Friday, August 14, 2015

‘जी.एम.’ बियाणे: मिथक आणि वास्तव

भारतीय कृषिविद्यापीठांतील वैज्ञानिकांनी प्रोटीन व ए-विटामिनयुक्त तांदूळ   (बालकांतील अंधत्वाचे महत्वाचे कारण ए-विटामिनची डेफिशियन्सी हे आहे.) लोहयुक्त केळी, तांबेरा रोग प्रतिबंधक सोयाबीन आणि अशी अनेक उत्तम बियाणे बनविली आहेत. बियाणे बनवणाऱ्या कंपन्या भारतीयच आहेत. जनुकाची रॉयल्टी हा घटक बियाणाच्या किमतीत खूप लहान असतो व ती रॉयल्टीदेखील बऱ्याच अंशी भारतीयांनाच जाणार आहे.

भारतातील सर्व कापूस हा बोंडअळी प्रतिबंधक जनुकीय बियाणानेच बनतो. मॉन्सँटोला घालवल्यानंतर त्यांचे तंत्र चोरून भारतीय कंपन्यांनी हे कापूस बियाण प्रचलित केले. अटलजींनी बीटी कापसाला अधिकृत परवानगीही दिली. दहाहून अधिक वर्षे हा कापूस पिकतो आहे. माणसे त्याचे सरकी तेल वापरत आहेत. गुरे पेंड खाऊन दूध देत आहेत. शेळ्या झुडुपे खाऊन शेतं साफ करत आहेत. कोणालाही काहीही झालेले नाही. ज्या ग्रीनपीस संस्थेने मुळात जनुकीय बियाणांना विरोध सुरु केला तिचे संस्थापक सदस्यदेखील पश्चात्ताप व्यक्त करून जनुकीयचा प्रचार करत आहेत.

‘स्वदेशी जागरण मंच’ या संघपरिवारातील संघटनेने या नव्या तंत्राच्या चाचण्यावरही बंदी घालायला लावली आहे. मोदीसाहेबांचा विकासवादी दृष्टीकोन असला तरी त्यांना परिवारातूंच ब्रेक लावला गेला आहे. विषारी कीटकनाशके मात्र यांना विदेशीही चालतात. जनुकीय बियाणांविषयी घबराट पसरवणारा धादांत खोटा सिनेमा महेश भट्ट यांनी काढला आहे. जे धोके स्वदेशीवादी व्यक्त करतात ते कसे अ-वैज्ञानिक आहेत हे स्पष्ट करणारा लेख मी लोकसत्तात प्रसिध्द केला होता. तो पुढील लिंकवर आवर्जून पहावा. पश्चिमद्वेषापायी भारतीय उत्पादक, ग्राहक व शेतकरी यांना विज्ञानवंचित ठेवून  स्वराष्ट्रघात कसा चालू राहू शकतो याचे हे एक उदाहरण आहे.  

कलात्मक स्वातंत्र्यवीर (सेन्सॉर नकोच मानणारे) महेश भट्ट यांनी वैज्ञानिक-संशोधन-स्वातंत्र्य नाकारणारी व बेधडकपणे हिरोशिमा, पूर, भूकंप, महायुध्द, ९/११ यांचा जी.एम.शी बादरायण संबंध जोडत प्रलय-घबराट पसरवणारी, थालीमे जहर नावाची फिल्म बनविली आहे. त्यात उल्लेखिलेला जीएम खाऊन उंदरांना कॅन्सर झाल्याचा शोधनिबंध आता मागे घ्यावा लागलेला आहे. कारण त्यात मुद्दाम अगोदरच कॅन्सरप्रवण असलेले उंदीर वापरल्याचे उघडकीस आले. फिल्ममधील बाकी बडबड आध्यात्मिक गुरू आणि एन्जीओसम्राटांची आहे.  

आज आपण ज्या मित्र जीवाणूची ओळख करून घेणार आहोत तो कसदार शेतजमिनीतला कस समृध्द करणारा  कृषि-जीवाणू आहे. कीटकनाशके, शत्रु-कीटकांबरोबर मित्र-कीटक व मित्र-जीवाणूसुध्दा नष्ट करतात. शत्रू जीवाणू  मात्र हळूहळू त्यांना दाद देईनासे होतात. कीटकनाशके ही चक्क विषेच असतात. असे असूनही पर्यावरणवाद्यांना ती सुखेनैव चालतात!

जीवाणू (बॅक्टेरिया) हा उत्क्रांतीच्या अगदी आदीम टप्प्यावर अस्तित्वात आलेला आणि आजही प्रचंड प्रमाणात यशस्वीपणे जगणारा जीवप्रकार आहे. आपली त्याच्याशी पहिली ओळख होते ती रोगजंतू म्हणून. ऍंटिबायोटिक घेतल्यानंतर मित्रजीवाणूंचे पुनर्भरण करण्यासाठी जास्त दही-ताक किंवा मित्रजीवाणूच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. विरजण, किंवा ब्रेड वा अल्कोहोल बनवतानाचे यीस्ट-जीवाणू हे उपयोगी साधन म्हणूनही आपल्याला माहित असतात. निरोगी शरीरातसुद्धा आपल्या पेशींपेक्षा जास्त जीवाणू असतात. आपले मोठे आतडे हा तर एक पर्यावरणीय अधिवासच असतो.

पण हे काहीच नाही तर आपल्या पेशींच्या आत, आपले गुलाम बनलेले मायटोकॉंड्रिया नामक जीवाणू, चक्क आपली कामे करत असतात. शुक्राणूमध्ये (किंवा शुक्रजंतू) वळवळती गतिमानता कोठून येते? चक्क मायटोकॉंड्रियाचे इंजिन बसवले जाते. म्हणजे जननपेशी पुरुषाची पण तिचा वाहक चक्क वेगळा जंतूच असतो! आपले स्नायू यांत्रिक ऊर्जा बनवू शकतात तीही मायटोकॉंड्रियांच्याच जीवावर! वरील कारणांमुळे जीवाणू हा जीवप्रकार मित्रही ठरतो हे तर झालेच. पण शरीराच्या किंवा खाद्यपेयांच्या बाहेरही मित्रजीवाणू अस्तित्वात आहेत. जैव-खते (सेंद्रिय म्हणू नये! कारण मूळ शब्द इंद्रिय-ऑर्गन हा नसून जीव-ऑर्गॅनिझम हा आहे) बनविताना त्यांचे हे कार्य सहजच दिसून येते. विष्ठेची विधायक विल्हेवाट लावणाऱ्या टाकीला सेप्टिक-टँक म्हणतात ते यामुळेच.


कृषि-जीवाणूचे (अॅग्रोबॅक्टेरियम) महात्म्य
जीवनसंघर्षात आतून हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना परोपजीवी (परासाईट) म्हणतात. या चोरांना आत शिरण्यासाठी यजमान जीवाचे कुलूप फोडावे लागते. एकाच नंबराचे कुलूप फोडायला एकदा शिकले की झाले. पण दर व्यक्तीगणिक मोठा आणि अनन्य नंबर असला की घरफोडी कठीण. जे जीवाणू एकमेकांशी बोगदा जोडून व जनुकांची देवाणघेवाण करून अनेकानेक नंबरांची कुलपे बनवू शकले ते जिंकले. यातून त्यांना यजमानपेशीतून जनुक-तुकडाही पळवून आणायचा/टाकून द्यायचा अशी सवय लागली. असले धंदे करणारा व्रात्य जीवाणू म्हणजे कृषिजीवाणू होय. हे भरपूर प्रकारचे असतात. ते जे उद्योग करून ठेवतात त्यात मनुष्याला उपकारक की मारक असा विवेक करण्याची कोणतीही सोय नसते. ज्या जाती नत्रवायूचे ग्रहण चांगले करतात त्यांच्या मुळांवर, म्हटले तर एक, रोगच जडलेला असतो, हे आपण शाळेतही शिकतो. हा कृषिजीवाणू जनुकीय बदल घडवून काही वनस्पतींचा नाश तर काहींचा बेलगाम प्रसारही करू शकतो. अमेरिकन गव्हाबरोबर भारतात आलेले काँग्रेस गवत आठवत असेल.

कृषिजीवाणूंनी चालवलेल्या आंधळ्या जनुकांतर-धुमाकुळाच्या(जीन ट्रान्सफर केऑस) सर्व भल्याबुऱ्या परिणामांतून काय होते? उत्तर आहे उत्क्रांती! छोट्या जनुक-माला मोठ्या होऊन उच्चतर बहुपेशीय जीव बनत गेले आहेत. पत्ते खेळताना पालथ्याच पानांवर बोली लावण्याला शुध्द जुगार म्हणता येईल. पण बोली लावून पाने व्यक्त करणाऱ्या आणि पार्टनरची पाने उलथी करणाऱ्या ब्रिजला जवळजवळ बुध्दीबळाचा दर्जा दिला जातो. तद्वतच जनुकांतर-धुमाकुळ ते काटेकोर जनुक अभियांत्रिकी, असा आंधळेपणाकडून डोळसपणाकडे जाणारा सलगपट कल्पिता येतो.

शेतीचा शोध लागल्यापासून आजपावेतो आपण निवडक लागवड (तण काढणे) आणि संकर या मार्गाने अप्रत्यक्षपणे जनुक-अभियांत्रिकीच करत आलेलो आहोत. वनस्पतीतील वधूवरांच्या जोड्या जमवून लाभप्रद संतती होईपर्यंत आपण प्रयोग करत असू व करीत आहोतही. कोणत्याही एका पेशीपासून संपूर्ण जीव निर्मिणे म्हणजेच टिश्युकल्चर हे नवे असले तरी त्याबाबत कोणी जी.एम म्हणून धसका घेत नाही.

संकरात आणि टिश्युकल्चरमध्ये आपणही पालथ्या पानांचा जुगारच खेळत होतो व आहोत. त्यात झालेली जनुकांतरे वाया जाणारी आणि धोक्याचीही असत कारण डाव आंधळा असे. आज कळीचा फरक असा पडला आहे की आता आपण पाने उलथी करून वाचू शकतो आहोत. कारण जनुकांचे कूट रेणू रेणू पर्यंत उकललेले आहे. असे असूनही आंधळ्या जुगाराला, मग तो नैसर्गिक असो वा मानवी, निर्धोक समजणे आणि डोळसपणे उलथी पाने बघून लावून घेण्याला मात्र प्रलयंकारी समजणे, हा उफराटा धसका का पसरला आहे?

मुख्य कारण एवढेच आहे की कृषिजीवाणूचा प्लाज्मॉइड नामक भाग आपल्या हाती लागला आहे. हा प्लाज्मॉइड कृषिजीवाणूतून बाहेर पडून भक्ष्य-वनस्पतीच्या यजमान पेशीत घुसतो. तेथील जनुक-मालेतला लचका तोडू शकतो व दुसऱ्याच जनुक-मालेतील मोकळ्या जागी जोडूही शकतो.

वनस्पतींच्या जनुक-मालेत दोरा(निरर्थक रेणू) भरपूर लांब पण माळलेली फुले(जनुके) मात्र विरळाच अशी स्थिती असते. प्लाज्मॉइड आता मानवी देखरेखीखाली व नियंत्रणानिशी या कामी जुंपला गेला आहे व यालाच विशेषत्वाने जनुक-अभियांत्रिकी म्हणतात. भय इतकेच आहे की त्यातील तोडणारा घटक जर सुधारित बियाणात व त्याच्या अन्नवापरातून मानवी शरीरात शिरला तर तो मानवी जनुक-मालेची मोडतोड करणार नाही कशावरून?

तोडणारा तुटतो जोडणारा जुडतो
मुळात प्लाज्मॉइड कृषिजीवाणूच्या आज्ञेनुसार काम करत असतो. प्लाज्मॉइडचे यशापयश आणि भक्ष्यजीवावर होणारे शुभाशुभ परिणाम यादृच्छिक असतात.

जनुक-अभियांत्रिकीद्वारे एन्झाइम्स व औषधे मनुष्य निवडकपणे, अपेक्षित सद्गुणाचे जनुक वेगळ्याच प्रजातीच्या पेशीतून तोडून आणायला प्लाज्मॉइडला भाग पाडतो. नंतर तोडण्याचा घटक निकामी करून, उरलेला अर्धवट प्लाज्मॉइड, जे बियाण सुधारित करावयाचे असेल त्याच्या पेशीत ढकलून देतो. आता या प्लाज्मॉइडकडे तोडण्याची शक्तीच उरलेली नसते पण कोणत्याही जनुक-मालेत जाऊन चिकटण्याची शक्ती मात्र असते. मोकळ्या जागेत चिकटून तो नव्या यजमान पेशीला नवे जनुक प्रदान करतो. यात मानवाचे इप्सित साध्य होते. जसे की कापसाला बोंडअळीशी प्रतिकारशक्ती प्राप्त होते, केळ्याला स्वतःत लोह धारण करण्याची क्षमता प्राप्त होते तर सोयाबीनला तांबेरा या रोगापासून बचाव करता येऊ लागतो, इत्यादि.

सुधारित बियाणाच्या जनुक-मालेत चिकटलेला, अर्धा प्लाज्मॉइड आता कृषिजीवाणूतला स्वतंत्र प्लाज्मॉइड उरलेलाच नसतो. त्याला इतस्ततः भटकण्याची मुभा आता नव्या यजमानपेशीत उरलेलीच नसते. तो आता प्लाज्मॉइडच नसतो. मग तो यानंतर कोणाच्याच म्हणजे पिकाच्या किंवा माणसाच्या जनुक-मालेवर आक्रमण कसे करणार?

तरीही आता मुद्दाम एक भयंकर शक्यता पाहू. समजा तोडणारा घटक उरलाच तर काय होईल? सुधारित करावयाच्या नव्या यजमान पेशीत तो धुमाकूळ घालेल व तिचे मूळ गुणधर्मसुध्दा ध्वस्त करेल. अशी विकृतीग्रस्त पेशी असल्याचे बियाण बनविण्यापूर्वीच ध्यानात येऊन तिचा पुढील वापर टाळतात. याशिवाय साखळीप्रक्रिया घडू नये यासाठीच, पीक हेच बियाण म्हणून वापरता येणार नाही असा, टर्मिनेटर जोडलेला असतो.

अशा सर्व सेफगार्ड्समुळे मानवी जनुक-मालेवर आक्रमण करेल असा घटक अन्नातून आत जाणे अशक्य आहे. टर्मिनेटरविषयी, पुनःपुन्हा रॉयल्टी मिळावी या आर्थिक लोभापायी तो टाकतात हा गैरसमज आहे. उत्पादनखर्चात रॉयल्टी नगण्य असते. तसेच ‘टर्मिनेटरचे वंध्यत्व’ सर्वच वनस्पतीत पसरेल(!) हे हास्यास्पद आहे.

तरीसुध्दा पुरेश्या चाचण्या घेतल्याशिवाय व सरकारी तज्ञसमितीने पास केल्याशिवाय कोणतेही बियाण विक्रीसाठी खुले करता कामा नयेच. येथे तर मोठाच दैवदुर्विलास भारताच्या पदरी आला आहे. निसर्ग हा जणू अहिंसकच असतो (तो तसा अजिबातच नसतो) मानवच काय तो हिंसक असतो अशी कविकल्पना मानणाऱ्यांनी व पश्चिमद्वेष्ट्या प्रतिगाम्यांनी चाचण्यांवर बंदी आणवली आहे. प्रत्यक्ष वापरावर मात्र बंदी नाही! कापसाबाबत अटलजींनी अधिकृत परवानगी दिली व ती लागूही आहे. सर्व कापूस बीटीच आहे. आत्महत्या बीटीमुळे नव्हे तर एकाधिकार खरेदी योजनेमुळे झाल्या. आता महाराष्ट्रातली एकाधिकार खरेदीही रद्द झाली आहे आणि कापूस क्षेत्रात विक्रमी वाढ झालेली आहे.

जनुक-अभियांत्रिकीमध्ये क्रांतिकारक शक्ती दडलेली आहे. कमी पाण्यानिशी तगणाऱ्या, खार जमिनीत तगणाऱ्या जाती, जास्त उत्पादकता आणि जास्त पोषणमूल्य देणाऱ्या जाती, भारतीय कृषिविद्यापीठांनी शोधलेल्या आहेत. पण त्यांना त्या वापरता येत नाहीयेत. शेतकऱ्यांना नुसत्या भरपाया देत रहायचे की कायमस्वरूपी आर्थिक सक्षमता द्यायची हा खरा प्रश्न आहे.. शेतकरी, ग्राहक आणि संशोधक या तिघांचे स्वातंत्र्य हे खोट्या भयापायी कुचंबविणे हा हट्ट ‘विकास’वादी सरकारला अजिबात शोभत नाही.  

  





3 comments:

  1. Dhanyachi chav hi gentic engineering ne badalate ka ? Tase nsel tar hydbrid jwari/bajri he bechav ka lagate ?

    ReplyDelete
  2. Dhanyachi chav tar badaltech aani rograi pan khupach vadhate tyamule aushadhancha kharch hi khupach vadato tyamule fayada kami. tyapekshya Subhash Palekar yanchi 0 budget natural farming concept khupach chan aani prabhavi aahe....... Facebook var nahitar youtube var paha

    ReplyDelete
  3. Khup Chhan lekh, GMO baddal samanya lokanna education dene far mahatvach ahe ani te sopya shabdat sangitalya gele pahije he pan mahatvache ahe. Ya blog madhe atyant samjel ashya shabdat GMO baddal sangitalya gelele ahe. Thank yo.

    ReplyDelete