Friday, August 28, 2015

व्रते हवीत, पण त्यांत ‘वैकल्ये’ कशाला?

      
विकल मन आज झुरत असहाय्य अशा गाण्यांत किंवा विकलांग/बहुविकलांग अशा शब्दात विकल हे विशेषण येते. शक्तिपात झाल्याने अधिकच व्याकूळ म्हणजे विकल अशी व्याख्या करता येईल. विकलता येण्यामागे व्याधी, वार्धक्य, आघात अशी अनेक कारणे असू शकतात. विकल पासूनच वैकल्य असा शब्द बनतो. जसे की उदाहरणार्थ विविध या विशेषणापासून भाववाचक नाम बनविताना विविधता आणि वैविध्य असे दोन पर्याय असतात, त्याच न्यायाने विकल पासून विकलता आणि वैकल्य हे दोन पर्याय असतात.

सहेतुकपणे व निर्धाराने स्वतःला विकल करून घेण्याच्या अनेक प्रकारांना मिळून वैकल्ये असे म्हणतात. निर्जळी उपास, मग तो रमझानही असेल, त्यात थुंकीसुध्दा गिळायची नाही म्हणून थुंकत चालणे असा जास्त कडकडीत अर्थही लावला जातो, हा वैकल्याचाच प्रकार आहे. ओलेत्याने प्रदक्षिणा घालणे, लोळत लोळत दर्शनाला जाणे अशी कितीही उदाहरणे देता येतील. क्लेश किंवा त्रास सहन करण्याला असे स्वतोमूल्य का बरे प्राप्त झाले असेल?

कर्मसिद्धांत हे सर्वात मोठे कारण आहे. पापक्षालन हा कर्मसिद्धांताचाच एक उपसिद्धांत आहे. आपण जितके क्लेश सोसू तितके आपले देणे फेडले जाईल आणि आपले खाते नेट क्रेडीट साईडला जाईल असे मानले जाते. इतकेच नव्हे तर सुखभोगाने पुण्यक्षय होतो असेही मानले जाते. यामुळे आत्मक्लेशांचे उदात्तीकरण होत रहाते.

फक्त आत्मक्लेशच नव्हे तर, स्वकीयांचे बलिदान याही गोष्टींचे उदात्तीकरण होण्यामागे, दुसरा सिद्धांत असा आहे की ईश्वर उपासकांची परीक्षा घेत असतो. चिलयाबाळ ही पुराणकथा किंवा बकरी ईदची कुर्बानीची कथा या परीक्षा घेणे नामक प्रकारात मोडतात. निष्ठा तपासायला दुष्कृत्य करायला लावणारा ईश्वर, ही कल्पना ईश्वरत्वालाच ढळ पोहोचवणारी नाही काय? याउलट  ईश्वर न मानणाऱ्यानेसुध्दा जर सत्कृत्य केले तर तोही (परीक्षेत न उतरता) परीक्षेस उतरतो, असे मानणे जास्त मंगलकारी नाही काय? बहुत सुकृतांची जोडी| म्हणूनी विठ्ठली आवडी|| येथे जोडी म्हणजे दुक्कल नसून संचय असा अर्थ आहे. 

आपण सत्कृत्ये करावीत. यथावकाश आपल्यालाही भक्ती प्राप्त होईल! भक्ती हे साधन नसून भक्ती लाभणे सत्कृत्याचे फल मानणे ही धारणा मानवाला अधिक योग्य दिशा देणारी आहे. उपासना/आराधना करणे या अर्थाने भक्ती करणे असा चुकीचा शब्दप्रयोग रुळला आहे. एरवी आपण आत्मतत्त्वापासून वि-भक्त झालेलो असतो ही विभक्ती मिटणे म्हणे भक्ती होणे होय.(सांडिली त्रिपुटी तुकोबा)  

तिसरा (कु)तर्क म्हणजे तपश्चर्येने दिव्यशक्ती प्राप्त करण्याचे प्रलोभन होय. तपश्चर्या म्हणजे ताप करून घेणारी दिनचर्या. साधक जितकी घोर व क्रूर (अघोरी) तपश्चर्या करेल तितकी पॉवरफुल सिद्धी त्याला प्राप्त होणारच. मग तो ती शक्ती दुष्कर्मासाठीही वापरू शकतो. शंकराने देऊन बसायचे आणि विष्णूने निस्तरायचे ही पुराणकथांची एक थीम होऊन बसली आहे. सिद्धींचा दुरुपयोग किंवा बेजबाबदार उपयोग करणारे शुक्राचार्य, दुर्वास, असे ऋषीसुध्दा प्रसिद्धच आहेत. 

आता वैकल्यांचे समर्थन करणारा इहवादी युक्तिवाद पाहू. माणसाला खरे स्व-तंत्र व्हायचे असेल तर त्याने स्वतःला न पटणारे मोह टाळायला हवेत व त्यासाठी त्याला स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर रहाण्याची क्षमता हवी. म्हणजेच सहनशक्ती किंवा तितिक्षा हा गुण जोपासला जायला हवा. वैकल्ये पाळल्याने तितिक्षा वाढते म्हणून वैकल्ये योग्य, असा तो इहवादी युक्तिवाद आहे. पण अशी जनरल परपज तितिक्षा जोपासता येते काय? आणि व्रताचा आशय कोणता? यावर काय सहन करावे व सोडून द्यावे लागणार, हे अवलंबून असणार नाही काय? या प्रश्नांकडे आता वळू.

तुमचे व्रत, लाच न घेणे हे असेल तर तुमचे सहकारी वा वरिष्ठ तुम्हाला त्रास देतील. हा त्रास कसा कमीत कमी होऊ द्यायचा याची एक कला असेल. लोक काय म्हणतील? या प्रश्नात न अडकणे हे एक घेण्यासारखे व्रत आहे व ते पाळण्याची कला वेगळीच असेल. खरेतर कोणाला कोणते व्रत महत्त्वाचे ही गोष्ट त्या त्या व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तित्वातला कोणता दोष जास्त घातक ठरत आहे यावर अवलंबून आहे. वर्कोहोलिक व्यक्तीला मजा करण्याचे व्रत (!) घ्यावे लागेल, तर आळशी व्यक्तीला आळस झटकण्याचे! पण निर्धारशक्ती वाढवण्यासाठी स्वतःला विकल करून घेणे हे कोणत्या व्रतासाठी? कमरेइतक्या पाण्यात उभे राहून उदाहरणार्थ मुखदुर्बलता कशी जाणार? किंवा उद्धटपणा तरी कसा जाणार?


कोणती तितिक्षा महत्वाची हे व्रताच्या आशयानेच ठरायला नको काय? दुर्दैवाने व्रताच्या आशयाची प्रस्तुतता तर विसरली जाते आहेच. पण त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, वैकल्य हे व्रताचे साधन न राहता, वैकल्य हाच व्रताचा आशय बनून बसला आहे!

3 comments:

  1. अचूक विश्लेषण. ...

    ReplyDelete
  2. अचूक विश्लेषण. ...

    ReplyDelete
  3. अतिरेकी वैकल्ये आणि वैकल्यांचा अतिरेक नकोच. कारण शरीरमाद्यम खलू धर्मसाधनम् असे म्हटलेलेच आहे. पण तप - वैकल्ये करण्यातही काहींना आनंद वाटतो हे खरंय. काही माणसं अॅडव्हेन्चरस असतात. त्यांना धाडस करायला आवडते. सिंहगडावर काहीलोक वाहनाने जातात, काही पायर्‍या चढून जातात. काहींना पायर्‍या न चढता गडावर चढायला आवडते. मी मित्रांच्या हट्टाखातर असा गेलोय. काही थेट तानाजीच्या मार्गाने गिर्यारोहण करतात. आता चांगला रस्ता आणि पायर्‍या असताना लोक ट्रेकींग किंवा गिर्यारोहण का करतात कारण धाडस करणे त्यांना आवडते. एव्हरेस्ट चढतांना तर अनेक जण आपला जीवही गमावतात. तसेच कठोर व्रत-वैकल्ये करणे ही धाडसी स्वभावाच्या लोकांची भक्ती करण्याची पद्धत असते. शांतपणे माळ ओढणे त्यांच्या स्वभावात नसते. दुसरे म्हणजे तप करण्याने भक्तीच्या भावनेची तात्पुरती का होईना पण तीव्रता वाढते. माझ्या गावापासून (अकोला) शेगाव पायी रस्त्याने ३५ किमी आहे. अनेकदा कारने जाऊन, आडवारी आडवेळेला म्हणजे गर्दी नसतांना, रांगेत उभे न राहता आरामशीर दर्शनही घडते. पण तीनवेळा मी पायवारी करून दर्शनाला गेलोय. शेगाव जवळ येत असतांना, पायांसह संपूर्ण अंगच ठणकत असताना दर्शनाची ओढ लागते, मंदिराच्या परिसरात, आवारात पोहोचल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात, गाभार्‍यात पोहोचून दुरूनच समाधी दिसते न दिसते तोच डोळे भरून येतात, कंठ सद्गदीत होतो. दर्शन करतांना प्रत्यक्ष महाराजांना भेटल्याचे समाधान लाभते. आता मी एरवी काही तसा फार भावनाविवश, भोळा, कट्टर भक्त नाही, तरी भावनांची ही तीव्रता मी अनुभवलेली आहे. तशी उत्कटता अारामशीर दर्शनाने साधत नाही, हे खरंय. मात्र अतिरेकी वैकल्ये आणि वैकल्यांचा अतिरेक नकोच हे ही खरेच.

    ReplyDelete