Friday, May 15, 2015

दुखमे सुमिरण सब करै-----

कबीरांचे दोहे हे अनेक भावावस्था व्यक्त करणारे आहेत. त्यातील काही दोहे हे, भूमितीचे प्रमेय किंवा एखादी गणिती सिद्धता मांडावी असे, टाचीव व बिनतोड युक्तिवाद देणारे आहेत. अर्थात, आपण जी कोणती दार्शनिक भूमिका मानत असू, तिच्याप्रमाणे त्यांच्या संज्ञांचे व वाक्यांचे अर्थ लावण्यात, फरक पडतो. पण कमाल अशी की कबीरांचे युक्तीवाद हे वेगवेगळ्या अर्थांनीसुध्दा बिनतोड रहातात! आपण आज त्यांचा एक सुप्रसिध्द दोहा घेऊ.

दुखमे सुमिरण सब करै| सुखमे करै कोय|
 जो सुखमे सुमिरण करै| दुख काहे का होय|

सुमिरण हा स्मरणचा अपभ्रंश आहे हे उघड आहे. आता प्रश्न असा येतो की कशाचे स्मरण? सुरुवातीला आपण सुटसुटीत ईश्वरवादी अर्थ लावून बघू. दुःखात असताना ईश्वराचे स्मरण होतेच. ईश्वराला त्याचे काही कौतुक नसते. पण जे कोणी, सुखात असतानाही ईश्वराचे स्मरण सुटू देतात नाहीत, अशा खरया भक्तांना ओळखून, ईश्वर त्यांच्याच दुःखांचे निवारण करतो. सुखात असतानाही ज्याची भक्ती आटत नाही तोच खरा भक्त, हा (ईश्वर मानला तर) अगदी भक्कम युक्तिवाद आहे.

आता आपण ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म असे काहीही पारलौकिक न मानता याच दोह्याचे इहवादी अर्थांकन (इंटरप्रिटेशन) करून पाहू. असे अर्थांकन गृहीत धरून ह्या दोह्याचे मराठी रूपांतर देत आहे.

दुःखात भान ये साऱ्यांना| सुखात कोणा ते न उरे|
 सुखात जो राखे भाना| त्याला दुःख कशाचे रे|

येथे सुमिरण करै चा अर्थ भान रहाणे आणि करै न कोय चा अर्थ भान सुटणे असा लावला आहे. आता प्रश्न येतो की कशाचे भान? मी अर्थ लावतो आहे की अनित्यतेचे भान! सारे काही तात्पुरते आहे काहीही टिकणारे नाही असे भान म्हणजे अनित्यतेचे भान.

जेव्हा दुःख असते तेव्हा, हे आत्ता असले तरी जाणारे आहे, अशी आशा हा जीवाला आधार ठरते. त्यामुळे दुःखाचे तात्पुरतेपण हे स्वाभाविकच अधोरेखित होत असते. पण सुख होत असताना, ते तसेच चालू रहाण्यात स्वारस्य असते. त्यामुळे सारे काही तात्पुरते आहे ही गोष्ट नकोशी वाटते व जीव त्या सत्याची झाकपाक करतो किंवा ते सत्य दृष्टीआड (ऑब्सक्यूअर) करतो. गोची ही सुखात नसून, ते चालूच राहिले पाहिजे या हट्टात असते. सुख चालू राहणार असल्याचे काल्पनिक सुखही नकळत घेतले जाते. हे जे सातत्य-आशेचे सुख असते ते त्यागले पाहिजे. सुख सातत्याची आशा त्यागली की आसक्ती जाते. (तसेच दुःखाचा अभाव टिकावा याबाबतची आशा त्यागली की घृणा आणि भय जाते.) म्हणूनच अनित्यतेचे भान हे सुखातही टिकणे असा जो सुखमे सुमिरण करै| या चरणाचा अर्थ लागतो.

आता दुख काहेका होय| हा चरण लक्षात घेऊ. कसलेच दुःख उरत नाही असा त्याचा अर्थ नाही. आपल्याला ठेच लागली तर आपण कळवळणारच! त्या प्राथमिक वेदनेवर उपाय म्हणजे औषध लावणे व घेणे हाच असणार. तसेच धोंडा वाटेतून काढून टाकणे हाही असणार. प्राथमिक दुःखाला वैज्ञानिक व व्यावहारिक उपायच हवेत. 
पण ठेच मलाच का लागावी? आत्ताच कां लागावी? हे नेहमी असंच का होतं? असले विचार करून आपण दुःखाचे दुःख करायला शिकलेलो असतो. ही असतात स्वनिर्मित प्रतिक्रियात्मक मानसिक दुःखे. यातही 'दुःख वाट्याला न आलेल्या अवस्थेचे' सातत्य टिकावे हाच हट्ट असतो. या दुःखांचे निवारण आत्मविद्येने होते. म्हणजेच एकदा का सातत्याचा हट्ट सोडून अनित्यता स्वीकारली की स्वनिर्मित दुःखे होणे थांबते. एवढ्याच पण महत्वाच्या अर्थाने दुख काहेका होय| हा चरण घेतला पाहिजे. दुःख होणे पण दुःखी न होणे, डिस्टर्ब्ड न होणे हा मुद्दा आहे.

सारांश, ज्याला 'सुख चालूच रहाणार' या कल्पनेतून मिळणारे दुय्यम सुख सोडता येते त्याला दुय्यम दुःखातूनही मुक्ती मिळते. असे हे अगदी तर्कसंगत म्हणणे आहे. अशा तऱ्हेने आपण कबीरांचे प्रमेय इहवादी अर्थानेही बिनतोड असल्याचे पाहू शकतो.

जरा जास्तच इहवादी अर्थही शक्य आहे. आपण चेकाळलो असताना चुका करतो कारण अगोदरच्या चुका व त्यापासून घेतलेले धडे यांचेही स्मरण चेकाळल्याने सुटते. पश्चात्ताप करताना तो अगदी रंगवून रंगवून करायचा व त्याचे दुःख भोगायचे हे निरुपयोगी असते. पूर्वीच्या चुकांचे आत्मपरीक्षण व येऊ घातलेल्या पेचांची पूर्वतयारी करायला, निर्वाणीच्या प्रसंगी ऊर्जा नसते. जेव्हा सुखात असतो तेव्हा ऊर्जा भरपूर असते व ती उपलब्ध असतानाच, आत्मपरीक्षण व पूर्वतयारी करून घेतली पाहिजे. म्हणजेच संभाव्य चुकांचे सुखमे सुमिरण केले की त्याही टळतात व त्यांच्या पासून पुढे होणार असलेले दुख काहेका होय हे ओघाने आलेच.

                     

5 comments:

 1. When applied to Bhgwadgeeta, the same इहवादी approach makes one wiser and more objective participant in the process of living. On the whole I appreciate your view!

  ReplyDelete
 2. दु:ख / सुख व त्यांचा वेळशी असणाऱ्या संबंधाचे 'भान' नसल्याने होणाऱ्या मानसिक त्रासाचे थोडक्यात 'आक्कलन' करून दिल्या बद्दल राजीव सरांचे आभार.

  ReplyDelete
 3. छान उलगडुन दाखवलयस !

  ReplyDelete
 4. छान उलगडुन दाखवलयस !

  ReplyDelete
 5. सुख आणि दुःख हे दोन्ही राग- द्वेष नावाचे क्लेश आहेत. त्यांचे मुळ अविद्या आहे. जे अनित्य आहे त्याला नित्य समजणे,जे अपवित्र आहे त्याला पवित्र समजणे ,जे दुःखमय आहे त्याला सुखमय समजणे, जे अनात्म आहे त्याला आत्मा समजणे या सर्व समजाला अविद्या म्हणतात. विवेकी माणसाला सारा संसार दुःखमय वाटतो.सुख-दुःख स्पर्ष मात्र आहेत. शीतल स्पर्ष सुखदायक वाटतो. उष्ण स्पर्ष दुःखदायक वाटतो. ते येतात जातात. नित्य नाहीत तेव्हा ते सहन करणे-त्यांची तितिक्षा करणे योग्य असे गीता सांगते.

  ReplyDelete