-----सी. डब्ल्यू. लेडबिटर(१८५४-१९३४)
[मराठीकरण आणि संक्षेप राजीव साने]
[आभार anandgholap.net ही साईट आणि माझे मित्र श्री. द. त्र्यं. तेल्हारकर]
थिओसॉफीवाल्यांचे चमत्काराचे भाग बाजूला ठेवले तरी दर्शन म्हणून त्यांनी जे मांडलेले आहे ते मोलाचे आहे. हे
भारताबाहेर विकसित होऊनही खास भारतीय वळणाचे दर्शन आहे. फरक हा आहे की हे दर्शन आत्मोन्नतीदेखील उत्क्रांतीचाच
पुढचा टप्पा म्हणून पहाते. स्वर्ग/नरक नाही दंड वा पारितोषिक नाही त्या त्या आत्म्याच्या शिक्षणातील धडे
म्हणून आव्हाने व संधी
येतात.
प्रार्थनेने काहीही बदलत नाही. अर्हता ही कमवावीच लागते. जसजसे
श्रेयमार्ग आत्मसात होतात तसतसा दुरितांचा निरास होत जातो, कल्याणकारी हुकुमशाहीने
केलेल्या दमनांने दुरितेच वाढतात.
हा असतो
विश्वात्म्याचा शुद्धतेकडून पूर्णतेकडे प्रवास आणि आपण असतो त्याच्या विभिन्न
मार्गांनी व विभिन्न टप्प्यावर उत्क्रांत होत असलेल्या शलाका.
सी. डब्ल्यू. लेडबिटर यांनी त्यांच्या ‘आउटलाईन ऑफ थिओसॉफी’ या पुस्तकात मांडलेले महत्त्वाचे
७५ मुद्दे (मी लेडबिटर यांच्या विचारांशी सहमत असेनच असे नाही. पण हे दर्शन प्रोटेस्टंट-हिंदू-वळणाचे
असल्याने ते लोकांना माहीत व्हावे अशी
माझी इच्छा आहे)
१. ईश्वर आहे. तो महान जीवनदाता आपल्या आत आणि बाहेरही सर्व व्यापून रहातो. तो निरपवादपणे शुभंकर आहे. तो इंद्रियगोचर नसला तरी ज्याला
इच्छा असेल त्याला प्रचित होतो.
२. मनुष्य अमर्त्य आहे आणि त्याचे भवितव्य
अमर्यादपणे वैभवशाली आणि तेजोमय आहे.
३. परिपूर्ण न्यायदायक अशा ईश्वरी गतिनियमांनी
जग चालते त्यामुळे प्रत्येक
मनुष्य हा स्वतःच स्वतःचे शुभाशुभ, दंड/पारितोषिक ठरविणारा न्यायदाता
असतो.
४. वरवर पहाता तसे दिसत नसले तरी सारेकाही निश्चितपणे
आणि
स्वयंप्रज्ञतेने श्रेयपूर्णतेकडेच प्रवास करीत असते. परिस्थती जरी प्रतिकूल
असली तरी तिला
तोंड देणे हे या प्रवासासाठी आवश्यक असते. आपल्या भोवतीचे सारे काही,
जर नीट समजून घेतले तर आपल्याला अडथळा आणणारे नसून उपकारकच असते.
५. ही संपूर्ण योजना मानवहिताला अनुकूल
असल्याने ती समजावून घेणे
आणि तिला सुबुध्दपणे सहयोग देणे हे मानवाचे कर्तव्य आहे.
६. मनुष्याचे खरे स्वरूप आत्मा हे आहे व शरीर हे त्याचे साधनमात्र आहे. म्हणूनच कधीही आंतरिक संघर्ष उभा राहिला तर मनुष्याने
त्याच्या उच्चतर अंगांशी तादात्म्य पावले पाहिजे, निम्नतर अंगांशी नव्हे.
७. मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नसून एका शिकवणीनंतर दुसऱ्या शिकवणीला नेणारे केवळ एक संक्रमण आहे.
८.मनुष्याची आतापावेतो झालेली उत्क्रांती ही सुरस आणि उदबोधक आहेच. यापुढील उत्क्रांती तर अधिकच सुरस आणि उदबोधक असणार आहे. प्रत्येक
मानवी आत्मा मानवी उत्क्रांतीचे अंतिम श्रेयस प्राप्त करेल हे अटळ आहे, भले तो
मधल्या काळात सन्मार्गापासून कितीही का भरकटलेला असेना.
९. कोणताही विचार, उच्चार किंवा आचार एक निश्चित फलश्रुती देतोच, ही बाहेरून
लादलेली शिक्षा किंवा बक्षीस नसते तर मूळ क्रियेत अंगभूतपणे निहित असते. कारण आणि
कार्य या दोन वेगळ्या गोष्टी वाटल्या तरी त्या खरेतर एकाच पूर्णप्रवासाच्या अंशविधा असतात.
१०.या दिव्य बृहदनैसर्गिक नियमांशी स्वतःचे सुबुद्धपणे अनुकूलन करून
घेण्यासाठी माणसाला स्वतःवर बिनचूक नियंत्रण प्राप्त करून घ्यावे लागते.
११.अग्नीने भाजते किंवा पाण्यात बुडू शकतो अशा जडनैसर्गिक बाबतीत आपल्या धारणा
जितक्या थेट आचरणीय असतात तितक्याच समग्र जीवनाबाबतच्या धारणादेखील थेट आचरणीय
असतात.
१२ कसे जगावे? कशासाठी जगावे? आणि जीवन समजले तरच ते जगण्यालायक का बनते? याचे
तर्कशुध्द आकलन आपल्या लाभू शकते.
१४. आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो म्हणूनच स्वतःला विकसित करू शकतो.
१५. स्वतःला, संबंधिताना, प्रियजनांना आणि साऱ्याच मानवजातीला खरोखरच मदतकारक काय
ठरू शकेल हे आपल्याला समजते.
१६. जीवनातले ताप आपल्याला भलेमोठे वाटेनासे होतात. कारण आपण सर्वच गोष्टींकडे आपल्या खासगी आणि क्षुल्लक मुद्याच्या संदर्भात न
बघता व्यापक तात्त्विक दृष्टीने बघू लागलेलो असतो.
१८.आपल्या भागधेयाबाबत वा भवितव्याबाबत अन्यायग्रस्ततेची भावना आपल्याला
स्पर्श करेनाशी होते.
१९. मृत्यूचे भय आणि प्रियजनवियोगाचा शोक यापासून आपली मुक्तता होते.
२०. मृत्यू हा उत्क्रांतीतला दुवा म्हणून पाहिल्याने आत्म्याचे तारण होईल की
नाही, स्वर्ग मिळेल की नरक, असल्या धर्मजन्य चिंता निकाली निघतात. भवितव्य ही चिंता
करण्याची गोष्ट न राहिल्याने आपण प्रसन्नतेने आणि निर्भयतेने जगू लागतो.
२१. माणसाचे दुर्गुण ईश्वराला चिकटवून ईशकार्याच्या नावाखाली ईशनिंदेचे पातक
करणाऱ्या धर्मगुरूंकडून ऐकलेल्या, ईश्वर ही जणू आपल्यासारखीच एक व्यक्ती आहे, अशा खुळचट समजुती गळून पडतात व सर्वव्यापी सर्वसमावेशक
अस्तित्व, ज्यात मार्गदर्शक तत्त्वे निहित आहेत अशी ईशकल्पना आपल्याला स्पष्ट
होते. लोगॉस हे ईशतत्त्वच प्रेममय उदार,
क्षमाशील, सर्वमांगल्यकारक, ज्ञानकारक व शक्तीकारक असते
२२. जो असेल अशी आशा श्रध्देने बाळगावी लागते
असा कोणीतरी ‘तो’ नसून तो कार्यरत असल्याचा प्रत्यय साऱ्या भोवतालातून मिळू
लागतो. किंबहुना आपल्या जगाचाच सलगपणे शिखरावर
पोहोचणारा चढ म्हणजे ‘तो’ आहे.
२३. तो आपल्याला कवेत घेणाराच फक्त नसून आपल्यात आतून भरलेला आहे. म्हणजे मनुष्य स्वतःच तत्त्वतः दिव्य आहे आणि जडापर्यंत
अवतरलेली दिव्य शलाका प्रदीर्घ उन्नयनाद्वारे तिच्या मूळ निवासी पोहोचणारच आहे.
२४. आपल्यात व भोवती, आपण जे उत्पात आणि तणाव, जी दुःखे आणि यातना, पाहतो आहोत व त्यामुळे दुरिताचा श्रेयावर विजय झाल्यासारखा दिसतो आहे, हे
लक्षात घेता हे सारे प्रेममय अस्तित्वाने सुनियोजित केलेले असेल यावर विश्वास
ठेवणे खरोखरच कठीण आहे. पण या संघर्षमय धुरळ्याच्या ढगातून बाहेर पडू शकलो आणि
ज्ञानवान व आंतरिक शांततेच्या भूमिकेवर स्थिरावू शकलो तर मुख्य आणि ताकदवान प्रवाह
हा प्रगतीचाच असल्याचे आपल्या ध्यानात येईल.
२५.जेव्हा बहुआयामी व संश्लिष्ट अशा कार्यप्रणालींची नियमबद्धता आपल्या लक्षात
येईल तेव्हा उन्नतीच्या महाओघात अधून मधून तयार होणारे भोवरे व उलट दिशेचे प्रवाह
हे किती वरवरचे आहेत हे कळून आपल्याला महाओघाच्या शुभदिशेची खात्री पटल्यावाचून
राहणार नाही.
२६.एखादा मनुष्य ज्या प्रसंगस्थितीत सापडलेला असतो ती त्याला हवी असते असे
नाही. पण तशी प्रसंगस्थिती त्यानेच स्वकर्तृत्वाने ओढवून घेतलेली असते हे निश्चित.
ज्याला त्याला अर्हतेनुसारच स्थिती मिळेल ही व्यवस्था अत्यंत अचूक आणि आपोआप
चालणारी असते. परंतू याचा अर्थ असा नाही की दिव्य योजना त्याच्या विरोधात आहे.
ज्या क्षमता शिकण्याच्या राहून गेल्या आहेत त्या क्षमता प्राप्त करण्याची संधीच हे
खडतर प्रसंग त्याला मिळवून देत असतात. हे शिक्षण जर त्याने मिळवले तर तो तशा चुका
करणारच नाही की ज्यामुळे त्याच्यावर अशी स्थिती ओढवेल. अशा तऱ्हेने न्याय आणि
कल्याणप्रदता या दोन्ही गोष्टी या व्यवस्थेत मिळतात. अर्हता कमी पडली की अर्हतार्जनाची
संधी चालून येते. मात्र या कडे असे पाहता आले तरच ती संधी कारणी लावता येते. चांगुलपणा
आणि आकलनशक्ती या गोष्टी एकत्रच वाढतात. त्या एकदा पुरेशा प्राप्त झाल्या की
दिव्य-योजनेचे आकलन होण्यास माणूस पात्र बनतो. एकदा का त्याला योजनेचे मर्म कळले
की मग तो त्या योजनेत सर्वस्व झोकून देण्याखेरीज अन्य मोहात पडणारच नाही. ईश्वराचे
सहकामगार बनले की मग काम किती मोठे आहे वा लहान आहे याने फरक पडत नसतो.
२७.आपण म्हणजे शरीर आणि आपल्याला एक आत्मासुध्दा असतो हा भ्रम झटकून
टाकल्यावरच आपल्याला हे समजेल की माणूस आत्मस्वरूप असून दृश्य जगातल्या स्थूल
द्रव्यांशी व्यवहार करण्यासाठी त्याने त्याच स्थूल द्रव्याचे शरीर स्वतःच्या
अभिव्यक्तीचे एक वाहन म्हणून धारण केलेले असते.
२८. आजच्या विज्ञानाने (लेडबिटर यांच्या काळातील) स्थूल द्रव्यातून
आरपार जाणारे इथर नावाचे सूक्ष्म द्रव्य असते असे मान्य केले आहे. घनपदार्थातून आरपार
जाणारा इथर हा जितका सूक्ष्म ठरतो तितकेच इथरला सूक्ष्म ठरणारे अतिसूक्ष्म
द्रव्यही असते आणि अधिकाधिक सूक्ष्मतर द्रव्यांची मालिकाही असते. या सूक्ष्मतर
द्र्व्यांतील नजाकतदार रचना आपल्याला कशा समजणार? जश्या स्थूल द्र्व्यातील रचना
त्यातील कंपने ग्रहण करून आपण प्रत्येय करतो तशा सूक्ष्मतर द्र्व्यांतील कंपने
ग्रहण करून त्याच्यातील रचनांचा प्रत्यय घेता येतो.
२९. जसे आपण घन द्रव्यांनी बनलेले असल्याने त्यातील कंपने ग्रहण करण्यास समर्थ
असतो तसेच आपण सूक्ष्मतर द्रव्यांनीदेखील घटीत झालेलो असल्याने आपल्यात सूक्ष्मतर द्रव्यांतील
कंपने झेलू शकणारी तत्सम वाहने/ माध्यमे/ इंद्रिये असतात, म्हणूनच आपल्याला
सूक्ष्मतर द्रव्यांचे विश्वदेखील प्रत्येय असते.
३०.. एकाच्या आत दुसरे, त्याच्या आत तिसरे अशा तऱ्हेने प्रत्येक स्तरावरील
द्रव्याच्या जगात जगणारी तितकीच शरीरे आपल्या आत्म्याने धारण केलेली असतात. व
टप्प्याटप्प्याने आपण सूक्ष्मतर संवेद्यता प्राप्त करून आपले जग हे त्याच्यातच
वसलेल्या इतर जगांनी मिळून बनलेल्या व्यामिश्र जगाचे अधिकाधिक आकलन करून घेऊ शकतो.
३१. ही सर्व वाहने घेऊन वा टाकून देऊनही आपण आपणच रहातो. त्यांच्याकडे वाहने
म्हणून पाहिले की आपण आपले जीवन त्यांच्या सर्व शक्तीनिशी घडवू शकतो. हे गूढगुंजन
नव्हे, चिंतनाच्या झेपा घेऊन रचलेले अतिभौतिकही नव्हे आणि पवित्र मानले गेलेले
धार्मिक मतही नव्हे तर थिओसॉफीद्वारा प्रयोगांनी सिद्ध करता येणारे वैज्ञानिक तथ्य
आहे.
३२. सर्वमान्य अशा स्थूलतम द्रव्याच्या जगाला आम्ही भौतिक स्तर असे म्हणतो.
त्याच्या (इथरच्याही) आत असणारा आणि उच्चतर असणारा स्तर म्हणजे एषणामय स्तर.
त्याच्याही आत व उच्चतर असा मनोमय स्तर, असे अधिक उच्चतर स्तर आहेत. पण सध्या आपण
निम्नस्तरीय जीवनाची गोष्ट करीत असल्याने हे तीन पुरेसे आहेत.
३३. ही वाहने अवकाशात भिन्न ठिकाणी नसून आपल्यातच एकात एक असतात. सध्या आपण
स्थूलतम द्रव्याच्या जगातील कंपने आपल्या स्थूलद्र्व्याने बनलेल्या मेंदूत ग्रहण
करीत आहोत. यावर आपल्या जाणिवेचे लक्ष केंद्रित झालेले आहे. जसजसे आपण आपल्या
जाणिवेचे केंद्र उच्चतर वाहनांकडे नेऊ शकू तसतशी आपल्याला त्या त्या स्तरातील
घडामोडींची साक्षात जाणीव होत जाईल.
३४. खरेतर जसा बर्फात आणि वाफेत द्रव्यतः फरक नसतो तसाच स्थूलद्रव्यांत आणि
सूक्ष्मद्रव्यांत स्वरूपातः फरक नसतो. किती सूक्ष्म भाग पडतात आणि ते किती वेगाने
कंपायमान होतात यानुसार हे स्तरीकरण आहे. म्हणजे सारतत्त्व म्हणाल तर अखिलाचे एकच
एक आहे!
३५. मग मूलतः माणूस कोण आहे? तो ईशतत्त्वातूनच प्रकटलेला आहे. तो म्हणजे दिव्य
अग्नीतून बाहेर पडलेली एक शलाका आहे. तो ईश्वराचेच सारतत्त्व घेऊन एका आत्म्याच्या
चिलखतात शिरतो व स्वतःला व्यक्तीगत बनवून टाकतो. किंवा ईश्वरच स्वतःतून त्याला जणू
काही विभक्त करतो. तो एकूण ईश्वरी जीवनापासून वेगळा आहे हे आपल्या दृष्टीच्या
मर्यादेमुळे आपल्याला भासत राहते.
३६. एकाअर्थी ईश्वरच त्याच्या एकेका अंशाचे बलिदान देऊन त्याचे जड-अवतरण घडवतो
आणि त्याला उत्क्रांतीकथेच्या सुरुवातीला फेकतो. पण उत्क्रांतीकथेची अंतिम परिणती
त्याला शक्य होईल असा शक्तीसंचय ईश्वराने एकेका शलाकेतच देऊन ठेवलेला असतो. ही
संभवशक्ती उत्क्रांतीच्या, जडोन्नतिच्या आणि चिदोन्नतिच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून
जाउनच स्वतःची मूळची दिव्यता प्रत्यक्षात आणू शकणार असते.
३७. सुरुवातीला तो ढोबळ आणि मोठ्या स्पंदनांनाच प्रतिसाद देऊ शकत असतो. जसजशी
तो त्याची संवेदनशीलता वाढवत नेईल तसतसा तो उच्चतर नाजूक आणि गतिमान स्पंदनाना
प्रतिसाद देऊ शकणार असतो.
३८.हे झाले प्रगतीचे हे वस्तुगत वर्णन पण सर्व स्पंदनांना प्रतिसादशील बनणे
म्हणजे, आत्मगतदृष्टीने पहाता, सहवेदना आणि आत्मौपम्यवृत्तीने परिपूर्ण बनणे होय.
सिद्धपुरुष म्हणजेच सर्व सद्गुण संपादित केलेला माणूस. अर्थात सद्गुण-संपादनाचे
कार्य अनेकानेक जन्मांच्या अनुभवांतून सिद्धीस जाणार असते.
३९.निम्नतर वाहने धारण करीत स्थूल-शरीर धारण करणे म्हणजेच जन्म घेणे.
सुरुवातीला आत्म्याला भौतिक जगातले प्राथमिक धडे घ्यायचे असतात. बरेच जन्म म्हणजे
एकेका शिकवणीला प्रवेश घेणे असते. एका आयुष्यातील धडे पचवून आत्मसात करण्यासाठी
त्याला एकेका शिकवणी नंतर एक विश्रांतीकाळ घ्यावा लागतो व त्यासाठी तो त्या
आयुष्यातले जड-शरीर त्यागतो, ह्या घटनेलाच आपण मृत्यू म्हणतो. बरीचशी पृथ्वीवरील भौतिक आयुष्ये म्हणजे शालेय-शिक्षणाचा
टप्पा होय. त्यानंतर त्याला उच्चतर स्तरांची चाहूल लागते.
४०. सुरुवातीच्या निम्नतर योनीतील जीवनानंतर त्याला जेव्हा मनुष्यजन्म मिळतो तेव्हा
त्याला कारण-देह लाभतो. यानंतर त्याने कितीही चुका केल्या आणि त्याचे दुष्परिणाम
भोगावे लागले तरी तो कधीच मनुष्याच्या खालील योनीत पडू शकत नाही. शिकण्यासारखे
इतके भरपूर आणि अधिकाधिक सूक्ष्म असते की अनेकानेक जन्म मानल्याखेरीज कित्येक
प्रश्नांना उत्तरेच मिळू शकणार नाहीत. तेव्हा बहुजन्म हे सत्य मानावेच लागेल.
४१. अनेक सज्जनांना आपल्यात व भोवती दिसणाऱ्या दुःखांचे आणि यातनांचे प्रमाण
पाहिल्यावर ईश्वर हा सर्वशक्तीमान असणार नाही कारण तो हे थांबवू शकला नाही किंवा सर्वशक्तीमान
असूनही त्याने या दुःखांची पर्वा केली नसेल तर त्याला प्रेममय कसे मानणार? असा पेच
पडतो. हा पेच अनेक जन्म मानल्याखेरीज सुटूच शकत नाही. दुःख हे अनेक आयुष्यांतून स्व-अर्जित
असते आणि ते पुढील आयुष्यांतील शिक्षणासाठी आवश्यक असते. यांवरूनच ईश्वर हा
एकाचवेळी सर्वशक्तीमान आणि शुभंकर ठरू शकतो.
४२. आदिमानवापासून आत्तापावेतो आपण साऱ्यानी अनेक आयुष्ये व्यतीत केलेली आहेत.
त्यांत आपल्या कडून श्रेययुक्त आणि दुरितयुक्त अशा दोन्हीप्रकारच्या कृती घडलेल्या
आहेत. श्रेय-कृतीने सुख आणि पुढील संधी मिळणार तर दुरित-कृतीने दुःख व अडथळे निर्माण
होणार हे अटळ आहे.
४३. आपल्याला ज्या मर्यादा किंवा अक्षमता असतात त्या एकतर आपण कमावलेल्या
असतात किंवा आपला आत्मा तुलनेनी अननुभवी असतो. व्यक्तीची बहुरंगी आणि बहुढंगी
प्राक्तने पाहिली की किती नेमकेपणाने कर्मविपाक होतो हे लक्षात येईल. पण हे काहीही
असले तरी अंतिम परिणती दिव्यत्वप्राप्तीचीच आहे हे निश्चित.
४४. खरेतर हे सत्य किती आश्वासक आहे. पण त्यालाच प्रखर विरोध होतो. आपल्याला
तक्रार करायला वाव नाही हे लोकांना खटकत असावे.
४५. आपल्याला बरेच पूर्वजन्म असतात तर ते आठवत का नाहीत असाही प्रश्न येतो. आपल्या
जाणिवेचे लक्ष निम्नतर कवचांपुरतेच केंद्रित झालेले असते. या कवचांपुरती स्मृती
पुढील जन्मात रहात नाही. कारण या कवचांना पुढील जन्म नसतोच. आत्मा मात्र तेव्हाही
साक्षी असतो. त्याच्यात साठलेली स्मृती ही नवजात बालकात जे उपजत गुण असतात
त्यांच्या स्वरूपात प्रत्ययास येते.
४६. स्थूल शरीरात मिळालेला जन्म हा शालेय शिक्षणाचा एक दिवस व एक प्रयत्न असतो
हे समजलेला मनुष्य, गुणार्जनाखरीज इतर विक्षेपात गुंतून कसा राहील?
४७. भौतिक वस्तू, संपत्ती, सत्ता, कीर्ती वगैरे मिळवणे हे त्याला पोरखेळ वाटू
लागते. कारण उच्चतर गोष्टींची गोडी लागलेली असते. तो आपली शक्ती तिकडे वळवितो.
४८. असे असले तरी निम्नतर गोष्टींचे मोह सहजी सुटत नाहीत. यामुळेच माणसाला
आंतरिक संघर्षातून जावे लागते. “ज्या गोष्टी मी करीन असे वाटते त्या मी करीत नाही आणि ज्या मी करणार नाही असे
वाटते त्या मी करतो”
४९. धार्मिक लोक आंतरिक संघर्षाबाबत दोन चुकीच्या धारणा बाळगून असतात. एक चुकीची
धारणा म्हणजे आपल्या बाहेर अशा आसुरी शक्ती आहेत की ज्या आपल्याला नसत्या मोहात
पाडतात व दुसरी अशी की मनुष्याच्या हृदयात अमर्याद पाप भरलेले आहे. या धारणांमुळे
अनेक सहृदय स्त्रीपुरुष अनावश्यक यातनांतून जातात.
५०. पण आपल्याला अनिष्ट सूचने पुरविणारे कारण वेगळेच आहे. जन्म घेण्यासाठी जी
निम्नतर कवचे धारण करावी लागतात. त्यातील द्रव्ये ही काही मृत नसतात (किंबहुना
कोणतेच द्रव्य मृत नसते) त्यांच्यात जीवनाच्या सह्जोर्मी भरलेल्या असतात. फक्त
त्या अलीकडच्या अवस्थेतून आल्याने अलीकडची ओढ घेत असतात इतकेच. म्हणजेच आत्म्याचे स्वारस्य आणि त्याने धारण केलेल्या आवरणांतील
द्रव्यांच्या प्रेरणा यात द्वंद्व असते.
५१. माणसाने उच्चतर ध्येये साध्य करताना अशा निम्नतर ओढीवर मात केली पाहिजे हे
खरेच पण त्याने हेही कधीही विसरता कामा नये की दुरिताला स्वतंत्र आधार काही नसून,
ईश्वरी ऊर्जेच्या उत्-तर दिशेने चाललेल्या प्रवासात तिची ओसंडणूक ही कधी कधी
अवदिशेनेही होत असते. पण हे अपलक्षण मानून खिन्न होण्याची गरज नसते.
५२. मृत्यूविषयी असणारे अज्ञान आणि अंधश्रद्धांमुळे मृत्यूभोवती शोक, दहशत आणि
बिचारेपणाचे वलय बनले आणि त्यामुळे मानवजातीची अपरिमित हानी झालेली आहे. मृत्यू
आणि तदनंतरचे काल्पनिक घटनाक्रम यांनी सैरभैर होऊन मानवाने अनेक वेडेचार केले.
अनेक दुष्टप्रथा पडल्या व क्रौर्यही घडले हे खरेच. पण तत्त्वज्ञानाच्या अनेक
जन्मीच्या अभ्यासानंतर माणसाला जेव्हा मृत्यूविषयीचे थिओसॉफीप्रणित सत्य उमगते
तेव्हा मृत्यूची सर्व भयानकता कोसळून पडते. आणि उत्क्रांतीतील एक सकारात्मक घटना
म्हणून माणूस त्याच्याकडे पाहू लागतो.
५३. शोक मनविण्याच्या अनेक तऱ्हा अशुभाची लक्षणे बनून बसतात. पण जेव्हा
माणसाला हे लक्षात येते की त्याच्या प्रिय व्यक्तीच्या उन्नतीत तिचे अभिनंदन
करण्याचे सोडून तो तिच्या तात्कालिक व भ्रामक वियोगाच्या कल्पनेने स्वतःचे
स्वार्थीपणच शोकाद्वारे प्रकट करत असतो, तेव्हा तो हे सर्व पोरखेळ सोडून देतो.
५४.आपण दुःखी होऊन प्रिय व्यक्तीच्या पुढील प्रवासात अडथळाच निर्माण करीत
असतो. सत्य कळल्यावर मृत्यू ही अनेकवार अनुभवलेली नित्याची घटना बनते. त्याला नाश
करणारा यमदूत म्हणून न पहाता आपण सुंदर भवितव्याची किल्लीच हाती सोपविणारा देवदूत
म्हणून मृत्यूकडे पाहू लागतो.
५५. परलोक असा नसतोच. सारा काही एकच लोक असतो. मृत व्यक्ती नष्ट झालेली नसते
तर एषणामय कायेत विश्राम घेत आणि अनुभव पचवीत असते. ज्ञानी माणसाला दृश्य जगाच्या
पलीकडचे जगही परिचित असल्याने त्याला काहीतरी अघटीत घडल्यासारखे वाटत नाही. कारण
पलीकडे काय आहे हे निश्चित माहीत असते.
५६. एषणाकायेत रहात असताना अतृप्तीचे जे त्रास सहन करावे लागतात तेच आपणच
स्थूलदेहात असताना भलत्या इच्छा धरून निर्माण केलेले असतात. पण ते विश्रांतीकालात
विरून जातात व नव्या उमेदीने नवे अवतरण करण्यास आत्मा सज्ज होतो. जे हे सर्व जाणत नाहीत
ते मृत्यूनंतर स्वतःसाठी काहीही मोलाचे निर्माण करीत नाहीत कारण ते जगत असताना
चंगळवाद, क्षुद्र गोष्टी आणि चघळगप्पांमध्ये व्यर्थ काळ घालवत असतात.
५७. ज्यांनी विशेषत्वाने दुर्गुण कमावलेले असतात त्यांना एषणाकायेत
विरेचनासाठी आवश्यक अशा यातनाही भोगाव्या लागतात.
५८. तरीही हे अतृप्तीचे डंख सोसणे हाच त्यातून सुटकेचा मार्ग असतो. जर दुः-वासनांचे
विरेचनही होऊ शकले नाही तर पुन्हा जन्म घेताना तो दुर्गुणांसकट जन्म घेतो आणि
पुन्हा त्याच चुका करतो. असे दुष्टचक्र सुरू रहाणे हे सर्वात वाईट भवितव्य होय.
कारण त्यात उत्क्रांती खोळबून रहाते. अर्थात भोवतीचे सज्जन काही प्रभाव टाकून दुर्गुणाचे
सौम्यीकरण करतात. शेवटी ईश्वरी योजना ही बलवत्तर ठरणारच.
५९. याउलट जाणकार आणि मदत करणारा माणूस पुढील जीवनासाठी सद्गुण कमावून ठेवत
असतो. त्याला पुढील अधिकाधिक संधी देणाऱ्या प्रकाशमान भवितव्याची कल्पना असते. तो
त्या दृष्टीने उपयुक्त कामे करून ठेवतो. तो भोवतालच्या अगणित सहयात्रींना शांततेचा
आणि उत्साहाचा स्रोत बनून रहातो आणि स्वतःलाही स्वर्गीय जीवनाची संधी प्राप्त करून
घेतो. स्वर्ग हे वेगळे ठिकाण नव्हे तर ह्याच जगातील लपलेले सौंदर्य प्रत्ययाला
येऊ लागणे, होय. धर्मांमध्ये सांगितलेल्या सोन्याच्या नगरी, मोत्याची कवाडे व
अमृताचे झरे नव्हेत, तर अधिकाधिक वरच्या इयत्तेतील सार्थकांचे व श्रेयांचे आनंद
म्हणजे स्वर्ग.
६०.. एषणकायाही गळून पडते. परंतू सध्या आपण त्या पलीकडच्या जीवनाचा विचार
करणारा नाही आहोत. जे मिळते ते अर्हतेनेच हे निश्चित. दुःखे आणि आनंदही ज्याने त्याने पेरलेल्याच्या प्रमाणात आणि ज्याचा त्याच्या झक्कूपणाच्या
तऱ्हेचाच मिळणार.
६१. माणसाच्या वाट्याला जे येते ते नेमके त्याने कमावलेल्या सकारात्मक वा
नकारात्मक अर्हतेनुसारच असते, याचा अर्थ कोणीतरी न्यायाधीश हा न्याय करायला बसलेला
असतो असा लावल्याने मोठाच घोटाळा होतो. न्यायाधीश हा त्याला केलेल्या
प्रार्थनांमुळे विचलीत होऊन प्रार्थनेला प्रतिसाद देऊ शकतो. परंतु न्यायाधीश असा
कोणी नसतोच. शुध्द कार्य-कारण संबंधच हिशेब लावल्याप्रमाणे अचूक घटना घडवत असतो.
६२. तापलेले लाल लोखंड जर कोणी हातात धरले तर त्याला भाजणारच. त्याने ‘तापलेल्या वस्तूला हात लावू नये’ या विधीनियमाचा भंग केला म्हणून ‘देवाने त्याला शिक्षा दिली’, हे म्हणणे जितके चुकीचे आहे तितकेच अर्हता आणि फळ याच्या संबंधात न्यायाधीश
शिक्षा बक्षीस हे प्रतिमान वापरणे चुकीचे आहे.
६३. शारीरिक भाजण्याचा त्याने कोणत्या हेतूने तापलेल्या गोष्टीला हात लावला
होता याच्याशी काहीही संबंध नसतो. त्याने दुसऱ्याला दगा देण्याच्या भरात किंवा
दुसऱ्याला वाचवण्याच्या तळमळीपोटी असे केलेले असू शकते. या फरकाचा परिणामही
वेगळ्या पातळीवर वेगवेगळा होतो. आपण उमदेपणाने सत्कार्य केले असे जर त्याचा
सदसद्विवेक त्याला सांगत असेल तर त्याला धन्यता वाटेल. मुद्दाम दुष्टपणा करायला
गेलो याचा अपराधभाव जागृत होईल, गाढवपणा केला असेल तर पश्चात्ताप होईल. पण तीनही वेळी
शारीरिक भाजणे हे तेच असेल.
६४. भौतिक पातळीवर भौतिक संतुलने जशी आपोआप कार्यरत होतात तशी उच्चतर
द्रव्यांच्या जगांतही त्या त्या प्रकारची संतुलने कार्यरत होतात. हेतू वाईट असला
तर वाईट मनस्थिती येणारच. असेच आत्मिक पातळीवरही खरे आहे. ज्याला आपण आज चुकीने
पारलौकिक म्हणतो ते वेगळ्याच जगातले नसते तर एकाच बहुस्तरीय जगातले असते. म्हणूनच
आत्मिक उन्नतीची अर्हता प्राप्त केलेली नसताना प्रार्थनेने ते साधणे अशक्य असते. ईश्वर
ही तत्त्वव्यवस्था आहे ती स्तुतीने खुश होईल निंदेने चिडेल अशी मानवी-छापाची
व्यक्ती नव्हे.
६५ समाजाच्या नियमानुसार सभ्य माणूस आपला वैताग किंवा संताप व्यक्त करण्याचे
टाळतो व ती ऊर्मी दाबून टाकतो. याने वाचिक हिंसा टळते हे जरी खरे असले तरी
थिओसॉफीच्या साधकाला हे पुरेसे नसते. अधिक सखोल पातळीवर वैताग येणे हेच कर्म ठरते
व त्याची फळे त्या पातळीवर बनतातच. स्थूल कायेवर ठोसा नाही मारला तरी एषणकायिक
ठोसा कदाचित जास्त तीव्र सुध्दा ठरू शकतो.
६६. आत्मा जरी मूलतः दिव्य असला तरी त्याचे गुण, खालून वर पहाता, दिसणाऱ्या
उन्नतीत एकेक करून उमलत जाताना दिसणार असतात.
६७. जीवन हे एक न सुटलेले कोडे न रहाता, आपण येथे का आहोत?, आपल्याला कशासाठी
जगायचे आहे?, आपले सार्थक कशात आहे आणि या दिशेने नेमके प्रयत्न काय करता येतील?
याचे एक स्पष्ट व तर्कयुक्त परिप्रेक्ष्यच थिओसॉफीमुळे आपल्याला प्राप्त होते.
ऐहिक जीवनातील यशापयश हे एकदा हे आयुष्य म्हणजे एकूण शिक्षणातला एक दिवस असे
पाहिल्यावर त्याचे महत्त्व अवाजवीपणे वाढून बसत नाही.
६८. क्षुद्र गोष्टी गळून पडतात व आपण एक खासगी व्यक्ती म्हणून न राहता मानवजातीचे
प्रतिनिधी म्हणून आणि खरेतर ईश्वराचे सहकारी म्हणून जगू लागतो.
६९. जे योग्य आहे ते योग्य आहे एवढ्या खातरच ते करायचेच अशी आपली जीवनरीत बनते
आणि मुख्य म्हणजे हे आपण आनंदाने करतो. आपण जर आनंदी असू तरच आपण इतरांना योग्य ती
मदत करू शकतो आणि इतरांविषयीची सहवेदना आपल्याला परवडू लागते. आपण इतरांसाठीही एक
शक्तीस्रोत बनतो.
७०. आपण आनंदी रहावे ही ईश्वराची आज्ञा आहे व आपले कर्तव्य आहे हे आपल्याला
कळते. आनंदाची स्पंदने इतरत्र पसरविणे हेही इतरांना कल्याणप्रद ठरणारे असते.
आपल्या आनंदाचे मुख्य रहस्य हे असते की एखादा ताप हा माझ्याच वाट्याला का यावा? या
प्रश्नातून आपली कायमची मुक्तता झालेली असते. अन्यायग्रस्ततेची भावना हे वैतागाचे
मख्य कारण असते.
७१. ईश्वर आपल्या आत्म्याला तारेल की नाही यावर संशय घेणे हेच ईश-निंदेचे पातक
होय. आपले तारण आपणच करू अशीच ज्याची योजना आहे. ‘त्याने’ तारण करायचे म्हणजे आणखी वेगळे काय करायचे?
७२. प्रत्येकाला भरपूर संधी असतात. आपला कोणाही नव्या व्यक्तीशी संबंध येणे ही
एक संधीच असते. मदत करायला मिळण्याची संधी किंवा आपल्यालाच मदत मिळण्याची संधी!
जोडून घेत रहावे आणि मुख्य म्हणजे आपली मते इतरांवर लादणे तर सोडाच पण विचारलेली
नसताना सांगायलाही जाऊ नये. आपले धर्मवादी मित्र जशी इतरांना कटकट करतात तशी आपण
कदापीही करू नये. एखादा विचार ऐकणाऱ्याच्या जीवनात खरोखरच प्रस्तुत आणि लक्षणीय
ठरत असला तरच तो सांगण्यात अर्थ असतो, म्हणून हा संयम. यात ज्ञान लपवून ठेवण्याचा
प्रश्नच नाही.
७३. थिओसॉफीचा साधक जगाला कसा ओळखू येईल? जो सदासर्वदा आनंदी आणि उल्हसित असेल,
जो कठीण समयी खंबीर आणि धैर्यशील असेल, सहवेदना आणि मदत करण्याची वृती त्याच्यात
नेहमीच असेल, आनंदी असला तरी तो प्रत्येक गोष्ट अतिशय गंभीरपणे घेत असेल, त्याला
फालतूपण करायला वेळच नसेल, तो स्वतःवर आणि स्वतःच्या सर्व वाहनांवर अचूक नियंत्रण
ठेवण्याचा प्रयत्नात असेल असा साधक म्हणजे खराखुरा थिओसॉफीचा साधक होय.
७४. तो नेहेमी सहिष्णू असेल कारण तो कशातही चांगले काय तेच पाहील. तो
दोषैवदर्शी नव्हे तर आशावादी असेल कारण त्याला हे खात्रीने माहित असेल की दुरित
अल्पजीवी आहे आणि श्रेयच अंतिमतः टिकून राहणार आहे.
७५. तो कितीही किरकोळ काम करीत असला तरी ते काम तो ईश्वराचा सहकारी म्हणून करत
असेल. मनुष्याच्या वाट्याला येऊ शकणारा याहून अधिक सन्मान व याहून अधिक विशेषाधिकार
तो कोणता?