१) सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?
२) प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?
३) सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर का आणता येऊ नये?
४) ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास ती म्हण म्हणून का रुळली असेल? याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता मुद्दा तर्कशास्त्रात येतो?
५) प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?
उत्तरे
१) सात्विक संताप हा वदतोव्याघात आहे काय? ज्या संतापाला आपण सात्विक म्हणतो त्याला जास्त नेमके नाव देता येईल का?
उत्तर-सत्वगुणाच्या व्याख्येनुसार त्यात संताप ही गोष्ट बसूच शकत
नाही. म्हणजेच सात्विक-संताप हा वदतोव्याघातच आहे. जेव्हा आपल्या आलेला क्रोध हा
आपल्या वैयक्तिक नुकसानामुळे किंवा कोंडीमुळे असतो तेव्हा आपण त्याला सात्विक
म्हणत नाही. ज्या घटनेमुळे किंवा कृतीमुळे आपण मानत असलेले ब्रीद मोडले जाते,
धोक्यात येते आव्हानित होते तेव्हा येणारा संताप हा खासगी नसतो.
ब्रैदिक हा शब्द
कसासाच वाटेल म्हणून नैष्ठिक-संताप असा शब्द प्रचारात आणता येईल. पण नैष्ठिक
संतापही राजसच असेल सात्विक नव्हे.
२) प्लास्टिकचे मोती कृत्रिम असतात. कल्चर्ड मोती कृत्रिम असतात. म्हणून कल्चर्ड
मोती प्लास्टिकचे असतात. हा तर्कदोष कोणता?
उत्तर-यात दोन दोष आहेत. एकतर दोन नकारात्मक विधानांवरून एक
सकारात्मक विधान निगमित करता येत नाही असा नियम आहे. दुसरे असे की प्लास्टिकचे
मोती हे कृत्रिम मध्ये मोडतात पण सर्वच कृत्रिम मोती हे प्लास्टिकच्या मोत्यात मोडतात
असे आधार विधान नाही. किंबहुना कल्चर्ड मुळे कृत्रिमतेला प्लास्टिकेतर वर्ग असतात
हेच दिसून येते.
याला अन-डिस्ट्रिब्यूटेड मिडल असे म्हणतात व न्यायात सत्प्रतिपक्ष, व्यभिचारी
हेतू असे हेत्वाभास सांगितलेले आहेत. कल्चर्ड मोती असावेत की नसावेत किंवा कल्चर्ड
मोत्यांना कृत्रिम म्हणावे की म्हणू नये हे प्रश्न तर्कदोषात येत नाहीत. ते आधार
विधानाला आव्हानित करणारे व्याखेचे प्रश्न आहेत.
३) सायफनमध्ये पाणी खालून वर चढते मग कोकणातले अतिरिक्त पाणी सायफन करून देशावर
का आणता येऊ नये?
उत्तर-सायफनचा स्रोतबिंदू आणि जेथे द्रव पोहोचते तो लक्ष्यबिंदू
यांच्यात वरून खाली अशीच दिशा असते. खालून वर पेक्षा वरून खाली हा भाग जास्त असला
तरच सायफन होते. मधल्या भागात जरी पाणी वरच्या दिशेने गेले तरी ते अंतिमतः वरून
खालीच जातच नसते. सायफनमुळे मधला अडसर बायपास करता येतो पण विभवांतर (पोटेन्शियल
डिफरन्स) किंवा ‘हेड’ उत्पन्न करता येत नाही. हवेच्या दाबामुळे सायफन शक्य होते
पण हवेच्या दाबावर ते चालू रहात नाही त्यासाठी हेडच लागते.
४) ‘अपवादानेच नियम सिद्ध होतो’ हे विधान बरोबर आहे काय? चुकीचे असल्यास
ती म्हण म्हणून का रुळली असेल? याच्याशी साधर्म्य असलेला पण खरेतर वेगळा असा कोणता
मुद्दा तर्कशास्त्रात येतो?
उत्तर-अपवादाने नियम बाधितच होतो सिद्ध नव्हे. नियम जर ढोबळ
आडाखाच असेल तर त्याला अपवादही असतात पण ते असण्याने नियम सिद्ध होण्याचे काहीच
कारण नाही.
युक्तिवादात अडचण आल्यावर पळवाट म्हणूनच ही म्हण रुजली असावी. जे क्ष असेल ते
य ही असतेच असा विधानाचा (येथे नियम म्हणजे विधिनियम नव्हेत तर गतिनियम) आकार
ध्यानात घेतला तर ते जे क्ष नाही ते य नाही असेही दाखवता आले पाहिजे. म्हणजेच क्ष
ला काहीतरी तद्-इतर शिल्लक पाहिजे “जे जे अस्तित्वात असते ते” अशा प्रकारे सर्वसमावेशक पक्ष (ज्याविषयी सिद्ध करायचे त्याला पक्ष म्हणतात)
घेतल्यास प्रतिपक्षात बाध होतो हा पडताळा घेण्याची सोय उरत नाही. कोणत्या अटी
पूर्ण केल्यास नियम बाधित होईल हे सांगता आले पाहिजे. म्हणजे तो नियम तपासणीय
राहतो.
५) प्रकाश हा स्वतः अदृश्य असतो म्हणजे नेमके काय? आपल्याला प्रकाश दृश्यमान
झाल्यासारखा वाटतो तेव्हा नेमके काय दृश्यमान होते?
उत्तर-चातकपक्षी थेट पावसाचेच पाणी पितो असे मिथक आहे. ओंजळ,
भांडे वगैरे काही नसले तर जलधारेत तुम्ही आडवे आलात आणि तोंड घातलेत तर पाणी मिळेल
जलधारेच्या बाजूला / बाहेर राहून नव्हे. तद्वतच जेव्हा आपण प्रकाश किरणाच्या अक्षीय
दिशेला आपल्या दृकपटलाने आडवे जातो तेव्हा त्या किरणाच्या द्वारे आपल्याला त्याचा
स्रोत दृश्यमान होतो. किरण बाजूने पाहिला असता तो दृश्यमान नसतो.
जर धूळ किंवा
कसलेही कण नाहीत अशी पोकळ पारदर्शक नळी केली व तिच्यात झोत सोडला तर झोत जेथे पडेल
तो कवडसा दिसेल, पण झोत दिसणार नाही. स्रोत दृश्यमान होतो असे म्हणताना आपण प्राथमिक
स्रोत ज्योत, सूर्य, तापलेले फिलॅमेंट अशा गोष्टींबरोबर परावर्तक स्रोतही ध्यानात
घेत आहोत. हे स्रोत अगदी लहान आकाराचे व बहुदिशाना प्रकाश परावर्तीत करणारे असू
शकतात.
थेट उन असेल तेथेच पृष्ठ प्रकाशित होईल व नसेल तेथे काळीठिक्कर सावलीच असेल
असे कधीच होत नाही. प्रकाश हा थेट नसून विकीरीत झालेला डिफ्यूज्ड असाच आपण जास्त
करून अनुभवतो. त्यामुळे दृश्यमान होते ती आभा होय. वातावरण आहे म्हणून आभाळ आहे.
चंद्रावर तेथील दिवसाच्या बाजूलाही आकाश काळेच दिसते कारण वातावरण नाही.
No comments:
Post a Comment