Friday, June 12, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - ५


१) दोरावरून तोल राखत चालणे ही कसरत उत्तम करू शकणाऱ्या कलाकाराला जर, ताठ आणि सरळ रेषेत असलेला दोर (किंवा तेवढ्या जाडीचा लांबीचा पृष्ठभाग) जमिनीलगतच उपलब्ध करून दिला तर तो/ती पाऊल एकदाही इतरत्र न पडू देता पूर्ण लांबी चालू शकेल काय? (पडण्याचा धोका तर नाहीच!) का?

२) थंडीत वाहक पदार्थ धातूच्या वस्तू हाताला गार लागतात. अवाहक पदार्थ गार लागत नाहीत. परंतु तापमापक लावून पाहिले असता दोन्ही पदार्थ एकाच तापमानावर आढळतात. ही विसंगती का यावी?

३) पूर आलेल्या नदीकडे पुलावर उभे राहून पाहिले असता कधी नदी हलतेय व पूल स्थिर आहे असे भासते तर कधी नदी स्थिर आहे आणि पूलच हलतोय असे भासते. विशेष म्हणजे या पैकी कसे बघायचे हे आपण स्वेच्छेने निवडू शकतो. ही शक्ती आपल्याला कशी प्राप्त होते?

४) फिरत असलेले मळसूत्र म्हणजेच आटे पाडलेला दंडगोल(अनेक आटे नसून एकच आटा त्याच्या अनेक प्रावस्था/फेजेस दाखवत असतो) त्याच्या कण्याच्या/अक्शियल दिशेने सरकताना दिसतो. हे सत्य असते की आभास? व का?

५) नजरानजर होताना दोन्ही व्यक्तींनी एकाच वेळेला एकमेकीच्या कडे पहावे लागते. फोटोतील व्यक्ती जर कॅमेऱ्याकडे पहात असेल तर कोणत्याही कोनातून फोटो पाहिला तरी ती व्यक्ती आपल्याकडेच पाहतेय असे दिसते. इतकेच नव्हे तर मूळ व्यक्तीने कॅमेऱ्याकडे कोणत्याही कोनातून पाहिलेले असले तरीही चालते. असे का व्हावे?





No comments:

Post a Comment