Friday, June 26, 2015

अष्टांगयोग नव्या स्वरूपात



आंतरराष्ट्रीय योगा दिवस जाहीर झाला आहे. योगाचे महत्त्व सर्वांनाच पटू लागले आहे ही आनंदाचीच गोष्ट आहे. आसन आणि प्राणायाम ही अष्टांग योगाची दोनच अंगे आहेत. योग हे नऊ दर्शनांपैकी एक दर्शन आहे. म्हणजेच त्यात जीवनदृष्टी मांडलेली आहे. ही जीवनदृष्टीही मोक्षकेंद्रीच आहे व सध्या प्रचारात असलेल्या साहित्यावर शांकरमताचाही प्रभाव आहे.

वैराग्यवाद मायावाद यांमुळे ही जीवनदृष्टी जशीच्या तशी मान्य करता येणार नाही. युगानुकूल, जीवनाभिमुख आणि विवेकवादी दृष्टीने पहाता योगदर्शनाच्याही पुन:सुत्रांकनाची गरज आहे. यावर सविस्तर चर्चा व्हावी म्हणून जी मूळ अष्टांगे मांडली गेलेली आहेत त्यांची एक पुनर्मांडणी पुढील कोष्टकात देत आहे. माझी दृष्टी ही सर्वांना पटेल असे नाही. पण हीसुध्दा दृष्टी असू शकते व त्यात मूळ परंपरेचे समृद्धीकरणही होऊ शकते अशा खुल्या मनाने ती पहावी ही विनंती    

यम:   अदंभ, अनसूया, अप्रतिशोध, अस्वामित्व, अनाश्रितता

नियम: उपायदृष्टी, भाग्यस्वीकृती, स्व-पिंड-जिज्ञासा, रस-रक्षणार्थ रस-संयम,  
      अमूर्तचिंतन   

आसन: कायिकमुद्रा व आविर्भाव यांचे सहायाने मनोवस्था नियंत्रण, कर्ष  
      आणि शैथिल्य हे एकमेकांवर उतारे म्हणून वापरून उत्साहवर्धन,
      यत्नशक्तीचे अपव्ययरहित प्रचालन 

प्राणायाम: मनोवस्था आणि शारीरक्रिया यातील पारस्परिकता वापरून दोन्हीत   
         सुधारणा 


प्रत्याहार: उर्मींचे विषयांतर करून दुर्गुणांना विकल व सद्गुणांना ओजस्वी   
        बनविणे, क्षमतावर्धनासाठी सध्याच्या क्षमता अल्पशा आव्हानित  
        होतील अशी उद्दिष्टे घेणे  

धारणा:  संकल्पशक्तीत विचलन न येऊ देणे, बुद्धीला भावनांवर आरूढ करणे 

ध्यान: करण्याकडून होऊ-देण्याकडे वळणे, चिकित्सा व यत्न निलंबित
      ठेवून शांत होणे

समाधी: विनाअट आनंद असू शकतो याचा अनुभव घेणे. यातून  
        प्रतिकूलतेविषयी निर्भयता






No comments:

Post a Comment