळ वाहक
पदार्थ आपल्या शरीरापेक्षा थंडच राहतो व म्हणूनच थंड ‘लागतो’.
अवाहक पदार्थ आपली उष्णता त्याच्या इतर भागात पसरवू शकत नाही.
आपल्या बोटाला टेकलेले छोटेसे पृष्ठ लगोलग तापते व आपल्या शरीराइतके तापमान धारण
करते. म्हणूनच अवाहक पदार्थ गार ‘लागत’ नाहीत व वाहक गार
‘लागतात.’
तापमापक हा स्वतः उष्णतेचा स्रोत नसतो. त्यामुळे तापवणे ही
भानगड उद्भवतच नाही. जी खोली बराच काळ थंड असते तेथील सर्व वस्तू कमी-अधिक वेगाने
का होईना पण त्या कमी तापमानाला पोहोचलेल्या असतात व तापमापक ‘इमानदारीत’ त्यांचे तापमान दाखवतो
३) पूर आलेल्या नदीकडे पुलावर उभे राहून पाहिले असता कधी
नदी हलतेय व पूल स्थिर आहे असे भासते तर कधी नदी स्थिर आहे आणि पूलच हलतोय असे भासते.
विशेष म्हणजे या पैकी कसे बघायचे हे आपण स्वेच्छेने निवडू शकतो. ही शक्ती आपल्याला
कशी प्राप्त होते?
उत्तर: संवेदनांचा इनपुट मिळणे आणि त्यापासून अनुभव गठीत
करणे यात बराच फरक पडतो. अनुभव जसाच्या तसा ‘बाहेरून आत’ येत नसतो! आपल्या
आकलनशक्तीत निहित असलेल्या कोटी वापरूनच आपण अनुभव बनवत असतो. एखाद्या
गोष्टीकडे आपण काय म्हणून किंवा तिला काय मानून पहातो यावर ती कशी दिसेल हे
अवलंबून असते. उदा आकृती म्हणून जे लंबवर्तुळ दिसत असेल ते, त्याच प्रतलातले
लंबवर्तूळ म्हणून पहायचे की तिरक्या दिशेने पाहिलेले वर्तूळ म्हणून पहायचे, हे
आपल्या ‘हातात’ असते. उदाहरणार्थ एका आड एक त्रिज्या जोडलेला षटकोन, तीन चिकटलेले
ऱ्हॉम्बस, क्यूबचा आयसोमेट्रिक व्ह्यू आणि पोकळ क्युबचा (रिलीफ) आयसोमेट्रिक
व्ह्यू या चारही गोष्टी एकाच आकृतीने दाखवता येतात
तसेच उदाहरणार्थ ‘तू है मेरा प्रेमदेवता’ हे गाणे ललत म्हणूनही ऐकता येते व तोडी म्हणूनही.
४) फिरत असलेले मळसूत्र म्हणजेच आटे पाडलेला दंडगोल (अनेक
आटे नसून एकच आटा त्याच्या अनेक प्रावस्था/फेजेस दाखवत असतो) त्याच्या
कण्याच्या/अक्शियल दिशेने सरकताना दिसतो. हे सत्य असते की आभास? व का?
उत्तर: आटे पाडलेला फिरता दंडगोल अक्षीय दिशेने सरकताना
दिसतो हे जर फक्त दिसण्यापुरतेच असते तर त्याला दृष्टीभ्रम म्हणायचे काय हा प्रश्न
योग्य होता. परंतु ही अक्षीय गती फक्त दिसत नसून रेटाही देत असते. गिटारच्या
खुंट्या बरेच वेढे फिरवल्यावर थोडासाच ताण बदलतात त्यांची रचना पहाल तर फिरते
मळसूत्र हे छोटेसे चाक ढकलून फिरवतसुध्दा असते असे आढळेल. मळसूत्र फिरताना त्यातील
रेणू जरी वर्तुळाकारच फिरत राहिले तरी त्याचे पृष्ठ (नवनवीन रेणूनी जाग घेतल्याने)
खरोखरच सरकत असते. पाणबुडीला प्रोपेलर म्हणूनही मळसूत्र वापरले गेलेले आहे. पंखा
गोल फिरतो पण वारा मात्र अक्षीय दिशेनेच येतो हेही आपण अनुभवतो. त्यामुळे आटे पुढे
पुढे सरकतात हा दृष्टीभ्रम नसून ती वस्तूस्थितीच असते.
५) नजरानजर होताना दोन्ही व्यक्तींनी एकाच वेळेला
एकमेकीच्या कडे पहावे लागते. फोटोतील व्यक्ती जर कॅमेऱ्याकडे पहात असेल तर
कोणत्याही कोनातून फोटो पाहिला तरी ती व्यकी आपल्याकडेच पाहतेय असे दिसते. इतकेच
नव्हे तर मूळ व्यक्तीने कॅमेऱ्याकडे कोणत्याही कोनातून पाहिलेले असले तरीही चालते.
असे का व्हावे?
माणूस उत्क्रांत होतानाच त्याला इतर व्यक्तींचे चेहरे वाचता
येणे हा जीवनमरणाचा प्रश्न होता व आजही तो प्रश्न मोलाचाच आहे. यामुळे व्यक्तीच्या
नाकानुसार तिच्या चेहेऱ्याची दिशा आणि बुबुळे डोळ्यांच्या कोणत्या भागात आहेत
यावरून त्या व्यक्तीची बघण्याची दिशा यातला फरक आपण अचूक ओळखू शकत असतो. कोण
कोणाकडे पाहते आहे हे कळतेच. कॅमेरा हा आपले प्रतिनिधीत्व करत असतो म्हणजे आपला
चेहेरा जर तिथे असता तर आपल्याला काय दिसले असते हे तो ‘प्रामाणिकपणे’ व अचूक पुनर्निर्मित
करतो. फोटो हा बुबुळांच्या डोळ्यातील स्थानाचे स्थिर चित्रण समोर ठेवतो. कोणतेही
चित्र आपण किती कोनातून पहात आहोत याचे करेक्शन करून घेणे हेही अगदी सवयीचे असते.
हे सर्व घटक आपला मेंदू अचूक गणित करूनच स्वीकारतो म्हणूनच प्रश्नात विचारलेला
चमत्कार शक्य होतो.
डोळ्यात दिसणारे बुबुळाचे सापेक्ष स्थान किती महत्त्वाचे
आहे हे स्पष्ट करण्यासाठी दोन उदाहरणे घेत आहे. स्पर्श या सिनेमात नसीरउद्दिन कधीच
डोळे मिचकवत नाही किंवा धृतराष्ट्रासारखे छताकडे लावून धरत नाही. तो डोळे उघडे आणि
सरळ ठेवतो पण तो नेहमीच ‘कुठेच नाही अशा दिशेने’ बघतो व आंधळा आहे हे निर्विवाद प्रस्थापित करतो. त्याने अपारदर्शक कॉंटॅक्ट लेन्स
लावून हे साधले की त्याच्या जबरदस्त अभिनय कौशल्याने तो बरोब्बर शून्यात बघू शकला?
हे त्यालाच विचारावे लागेल.
व्यंगाचा उल्लेख केल्याबद्दल क्षमा मागून आणखी एक उदाहरण
देतो. तिरळी व्यक्ती नेमकी कुठे पहाते आहे या बाबत आपला गोंधळ होतो. यावरूनही
डोळ्यात दिसणारे बुबुळाचे सापेक्ष स्थान ही गोष्ट आपण नजर ‘वाचण्या’साठी किती खोलवर
आत्मसात केलेली आहे हे सहजच ध्यानात येईल.
No comments:
Post a Comment