Friday, September 4, 2015

इझम-लेबलांचे नूतनीकरण व वर्गवारी

(माणसाला इझमचे लेबल लावून मोकळे होऊ नये, पण अगदीच राहवले नाही तर---)


पुरो आणि प्रति यातून नक्की कुठे गामी हे कळेनासे झालेय. पण गामी हे पद राखून दोन स्पष्ट लेबले प्रस्तुत ठरतील.

जे लोक पूर्वगौरव (पूर्वीच्याचा आणि पौर्वात्यांचा अशा दोन्ही अर्थी) आणि पश्चिमद्वेष यांनी पछाडलेले असतील, मग ते हिंदुत्ववादी, गांधीवादी, डावे, किंवा फॉरीनफंडमेंटॅलिस्ट(!) असे कुणीही असोत, त्यांच्या साठी ओरिगामी हे लेबल सुचवीत आहे. ओरिएन्टल म्हणजे पौर्वात्य हे तर झालेच. पण आहे त्याच कागदात घड्या घालत बसणे, याचा दृष्टांतही शोभेल.

याउलट ज्यांनी, पाश्चात्यांनी निर्मिलेली आधुनिकता स-मूल्य स्वीकारली आहे (फक्त तंत्रे व सुखसुविधा नव्हेत) ज्यात महात्मा फुले, केशवसुत, आगरकर, सावरकर, आंबेडकर, र.धों कर्वे व असे अनेक थोर लोक होऊन गेले, आहेत व बिगर-थोरही आहेत, त्यांनी स्पष्टपणे स्वतःला ऑक्सिगामी म्हणवावे. ऑक्सिडेंट म्हणजे पश्चिम. आधुनिकता ही सार्विकच असते. पण पाश्चात्य म्हणून होणाऱ्या हेटाळणीला उत्तर म्हणून ठासून ऑक्सिगामी म्हणवावे.

सर्वंकष राज्यसंस्थेद्वारे वा समूहाच्या बळावर, व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी देऊनही, समता आणली पाहिजे असे मानतात ते डावे होत. डावे समूहोध्दाराचे दावे करून, समूहातील अंतर्गत विषमता लपवू पहातात. यांना समूह-बल-समतावादी म्हणू.

व्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करून व प्रत्येकाने इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करून व आपले उत्तरदायीत्व निभवून, जी परस्परपूरकता येते तीच सम्यक समता, असे मानतात ते उजवे होत. हे व्यक्तीउध्दार मानतात. म्हणून  यांना व्यक्ती-उत्तरदायीत्व-स्वातंत्र्यवादी म्हणू

भारतात हिंदुत्ववाद्यांना उजवे म्हणण्याची अशास्त्रीय प्रथा पडली आहे. उजवेपणा आणि हिंदुत्ववाद यांचा काहीही संबंध नाही.

श्रद्धास्वातंत्र्य या अधिकारात श्रद्धा निवडण्याचा व अश्रध्द असण्याचा अधिकारही मोडतो. इस्लाममधील काफीर, जिहाद आणि दार-उल-इस्लाम (इस्लामचे जगावर राज्य) ह्याच तीन मुद्यांमुळे श्रद्धास्वातंत्र्य स्पष्ट नाकारले जाते. कुफ्र किंवा काफीरियत म्हणजे पैगंबरोक्त अशाच ईश्वराशी व कायद्यांशी निष्ठा नसणे. इतर प्रेषितोक्त ईश्वर, बिन-प्रेषितोक्त ईश्वर, सर्वेश्वर, ब्रह्म, आत्मा, किंवा बौध्द अनात्मवाद या सर्व श्रद्धा, तसेच जडवाद मानणारे, हे सारेच काफीर ठरतात. त्यांना काफीरच राहण्याचा अधिकार म्हणजे कुफ्राधिकार होय.

जे श्रद्धास्वातंत्र्य मानतात ते कुफ्राधिकारवादी ठरतात. धर्माची जाचकता सर्वांनाच भोवते. पण मुस्लिमाना जास्तच भोवते म्हणून कुफ्राधिकार मुस्लिमांनाही मिळावा ही तळमळ कुफ्राधिकारवाद्याला असते, मुस्लिमद्वेष नव्हे. पण हिंदू पुराणमतवाद्यांत मात्र मुस्लिमद्वेष असतो.  

हिंदू-पुराणमतवाद या गोष्टीचा कुफ्राधिकाराशी काहीही संबंध नाही. दुर्दैवाने भारतातील अनेक कुफ्राधिकारवादी हे विनाकारण हिंदू पुराणमतवादात  गणले व गुरफटले गेले आहेत. (व यामुळे ऑक्सिगामी असूनही ओरिगामी बनले आहेत.) कुफ्राधिकार आणि हिंदू-पुराणमतवाद यात घोळ घालणे, म्हणजेच हिंदुत्ववाद होय. म्हणूनच कुफ्राधिकार की पुराणमत याची लेबले वेगळी काढली गेली पाहिजेत.

[श्रद्धास्वातंत्र्य हा शब्द सार्विक आहे. परंतु विवेकवाद्यांनी इस्लामचा उल्लेख टाळणे या गोष्टीला वैतागून अनेक जण हिंदुत्ववादाकडे वळत आहेत. म्हणून जाणीवपूर्वक कुफ्राधिकार हा शब्द योजला आहे]

याखेरीज आणखी एक अत्यंत महत्त्वाची जोडी आहे. तिच्यात वैरवाद की सर्वोदयवाद असे विकल्प असतात. वैरवादातून हिंसा, युद्धे, कारस्थाने, अविश्वास, अ-समरसता हे सारे वाढत जाते. हुकुमशाही किंवा फॅसीझम या गोष्टी वैरवादातूनच येतात. ब्रिटीश नकोत म्हणून हिटलरही चालेल हा वैरवादच आहे.

वैरवादी-श्रमिकधार्जिणे हे नक्षलवादाकडे जातात. वैरवादी-निम्नजातिधार्जिणे हे पँथर्स किवा ब्रिगेडींकडे जातात. वैरवादी स्त्री-धार्जिणे हे स्त्री-मूलतत्त्ववादाकडे जातात. अगदी निसर्गाच्या बाजूने मानवाशी वैर म्हणज वैरवादी-पर्यावरणवाद ठरतो. सर्वोदयी पर्यावरणवाद मानवी-निसर्गालाही समाविष्ट करतो. 

कोणत्याही न्यायप्रेमी माणसाला अबलपक्ष-धार्जिण्य आवश्यक असते. प्रश्न धार्जिण्यच नसावे असा नसून ते वैरवादी न बनता सर्वोदयवादी रहावे हा असतो. अन्याय रोखणे, प्रतिकार करणे, अन्यायकर्त्याविषयी सूडभावना न येऊ देणे व त्यालाही मानव्याकडे येण्याचे पर्याय पुरवणे असे सर्वोदयाचे न्यायविषयक धोरण आहे. विनोबाजींच्या संदर्भामुळे आपल्या मनात ओरिगामी-सर्वोदयच येतो. पण येथे ओक्सिगामी सर्वोदयही शक्य असतो हे ध्यानात घ्यावे.

या चार जोड्या वेगळ्या आहेत व त्यांची गल्लत करण्याने काहीच कळेनासे होते म्हणून या चार जोड्यांबाबत माणूस काय उत्तर देतो यानुसार त्याचे लेबल ठरावे   .

सारांश: शास्त्रशुध्द लेबल हे चार उत्तरांच्या सोळा जुळण्यांपैकी एक असेल   
   
                  ओरिगामी की ऑक्सिगामी?                 (०,१)
       समूह-बल-समतावादी की व्यक्ती-उत्तरदायीत्व-स्वातंत्र्यवादी?  (०,१)
               पुराणमतवादी की कुफ्राधिकारवादी?              (०,१)
                    वैरवादी की सर्वोदयवादी?                 (०,१)

माझे उत्तर (१,१,१,१) हे आहे.


     

3 comments:

  1. माझेही उत्तर ११११

    ReplyDelete
  2. इतिहासाच्या आकलनालाही हे वर्गीकरण उपयुक्त आहे.

    ReplyDelete
  3. मधली अवस्थाही असू शकते म्हणून द्वैत मांडणी (बायनरी) शक्य आहे का ह्याबद्दल शंका आहे. उदा.सौम्य पुराणमतवादी व बऱ्यापैकी कुफ्राधिकारवादी.
    प्रत्येक लेबलाच्या तीन पातळ्या (सौम्य,मध्यम,तीव्र) मानव्यात का? त्यामुळे हे वर्गीकरण अधिक व्यवहार्य होईल का?

    ReplyDelete