Friday, June 5, 2015

मर्मजिज्ञासा प्रश्नसंच - 3 उत्तरे

१) तू मला आवडतेस(किंवा आवडतोस) या वाक्यातला कर्ता कुठला आणि   कर्म कुठले?

क्रिया ही जेव्हा वक्त्याच्या मनातल्या मनात घडत असते आणि वक्त्याला काहीतरी वाटायला लावत असते तेव्हा ती क्रिया विषय म्हणजेच ऑब्जेक्टनी केली असे सकृतदर्शनी दिसते. मला अमुक मालिका बोअर होते यात बोअरिंगपणा हा जरी मालिकेचा गुण म्हणून कथन केला असला तरी, मला हा विषयी(सब्जेक्ट)च अभिप्राय देत असतो. विषयी कर्ता/भोक्ता/ज्ञाता इत्यादी असतो. त्यामुळे तू मला आवडतेस. या वाक्यातील (व्याकरणदृष्ट्यादेखील) कर्ता मला हाच ठरतो. तू मला भुलवतीयस असा आरोप केला तर मी भुलतो आहे अशी वक्त्याच्याच मनात घडणारी क्रिया उरत नाही. तिच्या कडून (आरोपिततः) कृती होतेय असा दावा असल्यामुळे तू हा कर्ता ठरतो. 

२) मराठीतील कर्तरी-कर्मणी आणि इंग्लिशमधील अक्टिव्ह पॅसिव्ह ही प्रकरणे एकच आहेत की वेगवेगळी?

ही अगदी वेगवेगळी प्रकरणे आहेत. कर्तरी-कर्मणी हा भेद फक्त क्रियापदाची रूपे बनवण्यापुरता मर्यादित आहे. रामू/सीता आंबा खातो/खाते. असे कर्त्याच्या लिंगानुसार रूप बदलले. तेच भूतकाळात, आंबा खाल्ला/कैरी खाल्ली असे कर्माच्या लिंगानुसार बदलेल.

इंग्लिशमधील अक्टिव्ह/पॅसिव्ह मध्ये मात्र कर्माला कर्ता आणि कर्त्याला कर्म बनविले जाते. आंबा रामूकडून खाल्ला गेला असे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होईल. जेव्हा प्रक्रियेचे वर्णन व्यक्तीनिरपेक्षपणे करायचे असते तेव्हा हा व्हॉइस उपयोगी पडतो. प्रथम उसाचे बारीक तुकडे केले जातात. नंतर त्यांच्यावर------ अशा प्रकारे. कार्य-रीत मांडून ठेवणे ही गरज औद्योगिक क्रांतीशी संबंधित आहे. कोण करतो हे महत्त्वाचे नाही तर काय केले जाते हे महत्त्वाचे ठरते तेव्हा पॅसिव्ह व्हॉइसचा वापर वाढतो. म्हणूनच कदाचित इंग्लिश व्याकरणात तो आवर्जून सांगितला गेला.
आपल्या भाषेत निर्जीव वस्तूंना उगाचच लिंगे असतात. ती निर्जीवांसाठी न्यूटर जेन्डर आणि स्त्री/पुरुष कोणीही असू शकेल तिथे कॉमन जेन्डर अशी इंग्लिशमध्ये असतात. इंग्लिश लोकांना मराठी (बंगाली सोडून कोणतीही) भाषा शिकताना लिंगांचा फुकट व्याप होतो. आपल्याला त्यांची स्पेलिंगे लक्षात ठेवावी लागतात तर त्यांना आपली लिंगे! असो.   

३) साबण कोणत्याही रंगाचा असला तरी फेस पांढराच होतो. असे का?

बुडबुड्यांचे द्रव-कवच अगदी पातळ असते. त्यामुळे ते रंग पाणचट (डायल्यूट) होऊन प्रायः पारदर्शक बनते. हे झाले एकेका बुडबुड्याबाबत. पारदर्शक कवचाचा घनगोलक (स्पीअर) प्रकाशकिरणांचे अंतर्गत परावर्तन आणि वक्रीभवन करत असतो. अगदी लहान असे भरपूर संख्येने दाटीवाटीने बसलेले घनगोलक हे किरणांना इतके विस्कटून टाकतात की प्रकाश विकीर्ण (डिफ्यूज्ड) होतो. फेस हा आपल्याला विकीर्ण प्रकाशाद्वारे दिसत असल्याने तो पांढरा दिसतो.

४) एकेका वर्तुळपाकळी(सेक्टर)वर सात रंग लावलेली चकती वेगाने फिरवली तर ती पांढरी दिसते. त्याच रंगांच्या लेपन-द्रवांचा(पेंट्स) काला केला तर तो मात्र जवळपास काळा होतो. असे का?

अमुक रंगाचा पृष्ठभाग म्हणजेच त्या रंगाचे किरण परावर्तित करणारा आणि बाकीचे शोषून घेणारा पृष्ठभाग. जेव्हा चकती फिरते तेव्हा एकामागून एक असे करत सर्व रंगकिरण परावर्तित होत रहातात. दृष्टीसातत्यामुळे परावर्तनांची बेरीज होत जाते व सर्व रंगकिरणांची बेरीज असा पांढरा रंग दिसतो.
लेपनद्रव्यांचा काला करताना प्रत्येक लेपनद्रव्याच्या एक सोडून इतर रंगकिरण शोषून घेण्याच्या क्षमतेची भर पडत जाऊन बेरीज होत जाते. सर्वच रंगकिरणांचा अभाव असा जो काळा तो रंग दिसू लागतो.    

५) सिझेरियनचा मुहूर्त साधून बालकाचे भविष्य घडवता येईल काय?

यात तीन मोठ्या अडचणी आहेत. एकतर जन्मवेळ या एका साध्या गोष्टीने जीवन ही अत्यंत व्यामिश्र गोष्ट नियत होते हेच पटण्यासारखे नाही.
दुसरे असे की ज्योतिष-सदृश सर्वच (मूलतः अ-संबंधित गोष्टींत) आढळलेले संबंध जोडून देऊन त्या आधारे प्राक्कथने (प्रेडिक्शन्स) करणारी जी जी शास्त्रे आहेत त्यांच्यात एक मूलभूत गोची आहे. जर शास्त्र खरे ठरले तर काही उपाय करता येत नाही आणि जर उपाय करता आला तर त्यायोगेच शास्त्र खोटे पडते.

तिसरी अडचण तर भविष्य घडविणे ही गोष्ट आरपार अशक्य करून सोडणारी आहे. समजा मुहूर्त काढून सिझेरियन केलेच तर तुलना कशाशी करणार? एकाच बालकाचे दोन वेगळ्या वेळांना दोनदा सिझेरियन करणे व त्या दोन आयुष्यांची एकमेकाशी तुलना करणे हे कसे शक्य आहे?

खरेतर अमुक निर्णय वेगळा घेतला असता तर आयुष्य कसे बदलले असते याची कल्पना करणे अशक्य असते. कारण नंतरचे असंख्य निर्णय वेगळ्याच विकल्पांनिशी उद्भवले असते आणि तितके निर्णय वेगळे कल्पून पहावे लागतील. त्यामुळे इतिहास ही अनन्यतेने घडलेली गोष्ट रिवाइंड करून व फास्ट-फॉरवर्ड करून अन्य तऱ्हेने कल्पिणे हे कोणालाच करता येत नाही. इंग्रज आलेच नसते तर? असा इतिहास कल्पिणे हे अनेक दिशांनी जाणारे व अ-निर्णायकच रहाणारे असते.

आपली सद्यस्थिती ही अनेकानेक योगायोगांवर अवलंबून प्राप्त झालेली असते या विदारक सत्याला सामोरे गेलेच पाहिजे.  

No comments:

Post a Comment