Friday, May 22, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - 2 उत्तरे

१) नेहमीच्या वापरातील सपाट आरशात ‘डावे-उजवे’ उलटलेले दिसते पण
  ‘वर- खाली’ मात्र उलटत नाही. हे कसे?

हा प्रश्न प्रकाशकिरणांच्या आकृत्या काढून सुटणारा नाही. हा प्रश्न ऑप्टिक्सचा नाही. डावे-उजवे उलटते ते आरशात नव्हे तर आरशाबाहेरील प्रत्यक्ष जीवनात. समजा मी (कल्पनेने) एकाचा दोन झालो आणि त्यातला एकजण माझ्या समोर येऊन माझ्याशी सन्मुख झाला तर तो १८० अंशात वळूनच हे करू शकेल. त्या प्रतिमेची डावी बाजू माझ्या उजव्या बाजूसमोर येईल व तसेच उलट पक्षी. हे जे प्रत्यक्षातले उलटणे आहे ते आरशात न घडल्याने डाव्या बाजूसमोर आरशातल्या प्रतिमेची डावीच बाजू येते व उजवीसमोर उजवीच!

पाठीला पाठ लावूनही आपण तोंडे विरुध्द दिशेला करू शकतो आणि एकमेकांकडे समोरून बघतानाही आपली तोंडे विरूद्धच दिशेला असतात. सन्मुख-विरुध्द आणि विन्मुख-विरुध्द! 


२) आपण स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही. असे का व्हावे?


  समजा आपण टेडी बेअरला गुदगुल्या केल्या तर गुदगुल्या करण्याचा अनुभव आपल्याला येईल पण गुदगुल्या होण्याचा अनुभव(कोणालाच) येणार नाही. आपल्याला सतत यत्नेन्द्रीय-प्रत्यक्ष फीडबॅक मिळत असतो. आपण जे करतो त्याचा प्रत्यय ठळक होतो. जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपले विषयीत्व(सब्जेक्टहुड) भोक्ता-पवित्र्यात(अंडरगोइंग मोड) न रहाता कर्ता-पवित्र्यात(डूअर मोड) शिफ्ट झालेले असते. तसेच अनपेक्षितपणे केलेल्या गुदगुल्या या जितक्या होतात त्यामानाने सांगून केलेल्या होत नाहीत. कारण गुदगुल्या होणार असलेली व्यक्ती तिचा भोक्ता-पवित्रा हा गुदगुल्या न होऊ देण्याच्या तयारीत ठेवते. पण स्वतःच कर्ता आणि स्वतःच भोक्ता म्ह्टल्यावर अनपेक्षितता उरूच शकत नाही. जिला गुदगुल्या करायच्या आहेत तिला त्या व्हाव्यात यासाठी ती बेसावधपणे भोक्ता पवित्र्यात असावी लागते. 
(व्यक्ती हा शब्द मराठीत स्त्रीलिंगी आहे हा केवळ योगायोग समजावा)  

३) निमिषार्धात आणि क्षणार्धात यापैकी कोणता शब्दप्रयोग शास्त्रशुद्ध आहे? का?

  निमिष म्हणजे पापणीची उघडझाप होण्यास लागणारा अवधी. हा खूपच लहान असतो पण तो अवधी असल्याने त्याच्या निम्मा अवधी ही गोष्ट आयामिकदृष्ट्या सुसंगत असते. पण क्षण हा मुळात अवधी नसतोच (जसे बिंदू हे अंतर नसतेच) त्यामुळे क्षणाच्या निम्मी ही गोष्ट अचिंत्य (इनक्न्सीव्हेबल) व त्यामुळेच निरर्थक असते. म्हणून निमिषार्धात असे म्हणणे हेच (अतिशयोक्तीपूर्ण असू शकेल पण) शास्त्रशुध्द आहे
 

४) अनीता हे नाव चांगल्या अर्थाचे आहे. हा चांगला अर्थ कोणता?

  सुनीती या नावात जो नैतिकतेचा निर्देश होतो त्याच्या उलटे नाव अनीती असे होईल व तसे नाव कोणी ठेवणार नाही. नीअ हा धातू नेणे या अर्थाचा आहे. जशी जेता आणि जित ही जोडी आहे तशी नेता आणि नीत ही जोडी मानता येते. जी स्वतंत्र आहे, जिला अनुयायी बनवता येणार नाही, जिला हवे तसे नेणे शक्य नाही म्हणजेच जी नीत बनू शकत नाही ती अनीता (अनीती नव्हे) हा चांगला अर्थ आहे.

५) फक्त धनविद्युतभार किंवा फक्त ॠणविद्युतभार असलेल्या सुट्या वस्तू    
  शक्य होतात. पण एकाच ध्रुवाचा चुंबक कधीच बनविता येणार नाही असे  का?


  ज्या वस्तूत रासायनिकदृष्ट्या आवश्यकतेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स कोंबले गेलेले असतात व ते अ-वाहक भोवताला/आवरणामुळे बाहेर पडू शकत नसतात. ती वस्तू ॠणविद्युतभारित होते. तसेच जिच्यात इलेक्ट्रॉन्सचा तुटवडा निर्माण केलेला असतो व अ-वाहक भोवताला/आवरणामुळे इलेक्ट्रॉन्स आत शिरू शकत नसतात ती वस्तू धनविद्युतभारित बनते.
चुंबकीय क्षेत्र हे विद्युतभाराच्या गतीशी काटकोनात (ट्रान्सव्हर्स डायरेक्शन) उत्पन्न होते. इलेक्ट्रॉन्स हे त्यांच्या इतर प्रवासांखेरीज स्वतःभोवती गिरक्या (स्पिन) घेत असतात. गिरकीच्या काटकोनात म्हणजेच गिरकीच्या अक्षाच्या दिशेने चुंबकीय क्षेत्र तयार होत असते. स्पिन म्हणजे स्वतोभ्रमण(गिरक्या) हे एका बाजूने पाहिल्यास अपसव्य (अँटी-क्लॉकवाईज) तर दुसऱ्या बाजूने सव्य(क्लॉकवाईज) असे असतेच. म्हणजेच एकेक इलेक्ट्रॉन हा सर्वात लहान चुंबक असतो व त्याच्या अक्षाला दक्षिणोत्तर ध्रुव असतात. इलेक्ट्रॉन तोडणे व दोन्ही तुकड्यांना परस्परविरुध्द दिशेने फिरायला लावणे अशक्य असते. 
जेव्हा इलेक्ट्रॉन्सच्या अक्षदिशा समांतर होतात तेव्हा मोठा चुंबक तयार होतो. किमान घटकच द्विध्रुवीय असल्याने एकध्रुवीय चुंबक ही अशक्य गोष्ट आहे. सुटसुटीतपणे सांगायचे तर तुम्ही चुंबक त्याच्या अक्षदिशेच्या निम्यावर तोडलात तरीही एकाच दिशेचे दक्षिण-उत्तर-दक्षिण-उत्तर असे दोन चुंबक बनतील आणि असे कितीही तोडत गेले तरी द्विधृवीयता कधीच जाणार नाही.   

2 comments:

  1. ‘मर्मजिज्ञासा’ च्या प्रश्नांना वाचकांनी प्रश्नसंचाखालीच उत्तरे देणे अपेक्षित आहे अथवा नाही ? पहिला प्रश्नसंच ब्लॉग वरून काढलेला दिसतो. या प्रश्नांना काही वाचकांनी ‘comment’ स्वरूपात उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. माझी विनंती आहे कि ब्लॉगची जुनी पाने (आणि त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा) delete न करता ठेवावीत. एक व्यासपीठ (forum सदृश) निर्माण होईल. चर्चेला जास्त रंगत येईल.

    ReplyDelete
  2. अनीता चा अर्थ माझ्या दृष्टीने जे पुन्हा निर्माण होत नाही .अनित्य ,जे नित्य दृष्टीस पडत नाही ते . मी संस्कृत तद्न्य नाही .पण मला वाटते ते बरोबर आहे का ? पहा .

    ReplyDelete