Friday, May 15, 2015

आपण मेंदूचे गुलाम? नव्हे, मालक !

      आपल्याला जे संकल्पस्वातंत्र्य असते ते आभासी असून खरेतर आपण काय निवडणार हे ठरलेलेच असते अशी एक आवई उठली आहे. यासाठी निमित्त झाले ते एका प्रयोगाचे. मेंदूत घडणाऱ्या घडामोडींचा ढोबळमानाने स्कॅन काढता येतो. तू दिलेल्या प्रश्नावर जेव्हा निर्णय घेशील, तेव्हा हा स्वीच दाब अशी सूचना ज्याच्यावर प्रयोग केला गेला त्या माणसाला दिलेली होती. निर्णय या घटनेचा स्कॅनमध्ये एक फ्लॅश पडलेला दिसतो. माणसाने प्रत्यक्षात स्वीच दाबण्याच्या बरेच सेकंद अगोदर हा फ्लॅश पडत असल्याचे आढळले. यावरून नियतीवाद्यांनी उचल खाल्ली व आपल्याला जेव्हा वाटते की आपण निर्णय घेतला त्याच्या आधीच मेंदूने तो निर्णय घेतलेला असतो म्हणजे निर्णय घेणारे आपण नसतोच असा वाद निर्माण केला. त्या निमित्ताने माणसाचे भावविश्व आणि वस्तुविश्व यांच्यातील संबंधावरील हे भाष्य.


     एखाद्या सांगकाम्याने शब्दशः अर्थ घेऊन घोळ घातला तर वरिष्ठ त्याला म्हणेल की अरे जऽऽरा डोकं चालवलं असतंस तर----. पण वरिष्ठ असे म्हणू लागताच त्याने मी कोण डोकं चालवणार साहेब डोकंच मला चालवतंय असे उत्तर दिले, तर जो वैताग येईल तोच वैताग, प्रगत मेंदुविज्ञानाचे काही निष्कर्ष ऐकून दार्शनिक जडवादाचा विजय झाला आहे असे समजणायऱ्या काही मंडळींनी आणलेला आहे.

हमको मिटा सके ये जमानेमे दम नही| जमाना हमसे खुद है जमानेसे हम नही||
या चालीवर हमको नचा सके ये मेंदूमे-------”  असे म्हटले पाहिजे. करता करविता तो आहे. आपण त्याच्या कळसूत्री बाहुल्या! या धारणेत, फक्त ईश्वर काढून मेंदू घातला की ठरलोच आपण विज्ञान-निष्ठ, असे मानणे म्हणजे विज्ञानही समजले नाही आणि मी ही समजला नाही एवढेच दिसून येते.

अगदी सेव्हन हॅबिट्सवाला कोवे सुध्दा सुरवातच अशी करतो की, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स च्या मध्ये, रिस्पॉन्स निवडणारे आपण असतो. म्हणून आपण घटनाक्रम बदलू शकतो आणि स्वतःलाही बदलू शकतो. बाह्य निसर्गाबाबत, उदा. आत्ता वाळवून ठेवले तर नंतर खायला मिळेल, अशी पोस्टपोनमेंट करता येते., तशीच शरीर-अंतर्गत निसर्गाबाबतही करता येते. आत्ता मी काही बोलणार नाही पण नेमकी वेळ आल्यावर सुनावल्याशिवाय सोडणार नाही असे ठरवून, सुनावताना लागणारा आवेशही, आपण नेमक्या वेळेसाठी राखून ठेवू शकतो. ही पोस्टपोनमेंट करताना आपण शरीर-अंतर्गत निसर्गात इन्होवेशन करत असतो.  

मी निर्णय घेतो, रेटून तडीला लावतो आणि त्याची जबाबदारी घेतो या, मानवी भावविश्वातील अनिवार्य अशा घटिताला, एक शारीरिक व विशेषत्वाने मैंद्विक बाजूही असते, हे कोणीच नाकारणार नाही. पण यावरून या गोष्टीचे वर्णन मेंदू निर्णय घेतो असे करणे अनुचित आहे. मेंदू जरी झाला तरी, तो म्हणजे एखादे, निर्णय घेणे या अर्थाची क्रिया करणारे व प्रयोजन-भान असलेले अस्तित्व, (टेलिओलॉजिकल एन्टीटी), नाही. मेंदूत अनेक विकल्प शक्य असणाऱ्या प्रक्रिया घडू शकतात व त्या पैकी काही प्रक्रियांचे पर्यवसान, इतर विकल्पात न होता, विशिष्ट विकल्पात होते एवढेच म्हणता येईल. अन्यथा, नुसता फ्यूज उडाला असे न म्हणता तारा जळतील इतका प्रवाह वाहण्याची शक्यता निर्माण होताच ते न होऊ देण्यासाठी फ्यूजने आत्मसमर्पण केले असे म्हणण्यात जी चेतन-गुणोक्ती केली जाते तीच मेंदू बाबत केली असे होईल. कम्प्युटरजी ये आन्सर लॉक कीजीये असे अमिताभ गमतीने म्हणतो, तेव्हा सर्वांना हे माहीत असते की निर्णय हा खेळाडूनेच घेतला आहे आणि तो फायनल म्हणून नोंदविण्याचे काम कोणीतरी ऑपरेटरजीच करणार आहे.

दृष्टीने होणारी सृष्टी : आय डीम देअरफोर इट सीम्स
जीवनाच्या भाषेतील भावप्रत्ययाला जोडून असणारे विज्ञानाच्या भाषेतले जडघटित बदलले तर भावप्रत्यय बदलतो ही बाजू जडवादी लोक ध्यानात घेतात. पण नेमकी उलट प्रक्रियाही घडविता येते हे मात्र ते विसरतात. जीवनाच्या भाषेतली गरम वस्तू म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत जिचे रेणू जोरात कंप पावत आहेत अशी वस्तू. आपल्याला थरथर जाणवत नसून गरमपणाच जाणवतो. आपण गरम वस्तू गार करण्यासाठी तिला गार वस्तूच्या संपर्कात आणतो आणि ती गार होतेही. हेच विज्ञानाच्याच्या भाषेत असे म्हणता येईल की, अधिक कंपायमान वस्तुतील गती-उर्जा कमी कंपायमान वस्तूत जिरते. आपण पिवळा आणि निळा रंग मिसळून हिरवा बनवू शकतो हीच गोष्ट अमूक फ्रिक्वेन्सी परावर्तित करणारी रेणूंची रचना बदलून------- असेही म्हणता येईल. तसेच आपण तार लावताना ती स्वराशी लावतो, कंपद्रुती(फ्रिक्वेन्सी)शी नव्हे. पण मग यामुळे तिची कंपद्रुती निश्चित होते की नाही? अर्थात होतेच. 

थोडक्यात जीवनाच्या भाषेतले भावप्रत्यय आणि विज्ञानाच्या भाषेतली जडघटिते यांच्यात समकक्षता(कॉरस्पॉंडन्स) असते; एकस्वरूपता(आयडेन्टिटी) नव्हे.
हे जसे शरीरबाह्य जड जगाबाबत खरे आहे तसेच ते शरीरांतर्गत जड-जगाबाबतही खरे आहे. पोटात गोळा येतो हेही खरे आणि अड्रेनलीन पंप होते हेही खरे. धक्कादायक बातमी ही अफवा होती असे कळताच हुश्श होते’ ‘जीवात जीव येतो हेही खरे आणि स्ट्रेस रीलीजिंग हार्मोन स्रवते हेही खरे.   

कृत्रिम-हास्य-क्लब हे तेव्हाच यशस्वी होतात की जेव्हा त्या खोटे हसणाऱ्यांना खरे हसू येऊ लागते व खऱ्या हास्याशी समकक्ष अशी जी काही जैवरासायनिक घटिते असतील तीही त्यांच्या मेंदूत व ग्रंथीत इ. ठिकाणी घडतात. विनोदामुळे हसणे, एन.टू.ओ(लाफिंग गॅस) मुळे हसणे आणि कृत्रिम-क्लब मधले हसणे यात फरक नक्कीच आहेत(त्यापैकी विनोदामुळे हसणे हे उत्तम असे माझे वैयक्तिक मत आहे) पण साम्येही आहेतच. (लहान मुलांचे काही डेंटिस्ट मुलांना चक्क सोम्य एन.टू.ओ(लाफिंग गॅस) देतात. त्यामुळे मूल रिलॅक्स्ड राहून व चुळबुळ न करता दातांवरचे काम करू देते. ही एक अधिकृत व मान्यताप्राप्त पद्धत आहे.

विविध भावनांचे आकार(फॉर्म्स) तेच असतात व त्यांची मैद्विक बाजू समान प्रकारची असते पण या भावनांचे आशय काय असतील हे चिन्हमय जगातल्या संदर्भांवर अवलंबून असते. एम्बरॅसमेंटने उदा. भिवईच्या वर दुखणे, हे दोन व्यक्तीत समान असेल पण कोणाला कशाची एम्बरॅसमेंट वाटेल याचा आशय अगदीच वेगळा असेल. आणि मुख्य म्हणजे हा आशय मैंद्विक टर्म्समध्ये रिडयूसिबल नसेल.
इतकेच नव्हे तर एखाद्या जास्त वयाच्या व्यक्तीने, जरी नव्याने वाद्य शिकायला घेतले आणि भरपूर रियाझ केला, तरी तिच्याही कानांशी तसेच हात-बोटे यांच्याशी संबंधित मेंदू-पेशींचे चक्क रीवायरिंग होते. म्हणजेच जाणिवेतल्या निर्णयांनी मेंदूचे हार्डवेअरसुध्दा बदलता येते. अर्थात आपण रीवायरिंग करत आहोत अशी जाणीव मेंदू-विज्ञानाच्या अभावी नसे पण आता ती होईल. 

म्हणजेच, कारण-संबंध म्हणून पहाता जाणीवेतून जडात, असेही कारणत्व नेहमीच अस्तित्वात होते. पॅरॅलिसीसच्या रुग्णांना जर फिजिओथेरपी करायला प्रेरित केले तर त्यांच्या मृत नर्व्हज् चे काम जिवंत नर्व्हज् स्वतःकडे घेतात. तसे पहाता फिजिओथेरपी हा हस्तक्षेप शारीरच आहे पण त्यासाठीची मनःपूर्वकता(सिन्सिरीटी) निर्माण होईल की नाही हे ती व्यक्ती जाणीवेत काय धारणा बाळगून आहे यावर अवलंबून असणार आहे. यावर तुम्ही पण त्या धारणा रुजण्यासाठी आवश्यक अशी मेंदू-वैशिष्ट्ये होतीच की असे म्हणू शकाल व त्यावर मीही म्हणेन की ती मेंदू-वैशिष्ट्ये शाबूत राखण्यासाठी त्या व्यक्तीने लहानपणापासून घेतलेले जाणिवेतले निर्णय कारणीभूत आहेत. ही अनवस्था किंवा चक्रीयता टाळता येणार नाही कारण ती खरी आहे. जाणीवेने अंतर्गत जडाला घडविणे ही बाजू वजा करून चालणार नाही एव्हढेच मी म्हणत आहे. अंतर्गत जड-वैशिष्ट्ये जाणीव घडविण्यात योगदान करतच नाहीत असे माझे अजिबात मत नाही.

आपले संवेद्य-प्रत्ययसुद्धा (पर्सेप्शन्स) आपण ठरवून बदलू शकतो. पूर आलेल्या नदीच्या पुलावर उभे राहून नदीकडे पाहिले की कधी पूलच हलतो आहे असा विचित्र प्रत्यय येतो. तर कधी पूल स्थिर आहे व नदीच हलते आहे असा वास्तवोचित प्रत्ययही येतो. हे का होते आहे याचे बौद्धिक आकलनही होते. पण विशेष महत्त्वाचे असे की आपण त्या दोहोंपैकी कोणता प्रत्यय यावा हे ठरवू शकतो. पूल हलतोय असे बघायचे ठरविले तर तसे दिसते आणि नदी हलतेय असे बघायचे ठरवले तर तसेही दिसते.
कागदावर काढलेले एलिप्स हे कागदाच्याच(वा समांतर) पातळीतल्या एलिप्सचे चित्र आहे की तिरक्या नजरेने पाहिलेल्या वर्तुळाचे चित्र आहे हे इतर संदर्भ न मिळाल्यास ठरविताच येणार नाही. असेच ठोकळा की कोपरा? वगैरे अनेकार्थी आकृत्यांचे आहे. फिगर कुठली व बॅकग्राउंड कुठली हे ठरवून एकाच चित्रात दोन भिन्न चित्रे (चेहेरे की प्याला, म्हातारी की तरणी वगैरे) बघता येतात. प्रत्यय हा अर्थपूर्ण असतो. एकच संवेद्य हे अनेक अर्थांनी प्रत्ययाला येते. आय डीम देअरफोर इट सीम्स असे हे अनुभव असतात.

असेच भविष्यकालीन घटनांच्या कल्पितांचे वर्तमानात येणाऱे प्रत्ययसुध्दा आपण ठरवून बदलू शकतो. जेव्हा आपण एखादा हट्ट सोडून देतो तेव्हा हा अनुभव येतो. हट्ट असताना आपण अपयशाने होणारया फजितीचेही प्रतिमा-रंजन करत असतो. हट्ट पुरा न झाल्यास, आपले हितचिंतक, हितशत्रू, स्पर्धक किंवा ज्यांनी आपल्या यशावर आंस लावली आहे असे लोक व बघे लोक यांचे चेहेरे कसे होतील याच्या प्रतिमाही आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात. हट्ट सोडल्या क्षणी सगळेच चित्र बदलते. त्याचवेळी या काल्पनिक भीतीमुळे घडणाऱ्या सर्व शारीर/मैद्विक गोष्टीही बदलतात. मोकळा श्वास, इतर गोष्टीत रस वाटून येणाऱ्या अनुकूल संवेदना, हार्मोन्स, मेंदूतील वाहक-रसायने या सगळ्याची वस्तुनिष्ठ रीडिंगज् देखील बदलतात. त्या हट्टाच्या अनावश्यकपणाचा बोध होण्याचा क्षण सगळी कलाटणी देतो. इतकेच नव्हे तर, हट्ट चालू राहावा यासाठी हा बोध टाळला जाईल असे युक्तीवादही आपण मनातल्या मनात करत होतो व ते फसवे होते, हेही आपल्याला उमगते. मानसिक आजारात औषधोपचारांनी मेंदूतील रसायने, इतर हार्मोन्स आणि शारीरिक मापदंडातही जे फरक पडतात, तेच फरक वर्तनात्मक उपचार, बोधात्मक उपचार, योगसाधना या जाणीवेच्या अंगाने केलेल्या बदलांमुळेही पडतात. (अर्थात याला मर्यादा आहेत, तीव्रतेनुसार व शारीर कारणे असल्यास औषधोपचारच लागतात.)

निर्णय ही घटना मेंदूत अगोदर घडते आणि आपल्याला नंतर कळते?
आधीची घटना ही नंतरच्या घटनेमुळे कशी घडू शकेल? हा वर वर पहाता बिनतोड वाटणारा युक्तिवाद वापरून मेंदुवाद्यांनी खळबळ माजवली आहे. या प्रयोगात माणूस निर्णय होताच एक बटन दाबतो पण त्याच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये निर्णयाची झळाळी अगोदर दिसलेली असते. पण हे दाखवले जाते तितके चमत्कारिक नाहीच. उदा. वीज अगोदर चमकते, गडगडाट नंतर ऐकू येतो. जर कोणी गडगडाटामुळे वीज चमकते असे मानले तर त्याला कारण-नंतर व कार्य-अगोदर या विसंगतीत पकडता येईल. पण आपल्याला हे माहीत आहे की या घटना दोन नसून ती एकच घटना आहे. प्रकाशाचा वेग हा ध्वनिच्या वेगापेक्षा फारच जास्त असल्याने दृक-प्रत्यय आधी येतो व श्रुत-प्रत्यय नंतर येतो. तद्वतच निर्णय व्हायला लागणारा वेळ आणि त्याचे आकलन होऊन तो द्यायला लागणारा वेळ यात फरक पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आकलन हे इतर अनेक धारणांमध्ये सुसंगत ठरून व्हावे लागते. अनुमोदन मिळून निर्णय पास होताना त्याचे आकलन पुरे होत असते. 

अनेकजण गुंतलेले असतानाचा निर्णय हा आपण दृष्टांत म्हणून घेऊ. फॉंर्मॅलिटीज पूर्ण करायला लागतात इतर खात्यांच्या एन.ओ.सी.ज् घ्याव्या लागतात. समोरच्या पार्टीला आपला प्रस्ताव पटणे आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंट हाती पडणे यात वेळ जातोच. साहेबांनी हो म्हटलेलंच आहे ही बातमी प्युनने फोडायची नसते! मेंदूचा स्कॅन करणाऱ्या चुंबकीय लहरी तोंडाळ प्युनचे काम करतात व त्यामुळे स्वतःच्या’ अगोदर शास्त्रज्ञांना बातमी लागते. ही बातमी त्यांनी बातमी म्हणून छापायला काही हरकत नाही. पण ते त्याच अंकात निर्णाता मी हा केवळ एक भास असा अग्रलेखही ठोकायला लागले तर त्याला माझा आक्षेप आहे. निर्णायक  मज्जापेशींमध्ये फ्लॅश होणे आणि इतर सर्व मज्जापेशींकडून तो फ्लॅश पचवला जाणे यात दुसरी प्रक्रिया वेळखाऊ आहे. 

आकलनाला कॉम्प्रिहेन्शन’ म्हणतात ते उगीच नाही ते एकुणात(कॉम्प्रिहेन्सिव्हली) व्हावे लागते. दुसरे असे की स्कॅनमध्ये फ्लॅश पडण्या अगोदरपासून अनिर्णीत काळातली दोलायमानता(अम्बिव्हॅल्न्स) किंवा ही केस कशात मोडते या माहितीचा शोध(स्क्रुटिनी) या गोष्टी चालू नसतात की काय? ही दोलायमानता व स्क्रुटिनी भोगणारा मी म्हणजेच निर्णाता मी. तो कार्यरत असल्याचे चित्र स्कॅनमध्ये अगोदर पासून दिसत नाही काय? म्हणजे  शोध, दोलायमानता, निर्णायकता आणि आकलन हा कालक्रम तर अजिबात मोडला गेलेला नाहीये. त्यामुळे काळाच्या संदर्भात उलट्या दिशेने कारणत्व हा त्या प्रयोगाचा योग्य निष्कर्ष नसून गैर-अर्थ-लावणे (मिसइंटरप्रिटेशन) आहे.

याखेरीज मेंदू अगोदर ठरवतो या मताला माझा आणखी एक स्वतंत्र आक्षेप आहे. पुन्हा आपण, निर्णयात अनेकजण गुंतलेले असतानाचा दृष्टांत घेऊ. समजा मला हे खात्रीने माहीत आहे की उदाहरणार्थ दर पौर्णिमेच्या दिवशी मी अनावर होऊन एक खून करणारच. एरवी मी सज्जन आहे. मी माझ्या हितचिंतकांना सांगेन, की त्या दिवशी मला कोंडून ठेवा मी कितीही आरडाओरडा केला तरी अजिबात सोडू नका. आता त्या दिवशी मी मनासारखे वागायला स्वतंत्र नसेन. पण हा माझाच निर्णय असेल व म्हणूनच एकूण घटनेचा निर्णाता मीच असेन. ही टोकाची परीस्थिती झाली म्हणून त्यात इतरांचे साह्य लागले. परंतु, मला ऐन प्रसंगी कोणते मोह होतात हे ओळखून, मी माझ्या उत्स्फूर्ततेला एरवीच काही वळण लावून ठेवतो. ऐन प्रसंगी म्हणाल तर मी या मीच लावलेल्या वळणाला वश असतो व त्या क्षणी स्वैर नसतो. पण एकुणात मी स्वनियंता असतो व म्हणजेच स्वतंत्र असतो. मी माझ्या इन-व्हॉलेंटरी(वस्तुतंत्र) अंगाला (नेणीव हा शब्द टाळावा) व्हॉलेंटरीली (पुरुषतंत्ररित्या) घडविलेले असते. मी माझ्याच शिस्तीचा गुलाम असल्यामुळे मला आकलन व्हायच्या आधीच माझा निर्णायक प्रतिसाद उमटेल व नंतर मी त्यावर शिक्कामोर्तब करीन. याही मार्गाने आपण, स्कॅनमध्ये फ्लॅश अगोदर पडणे आणि कळूनसवरून बटन नंतर दाबले जाणे, या गोष्टीला फ्रीविल नसल्याचा पुरावा म्हणून बाद ठरवू शकतो व मेंदुनियततावादी मताचे खंडन करू शकतो. खरेतर फ्रीविल या शब्दातल्या फ्री मुळे मुक्त हा चुकीचा शब्द घेतला जातो. खरा प्रश्न व्यक्त करण्यासाठी ऑटोनॉमी=स्वयम्-नियामकता हा अधिक योग्य शब्द आहे व त्यातही परफेक्ट-ऑटोनॉमी अभिप्रेत नाही. आपली स्वयम्-नियामकता बाह्य रेट्यांपुढे(जसेकी सत्तेपुढे शहाणपण) व अंतर्गत रेट्यांपुढे(जसेकी व्यसन सोडता न येणे) अनेकदा थिटी पडते हे तर उघडच आहे. पण थिटी पडणे आणि मुदलातच नसणे (किंवा आभासी असणे) या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.

त्याने त्याप्रसंगी जे केले त्यापेक्षा तो तेव्हा वेगळे करू शकला असता(च) का?
सध्याचे कडवे इहवादी सॅम हॅरिस यांनी त्यांच्या ब्लॉगवर फ्रीविलचे अस्तित्व नाकारून मोठाच धक्का दिलेला आहे. अत्यंत क्रूर गुन्ह्याचे वर्णन करून, माझे मलाच कळले नाही की मी हे कसे करू शकलो? असे उद्गार देऊन व त्या गुन्हेगारावर बालपणी कसे अत्याचार झालेले होते हे सांगून हॅरिससाहेब म्हणतात. अणू अणू पर्यंतचे तपशील चोख पाळून जर माझ्यातील अणूंपासून तो गुन्हेगार बनवला तर मीही तेच करेन की जे त्याने केले. अहो पण जर अशी सर्वांशाने अदलाबदल झाली तर तुम्ही सॅम हॅरिस असणारच नाही आहात. तुम्ही तोच असणार आहात याचे काय? तुमच्या मेंदूत उभवलेला जाणीव-स्वरूप सॅम हॅरिस तसाच राहून अदलाबदल केली तर तुमच्यावर बालपणी अत्याचार झालेले असणार नाहीयेत. तुम्ही त्याच्या जागी असतात तर या प्रश्नाला कट्टर-चिद्वादी विनोबाजींनी बऱ्याच काळापूर्वी अगदी हेच उत्तर दिले होते. सर्वांशांनी त्याच्या जागीचा मी म्हणजे तोच! मी नव्हेच.

जेव्हा आपण एखादा माणूस वेगळी निवड करू शकला असता असे म्हणतो त्या वेळी आपल्याला तसे सिध्द करण्याची जबाबदारी येते काय? त्याला इतर कोणी दमनाने भाग पाडले नव्हते ना इथपर्यंत आपण(निदान सिद्धांततः) जबाबदारी घेऊ शकतो. पण तो माणूस त्याच्या आंतरिक निसर्गाच्या किती आधीन असेल आणि त्यावर कितपत स्वार असेल यावर बाहेरून फार खात्रीने बोलू शकत नाही. पॅट्रिका चर्चलँड यांनी ब्रेन ट्यूमरचा दाब पडून लैंगिक विकृती उद्भवल्याचे व त्यातून स्वतःच्याच आठ वर्षाच्या मुली वर बलात्कार केल्याचे उदाहरण दिलेले आहे. मुद्दा असा आहे की अनावर होऊन स्वतःवरील ताबा सुटण्याअगोदर त्या व्यक्तीला दुविधा जाणवलीच नव्हती काय? ट्युमर होण्या आधी त्याची जी स्व-प्रतिमा होती, आपलीच आठ वर्षाची मुलगी हे जे भान होते त्यामुळे त्याला काहीच अडथळा आला नाही? केस स्टडीत असे तर कोठे म्हटलेले नाही. ट्यूमर नसलेल्यांनाही, जर पश्चात्ताप होत असेल तर, त्यांचीही त्यांना नको ती प्रेरणा वरचढ ठरलेलीच असते. 

स्व-निर्णातेपण असणे म्हणजे नेहमीच ते यशस्वी ठरणे असे कोणीच म्हणणार नाही. जेव्हा अयशस्वी ठरते तेव्हा ते स्व-निर्णातेपणच नव्हे असे जर मानले तर मग कोणत्याही गुन्ह्याला नेहमीच इनसॅनिटी-डिफेन्स मान्य करावा लागेल. जसे मला कायदाच माहित नव्हता हा डिफेन्स (प्लीडिंग इग्नरन्स) चालत नाही तसाच  माझ्यातील निसरड्या जागा मला माहीतच नव्हत्या हाही डिफेन्स चालणार नाही
शिक्षेची तीव्रता ठरविताना गुन्हेगाराचे त्याच्या हातून गुन्हा घडण्यामागचे दुर्भाग्य हे जमेस धरता येईल. पण दोषी ठरविणे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता लावणे, आणि शक्य असल्यास बळी ठरलेल्यांना भरपाई पुनर्वसन देणे, इतकेच नव्हे तर गुन्हेगाराला सक्तीने वैद्यकीय उपचार देणे व त्याचेही पुनर्वसन करणे हे सारे न्यायप्रक्रियेत असावेच लागेल.. सूडाचे समाधान मिळवू नये हे तत्त्व तर मेंदू-विज्ञानाचा अजिबात पत्ता नव्हता तेव्हाही योग्यच होते. पण स्वतःच्या दुर्भाग्यापोटी, दुसऱ्यावर दुर्भाग्य लादण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होऊ शकत नाही हे निश्चित. कोणत्याच न्यायदानाने वा उपचाराने, झालेल्या गुन्ह्याच्या वेळचा स्व-निर्णातेपणा, काळात मागे जाऊन सुधारता येत नाहीच. पुढे होणार असलेले गुन्हे टाळता येण्यासाठी आत्ताच काही बाह्य बंधने आणि आंतरिक उपचार करून ठेवणे हाच खरा मुद्दा आहे. तसेच एखाद्याने चांगले काम केले असेल तर ते काही त्याने पारितोषिकाच्या वा सन्मानाच्या आशेने केले असेल असे नाही. पण काय म्हणजे चांगले याचा सार्विक कौल देण्यासाठी पारितोषके वा सन्मान दिले जातात. तेव्हा तो वेगळे वागू शकला(च) असता हे सिध्द करायची ना आवश्यकता आहे ना शक्यता.

फ्रेडरिक हायेक या विचारवंताने त्याच्या कॉंन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी या ग्रंथात मार्मिक मांडणी केलेली आहे. हायेकच्या मते मुळात चिद्वाद्यांनी एक घोळ घालून ठेवल्याने जड-नियति-वाद्यांचे फावले आहे. हायेकच्या मते तो घोळ असा, निर्णाता-स्व हा जर कार्यकारण भावाच्या कक्षेत असेल व प्रभावाखाली असेल तर मग तो स्व-निर्णाता राहणारच नाही व जबाबदारी घेणे या गोष्टीची शक्यताच राहणार नाही. जर जबाबदारी घ्यायची असेल तर निर्णाता-स्व हा कार्यकारण भावाच्या बाहेर राहणारा प्रभावमुक्त-अतीत-आत्मा असायला हवाहायेकच्या मते उलट निर्णाता-स्व हा अतीत-आत्मा नसून तो कार्यकारणभावाच्या कक्षेत येतो म्हणूनच तो सुधारण्याची आशा असते!  हायेक म्हणतो की अनावर होणे/ढेपाळणे हा दोषच मानला पाहिजे. स्वतःला आवरता आले नाही तर शिक्षा होते किंवा निदान निंदा होते या अनुभवातूनच माणूस स्वतःला आवरायला शिकतो. तेव्हाचा जो तू होतास तो तू कदाचित तेच करू शकत होतास की जे तू केलेस. मग तरीही मी तुला कां झापतो आहे? तेव्हाचा तू हा न झापलेला तू होतास. आता झापल्याने तुझ्यावर काहीतरी परिणाम होईल व यापुढे तत्सम प्रसंग आला तर झापलेला तू वेगळा असशील व वेगळे करशील या आशेने मी तुला झापतो आहे. तू जर निंदा-स्तुती, लाज-गौरव, शिक्षा-बक्षीस या साऱ्यापासून अविकारी राहणारा असा आत्मा असतास तर नैतिक निवाडयांना व्यवहारात अर्थ उरला नसता. तू कार्यकारणभावाच्या पार नाहीस हेच बरे आहे! हायेकने तो तेव्हाच वेगळे वागू शकला असता (च) का? या, काळाला रिवाईंड करून वेगळ्या घटनाक्रमाने फास्ट फॉरवर्ड करायला भाग पाडणाऱ्या, प्रश्नापासून नैतिक निवाडे देणे या मानवी व्यवहाराची अशी सुटका केली आहे.[कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी ग्रंथातील रिस्पॉन्सिबिलिटी हा चॅप्टर]

आंतरिक-स्वातंत्र्याबाबत असेच म्हणता येईल. आपल्याला पूर्णतः आंतरिक-स्वातंत्र्य असते असे (अस्तित्ववादी वगळता) कोणीच मानत नाही. निवड करताना जे द्वंद्व अनुभवास येते ते द्वंद्व जर आपण पूर्णतः निसर्गाधीन असतो तरी आले नसते आणि उलटपक्षी जर आपण पूर्णतः स्वाधीन असतो तरी आले नसते. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती नव्हे. तर स्वातंत्र्य म्हणजे बंधनातील वाव वापरून नव्या प्रसंगीच्या बंधनांची निवड करण्याची/तसा कौल देण्याची संधी( किंवा कौल देण्याचे संकट) होय. ही मानवी स्थिती, भौतिक खुलासा होऊ शकण्याने टळत नसते व एकेकाळी भौतिक खुलासा नव्हता, म्हणून ती उद्भवली होती, असेही नाही.

अनुल्लंघ्य नियमबद्धता म्हणजे आधीच लिहून ठेवलेले कथानक नव्हे.
टळलेल्या, टाळलेल्या वा सोडून द्याव्या लागलेल्या, म्हणजेच प्रत्यक्षात न आलेल्या शक्यता या अस्तित्वातच नसतात कारण त्या होत्या तेव्हा केवळ शक्यता म्हणून होत्या व आता त्या शक्यता म्हणूनही शिल्लक नाहीत. हा एक फसवा युक्तिवाद आहे. केलेली निवड हा इतर विकल्पांचा त्याग असते पण त्यामुळेच ती काहीएक किंमत देऊन केलेली निवड असते. सोडलेले लाभ वा टाळलेली हानी यांचे मूल्य खरे असते. कारण त्यांच्याशी तुलना केल्याशिवाय माणसाला त्याने केलेली निवडही मूल्यवान वाटणारच नसते. मूल्य ही निसर्गविज्ञानाची विषयवस्तूच नव्हे. त्यामुळे जड-जगातल्या घटना म्हणून जरी त्या कधीच घडलेल्या नसल्या तरी जीवनचरित्रात त्या न घडलेल्या म्हणून असतातच. नियतिवादी मंडळी भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात जी असममिती आहे तिचा गैरफायदा घेतात. ज्या अर्थी घडले आहे त्या अर्थी त्यासाठी पुरेशी कारणे उपस्थित होतीच व ज्या अर्थी पुरेशी कारणे उपस्थित होती त्या अर्थी ते घडणारच होते. यातून जे व्हायचे असते ते झाल्याशिवाय रहात नाही या लाडक्या मताप्रत ते पोहोचतात.(मग टाळण्याची धडपड करताच कशाला? बघत राहा ना!) मी उलट असा प्रश्न विचारतो की घडणारच असणे या क्रियापदाचा काल कोणता. भूतकाळात ज्या अर्थी ते घडले नव्हते त्या अर्थी पुरेशी कारणे जमा झालेली नव्हती म्हणजेच ते घडणारच होते असे नाही. आता ते घडणारच असणे शक्यच नाही कारण ते अगोदरच घडलेले आहे आणि प्रत्यक्ष घडत होते तेव्हा ते घडणार-असणारे नसून घडत-असलेले असणार. त्यामुळे घडणारच असणे हे कोणत्याच काळात नसते.  
एखादी अगदी निरपवादपणे नियमबध्द अशी व्यवस्था असली तर त्या व्यवस्थेत नव्या व वेगळ्या अशा काही घटनाच घडू शकत नाहीत असे मानायचे काय कारण आहे? 
बुद्धिबळाचे नियम तंतोतंत पाळून काय एकच एक डाव पुनःपुन्हा घडत रहातो? किंबहुना इतक्या प्रचंड संख्येने संभाव्य डावांना वाव असतो की त्यामुळेच हा खेळ संपलेला नाही. तो चालूच आहे. पूर्णपणे व्हॅलिड-मूव्ह ही अत्यंत स्टुपिड मूव्ह असू शकते. अशी कल्पना करा की एका निरीक्षकाला फक्त व्हॅलिड की इनव्हॅलिड? एव्हढेच कळू शकते आहे. तो म्हणतो की काय तेच तेच चालवलय. केव्हाही पहा, तुम्ही तंतोतंत तेच नियम पाळत आहात’. आता बुद्धिबळाच्या जागी निसर्ग आणि रंगतदार डावांच्या कथेच्या जागी इतिहास (जीवोत्पत्तीचा, मानवोत्पत्तीचा, मानवी वगैरे) ठेवून बघा. म्हणजे विज्ञानाच्या विजयाला नियतिवादाचा विजय समजणारे लोक, कोणत्या प्रकारची चूक करत आहेत, याचा काहीसा अंदाज येईल (हा फक्त दृष्टांत आहे. निसर्ग-नियमांच्या बाबतीत बनविणे, पाळणे, मोडणे, बदलणे अशा गोष्टींचा प्रश्नच नसतो)
निसर्ग हा कारणबद्ध असण्याने त्यात ऑप्शन्सच राहणार नाहीत हे म्हणणे खोडून काढायला फार वरच्या दर्जाचे सिद्धांतन अजिबात आवश्यक नाही. 
एकाच मोमेंटमने  सोडलेले तोफगोळे हे दोन मार्गांनी (क्वाड्रॅटिक इक्वेशन ला दोन उत्तरे असल्याने) जाऊ शकतात व यामुळे तटावरून पलीकडे मारा करणारी उखळी तोफ आणि तटावर मारा करणारी कुल्पी तोफ हे ऑप्शन्स असतात एवढेच उदाहरण यासाठी पुरेसे आहे.
निसर्ग-नियम हे कितीही समजले तरी नुसत्या नियमांपासून प्रत्यक्ष घटितांची भाकिते करता येत नाहीत. कोणताही नियम जर वापरायचा असेल तर त्यात आरंभिक स्थिती(इनिशियल कंडिशन्स) दिलेल्या असाव्या लागतात आणि या आरंभिक स्थिती नेहमीच ऐतिहासिक असतात, वैज्ञानिक नव्हेत. पृथ्वीवर पाणी आहे हे एक आपातिक (कंटिंजंट) तथ्य आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हेही एक आपातिक (कंटिंजंट) तथ्य आहे. अशा अनेक दिलेल्या गोष्टी घेऊनच विज्ञान मांडावे लागते. 

निसर्गाचा इतिहास ही गोष्ट निसर्गनियमांचा व्यूह या गोष्टी पेक्षा अगदीच वेगळी गोष्ट आहे. मोठे रेणू झाले, स्व-मुद्रक रेणू झाले, जनुके झाली, त्यांनी जीव बनवले( जनुके हेतुपूर्वकपणे काही करतात अशातला भाग नाही. पण येथे व पुढे आलंकारिक भाषा वापरून आपण त्याना कर्तेपण बहाल करीत आहोत), बराच काळ जीवांवर जनुकांचे थेट नियंत्रण राहिले, मग जनुकांनी सगळा खटाटोप स्वतः करण्यापेक्षा मेंदू नामक पेशवा नेमला व जनुके मुख्यतः आपली गादी चालवत राहिली. बा मेंदवा! कसेही करून आमचे संतान(सातत्य)चालू ठेव मग त्यासाठी लागेल ते कर (जास्तच आलंकारिक). मेंदूतील प्रक्रिया तगण्यापुरती न राहता तिला स्वतःचीच भिंगरी लागली. गरज नसताना गोष्टी कल्पिल्या जाऊ लागल्या. कल्पिते आकर्षक वाटू लागली आणि महाराजा काय सांगावे? प्रयोजनांसाठी वखवखलेला मनुष्य नामक दुष्ट प्राणी की हो बनला. त्याने चिन्हांचे जग रचले. चिन्हांसाठी तो मरू मारू लागला. एकूण काय तर आपली केस ही निसर्गदेवाच्या पार हाताबाहेर गेलेली केस आहे. या कथेतील तात्पर्य असे की हे जरी मेंदू जड-जगातलाच असला तरी मानवी भावविश्व हे जड म्हणून उलगडता येणारे नाही. जसे सजीव हा वस्तूही असतो पण वस्तूचे नियम त्याला पुरेसे नसतात. तसाच माणूस हा प्राणीही असतो पण प्राण्याचे नियम हे त्याला पुरेसे नसतात.

जेव्हा जेव्हा साध्या घटकांपासून उच्चतर पातळीवरचा संघात(कॉम्पोझिट) बनतो तेव्हा तेव्हा त्या संघाताला असे काही उद्भूत-गुण(इमर्जन्ट प्रॉपर्टीज्) लाभतात की जे निम्न्तर घटकांच्या गुणांत घटविता येत नाहीत. तरीही ते तसे घटविण्याचा अट्टहास म्हणजे रिडक्शनिझम(निम्नघटनवाद) होय. विज्ञानाने विश्लेषण करायचे असते निम्न-घटन नव्हे.
यामुळेच कारणमीमांसा ही कितीही केली तरी ती प्रयोजनमीमांसेची जागा घेऊ शकत नाही.
वरिष्ठ-अरे काल माझी बी पी ची गोळी घ्यायची राहून गेली होती त्यामुळे मी तुझ्यावर जास्तच भडकलो
कनिष्ट-चालायचच साहेब. पण मी जो मुद्दा मांडला होता तो तुम्हाला आता पटतोय की नाही?
साहेबाच्या क्रोधाची मात्रा(डिग्री) अनाठायी कां होती याची कारणमीमांसा मिळाली पण क्रोधाचा आशय योग्य होता की अयोग्य याचे उत्तर मात्र असे मनो-वैग्यानिक(हिंदी) असून चालणार नाही. आशयासाठी प्रयोजन मीमांसाच लागेल. कनिष्ट सुचवत होता तो मार्ग कंपनीच्या उद्दिष्टांशी जास्त सुसंगत होता काय? कंपनीची उद्दिष्टेच चुकत होती की काय? ही प्रश्न-मालिका कशासाठी ची प्रश्न-मालिका आहे. ती कशामुळे च्या भाषेत बोलताच येणार नाही.
उदाहरणार्थ स्वतःच्या प्राणांचे बलिदान करावयास तयार असणाऱ्यांचा मनःपिंड हा एका प्रकारचा असेल व तो तसा का बनला याची कारणे जमेल तितकी शोधताही येतील. पण ज्या प्रयोजनासाठी हे बलिदान दिले जात आहे ते प्रयोजन मानव-हिताचे आहे किंवा कसे याचे उत्तर कधीच मनःपिंड असा कां बनला? यांच्या कारणांमध्ये सापडणार नाही. हे दोन विषयच किंबहुना आयामच अगदी वेगळे आहेत.

कारणमीमांसा उपलब्ध होण्याने मूळ अनुभवाच्या स्वरूपात फारसा फरक पडत नाही. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध हा विज्ञान म्हणून पहाता, जे उष्णतेतच व कोरड्या स्थितीतच जगू शकतात असे जीवाणू मरून त्यांचा प्रेतांचा जो दुर्गंध(!) पसरतो, तो असतो. पण हे ज्यांना समजले आहे त्यांचाही अनुभव सुंदरच राहतो
हिरा शुध्द कार्बनच असतो, जसे की ग्राफाईट असते. पण हे कळल्याने हिऱ्याचे आकर्षण कमी होत नाहीच उलट टेट्राहेड्रॉन रचने मुळे येणारे काठिण्य आणि षटकोनी पातळ्यांमुळे येणारी मृदुता समजण्याने दोन्हीची अद्भूतता अधिकच खुलून दिसते. या संदर्भात आपण रिडक्शनिझमने केलेला मोठा दावा तपासून पाहिला पाहिजे. तो दावा असा की,
आपल्या जाणिवेत घडणारे कोणतेही भाव-घटित हे दुसरे तिसरे काही नसून मात्र एक मेंदू-घटितच असते

भावविश्वाची स्वायत्तता आणि त्याचे मेंदुविज्ञानात न् मावणे
कोणत्याही अगदी साध्या भाव-घटिताशी समकक्ष(कॉरस्पॉंडिंग) असे बरेच गुंतागुंतीचे काही ना काही मेंदु-घटितसुध्दा अस्तित्वात असणार ही गोष्ट मान्य करता येण्याजोगी आहे. इतकेच नव्हे तर जर कोणाला आपली मेंदु-घटिते नियंत्रित करता आली तर त्या द्वारे तो हुकुमशहा आपल्या भाव-घटितांवरही नियंत्रण मिळवू शकेल अशीही कल्पना करता येईल. पण हुकुमशहा-नियंत्रित असोत वा निसर्ग-नियमित आपली भाव-घटिते ही त्यांच्या मागील मेंदु-घटितांपासून अगदीच भिन्न स्वरूपाची असतात हे कधीच विसरून चालणार नाही. तसेच जर आपण समजा पूर्णतः या डॉ. वाटवे नामक हुकूमशहाच्या कह्यात गेलो व त्याने आपल्याला, आपणच आपली प्रयोजने ठरवत आहोत असेही आपल्याला वाटवले, तर फक्त डॉ. वाटवे यांनाच असे अनुभवास येईल की इतर माणसे स्वयंनिर्णयाचा भ्रम बाळगीत आहेत. पण डॉ. वाटवे यांना मात्र, त्यांच्या कोणत्या प्रयोजनासाठी आम्हा कठपुतळ्यांना नाचवायचे, याचा निर्णय करण्यासाठी, प्रयोजनेच ठरवावी लागतील. त्यांची कारण-मीमांसेवरची फुल-टू मास्टरी त्यात त्यांना काहीही मदत करू शकणार नाही.
ही दिव्यकथा आता सोडून देऊ.

नॉर्मल माणसांचा मेंदू कसकसा विकसित होतो यातही रचना आणि कार्य यांच्या अगदी भिन्न जुळण्या संभवतात मनाचे अमूक एक कार्य हे माझा मेंदू ज्या हार्डवेअर मार्गाने साधतो त्यापेक्षा अगदीच वेगळ्या हार्डवेअर मार्गाने तेच कार्य तुमचा मेंदू साधत असेल पण यांचा प्रत्यय आपल्याला कधीच येणार नाही. कारण युजरफ्रेंडली पातळीवरच आपल्याला मनाचा अनुभव येतो मशीन-लँग्वेज मध्ये नव्हे.(दृष्टांत म्हणून घ्यावे. तसेच माझ्या हाताने ठोसा मारला मी नव्हे असे म्हणणे आणि माझ्या मेंदूने मत्सर केला मी नव्हे असे म्हणणे हे आपले एकूण अस्तित्व फक्त जड-वस्तूंच्या विश्वात ढकलणेच ठरेल.)  इतकेच काय पण माझा लाल/हिरवा हा तुमच्या लाल/हिरव्या पेक्षा प्रत्यय म्हणून वेगळाही असू शकतो. जोवर आपण पानासारखा सिग्नल हा जा या अर्थाने व रक्तासारखा सिग्नल हा थांबा या अर्थाने घेतो तोवर आपण भावविश्व शेअर करतो. समजा दोन चिंतातूर आहेत. एकाची अति-चिंता एका औषधाने तर दुसऱ्याची अतिचिंता ही दुसऱ्या औषधाने आटोक्यात येऊ शकते. पण दोघांच्या चिंतांचे आशय, हे समान असतील की भिन्न? हे त्यांना समान औषध लागू पडते की भिन्न, यावर अजिबात अवलंबून नसते. चिंतांचे आशय हे भाव-विश्वातल्या घटितांवर अवलंबून असतात. मेदू-विश्वातल्या घटितांवर नव्हे.  

आपल्याला जेव्हा विराटाचा अनुभव येतो तेव्हा समकक्ष मेंदु-घटित मात्र कवटीत मावणारे व म्हणून उघडच अ-विराट असणार.(विश्वाचा आकार केवढा| ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा|| ही कविता चमकदार असली तरी चूक आहे.) निळ्या रंगाच्या अनुभवाचे समकक्ष  मेंदूघटित हे काही निळ्या रंगाचे असणार नाही. तसे काय एकेक रंग ही खरेतर एकेक फ्रिक्वेन्सी असते असे म्हणून रंगांचे रंग-पण जाणार आहे काय? रातराणीचा सुगंध जी मोहक अस्वस्थता आणतो, ती तो कां आणतो यावर घनघोर संशोधन करून कोणत्या चेतापेशीत काय घडते हे सांगितलेच तर फारतर त्याचा उपयोग एखादे कृत्रिम अत्तर बनविण्यास होईल. अस्वस्थतेचे काय करायचे याचे उत्तर मात्र मिळणार नाहीच! मानवाची उत्क्रांती आणि रातराणीची उत्क्रांती यातील भाव-घटित-बाह्य कारण मीमांसा करून कोणी खुलासा केलाच तरी ती अस्वस्थता रातराणी याच प्रकारची असणार. त्याचे सी टी ए जी मधील वर्णन काही सुगंधी/अस्वस्थ करणारे असणार नाही.

इतकेच नव्हे तर आपण जे मेंदु-विज्ञान विकसित करीत आहोत त्यातील गोष्टीसुध्दा भाव घटिते या स्वरूपातही आपल्या भाव-विश्वात सामील होत चालल्या आहेत. पण त्या गोष्टीं सुद्धा स्वतःसारख्या असत नाहीत. उदा. सायनॅप्स चे ज्ञान काही खुद्द सायनॅप्स मध्ये स्टोअर होत नसते किंवा सायनॅप्सच्या आकृतीचा मेंदूतील ठसा हा सायनॅप्सच्या आकृतीसारखा असत नाही. सिरोटोनिन डोपामिन इत्यादी घटत चालले असल्याची घटना आपल्यावर, डिप्रेशन या स्वरुपात आदळते. डिप्रेशनग्रस्त जाणीव कोणाला मीच जगायला नालायक आहे अशी होते तर कोणाला जग हेच माझ्या लायकीचे नाही अशीही होऊ शकते. हे आशय भावविश्वातलेच असतात मेंदुविश्वातले नव्हेत. पण मेंदूतील रासायनिक वाहकांबाबत जर ज्ञान असले तर आत्ता जरी मला निरर्थक वाटत असले तरी खरे म्हणजे जीवन निरर्थक नाही. मी जर उपचार घेतले तर अर्थपूर्ण वाटणारा मी अजूनही माझ्यातच  पुन्हा उभा राहू शकेल. मुख्य प्रश्न रसायने कमी पडतायत हा आहे अशी जाणीव होईल. पण बऱ्या झालेल्या डिप्रेशनवाल्याला कशात सार्थक वाटेल हे मात्र  सिरोटोनिन/डोपामिन च्या भाषेत सांगता येणार नाही. सारांश आपली कोणतीही भाव घटिते ही मेंदु-घटितापासून भिन्न स्वरूपाचीच राहतात.
जेव्हा माझा मेंदु बंद पडेल तेव्हा माझ्यापुरती मानवी भाव-विश्वाची मी-विशिष्ट-आवृत्ती  विझेल पण शेवटच्या क्षणीसुध्दा माझे तोवरचे आत्मचरित्र हे भाव-घटित स्वरूपातच असेल ते कधीच मेंदु-घटितांबाबतच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणांचा अहवाल असणार नाही.

टीप: याविषयावरील तत्त्वज्ञान समजण्यासाठी सखोल वाचन करायचे असल्यास काही        ग्रंथ पुढे सुचवत आहे.
    १.    फिनॉमिनॉलॉजी ऑफ पर्सेप्शन--- मॉरिस मेर्लोपॉंन्ति
    २.    फ्रीडम ऍन्ड नेचर---------------- पॉल रिकर
    ३.    एलबो रूम----------------------- डॅन डेनेट
    ४.    कन्सेप्ट ऑफ माइंड------------- गिल्बर्ट राईल  

8 comments:

  1. चांगलाच गुंतागुंतीचा विषय आहे, पण आपण पुष्कळ सोपा करून छान मांडलाय. मेंदू ही अजब गोष्टच मुळी मेंदूला झिणझिण्या आणणारी आहे! 'विश्वाचा आकार' नाही तरी 'विश्वाचा प्रत्यय' नक्कीच 'ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा' असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या सोयीची तथ्ये उचलून मांडणी करू पाहतो. 'धर्माची कास धरावी की विज्ञानाची' असा एक स्टुपिडच नव्हे तर इन्व्हॅलिड वाद अशाच संकुचित मांडणीतून येतो. आणि हल्ली एकंदर वाढलेली अधीरता व असहिष्णुता पाहता सखोल व विविधांगी जीवनविचार स्वीकारणे (किंवा मुळात समजणे) हेच अवघड होत चालले आहे..

    ReplyDelete
  2. सर्व प्रथम मन आणि बुद्धी हे दोन्ही आत्म्याचे नोकर किवा उजवा डावा हात आहेत ....मन सुखलोलुप असते तर बुद्धी व्यवहारी असते...त्यामुळे मन आणि बुद्धी मध्ये सतत संघर्ष सुरु असतो....बुद्धीने काही वेगळा विचार केला आणि त्या प्रमाणे आत्म्याने निर्णय केला तर काहीशी अस्थिरता काही काळासाठी निर्माण होऊ शकते..सुखलोलुप मन हे स्थिरतावादी अधिक असते...त्यामुळे ते नेहमी नवीन गोष्टीना विरोध करत राहते.....माणसाची प्रगती खुंटते ती मनाच्या या काहीशा स्थायीवृत्तीमुळे .....मन पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन येत असते असे म्हणतात ....त्यामुळेच लहान बालकाला बुद्धी बेताची असली तरी मन प्रभावशाली असते..त्यासाठीच लहान मुलाच्या कलाने घ्यावे लागते ..तिथे बुध्दीचा वापर करून नाही चालत.....सर्वसाधारणपणे माणूस मन किवा बुद्धीच्या आहारी जाऊन कुणाचे तरी गुलाम होणे पत्करताना दिसते....मन आणि बुद्धी दोन्हीचा सारासार विवेक वापरून निर्णय घेण्याची शक्ती फक्त आत्म्याकडे आहे...पण व्यवहारात जसे एखाद्या नेत्याभोवती चांडाळचौकडी चा वेढा पडलेला दिसतो तसेच काहीसे आत्म्याचे होते...अपुरी , अर्धवट किवा कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह असलेली माहिती आत्म्यापर्यंत जेव्हा पोचत राहते ..तेव्हा तेव्हा आत्म्याची निर्णायक शक्ती दिसून येत नाही....जर आत्म्याने मन किवा बुद्धीला शिरजोर होऊ दिले तर तो आत्मा स्वताचा नजरकैदेत असल्यासारखे वाटते......जी free will असते ती या आत्म्याकडे असते....ती आत्मा जोपर्यंत वापरत नाही तो पर्यंत मन किवा बुद्धी कुणाची तरी एकाची किवा दोघांची गुलामगिरी अटळ आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आत्मा हा केवळ साक्षी असतो की निर्णाताही असतो?


      Delete
  3. साने सर...सॅलूट....अप्रतिम लेख

    ReplyDelete
  4. राजीव साने यांचा हा लेख विचारप्रवर्तक आहे. माझ्या समजुती अनुसार मी म्हणजे माझा मेंदू. माझी विचारसरणी, आवडी-निवडी, भावभावना, स्मृती,बुद्धी, मन या सर्व गोष्टी मेंदूत आहेत. मी, म्हणजे मेंदू, जिवंत राहाण्यासाठी शरीर आणि इंद्रिये हवीतच. पण माझी एकात्मता (आयडेंटिफिकेशन ) मेंदूशी आहे. आत्म्याचे अस्तित्व मी मानत नाही. ती एक भ्रामक संकल्पना आहे. ( "आत्मा आणि मानवी मेंदू " याविषयावर मी एक लेख लिहिला आहे.ते असो.)
    म्हणजे "मी विचार करतो. " या विधानाचा अर्थ माझ्या डोक्यातील "मेंदू विचार करतो." असा होतो. माझ्याहून भिन्न विचार मेंदू करू शकत नाही. तसेच मेंदूहून भिन्न विचार मी करू शकत नाही. कारण मी आणि मेंदू या दोन भिन्न वस्तू नाहीत.
    ....यनावालावलकर.[ynwala@gmail.com,9404609126]

    ReplyDelete
  5. सर आत्म्याचे अस्तित्व न मानता देखील जाणीवेची स्वायत्तता मानता येते. यात वस्तूमीमांसेतील जडवादाला अजिबात ढळ पोहोचत नाही

    ReplyDelete