Friday, August 7, 2015

टेक्नॉलॉजी म्हणजे काय रे भाऊ? (भाग-१)


सध्याच्या युगाला तंत्रयुग म्हटले जाते आणि ते रास्तच आहे. विविध तंत्रे कोणकोणते चमत्कार करून दाखवतात याची रसभरीत वर्णने बरीच वाचायला मिळतात. तर दुसरीकडे विज्ञानातील सिद्धांत किंवा वैज्ञानिक खुलासे क्वचित व तेही थोडक्यात वाचायला मिळतात. ज्या सूत्रांच्या योगे आपल्याला एकूण तंत्रविद्येसंबंधी एक दृष्टी प्राप्त होईल अशी काही सामान्य सूत्रे आहेत का? होय निश्चितपणे आहेत. इंजिनिअरिंगचे औपचारिक शिक्षणही जास्त समजेनिशी घेण्यासाठी ही सूत्रे उपयोगी पडतात. इतर क्षेत्रातील लोकांना देखील एकूण तंत्रक्षेत्रात काय काय चालते यावर एक सर्वसाधारण पकड येऊ शकते. निदान गूढनिवारण (डीमिस्टीफिकेशन) तरी होते. आपण तंत्रज्ञ नाही हा हीनगंडही दूर होतो व आपण तंत्रज्ञांशी न बिचकता बोलू शकतो.


यंत्र म्हणजे काय? अगदी सामान्य व्याख्या अशी की माणूस श्रम करताना   ज्या हालचाली करू शकतो, त्यांचे रूपांतर, वस्तूंमध्ये आपल्याला जे बदल घडवून आणायचे असतील, त्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियांमध्ये करण्याची कोणतीही पद्धती म्हणजे यंत्र होय. उदा. पूर्वी आपण काठीने दोरीवर कपडे वाळत घालत होतो त्या ऐवजी आता दोरीच खाली येईल अशी व्यवस्था करता येते.

यंत्र हा तंत्राचा एक प्रकार झाला. जे शक्य नव्हते ते शक्य करण्यासाठी कोणतीही उपलब्ध प्रक्रिया वापरणे वा नवी शोधणे म्हणजे तंत्र होय.
सर्वच तंत्रांचे उद्दिष्ट मनुष्याला अधिकाधिक विकल्प मोकळे करणे हे असते. अन्न शिजवता आल्याने अन्नाचे ऑप्शन्स बरेच वाढले. भाल्याने शिकार करता आल्याने भक्ष्य ठरू शकणारे प्राणीही वाढले. साठवण करता येण्याने आणखी वाव वाढला.   
माणसाच्या शरीरातून उपलब्ध होणारी ऊर्जा ही श्रमात लागतेच पण जसा बाहेरील वस्तूंना माणूस आपल्या कामासाठी जुंपतो तसाच तो बाह्य ऊर्जांनाही जुंपतो. हात-साधन(टूल), यंत्र-साधन(मशीन) आणि उर्जित-यंत्र-साधन(पॉवर्ड मशीन) व असे करत स्वयंचलित-यंत्र-साधन (ऑटोमेशन) ही साधनांच्या प्रगतीची एक धारा आहे. विविध साधने बनविताना काही सामान्य सूत्रेही वापरली गेली आहेत.

तरफ - आपल्याला जोर कमी लावून हालचाल जास्त करता येईल की थोड्या हालचालीत जास्त जोर लावता येईल याची निवड करावी लागते. पहारीने धोंडा सरकवण्यात हाताचा जोर कमी तर धोंड्यावरील जोर जास्त असतो. उलट वल्ह्यामध्ये हाताची हालचाल कमी पण पाण्यातील हालचाल जास्त असे करून मिळते. तरफ किंवा तरफ-सदृश इतर गोष्टीमुळे जोर/हालचाल गुणोत्तर बदलून मिळते. तरफ-सूत्र हे कप्प्या (पुलीज), गिअरबॉक्स, पास्कलचे दाबयंत्र, ट्रान्सफॉर्मर(करंट/व्होल्टेज), पंप असे अनेक रूपात आढळते.

झडप(व्हॉल्व्ह) - प्रवाह किंवा हालचाल एका दिशेने होऊ द्यायची मात्र उलट दिशेने होता कामा नये अशा कोणत्याही रचनेत झडप- दिसते. विविध प्रकारचे सापळे (उदा. उंदराचा पिंजरा) हे झडपसूत्रानेच रचले जातात. हवा भरण्याचा हातपंप. इंजिने कॉम्प्रेसर अशा किंवा विद्यत उपकरणातही व्होल्व्ह लागतात. इतकेच काय पण मिठागर ही सुध्दा झडप आहे. भरतीचे पाणी त्यात येते पण परत जाऊ शकत नाही.

शिड(अम्प्लिफायर) - शिडे फुलवणे किंवा मिटवणे याला फार कमी ऊर्जा लागते. परंतु याच क्रियेद्वारे, शिडाने पवनऊर्जा झेलून ती जहाजाला ढकलण्यात ,किती व कधी कामी आणायची, याचे नियंत्रण नाविकांच्या हातात येते. एका छोट्या उर्जेने दुसऱ्या मोठ्या ऊर्जेला नियंत्रित करता येते हा फार मोलाचा शोध आहे. अंकुश आणि हत्ती, कळप हाकणे, फिल्म-प्रोजेक्टर, फ्लेम-कटर, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक, यात अम्प्लिफिकेशन हे तत्त्व वापरलेले असते. याउलट मोठ्यापासून छोटे, म्हणजे सर्किट ड्रॉइंगपासून मायक्रोचिप असे, उलट दिशेनेही हे उपयोगी पडते.   

मर्यादित-प्रवेश(सिलेक्टिव्ह-परमिशन)- सुगरणीचे घरटे, जनावरे न जाऊ शकणारे आडवळणी दार, गाळणे, चाळणी, गॉंगल, फिल्टर, गो/नोगो गेजेस, ग्लासट्रॅप, रिव्हर्स ऑंस्मॉसिस, पोलरायझ्ड लेन्स, कुलूप-किल्ली,
पासवर्ड/बायोमेट्री असे अनेक आविष्कार पहायला मिळतात.

गुंतवून/ चिकटवून/वितळवून बांधणी (फासनिंग)- गांठी मारता येणे, अडकणारे पण काढता येणारे भाग, सांधेजोड, नटबोल्ट, रीव्हेट, डिंक, चुनालेप, सिमेंट, वेल्डिंग इत्यादी

प्रती काढण्याचे (कॉपीइंग)- एका दाण्याचे कणीस होते हे शेतीत तर दिसतेच पण एकदाच बनविलेली गोष्ट परत परत बनविताना तिचा साचा किंवा छापा वापरणे हे मानवाने शोधलेले खास तंत्र आहे. स्टेनसिल,
रोलर-रांगोळी, गठ्ठ्याने एकदम कटिंग करणे, दाबाखाली साच्यात पत्रा दाबणे, ओतकाम आणि अर्थातच छपाई, झेरोक्स ते पेन-ड्राइव्ह, रेकोर्ड-प्लेअर, कसेट, सीडी इत्यादी

उर्जेची रुपांतरे (एनर्जी-कन्व्हर्शन)- प्राणीज, स्थैतिक-गुरुत्व-ऊर्जा, जल, पवन, रासायनिक, ज्वलननिर्मित, औष्णिक, यांत्रिक-बल-कार्य, प्रकाश, विद्युत, आण्विक अशा विविध ऊर्जारूपांचे एकमेकीत, उपलब्ध ऊर्जेचे उपयुक्त ऊर्जेत रूपांतर करून वापर

ऊर्जेवर चालनादेश स्वार(सिग्नल-कमांड) पुरेसा थंड झाल्यानंतर फ्रीजचा  कोम्प्रेसर बंद व्हावा यासाठी वापरला जाणारा थर्मोस्टॅट, टीव्हीचा रिमोट, व्यक्ती जवळ येताच उघडणारा व नंतर आपोआप बंद होणारा दरवाजा/एस्कलेटर असो वा रडार असो या सर्वात आकृतिबंध किंवा घटनाक्रम छोट्याशा ऊर्जेत कोरला जातो. व यंत्रातील कळसूत्र प्रचालित केले जाते.  

मापन व गुणनिर्देश(इंडीकेशन अँड मेझरमेंट) - कोणत्या रंगाचा साका(प्रेसिपिटेट) जमला आहे यावरून रसायन ओळखणे, तारेवरील रायडर उडल्यावर कंप्रता जुळल्याचे ओळखणे यात मापन नसले तरी निर्णायक घटना असते. सलगपणे बदलणारे तापमान पाऱ्याच्या लांबीशी निगडीत करून मापन करणे हे थर्मोमीटरमध्ये साधलेले असते. याचप्रमाणे व्होल्टमीटर, विजेचा मीटर, पाण्याचा मीटर इ. उदाहरणे देता येतील.

प्रतिसंदेश(फीडबॅक) - ड्रायव्हर एसटी फलाटाला लावत असताना कंडक्टर शिट्या मारून त्याला फीडबॅकच देत असतो.  थेटपणे कामच होईल असा फीडबॅक म्हणजे उदाहरणार्थ टाकीत पाणी पुरेसे भरले की बॉल उचलला जाऊन नळ बंद होतो. आऊटपुट बघत बघत इनपुट योग्य दिशेने बदलणे ही क्रिया सर्वच तंत्रांत आवश्यक असते.

नव्या गुणांची द्रव्ये(मटेरीयल्स विथ नॉव्हेल प्रॉपर्टीज)- रासायनिक, रेण्विक व इतर क्रियांनी नवनवीन गुणधर्मांची द्रव्ये उपलब्ध होणे हे या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक असते. द्रव्यात नवी भर पडली की बरेच नवे मार्ग उपलब्ध होत असतात. न गंजणारे लोखंड (स्टेनलेस स्टील), प्लास्टिक, थर्माकोल इ  

मानकीकरण(स्टँडर्डायझेशन) -कोणताही सुटा भाग हा कोणत्याही असेम्ब्लीत फिट बसला पाहिजे. म्हणून कंपनीनिहाय वेगळाली मापे असून चालत नाही. यासाठी मानके ठरविलेली असतात. नट आणि बोल्ट, फायली आणि पंच केलेल्या दोन भोकातील अंतर, कॅसेट, सीडी व त्यांचे प्लेयर इ.


आकृती-आलेख-नोंद्णूक(रेकोर्ड ऑफ डायग्राम अँड ग्राफिक्स) - तंत्र उपलब्ध असणे म्हणजे ते व्यक्तीगत कौशल्यावर किंवा विशेष संवेदनशीलतेवर अवलंबून नसणे व ते हस्तांतरित करता येणे होय. यासाठी मापे, निरीक्षणे, ड्रॉइंग इ. अचूक नोंदवून ठेवणे तसेच कार्यपद्धती नोंदवून ठेवणे हे आधुनिक तंत्रज्ञानाचे खास वैशिष्ट्य आहे. या यादीत भरही घालता येईल.  

2 comments: