समता: सम्यक आणि ‘वैषम्य’क
‘समते’त दडलेल्या अनेक
अर्थांपैकी कोणते अर्थ नीतितत्त्व म्हणून मान्य करता येतील? तर
कोणते अर्थ मानवहितासाठी घातक आहेत?
फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्ताने ज्या समतेची उद्घोषणा झाली
तिचा अर्थ नियम-सार्विकता (आयसोनॉमी) हा होता. सर्वासांठी तेच कायदे! कारण तेव्हा
मध्ययुगीन रूढी (आपल्याकडे मनुवाद म्हणून गाजत असलेली) होती. काहींना कायमसाठी
काही विशेषाधिकार (प्रिव्हिलेजेस) आणि काहींना कायमसाठी विशेष-कर्तव्ये (बर्डन्स)
आणि तीही जन्माधिष्ठित किंवा वंशाधिष्ठित! ती स्पष्टपणे नाकारली गेली. न्यायनिवाडा
करताना पक्षपात असू नये हेही तत्त्व मान्य झाले. राज्यसंस्थेने नागरिकांत भेदभाव
(डिस्क्रिमिनेशन) न करता, त्यांना
‘समान वागणूक’ द्यावी, हे तत्त्वही याच ओघात येते. या अर्थाने समता हे नीतितत्त्व स्वीकारार्हच
आहे.
समाजसत्तावादी म्हणजे कम्युनिस्ट क्रांत्यामध्ये जे समतेचे तत्त्व
पुरस्कृत झाले ते मात्र वेगळे आहे. राज्यसंस्थेचे काम नागरिकांना ‘समान बनवून सोडायचे’ हे आहे व
त्यासाठी तिला नागरिकांना ‘असमान वागणूक द्यावीच’ लागेल. म्हणजेच उच्चस्तरांना प्रतिकूल आणि निम्नस्तरांना अनुकूल वागणूक
द्यावी लागेल, तरच त्यांना समान बनवून सोडता येतील. समान
वागणूक देणे आणि समान बनवून सोडणे ही उद्दिष्टे परस्परविसंगत आहेत. नंतरही
समतेच्या कल्पनेत अनेक प्रकारची भर पडत गेली आहे.
अशी भर घालणाऱ्या उप-संकल्पनादेखील परस्परविसंगत आहेत.
समता ही गाठोडेवजा (एक्लेक्टिक) संकल्पना बनली आहे. जेव्हा आपण समता मानतो असे
म्हणतो, तेव्हा या गाठोड्यातील काय मानतो आणि
काय नाकारतो, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आपल्यावर असते.
अशी स्पष्टता न केल्यास ‘समता’ हे
संदिग्ध/संमिश्र तत्त्व आपल्याला सतत चकवे देत रहाते.
समतेची तपासणी करायची असेल तर आपल्याला प्रथम, “स्तरीकरण व श्रेणी(हायरार्की) या गोष्टी
अनिवार्यपणे अन्याय्यच असतात आणि म्हणून समान बनवून सोडणे हे अनिवार्यपणे न्याय्यच
असते.” हा दुराग्रह सोडावा लागेल. तसेच “सर्व व्यक्ती ह्या मुळात समान असतातच पण व्यवस्थेने त्यांना असमान बनवलेले
असते” हेही गृहीत तपासावे लागेल. यासाठी अगोदर सर्वच
व्यक्तींत ‘समाईक’ (कॉमन) काय काय असते
हे स्पष्ट करून घेतले पाहिजे. त्या समाईक गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रत्येक व्यक्ती अनन्य(युनिक) असते.
२. प्रत्येक
व्यक्तीच्या वाट्याला वेळोवेळी येणारी स्थिती ही अंशतः स्वअर्जित, अंशतः
अन्य-दत्त आणि अंशतः भाग्याधीन असते.
अन्य-दत्त आणि अंशतः भाग्याधीन असते.
३. निरुपाय नसताना, प्रत्येक व्यक्तीला तिच्या कृतींची
जबाबदारी स्वतः घेणे
आवश्यक असते, पण तशी ती घेईलच असे नाही.
आवश्यक असते, पण तशी ती घेईलच असे नाही.
४ प्रत्येक व्यक्तीला आकांक्षा काहीही असू शकतात पण क्षमता मर्यादित असतात.
५. व्यक्ती एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदरही करू शकतात किंवा कोणी कोणाच्या
स्वातंत्र्यावर अतिक्रमणही करू शकते.
५. व्यक्ती एकमेकींच्या स्वातंत्र्याचा आदरही करू शकतात किंवा कोणी कोणाच्या
स्वातंत्र्यावर अतिक्रमणही करू शकते.
यातील एकाही समाईक गोष्टीबाबत, प्रत्यक्षात व्यक्ती एकमेकींशी समान नसतात! हे
आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.
समतावादातील अंगभूत गोच्या
श्रेणी ही गोष्ट वाईटच असते असे मानण्याचे कारण नाही. जर व्यक्ती एकमेकींशी समान नसल्या पण एकमेकीना पूरक असल्या व स्वयंस्फूर्तीने पूरक नात्यात उतरत असल्या तर त्यात वाईट काय आहे? उलट लादलेली नाती आणि परस्परमारकता ही गोष्ट वाईट आहे. स्पर्धा असूच नये हे शक्यही नाही आणि हिताचेही नाही. स्पर्धा न्याय्य (फेअरप्ले) आणि विधायक राखली पाहिजे हे बरोबरच आहे. या अर्थाने समता मान्य करता येईल.
पण सर्वांची स्थिती समान करायची म्हणजे काय करायचे? कारण वेगवेगळी सुभाग्ये/दुर्भाग्ये वेगवेगळ्या
क्षमता, वेगवेगळ्या रुची व आकांक्षा आणि मुख्य म्हणजे
वेगवेगळ्या वृती असल्यावर, कोणकोणत्या बाबीत कोण
कोणाच्यापेक्षा जास्त किंवा कमी सुस्थित ‘असेल’ हेही वेगवेगळे असते. शिवाय अर्हता हा वेगळाच मुद्दा आहे. त्यामुळे श्रेणी
लावायची म्हटली, तरी त्यातून एकेका मुद्यावर एकमेकीना छेद
देणाऱ्या (क्रिसक्रॉस) श्रेण्या मिळतील. म्हणूनच समग्र अर्थाने श्रेणी लावणे हेच
मुळात शक्य नाहीये. असे असूनही समता ही घोषणा इतकी सर्वमान्य (मनापासून नव्हे!) का
झाली असेल?
मक्तेदारी ही गोष्ट न्यायबुद्धीला खटकणारी आणि
उत्पादकता कमी करणारी आहे. मक्तेदाऱ्या नष्ट करून स्पर्धा स्थापित केलीच पाहिजे.
तसेच नैसर्गिक संसाधनांची मालकी आणि वारसाहक्काने मिळणारी संपत्ती या गोष्टी
अर्हतानिरपेक्ष असतात. त्यामुळे कर-सवलती या मार्गाने उत्पन्नाचे फेरवाटप
समर्थनीयच आहे. परंतु अशा फेरवाटपाचे उद्दिष्ट किती समतावादी असावे? हा खरा प्रश्न आहे. समतावाद्यांचा वाटपावर इतका भर
असतो की प्रश्न उत्पादनाचा आणि उत्पादकतेचा सुध्दा आहे याचे भान सुटते. सत्ता
संपत्ती आणि प्रतिष्ठा या तीनही गोष्टीचे ‘कितीही’ फेरवाटप करता येईल असे ते समजतात.
सत्ता ही गोष्ट समान वाटता येईल असे मानणे हे तर
स्वयंव्याघातीच आहे. सत्तेला वैधतेची जोड असली तरी तिचा गाभा बल हाच असतो. माणसे
गट करून एकेका माणसापेक्षा बलशाली ठरतातच. अनेकांच्या संख्याबलाशी एकाला तुल्यबळ
व्हायचे तर त्याचे प्रतिकारक बल संख्याबलाहून वेगळे पण संख्याबलाइतके असावे लागेल.
म्हणजेच बलसमता हे अराजक/निरंतर-युध्द ठरते. काहीजण विशेष बलिष्ट बनणे, त्यांच्याशी निष्ठावान गट जमणे, अशा गटांत तह होणे असे होत राहून बलांची उतरंड (पिरॅमिड) बनणे अटळ असते.
यावर खरा उपाय पिरॅमिडची उंची कमी करत नेणे हाच असतो..
स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त असते तेव्हाच सक्तीची
कार्यात्मक गरज लागत नाही. म्हणून स्वातंत्र्य व स्वयंशिस्त जोपासणे हा प्रयत्न
असला पाहिजे. पण या गरजेपेक्षा जास्त बल युद्धांमधून निर्माण होते आणि युद्धे ही
द्वेषांमधून उद्भवतात. म्हणूनच स्वातंत्र्य आणि स्वयंशिस्त यांना द्वेषरहिततेची
जोड असली पाहिजे. ही प्रक्रिया जसजशी पुढे जाईल तसतशी पिरॅमिडची उंची कमी होईल. पण
पिरॅमिडमध्ये समतावाद्यांनी उच्चस्थान पटकावले(!) की ते समता आणतील, हे सपशेल खोटे आहे.
उत्पन्नांतील विषमता कमी होणे हे समृद्धीनंतरच होऊ
शकते. लोकसंख्येने ग्रस्त आणि अनुत्पादक अर्थव्यवस्थेत दारिद्र्य टिकते व
श्रमिकांची सौदाशक्ती क्षीण रहाते. दारिद्र्य-निवारणाआधी आर्थिक विषमता कमी करणे
हा क्रम अशक्य असतो. अमर्त्य सेन यांचे गुरू जॉन रॉल्स यांनी मांडलेला अग्रक्रमवाद
(प्रायारिटेरियनिझम) हाच विकसनशील राष्ट्रासाठी उपयोगाचा आहे. स्पर्धा फेअर राखणे
हे काम न्यायसंस्थेने करायचे आणि कल्याणकारी राज्याने उत्पन्नाचे फेरवाटप करताना ‘अंत्योदया’ला अग्रक्रम
द्यायचा असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. “अशी विषमता निवडा की
जी तळच्या माणसाला वर काढण्यात सर्वोत्तम असेल.” (थिअरी ऑफ
जस्टिस--- जॉन रॉल्स). वरच्या उत्पन्न गटांत अंतर्गत विषमता किती वाढतीय? याची चिंता न करता खालच्या उत्पन्न गटांचे दारिद्र्यनिवारण आणि सक्षमीकरण
हे कल्याणकारी राज्याचे आद्य कर्तव्य आहे.
प्रतिष्ठा: डिग्निटी की ऑनर/प्रेस्टीज?
डिग्निटी चा अर्थ असा की कोणालाच तुच्छतेने न वागवणे व कोणाचीच विटंबना न करणे. हे सार्विक आहे. त्यामुळे डिग्निटी ही सर्वांचीच जपली गेली पाहिजे. ऑनर म्हणजे बहुमान! प्रेस्टीज म्हणजे मुद्दाम दाखवण्याचे श्रेष्ठत्व! त्याचा ऑनरशी घोळ घातला जातो.
एखाद्या व्यक्तीबाबत विशेष आदर वाटेल ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत घडूच शकत नाही. यामुळे बहुमान ही गोष्ट श्रेणीयच असते. समान-बहुमान हा चक्क तार्किक-व्याघात आहे.
पण ‘सामाजिक
समते’त, ऑनरमध्ये/प्रेस्टीजमध्ये समता
आणण्याचा प्रयत्न होतो! खरे सार्विक मूल्य डिग्निटी हे असताना, ऑनर
आणि प्रेस्टीज यांचा समान वाटप करायला बघणे, हे मुदलातच
चुकीचे असते. परंतु जनमानसावर, ऑनर आणि प्रेस्टीज यांचा समान
वाटप व्हावा, असे समतावाद्यांनी ठसवून ठेवलेले आहे. यातून
टोकनिझम म्हणजे नाममात्र बहुमान देण्याचे प्रकरण चालू रहाते. टोकनिझम करण्याला
खर्च येत नसल्याने राज्यकर्ते तो सढळ हाताने चालू ठेवतात.
किती व्यक्तींचे सत्कार करणार किंवा त्यांना
पद्मपुरस्कार देणार? त्यामुळे
टोकनिझम व्यक्तीकेंद्री न रहाता समूहकेंद्री बनवला जातो. आपल्याकडे गोतगटीय
समूहांना ‘समाज’ म्हणण्याची आणि आख्या
समूहाला बहुमान देण्याची प्रथा पडली आहे. यातून जातीजमातवाद आणि इतर सर्व
प्रकारच्या जमातवादांना अधिमान्यता मिळते.
मत्सर हा दुर्गुण माणसात असतोच. त्याला कशाचेही वैषम्य
वाटू शकते. वैषम्य वाटले की ‘विषमता’
दिसू लागते. यातून वैषम्यांचे सांत्वन करायचे हे जणू कर्तव्य होऊन
बसते. वैषम्य वाटण्याला मर्यादा नसते पण सांत्वन करण्याला सुध्दा (जरी खर्च येत
नसला तरी) मर्यादा असते. सांत्वन कधीच पूर्ण होणार नसते. म्हणजे सामाजिक समतेच्या
नावाखाली प्रत्यक्षात वैषम्य-भावनाच पोसली जाते. जमातवादी द्वेषभावनेला जास्त
जास्त इंधन पुरवले जाते. म्हणून अशी समता ही सम्यक नसून वैषम्यक असते.