Thursday, May 7, 2015

हिंदू मानसिकता आणि फॅसिझम

इंट्रो: इस्लामच्या आक्रमकतेचे भय आणि पक्षपाती सर्वधर्मसमभाववाल्या राज्यकर्त्यांविषयीची उद्विग्नता यांनी ग्रस्त असलेले हिंदू लक्षणीय संख्येने आहेत हे खरेच. पण याचा अर्थ त्यांना मुस्लिम-माणसांविषयी द्वेष वाटतो असा नाही. तसा द्वेष पसरवण्याचे प्रयत्न कटाक्षाने हाणून पाडलेच पाहिजेत. परंतु त्यासाठी हिंदू-फॅसिझम नावाचे संकट येऊ घातलेले आहे असे आणखी एक भय ओढवून घेण्याची गरज नाही

प्रथम काही तथ्ये स्पष्टपणे अधोरेखित केली पाहिजेत. हिंदूधर्म नावाचा एकच एक व संघटित असा रिलीजन कधीच अस्तित्वात नव्हता व यापुढेही असणार नाही. एकमेकांशी सरमिसळ झालेले अनेक धर्माचरण-पंथ आणि तितक्याच वैविध्यपूर्ण श्रद्धा याच्या एकत्र समुच्चयाला, सिंधूनदीच्या पलीकडले असे, अरब उच्चारणात च्या जागी वापरण्याच्या दोषातून त्यांनी पाडलेले, ते भौगोलिक नाव आहे. व्हॅटिकनच्या पोपप्रमाणे उदाहरणार्थ शंकराचार्यांच्या हाताखाली नोकरशाही अस्तित्वात नाही व फतवे अमलात आणेल अशी दंडसत्ताही नाही. गावोगावीचे ब्राह्मण (व काही इतर जातींचे पुरोहित) अधर्म तर घडत नाहीना यावरचे निर्णय परस्पर देत असत, पण सत्ता जात-पंचायती, गाव-पंचायती व स्थानिक राजेरजवाडे यांचीच असे. पुरोहितांचे खरे कौशल्य धर्माप्रमाणे निवाडा देणे हे नसून झालेले निवाडे धर्मात बसते करून दाखवणे हे असे. जसे शापांना उःशाप असायचेच तसेच चुकांना भरपाईवजा उपाय निघायचेच व आजही निघत आहेत. त्यामुळे हिंदू परंपरा परिवर्तनशील असण्यात आश्चर्य असे काहीच नाही. दंभ ही दुरिताने श्रेयाला दिलेली मानवंदना असते! दंभ या मूलतः वाईट गोष्टीचा चांगला उपयोग करून घेण्याचे श्रेय हिंदू-परंपरेला दिलेच पाहिजे. सुधारणा करणे भागच पडते आहे असे दिसताच ती बसती करून घेण्याला आधार मिळण्यासाठी बहुजिनसी शास्त्रार्थ निघू शकतील अशा भरपूर श्रुतिस्मृती व पुराणे आहेत. गीता हा एकच एक ग्रंथ मानला तरी तीत विविध उलट सुलट गोष्टींना आधार देणारी सर्व-दर्शन-जत्रा उपलब्ध आहे.
हिंदू-नोंदित नागरिकांमध्ये नगण्य अल्पमतात असलेले सनातनी, हिंदू-धर्म हे नावही टाळून सनातन-वैदिक-धर्म नावाचा एकच एक धर्म वैध असल्याचे दावे करत असतात. पण बौध्द व जैन हे अ-वैदिक जरी बाजूला ठेवले तरी वेदप्रामाण्य मानणाऱ्यांतसुध्दा अजिबात एकवाक्यता नाही. उपनिषदे हा वेदांचा शेवटचा काव्यात्मक भाग अध्यात्मिक असला, तरी यज्ञ-प्रधान भाग चक्क सुखवादी असून त्यात ईश्वरही नाही आणि मोक्षही नाही. उपनिषदाधारित वेदांत या अध्यात्मिक प्रवाहातसुध्दा शांकरमताची मक्तेदारी मानणे निराधार आहे. अनेक आचार्यांनी पूर्वीच इतर पंथ काढले. नंतरच्या काळातसुध्दा खुद्द ज्ञानेश्वरमहाराजांनी शांकरमताशी बंडखोरी केलेली आहे. अगदी अलीकडच्या काळात उपनिषदांपासूनच निष्पन्न केलेला, डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकरमहाराज यांचा पूर्णवाद, हा इतका इहवादानुकूल आहे की तो जर पूर्वीच्या काळीच सापडला असता, तर हिंदू-रेफर्मेशन व एन्लायटनमेंट सुध्दा घडली असती की काय? असे माझ्या आशावादी मनाला वाटते. सेंट थॉमस अक्वायनसने ग्रीक तत्त्वज्ञानाला ख्रिस्तमार्गात स्थान मिळवून दिले. म्हणोनी अक्वायनसचा थोरू| विश्वासि जाहला उपकारू| अरिस्टॉलोक्ति उच्चारू| ख्रिस्ताचा केला. ख्रिश्चॅनिटीमध्ये प्रेषितोक्त धर्मांचे दोष असूनही चर्च इतपत सुधारले की नास्तिकसुध्दा कृपा-प्राप्त होऊ शकतो असा निर्वाळा सध्याच्या पोपनी दिला.

सैतान नस्से, सखा-ईश्वर व ए.टी.के.टी  
ईश्वराच्या असण्याने काय तोटे होतात यावर खूपच बोलले गेलेले आहे. पण सैतानाच्या नसण्याने किती प्रचंड फायदा होतो, हे अगदीच दुर्लक्षित राहिले आहे. राजा त्रैलोक्याचा| गुरुराज स्वामी| वसे अंतर्यामी| पांडुरंग एकनाथ, अवघाची संसार (म्हणजे हिंदीतला सन्सार)| सुखाचा करीन| आनंदे भरीन| तीन्ही लोक, तुकोबा, अशी वचने भरपूर सापडतात. वसे अंतर्यामी मुळे तो कोणीतरी बाहेरचा बॉस रहात नाही. तीन्ही लोक म्हटले की नरकाला व्यापणारा, नरकाचाही स्वामी आणि पापीजीवांच्या अंतर्यामी राहून दुःख भोगणाराही ईश्वरच रहातो! दुरितांचा स्वयंभू निर्माता असा जो सैतान तो हिंदू परंपरेत कुठेही नाही. जीव दुरितांच्या आधीन होतो तो अज्ञानामुळेच आणि अज्ञान हे अभावात्मक असल्याने, ती युध्द पुकारून पराभूत करण्याची गोष्ट नसते.
सैतान न मानण्याने जगाचे युध्दकेंद्री मॉडेलच कोसळून पडते. पारशी धर्मात एक सैतानसदृश पदार्थ आहे. पण माणसाकडे सोपवलेले कार्य हे ईश्वराला फक्त सत्कृत्यरूपी  रसद पुरवण्याचे आहे कुमक पुरवण्याचे म्हणजे त्याच्या सैन्यात भरती होण्याचे कार्य माणसाकडे नाही. पारशी हे उद्यमशील आणि उदार असतात पण जगाला पारशी करून सोडावे असे कर्तव्य त्यांना नसते.  
जे कुमक म्हणून भरती होतात ते क्रुसेड/जिहाद या मानवताविरोधी प्रकल्पात कृतकृत्यता मानू लागतात. सैतानाच्या प्रभावाखाली आलेल्यांना सक्तीने, एकमेव प्रभूचे पाईक तरी बनवायचे किंवा नष्ट तरी करायचे, हे कार्य माणसावर सोपवलेले असले तरच सहिंसक धर्मप्रसार उद्भवतो. धर्म नावाच्या गोष्टीतून आलेल्या अनेकांपैकी सर्वाधिक चिंताजनक प्रकार नेमका हा आहे. एकूणातच माणसाने करण्याची कामे ईश्वरावर सोडायची आणि ईश्वराने करण्याची कामे माणसाने हाती घ्यायची हा सर्वात मोठा लोच्या आहे.
सैतान व त्याचा युद्धात पराभव ही भानगड हिंदू, बौध्द, जैन, शीख, पारशी या कोणातच नाही. ज्यूडाइझम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम यातच ती आहे. त्यात वर म्हटलेल्या अक्वायनसच्या थोरू मुळे ख्रिश्चनांत बऱ्याच सुधारणा झाल्यात. अॅनाबाप्टिस्ट या ख्रिस्तीपंथात तर, आपले अपत्य प्रौढ होऊन त्याच्याशी वाद घालून त्याला पटविल्याखेरीज, बाप्तिस्मा द्यायचाच नाही अशी पद्धत आहे. इतके श्रद्धास्वातंत्र्य इहवादी राज्य-घटना सुध्दा देत नाही!
हिंदूपरंपरेत इतरांच्या मोक्षप्राप्तीची चिंता करायचीच नसते. त्यांना तो मिळणारच असतो. फरक फक्त किती जन्मांनंतर तो मिळेल एवढाच पडतो. ज्याच्या त्याच्या मगदूराप्रमाणे तो मिळतोच. ईश्वरप्रेमामुळे मगदूर वाढू शकतो तो मानसिकदृष्ट्या, पण निष्ठावान म्हणून वशिला लागत नाही. सुकृत भरपूर असेल तर तत्त्वमसि हे वाक्य चुकून ऐकणाऱ्या लाकूडतोड्यालाही तो मिळू शकतो. कोणत्याही जीवाला हिंदू तत्त्वज्ञान (जसे वस्तूंना विज्ञान लागू असावे तसे) लागू असतेच. त्यासाठी ना त्याला हिंदू गणले जाण्याची गरज असते ना इतरांना! जे मोक्षमार्गात मागे पडलेत, त्यांना सुचवून पहावे पण त्यांची प्रक्रिया  पूर्ण होण्याअगोदर ईश्वरही काही करू शकत नाही.
पापे ही पुण्यांनी कॅन्सल आउट होतात. म्हणजे दोन्ही भरपूर केली तरी तुमची केस ही  नेट पुण्यवान ठरू शकते. बरे! चालू जन्मात चुकारपणा झालाच तरी ए.टी.के.टी ची गॅरंटी असतेच. ज्यांना एकच एक जन्म आणि एकदाच निकाल, थेट स्वर्ग तरी नाहीतर थेट  नरकच आणि निष्ठा(फायडेलिटी) हेच पुण्य असे असते, त्यांच्यात जिहादीपण शिरू शकते. याउलट, ए.टी.के.टी मुळेच हिंदू अटीतटीला येत नाही.
युरोपियन्स हे बाप दाखव नाहीतर श्राध्द कर अशा थाटात, एकदम असा तरी नाहीतर तसा, तुटक निकाल लावतात. आशियाई हे निर्णयाभोवती गोलगोल फिरत स्पायरलमार्गे जवळ पोहोचून, आता जवळ जवळ झालाच आहे असे म्हणून अलगदपणे निर्णय घेतात व त्यात परतीचा मार्गही शिल्लक ठेवतात. विरुद्ध गोष्टी बऱ्याच अंशी मिसळलेल्या असतात. भारतातील हिंदूंत व इतरांतसुध्दा, सर्वच बाबतीत अनौपचारिकता, व्यक्तिगत संबंध, गोड मानून/चालवून घेणे व कमालीची शिस्त-अ-प्रियता आहे. त्यांचे रेजिमेंटेशन अशक्य आहे. लोकसंग्रहार्थ (म्हणजे सामजिक शिस्त रहावी म्हणून) प्रसंगोपात्त खल-निर्दालन जरी उल्लेखिले गेले, तरी मुख्य शिकवण, खळांची व्यंकटी सांडो| तया सत्कर्मी रति वाढो हीच आहे.
ईश्वराला सखा मानणे ही हिंदूंची खासियत आहे. श्रीकृष्ण हा या गोष्टीचा शिखरबिंदू (एपिटोम) आहे. तमाशात कृष्णावर आणि कृष्णाच्या तोंडी जे विनोद येतात ते ऐकून कोणाही भाविकाच्या भावना दुखावत नाहीत. हिंदुत्ववादी सुधीर फडके व परंपरानिष्ठ गदिमा यांनी केलेले पुढील सिनेगीत भाविकांनी निरागसतेनेच घेतले.. 
कृष्ण तुझा बोले कैसा| ऐक ग यशोदे| लपविलेस चेंडू म्हणतो| उरी तूच राधे||
 ----परतुनी मला दे|
कटिस मिठी मारी झोंबे| मागतो रडूनी| निरी धरुन येऊ बघतो| वरी हा चढोनी
बाळपणी जाईल वाया| जन्म अशा नादे|---- परतुनी मला दे
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी अस्तित्व, पुष्पं-पत्रं-फलं-तोयं अशा अर्पिण्याच्या गोष्टी, हे सारे खोलवर रुजलेले आहे. एसटीतून जाताना नदी लागली की अनेकांचे हात जोडले जातात. बसमध्ये दिवे लागले तरी हात जोडले जातात, टेक्स्टबुकला पाय लागला तर नमस्कार केला जातो. सावता माळ्याने श्रमातच विठ्ठल बघणे अशा अनेकानेक गोष्टींतून भाव तोची देव हे रुजलेले आहे.

फॅसिझम/नाझीझमचे विशिष्ट स्वरूप
कोणतीही क्रूर हुकुमशाही (टायरनी) अशा व्यापक अर्थाने फॅसिझम हा शब्द वापरणे योग्य नाही. भांडवलशाहीच्या एका अवस्थेत, इतरत्र प्रत्यक्ष साम्राज्य करूनच, अंतर्गत कोंडी सोडवता येणे, हे भांडवली राष्ट्रांना शक्य होते. त्यात ज्या राष्ट्रांनी यशस्वीरित्या प्रत्यक्ष साम्राज्ये स्थापली नाहीत, त्यांना अभिजात भांडवली अरिष्ट भोगावे लागले. जनतेची दुरवस्था ही आपले साम्राज्य नाही म्हणून अशी मांडता आली. अगोदरपासून साम्राज्ये असलेल्या राष्ट्रांना पराभूत करून आपले साम्राज्य स्थापणे हाच एक तरणोपाय   असल्याचे जनतेला पटविता आले. लष्करीकरण, आक्रमकता आणि एकायतन सत्ता ह्या गोष्टी जनतेलाही आवश्यक वाटल्या. त्यातून नाईलाजाने नव्हे तर ओजस्वी असूनही अनुयायी लाभले. अंगात युध्दज्वर संचारावा यासाठी टोकाची द्वेषाधिष्ठित प्रेरणा निर्माण केली गेली. जर्मनीत शुध्द आर्यन रक्त आणि ज्यू हे सर्व संकटांचे कारण ही खोटी गोष्ट काहीकाळतरी बहुतेकांना खरी वाटली. हीच संधि आहे न पेक्षा सैतान जिंकेल ही कडेलोटाच्या काठावर असल्याची भावना, प्रेषिती व ग्रांथिक धर्मांच्या पार्श्वभूमीमुळे भल्याभल्यांच्या अंगात भिनू शकली. सत्य कळल्यानंतरचा जर्मनांचा पश्चात्ताप, सर्वच युरोपात पसरलेले असारवादी स्मशान-वैराग्य यातून आता सर्वच जग बरेच सावरले आहे. सैतानाचा पराभव करण्याचा प्रकल्प हाच खरा सैतान आहे ही अक्कल आता बऱ्याच जणांना आलेली आहे.
मुख्य म्हणजे आता जागतिक भांडवलशाहीचे स्वरूप असे बनले आहे की अप्रगत देशातील श्रमिकांना घाबरणारा उलट्या काळजीचा व्यापार-टाळू-पणा प्रगत देश दाखवत आहेत. आता चीन विरुध्द भारत ही स्पर्धा युद्धाने ठरणारी राहिलेलीच नाही. आज जर भारताला चीनवर लष्करी विजय मिळवण्याची निकड (क्षमतेचे सोडा) असती आणि भारतात एखादी चीनी-वंशाची जमातही असती तरच आज भारतात नाझीझम/फॅसीझम हे शब्द मूळ अर्थाने वापरता आले असते.

भारतीय राजकारणात मूल्यप्रणालींचे सपाटीकरण झाले आहे. काँग्रेसला पर्याय देऊ शकणारे कोणीतरी भक्कम हवे इतपतच हिंदुत्ववाद्यांचा खरा रोल आहे. खुद्द काँग्रेसमध्ये  दैदिप्यमान चिवटपणा आणि भाविक असूनही (किंबहुना भाविक असल्यामुळेच) हिंदुत्ववादी नसलेल्या हिंदूंना आपल्या बरोबर राखण्याची क्षमता आहे. प्रांतीय पक्ष, कुंपणावरील पक्ष आणि थर्ड फ्रंट हे सारे मिळून काँग्रेसविरोधी मते प्रचंड प्रमाणात फोडू शकतात. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना निर्णायक बहुमत मिळणेच मुळात अवघड आहे. खुद्द हिंदुत्ववाद्यांचे अंतर्गत उपप्रकार हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे पण त्यांत सनातनीही निष्प्रभ आहेत व गंभीर-फॅसिस्टही. हे सर्व राजकीय वास्तव, हिंदूंअंतर्गत जातिसंघर्ष व त्यांची वर मांडलेली मानसिकता, हे सारे लक्षात घेतले तर हिंदू-फॅसिझमचा उदय होईल की काय? हे भय किती काल्पनिक आणि अनावश्यक आहे हे सहज ध्यानात येईल.    

5 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. http://aisiakshare.com/node/4019 याठिकाणी आमच्या एका मित्राने वसंत व्याख्यानमालेतील आपले भाषणावर लिहिले आहे.

  ReplyDelete
 3. नाही बाबा फार काही आवडले.

  ReplyDelete
 4. नाही बाबा फार काही आवडले.

  ReplyDelete
 5. हिंदू हे नाव न वापरता सनातन धर्म नाव वापरले तर जास्त समर्पक नाव नाही का होणार ? त्याने प्रचलित धर्मापेक्षा वेगळा धर्म सूचित होतो का?
  मला फक्त नामभेद वाटतो.हिंदू -सनातन धर्मात Fascism मुळातच अनुस्यूत नाही तर हिंदू हिंदुत्ववाद जो काही लोक हिंदू Fascism अशा अर्थाने वापरतात तो शब्द प्रयोग चुकीचा नाही का?

  ReplyDelete