Friday, June 19, 2015

प्रायश्चित्त! स्वतःवर सूड नव्हे!!

                                       
       आपल्याला दोन प्रकारचे पश्चात्ताप होतात. एक धोरणात्मक(प्रूडंट) आणि दुसरा नैतिक(मॉरल). जेव्हा आपले गणित चुकल्याने आपण स्वतःचेच नुकसान करून घेतले आहे असे आढळते, तेव्हा धोरणात्मक पश्चात्ताप होतो. आपल्याला एखादा मोह न टाळता आल्याने, आपल्या हातून दुसऱ्याचे नुकसान होते, तेव्हा नैतिक पश्चात्ताप होतो. हे दोनही पश्चात्ताप अजिबातच न होणे, हे बेफिकीरीचे व निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. जी व्यक्ती बेफिकीरीचे व निर्ढावलेपणात पोचलेली असेल तिचे आजच्या मांडणीवाचून काही अडणार नाही. 

न पोचलेल्या म्हणजे, `(थोडीफार) जनाची नाही पण मनाची लाज शिल्लक असलेल्या काही व्यक्ती, आजच्या मांडणीचा कदाचित पलायनवादी दुरुपयोग करू शकतील. हे खरे असले तरी, पलायनवादाचे इतके राजमार्ग खुले असताना, ह्या आडवाटेची भर पडलीच, तर त्याने फारसा फरक पडणार नाही. मात्र ज्या व्यक्ती स्वतःविषयी चिकित्सक असतील व शक्यतो निर्दोषच राहण्यासाठी झटत असतील, त्यांची मानसिक ऊर्जा अनावश्यक व निरुपयोगी आत्मक्लेशांत वाया जात असू शकेल. ती अशी व्यर्थ खर्ची न पडता, स्वतःत सुधारणा करण्यासाठी उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे.

मी जर दुःखी झालो नाही, तर मी सुधारणार कसा?, असे वाटून दुःखात चूर होऊन घुटमळत राहण्याची सवय, आपल्याला आत्मक्लेशवादाने लावलेली असते. तसेच सूडाला न्याय समजणाऱ्या कठोर-शिक्षा-वादाने आपल्या मनात, पाप फेडण्यासाठी, माझ्यामुळे कोणाला तरी जेवढे सोसावे लागले, तेव्हढे मी सोसणे हे भरवून दिलेले असते. व्रताला जोडून जो वैकल्य हा शब्द येतो तोही आत्मक्लेशवादी आहे. विकल होणे म्हणजे वैकल्य. व्रतनिष्ठ(नीतिनिष्ठ) राहताना त्यापायी जर काही दुःख आले तरी बेहत्तर! ही भूमिका वेगळी आणि दुःख ओढवून घेण्यालाच व्रत(नीति) समजणे ही गोष्ट वेगळी. आधी नसते पराक्रम करून ठेवायचे आणि नंतर तपश्चर्या करत किंवा जशास तसे सोसत रहायचे, या गोष्टीला नायकत्व, देऊन आपल्या पोथ्यापुराणांनी मोठेच कु-मार्गदर्शन केलेले आहे.

अपराधीपणा वाटणे ही चांगलीच गोष्ट आहे. प्रश्न आहे तो, तसे वाटल्यावर करायचे काय?, याचा. अपराधीपणा ही एक भावना झाली. पण खरेतर साऱ्याच प्रतिकूल भावनांना काहीना काही योग्य कार्य(फंक्शन) ही असते आणि त्यात घुटमळत राहण्याचा धोकाही असतो. हा धोका टाळला तर प्रतिकूल भावनांचा अल्प-डोस आरोग्यपूर्णच ठरतो. आपल्याला घृणा नसती तर आपण काहीही खाल्ले असते. भय नसते तर योग्यवेळी पळून जाणे वा लपून बसणे जमले नसते. क्रोध नसता तर प्रतिकार करू शकलो नसतो. लोभ नसता तर पुरेशी साठवण केली नसती. आसक्ती नसती तर चिकाटीही टिकली नसती. कंटाळा नसता तर नव्याचा शोध थांबला असता. मोह नसता साहसे केली नसती. मत्सर अजिबात नसता तर निकोप स्पर्धाही नसती. प्रतिकूल भावनांना फीडबॅक म्हणून चांगलेच कार्य आहे. पण फीडबॅक मिळाला व त्यावरून काय बदल करायचा ते समजले की त्याचे कार्य संपते. प्रतिकूल भावना उचंबळून येणे हे आवश्यकच आहे. घोळ आहे तो, तिच्यात अडकून, दुर्गुण व गंड तयार करण्यात! आपण स्वतःत कोणती सुधारणा करायला पाहिजे हे कळण्यापुरता अपराधीपणा वाटणे आवश्यक आहे.

आत्मपरीक्षण म्हणजे स्व-ताडन नव्हे. जी चूक आपण केली आहे त्यात आपले आकलन कुठे कमी पडले, कोणत्या गैरसमजुतीमुळे ती चूक झाली, यात दुरुस्ती तर केली पाहिजेच. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, तो भलता मोह अनावर होण्यामागे आपली कोणती प्रेरणा होती?, व या प्रेरणेला दुसरी उचित वाट काढून देण्याचा पर्याय कोणता?, याचा शोध घेतला पाहिजे. आपल्यात जो गुंता झाला असेल तो, हिसडाहिसडी न करता सोडवला पाहिजे. तत्सम प्रसंग पुन्हा आला तर कोणते वळण द्यायचे, याचा काही मंत्र(सूत्र) लक्षात ठेवला पाहिजे. हे सगळे करायचे सोडून आपण स्वतःवर सूड काढत बसतो. फिट्मफाट झाली असे समाधान मानतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या! म्हणून, त्रागा बंद आणि सुधारणा सुरू, हे धोरण हवे.

सूडभावना सोडणे आणि आनंदाने क्षमा करणे हे किमानपक्षी स्वतःबाबत तरी सुरू करायला हवे. जो स्वतःला क्षमा करत नाही, तो इतरांना काय क्षमा करणार? क्षमेने पापभावना विसर्जित झाली की चित्तशुध्दी झाली. तितके नाही पण जवळ जवळ तितके म्हणून प्रायः+ चित्त असा प्रायश्चित्तची व्युत्पत्ती आहे. प्रायश्चित्ताचा अर्थ, स्वतःला जशास तसे न्यायाने दंडित करणे, असा नाही. 
     

No comments:

Post a Comment