Friday, August 7, 2015

दुर्गुण मानवी आणि आरोप ईश्वरावर?


मानवी भावविश्वात ईश्वराचे अस्तित्व आहे यात शंकाच नाही. पण मानवी-भावविश्वाच्या निरपेक्ष ईश्वराला स्वयंमात्र अस्तित्व आहे की नाही हे वादग्रस्त आहे.   
जेव्हा रामायणातल्या उर्मिलेवर अन्याय झाला असे आपण म्हणतो तेव्हा उर्मिला आणि तिची स्थिती या गोष्टी पुराव्याने शाबित झालेली तथ्ये आहेत, असे आपल्याला म्हणायचे नसते. 

उर्मिलेच्या निमित्ताने स्त्रीवर होऊ शकणारे अन्याय काय काय असू शकतात याची नोंद घेणे आणि तसे अन्याय न करण्याची वा न होऊ देण्याची जबाबदारी अस्फूटपणे मान्य करणे हे वाङ्मयीन कृत्य आपण करत असतो. आपल्या दृष्टीकोनात झालेला हा बदल उर्मिलेच्या स्वयंमात्र अस्तित्वावर जरा सुध्दा अवलंबून नसतो. 

भगीरथाने गंगा वळवून भारतात आणली हे वस्तु-तथ्य असले किंवा नसले तरी स्तुत्य आणि श्रेयपूर्ण आहे की नाही? नक्कीच श्रेयपूर्ण आहे. गुणावगुण कशाला मानायचे हे ठरवीत असताना आपण जी काही पात्रे निर्मितो त्यांच्यात जे काय दोष असतील ते असतील पण अस्तित्वात नसणे या नावाचा दोष नसतो. पण पात्रांवर अन्याय होऊ शकतो. म्हणजेच ईश्वर जरी नसला तरी त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. नव्हे झालेलाच आहे.

तत्त्वज्ञानात अस्तित्वात असणे हा गुण मानता येत नाही हे मान्य झालेले आहे. ईश्वर अस्तित्वात आहे हे सिद्ध करण्यासाठी देकार्त ने जो युक्तीवाद मांडला तो गमतीशीर आहे. देकार्त म्हणतो, सर्व सकारात्मक गुणांत परिपूर्ण अशी गोष्ट ही कल्पना आहे. जिच्यात इतके सगळे गुण आहेत तिच्यात साधा अस्तित्वात असणे प्राथमिक गुण नसेल हे कसे शक्य आहे. म्हणून तशी गोष्ट अस्तित्वात आहे आणि तिला आम्ही ईश्वर म्हणतो हा युक्तीवाद फसवा आहे. 

जे सिद्ध करायचे तेच सुप्तपणे गृहीत धरण्याचा हा प्रकार आहे. या युक्तिवादाचे खंडन असे होते. अस्तित्वात असणे हा गुण असू शकतो काय? जर तो गुण असेल तर त्याचा गुणी (गुणधारक) अस्तित्वात असेल की नसेल. गुणधारक जर अस्तित्वात असेल तर देकार्त फक्त द्विरुक्ती करीत आहे. याउलट गुणधारक जर अस्तित्वात नसेल तर देकार्त व्याघात करीत आहे. म्हणून अस्तित्वात असणे या नावाचा वेगळा गुण मानणे चूक आहे.

असणे हा जसा गुण नाही तसाच नसणे हासुध्दा दोष नाही! ईश्वर जर अस्तित्वात नसेल तर अस्तित्वात नसणे हा काही त्याचा दोष ठरत नाही. जे ईश्वराचे अस्तित्व मानतच नाहीत ते ईश्वराला दोष चिकटवीतही नाहीत. कारण ते कोणाला दोष चिकटवणार?

परंतू जे ईश्वराचे अस्तित्व मानतात ते ईश्वराचे गुणगान करण्याच्या भरात आणि/किंवा त्यांच्या इतर मतांमुळे ईश्वरावर भलतेसलते दोष आरोपित करू शकतात. किंबहुना त्यांनी तसे केलेलेच आहेत. याची कितीही उदाहरणे सापडू शकतात.

एखाद्या वृतीने अधम असलेल्या माणसाला, केवळ त्याने कठोर तप(स्वपीडन) केले या श्रेयाखातर वरदान म्हणून विध्वंसक शक्ती बहाल करणे हे आपल्याच प्रजेचा घात करणे नव्हे काय? असे मूर्खपणे शंकराच्या नावावर पडलेले आहेत. विष्णूने ते निस्तरायचे हा नसता उद्योग विष्णूला तरी का करायला लावावा?

विष्णूने स्वतः निरनिराळ्या अवतारात, भंपक पित्याच्या आज्ञेखातर निष्पाप मातेचा शिरच्छेद करणे. हीन कुळातला माणूस फार पुण्यवान ठरू लागला आणि इंद्राचे आसन डळमळू लागले की त्या पुण्यवानाला डोक्यावर पाय देऊन गाडून टाकणे. दुसरीकडे तप हेच पाप मानून वध करणे. आपल्या भावी मित्राच्या बाजूने, तो मित्र आणि त्याचा शत्रू यांचे द्वंद्वयुध्द चालू असताना झाडाआडून बाण मारून, मित्राच्या शत्रूला मारून टाकणे असे अनेक अपराध नोंदवले गेले आहेत. हे हिंदू धर्मातले आहे पण हिंदू म्हणून निवडकपणे निंदा करणे हेही बरोबर नाही.

इतर धर्मातल्या ईश्वरांबाबत त्यांना भक्तांनीच भलतेसलते आरोप चिकटविण्याचे प्रकार आणखीच भयंकर आहेत. निष्ठा असेल तर इतर गुन्हे माफ आणि निष्ठा नसेल तर थेट नरकच! स्वर्गसुखाच्या आणि नरकयातनांच्या कल्पना सुध्दा अत्यंत हीन अभिरुचीच्या. इतरांनी सांगितलेले ईश्वर मानले तर तुम्ही नरकात तर जाणारच पण पृथ्वीवरसुध्दा एकमेव ईश्वराचे बंदे तुम्हाला जिवंत राहू देणार नाहीत. असा क्रूर हुकुमशहा म्हणून ईश्वराचे चित्र रंगवणे हे ईश्वरवाद्यांना कसे शोभते?

ग्रांथिक धर्मांतले स्वर्ग नरक असोत किंवा हिंदू, जैन, बौध्द धर्मांतले पुनर्जन्म असोत. सुभाग्य किंवा स्वर्ग हे पूर्वजन्मीच्या सत्कृत्याबद्दल तसेच दुर्भाग्य किंवा नरक हे पूर्वजन्मीच्या दुष्कृत्याबद्दल ही जर ईश्वरी योजना असती तर त्याने त्या त्या कृत्यांचे स्मरण व्हावे ही सोय ठेवली नसती काय? स्मरणाशिवाय धडा शिकवणे याला अर्थच रहात नाही.

पण मुद्दा याहूनही सखोल आहे. भये किंवा प्रलोभने दाखवून माणसे बाह्य वर्तनात जास्त मॅनेजिबल होतीलही पण ती आतून व स्वयंध्यासाने सदाचारी कशी होतील? कारण धमकी खातर वा प्रलोभना खातर केलेले वर्तन हे स्वतःला भल्याबुऱ्याची उमज पडून केलेले नसते. मला बदल्यात काय मिळते याच्या निरपेक्ष मी श्रेयनिष्ठ होत नाही तोवर चांगल्या ईश्वराला त्याचा प्रकल्प पुढे गेलाय असे समाधान मिळणेच शक्य नाही. त्याला निरपेक्षपणे सद्वृत्त (त्याच्यासारखे पण स्वतंत्र) जीव बनवायचे आहेत ही त्याची महान तळमळ दुर्लक्षित करून, आपण स्वर्ग/नरक/पुनर्जन्म यांद्वारे त्याला कसेही करून मॅनेज करणारा ठरवत नाही काय?

दुसरे असे की नरकयातनांमागील न्यायकल्पना ही प्रतिशोधाची कल्पना नाही काय? सूड म्हणजे न्याय हे अत्यंत घातक समीकरण असभ्य संस्कृतीत असेलही पण ईश्वराची न्याय कल्पनासुध्दा चक्क सूडाचीच असू शकेल? तसेच प्रलोभनांचेही आहे सोसल्याची भरपाई असो वा योगदान केल्याचा मोबदला असो! कशाच्याही बदल्यात काहीही चालते ही तद्दन बाजारू वृती नव्हे काय?

माणसात ती आहेही पण ईश्वराच्या न्याय कल्पनेत उदाहरणार्थ जनहितासाठी झिजणाऱ्या महात्म्यांना भोग्य-सुखे पुरवणे हे त्या महात्म्यांना कसल्या प्रकारची माणसे ठरविणे आहे? संनिष्ठेला स्वयंभू मूल्य असते, तिच्यात अंगभूत आनंद असतो ही गोष्ट ईश्वराला सुध्दा कळू नये? हे कसे शक्य आहे?

असेच अकलेचे पण आहे. गर्भाशयातला थर पडून जाणे हे अपवित्र असते असे कुठल्यातरी काळच्या बिनडोक माणसांना वाटू शकते. पण एवढ्या साध्या गोष्टी ईश्वरालासुध्दा कळत नसतील?

ईश्वर माणसाला धमक्या आणि प्रलोभने देतो हे अशोभनीय आहेच पण माणसे ईश्वराला धमक्या आणि प्रलोभने देतात आणि तोही बिचारा अशा गोष्टीना भुलून वशिलेबाजी करतो हा आणखीच त्याला माणसापेक्षा हीन ठरविणारा आरोप आहे! नवस, बळी, खर्चिक शांत्या असली भंकस ईश्वराला चालेल?

सत्वपरीक्षा बघणे आणि त्यासाठी सदाचारी माणसांची कशीही दुर्दशा करणे, हा विकृत छंद आपण ईश्वराला का चिकटवतो आहोत? चमत्कारसुध्दा अभिरुचीचे दर्शन घडवितात. निष्ठा असेल तर स्वतःच्या मुलावर तलवार चालव अशी परीक्षा पहाताना चमत्काराने मुलाच्या जागी बकरी येते पण तलवारीच्या जागी उदा. मोरपीस आले असे का नाही होत?

दत्तजन्माच्या कथेत सती अनसूयेची दैवी शक्ती दिसते पण देवांची अभिरुची काय दिसते? हे कोणाला खटकत कसे नाही? आपण सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करतो. म्हणजे दुर्बुद्धी देण्याचा ऑप्शन त्याला असतो की काय? दुर्बुद्धीही द्यायची आणि वर शिक्षाही द्यायची हा किती वाईट आरोप आहे त्याच्यावर?
अरेरे! हे प्रभो, आमच्यातल्या आस्तिकांनीच तुझी इतकी निंदा केली आहे की नास्तिकांना निंदा करण्याचा काही स्कोपच ठेवलेला नाही. नसलास तरी क्षमा कर आणि असलास तर तुझ्या स्वरूपाचे सोयीस्कर चिंतन आमच्याकडून न होवो, ही प्रार्थना

         

7 comments:

  1. Perfect !!!
    प्रत्येकाची ईश्वर-संकल्पना त्याच्यासह क्रमाक्रमाने उत्तरोत्तर विकसीत (दैवी नसली तरी निदान मानवीय) होत जावो हीच प्रार्थना. :-)

    ReplyDelete
  2. खरे तर मी जे मुद्दे मांडतो आहे त्यांचा तुमच्या युक्तीवादाशी प्रत्यक्ष संबंध नाही. हा तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद पण नाही.तुमचा युक्तिवाद तर्कशुद्ध आहे.काही मुद्द्यांवर मला काय वाटते हे फक्त मी मांडतो आहे. या विश्वाकडे बघितले की मन विस्मयाने भरून जाते.हे निर्माण कसे झाले असेल या प्रश्नाचा विचार करायला लागलो तर काहीच हाती लागत नाही.विविध धर्मांनी आपापल्या परीने याचे स्पष्टीकरण दिले आहे. निरीश्वरवादी आणि वैद्न्यानिक दृष्टीकोन बाळगणारे धार्मिक स्पष्टीकरणे मानत नाहीत. पण बहुसंख्यांना मान्य होईल असे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारीही घेत नाहीत म्हणा किंवा त्यांची स्पष्टीकरणे सर्वमान्य होत नाहीत म्हणा, किंवा त्यांचे अजूनही प्रयोग चालू आहेत म्हणा ,गोळाबेरीज एकच आहे. जगातील बहुसंख्य लोक धार्मिक आहेत , श्रद्धाळू आहेत आणि विविध धर्मांशी जोडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मजेची गोष्ट अशी आहे की धर्मसंस्थापक हे समाजशास्त्रद्न्य होते असे मानले तर बरेच प्रश्न सुटतील. समाजव्यवस्था सुधारावी म्हणून त्यांनी काही उपाययोजना डोक्यात आणली आणि ती लोकांनी स्वीकारावी म्हणून तिला परमेश्वराचे लेबल लावले. त्यांनी जी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला होता ती तेव्हा कालसुसंगत होती.आता नाही. समाजाने मूळ हेतूचे आतले बी फेकून दिले आणि बाहेरचे धार्मिक टरफल चघळणे पसंत केले.पण त्या समाज शास्त्रज्ञांनी मानवाच्या भावनिक गरजा समजून प्रयोग केले होते असे म्हणता येईल. आपले प्रयोग बहुसंख्यांपर्यंत नेण्याचे त्यांनी प्रयत्न केले.आजचे वैद्न्यानिक सामान्य माणसाला समजणार नाही अशा अगम्य भाषेत बोलतात आणि समाजाने वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारावी अशी अपेक्षा ठेवतात. प्रयोगशाळेत देव सापडणार नाही, तो लोकांच्या मनात बसलेला आहे अगोदरपासूनच. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे सोपे काम नाही. अंधश्रद्धेवर टीका करून किंवा श्रद्धाळूंच्या श्रद्धेवर हल्ला करून हे साध्य होणार नाही. हे काम करू इच्छिणाऱ्याकडे उपनिषद कर्त्या ऋषींसारखी अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा हवी , महम्मदासारखी लढाऊ वृत्ती हवी , जिझसची करुणा हवी आणि कृष्णासारखी वास्तवदर्शी दृष्टी हवी आणि अर्थातच सामाजिक वास्तवाची जान आणि वैद्न्यानिक दृष्टीकोन हवा. प्रचंड मोठा प्रयोग करण्याची हिम्मत हवी.जर कालौघात आम्ही प्रगत झालो असू तर आम्ही हे काम जास्त हुशारीने केले पाहिजे. पण तसे होतांना दिसत नाही.

    ReplyDelete
  3. ईश्वर संकल्पनेच्या सर्व मुद्द्यांचा समावेश करून छान विवेचन करणारा लेख! खूपच आवडला. तुमची परवानगी गृहीत धरून फेसबुकवर शेअर करतोय.

    ReplyDelete
  4. ।। अल्लाह ।।
    फार-फार पूर्वी अदीम भूतकाळात, जेंव्हा काहीही नव्हतं, तेंव्हा फक्त अल्लाहचं अस्तित्व होतं !
    आज वर्तमान काळात, जेंव्हा सारं काही आहे तेंव्हाही अल्लाहचं अस्तित्व आहे !!
    आणि भविष्यात जेंव्हा काहीही नसेल, तेंव्हाही अल्लाह असणार आहे. !!!
    भूतकाळाच्या निरव शांततेत, शब्दही जन्मला नव्हता, तेव्हा अल्लाहची वाणी होती !
    आज भाषांचा गलबला आहे व अल्लाहचे शब्दही आहेत !!
    भविष्यात जेंव्हा सारें शब्द नष्ट होतील,अल्लाहचे शब्द तेव्हाही राहणार आहेत !!!
    कारण अल्लाह अनादी अनंत असून त्याचे शब्दही अनादी अनंत आहेत !
    हे विश्व नष्ट होणारे,आहे  विश्वातले शब्दही नष्ट होणार आहेत !!
    मात्र अल्लाह अनादी, अनंत असून त्याचे शब्दही विश्वात राहणार आहेत !!!
    ।। अल्लाह कोण आहे ? अल्लाह काय आहे ? ।।
    अल्लाहला समजून घेताना आपण आधी अल्लाह या शब्दाचा अर्थ आणि त्याची गरज समजून घेऊ या !!
    अल्लाहची व्याख्या करताना मौलाना अबुल कलाम आझाद म्हणतात 
    हा शब्द अरबीचे पहीले अक्षर अलिफ, बरोबरच लाम व हे या धातूंनी बनला आहे, 
    अल्लाहला सीरीयाच्या किल्दानीयन भाषेत अल-हिया, हिब्रू भाषेत अल्वाह व अरबी भाषेत इलाह म्हटले जाते. 
    अल्लाह हा फक्त विश्वनिर्मात्याची स्तुती करणयासाठीच वापरला जाणारा स्तुतीकारक, आदरदर्शक शब्द आहे . (तर्जुमान अल-कुरआन ,खंड १,पान :१८)
    शब्दकोषांतून अर्थ शोधणार्या मान्यवरांच्या मतानुसार या सार्यांचा अर्थ त्याच्यासमोर आश्चर्यचकित व विनम्र होणे असाही आहे.
    अल्लाह हा एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही
    त्याच्यासाठी निघणार्या सार्या शब्दांमधून यापेक्षा उत्तम शब्द कोणता असेल ?
    मनुष्य, अल्लाहचे अस्तित्व व गुण याविषयी जेवढा शोध घेईल, 
    तेवढाच तो विनम्र व चकित होत राहील.
    अल्लाहने निर्मिलेली पाताळातली रचनाही अदभुत आश्चर्यजनकच आहे.
    अल्लाहची समुद्रातली निर्मितीही अदभुत व परिपूर्ण आहे.
    सृष्टीची प्रमाणबद्धता ,सुगंध इत्यादी त्याच्या, निर्मात्याच्या उत्तम गुणांकडे लक्ष वेधते ! मग समुद्रातली कोणतीही निर्मिती असो, जमीनीतली निर्मीती  असो वा आकाशात फिरणारी असो , आपण जितका शोध घेऊ, 
    किंवा निसर्गाचे सारे पडदे हटवा, बुद्धी प्रत्येकवेळी चकित होते आणि बारकावे पाहू तितकेच आपले मन त्या अल्लाहसमोर विनम्र होईल , झुकेल आणि आपण म्हणू की, "हे अल्लाह , तूच सर्वश्रेष्ठ आहेस ! आणि आम्ही सर्व कनिष्ठ आहोत!" आणि हाच अजानमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या "अल्ला हु अकबर" या शब्दांचा अर्थ आहे !
    त्याच्या महिमेसमोर आपण विनम्र व नतमस्तकच होतो.
    मग शोध अल्लाहच्या निर्मीतीबाबत असो वा कुरआनबाबत असो !!!
    हाच तो अल्लाह आहे ज्याच्या अस्तित्वाचा स्वीकार 
    सर्वच युगात केला गेला आहे
    प्रत्येक राष्ट्रात, प्रत्येक समाजात, कुठल्या ना कुठल्या तर्हेने तो राहीला आहे.
        भौतिकशास्त्रवेत्ते, प्राणीशास्त्रवेत्ते व मूर्तीपूजकांमध्येही 
    या न पाहीलेल्या श्रेष्ठतम अस्तित्वाच्या सामर्थ्याची जाणीव 
    नेहमीच होती व आजही आहे, 
    कारण अशा श्रेष्ठतम अस्तित्वाला कितीतरी सदगुणांनीच जाणले जाते 
    तसेच त्याच्या व्यक्तिगत उल्लेखासाठी 
    कुठले ना कुठले नाव प्रत्येक भाषेत वापरले जात राहीले आहे.
    एकेकाळी अरब मूर्तीपूजक होते. 
    अनेक देवी देवतांची ते पूजा करत. 
    व तरीही एका परीपूर्ण समर्थ अस्तित्वासाठी 
    अल्लाह याच शब्दाचा वापर ते करीत.

    ReplyDelete
  5. ईश्वर आणि त्याची गुणवैशिष्ट्ये
    इस्लाममध्ये ईश्वराचे-अल्लाहचे स्वरुप अत्यंत स्पष्ट, पवित्र आणि बुद्धीला व आत्म्याला पटणारे आहे. त्यामध्ये कुठलीही अस्पष्टता, भेसळ, संदिग्धता किंवा बुद्धीविरुद्ध गोष्ट नाही. ईश्वर एक आणि एकमेव आहे. त्याच्या ईश्वरतत्वामध्ये कोणीही भागीदार नाही. तो या सृष्टीचा एकमेव निर्माता, पालनकर्ता, मालक, शासक, अन्नदाता आणि आदेश देणारा आहे. त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये कोणीही सहभागी नाही. तो स्वयंभू आहे, कायमस्वरुपी आहे आणि कायमस्वरुपी राहील. त्याला मृत्यु नाही, तो तहान-भूक, आसक्ती, सकल मानवी इच्छा, आकांक्षा आणि प्रत्येक प्रकारचे मानवी दोष आणि कमतरता यांपासून पवित्र आहे. त्याला कधी झोप अथवा थकवा येत नाही. त्याला पश्चात्ताप होत नाही किंवा त्याला कोणी धोका देऊ शकत नाही. कुठल्याही कामाकरिता त्याच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्याला कोणत्याही गोष्टीची लालसा नाही. मानव, संपूर्ण सृष्टी, विश्व व प्रत्येक वस्तू त्याच्या आज्ञेत आहेत. ईश्वर आणि सृष्टी एक नाही. त्यांचे स्वतंत्र वेगवेगळे अस्तित्व आहे. ईश्वराने सृष्टीला निर्माण केले आहे, वाढविले व सजविले आहे. त्याच्या या निर्माणकार्यामध्ये त्याला त्याग करण्याची किंवा बळी अगर बलिदान देण्याची गरज नाही. सृष्टीची निर्मिती, देखभाल ंकंवा आदेश देणे हे ईश्वराचे अगदी सोपे काम आहे. (तो मानवाकरिता मार्गदर्शन, त्याच्या पापाची, गुन्ह्याची क्षमा किंवा अन्यायकर्त्याची शिफारस अथवा दुसऱ्या कोणत्याही हेतूने मानवी किंवा प्राण्यांच्या रुपामध्ये येत नाही.) त्याला कोणताही पुत्र नाही, की जो त्याच्या मदतीकरिता पृथ्वीवर जन्मावा. या सर्व विकृत भावनांपासून तो पवित्र आणि समर्थ आहे. कोणतीही गोष्ट किंवा वस्तू ईश्वराची बाजू घेत नाही आणि ईश्वरदेखील कोणाच्याही बाजूने नाही. तसेच त्याला त्याच्या बरोबरीचा जोडीदार नाही. तो अजोड, अतूल व अदृश्य आहे. त्याला खालपासून वरपर्यंत कोणी पाहू शकत नाही. तो सर्वव्यापी आहे. सर्व वस्तूंना पाहणारा आहे. तो प्रत्येकाचे म्हणणे ऐकणारा, एवढेच नव्हे तर मानवाच्या हृदयामध्ये, मनामध्ये येणारे विचार, हेतू, इच्छा, आकांक्षासुद्धा जाणणारा अंतर्ज्ञानी आहे. त्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. त्याचे ज्ञान प्रत्येक गोष्टींनी व्यापलेले आहे. तो प्रत्येक माणसाच्या अगदी जवळ आहे. त्याला कोणाच्या मध्यस्थीची किंवा कोणाच्या शिफारशींची गरज नाही व तो मानवाची प्रार्थना, भक्ती कोणत्याही माध्यमाविना अगर शिफारशींशिवाय ऐकतो. संकटग्रस्त माणसाची फिर्याद ऐकतो व प्रत्येकाच्या मदतीस येतो. तो सर्वश्रेष्ठ, सर्वाधीश आहे. याउलट सर्वजण ईश्वराचेच लाचार व आज्ञाधारक आहेत. सर्व सत्कर्माची गुणवैशिष्ट्ये त्याचीच व त्याच्याचसाठी आहेत. सामर्थ्य, मोठेपणा, उत्कर्षाचा उगमसुद्धा ईश्वरामध्येच आहे. तो न्यायी व न्यायदाता आहे. अन्यायाच्या प्रत्येक वाईट पैलूंपासून पवित्र आहे. तो जे काही कार्य करतो ते आपल्या ज्ञानाने आणि बुद्धिकौशल्याने करतो. त्याचे कायदे व आदेश सृष्टीच्या, विश्वाच्या कणाकणांमध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यांचे पालन केले जाते. पृथ्वी आणि त्यावरील निर्मिती या सर्व गोष्टी त्याच्या अधिपत्याखाली आहेत. मानवाच्या ऐच्छिक व अनच्छिक जीवनामध्ये सुद्धा त्याचेच आदेश व आज्ञा पाळल्या जातात.



    ReplyDelete
  6. Continue .... ईश्वरच या सृष्टीचा आणि मानवाचा योग्य व सत्य स्वामी आहे. म्हणूनच मानवाच्या वस्तुनिष्ठ जीवनाकरितादेखील त्याचेच आदेश, कायदे-कानून आहेत. तो कृपावान व अत्यंत दयाळू आहे. त्याची दया, कृपा सर्व चराचरामध्ये सामावलेली, व्यापलेली आहे. संपूर्ण मानवजातीवर त्याची असीम दया, अनंत कृपा व देणग्या आहेत. या जगामध्ये सर्वांत मोठी कृपा आणि देणगी ‘ईश्वरीय धर्म’ (इस्लाम) आहे, जो मानवतेकरीता, मानवाच्या मार्गदर्शनाकरीता या ऐहिक आणि पारलौकिक जीवनामध्ये यश प्राप्त करण्याकरिता दिला आहे. त्याचे जे सेवक व भक्त त्याची भक्ती करतात, त्याच्या आज्ञेचे पालन करतात, त्याच्या धर्माचे पालन निःस्वार्थपणे करतात आणि त्याच्या सन्मार्गामध्ये आपले प्राण, संपत्तीची आहुती देतात, संकटकाळामध्ये त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कायम दृढ राहतात; अशांना सर्वशक्तिमान, सर्वसंपन्न आणि बुद्धिमान ईश्वर मदत करतो, त्यांना साथ देतो आणि त्यांना आपल्या निकट करुन प्रसन्न करतो आणि प्रसन्न होतो. सर्वज्ञानी ईश्वर त्यांना पारलौकिक जीवनात प्रामाणिक निवडक भक्तांमध्ये, सेवकांमध्ये सामील करुन स्वर्गामध्ये उच्चस्थान देईल व अनंत, अगणित देणग्यांचा, भेटींचा, कृपेचा वर्षाव करील. ऐहिक जीवन असो की पारलौकिक जीवन दोन्ही जीवनांमध्ये, त्याच्याच आदेशांचे व आज्ञांचे पालन केले जाते. त्याची मदत असेल तर कोणी त्याला अंकित व अधीन करू शकणार नाही. त्याने आपली दया, कृपा नाकारली तर त्या मनुष्याला वाचविणारा कोणी असणार नाही. मानवांना या जगामध्ये तोच पाठवितो आणि तोच त्यांना अन्न-पाणी देतो. व्यक्ती व समाज आणि त्यांचा उत्कर्ष, उन्नती व अधोगती त्याच्याच हातामध्ये आहे. त्याच्या कौशल्याने जाती-वंशसुद्धा अवकर्षाला व अधोगतीला पोहोचतात आणि व्यक्तीलादेखील मृत्यु येतो. मृत्युनंतर मानवाला परत त्याच्याच जवळ जायचे आहे. इहलोक व परलोक दोन्हींमध्ये त्याचा ईश्वराशी संबंध येणार आहे आणि त्यालाच प्रसन्न करुन त्याचीच भक्ती करुन दोन्ही लोकांमध्ये मनुष्य यशस्वी आणि सफल होणार आहे.

    ReplyDelete
  7. ईश्वराला/अललाहला कोणी निर्माण केले?

    ReplyDelete