Friday, May 22, 2015

भाव नाही अंतरी....

 एका मराठी सिनेमात(बहुतेक शेवटचा मालुसरा) फूल आहे गंध आहे| भाव आहे अंतरी| देव नाही मंदिरी| असे एक गाणे होते. विविध उपासनांच्या नावाने जे काही व्यवहार चालताना दिसतात, त्यात बऱ्याच वेळा बाह्य औपचारिकता कशाबश्या पार पाडल्या जात असतात पण उपासनेच्या कार्यपद्धतीमध्ये गर्भित असणारे सार हरवलेले दिसते. मार्गांविषयी मतभेद असोत वा नसोत, सच्चेपणा नसला तर फारच खेद वाटतो. या सार(इसेन्स) विसरून संभारा(पराफर्नेलिया)त रमणाऱ्या उपासना पाहून वरील गाणे उलटे म्हणावेसे वाटते. फूल आहे, गंध आहे| देव आहे मंदिरी| भाव नाही अंतरी!

देखल्या देवा दंडवत असा वाक्प्रचारही याच अर्थाचा आहे. पण दंडवत ही क्रिया पुरेशी अवघड तरी आहे. कामाच्या घाईत कुठेतरी निघालेले असताना, वाटेत चुकून एखादे देऊळ लागलेच, तर काही मंडळी थोडेसे थांबल्यासारखे करून, चपला पायातून अर्धवट काढून व लगेच पाय अडकवत, ओळख दाखवल्यापुरते स्मित करावे तसा नमस्कार करून, मूळ ओघातच पुढे निघून जातात. हा खोटेपणा नसतो पण औपचारिकता किंवा आन्हिकच उरलेले असते. तुम्ही नाही नमस्कार केलात तरी देवाचे काही बिघडणार नसते. इतकेच काय पण रस्त्यात असताना पायात चपला असणे हेही काही अपवित्र वगैरे नसते. चपला काढण्यापेक्षा, चापल्य काढून ठेवून शांत होणे, हे नमस्काराला खरे आवश्यक असते.

एका आजींना जप करायचा होता पण माळ सापडत नव्हती म्हणून त्या अस्वस्थ होत्या. माळ नसली तर अडचण काय आहे? नामस्मरण म्हणजे नामाच्या निमित्ताने त्याचे स्मरण. तो सोडून काहीच मनात नको. प्रत्येक नाम हे पहिल्यांदाच घेतल्या इतके उत्कटतेने आणि शेवटचे असल्या इतके निर्धास्तपणे घेतले जावे. आत्ताचे हे कितव्यांदाचे? हा चिंता अप्रस्तुत ठरायला हवी. मोजून द्यावे लागते ते व्यवहारात. परमार्थात मोजून काय देणार? काहीतरी संख्येने भले मोठे उद्दिष्ट ठेवायचे आणि ते यशस्वीरित्या पार पाडायचे ही प्रक्रिया नमुनेदारपणे प्रापंचिक आहे, पारमार्थिक नव्हे. त्यात संचय वाढवत नेणे व विक्रम करणे येते. अपरिग्रह या अगदी प्राथमिक व्रताच्या विपरीत असे हे जपाचे संख्यात्मक उद्दिष्ट आहे. एक बालवाडीत चालणारी प्रार्थना आहे. या चला शारदेला| वंदु या काला (ह्या वेळी). या प्रार्थनेत शारदेचे अगदीच बालवर्गीयीकरण केलेले दिसते.
बसली पोथी घेउन हाती का शिकवायाला| वंदु या---
वाजवी वीणा जरि करमेना रमवाया बाला| वंदु या---
माळ जपाची घेऊनि हाती मणि मोजायाला| वंदु या---
यातून बालकांना शारदेची कल्पना येण्याऐवजी शारदेला बालकांची(शिक्षकांच्या आकलनानुसार) कल्पना देण्याचा प्रयत्न दिसतो. मणी मोजणे या क्रियेतून, आपण मोजणे ही सामान्य क्रिया शिकतो. मोजणे हा प्रकारच निदान काही काळ सोडून कसा देता येईल हा उपासनेपुढचा खरा प्रश्न असतो. जप, तप या गोष्टींकडे पुण्य अर्न करण्यासाठी मोजावयाची कॉस्ट असे पहिले जाते हे भजन या प्रकारचा महिमा सांगणाऱ्या पुढील पदात स्पष्ट दिसते.
जप तप साधन| कछु नहि लागत| खर्चत नहि गठरी|
भजो रे भैय्याऽऽ राम गोविंद हरी||

उप-वास म्हणजे जवळ-रहाणे अर्थात देवाच्या. कोणताही खराखुरा ध्यास असतो तेव्हा तहानभूक हरपते हे खरेच. पण तहानभूक मारण्याने ध्यास सिद्ध होत नसतो. एकजण म्हणाला अहाहा! काय सुंदर वास सुटलाय! पण नेमका आजच माझा उपास आहे. तिथेच अध्यात्माचे एक जाणकार उभे होते. ते म्हणाले, अरे ज्या क्षणी इच्छा झाली त्याक्षणीच उपास मोडला. आता खाल्लेस तरी काही बिघडत नाही. उल्लंघनाच्या भीतीखाली चालते ते कसले लंघन! पण संयम शिकण्यासाठी आम्ही लंघन करतो असाही एक युक्तिवाद आहे. कोणतेच आन्हिक नसताना प्रत्यक्ष जीवनाच्या ऐन धकाधकीत संयम शिकण्याच्या प्रचंड संधी उपलब्ध असतात. त्यातली एकही न घेता एक कृत्रिम नेपथ्य, पथ्य आणि पात्रयोजना करण्याची काय गरज आहे? जे उपास करतात ते एरवी संयमी असतात असेही दिसत नाही आणि जे उपास करत नाहीत ते संयमी नसतात असेही दिसत नाही.

तरीही उपासना ही गोष्ट खासगीरित्या चालते तेव्हा ती बऱ्याचदा निदान निरुपद्रवी तरी असते. सार्वजनिक उत्सव म्हणून जे कानठळ्या बसविण्याचे व्रत चालू आहे ते तर इतरांवर अतिक्रमण करून गाजवेगिरी आणि कोणाच्या तरी पैशावर फुकटात उंडगेगिरी या पलीकडे काहीही उरलेले नाही. मुळात इबादतको फर्ज न समझो बल्कि फर्जको इबादत समझो (उपासना हे कर्तव्य नसून कर्तव्य ही उपासना आहे) हे तत्त्वच खरे महान आहे. पण त्यातूनही (कर्तव्ये नसलेल्या गोष्टीही) केवळ उपासना म्हणून करताना कोणता भाव तीत अभिप्रेत आहे हे विसरले जाता कामा नये. भाव तोची देव!      

No comments:

Post a Comment