Friday, July 17, 2015

न बुद्धिभेदं जनयेत्--?


ज्या संघटना किंवा जे गट बंदिस्त विचाराचे असतात त्यांना आपल्या अनुयायांनी इतरांचे ऐकूच नये, त्याहीपेक्षा इतरांशी वाद घालायला जाऊच नये, असे वाटत असते. एकेकाळी तर संगीतातसुध्दा शिष्यांनी दुसऱ्या घराण्याचे गाणे ऐकण्यावर बंदी असे. अडचणीत आणणारा प्रश्न पडूच द्यायचा नाही आणि चुकून पडलाच तर तो उच्चारायचा नाही असा अलिखित नियम असतो. असली पथ्ये का पाळायची? तर त्यामुळे बुद्धिभेद होतो म्हणून!

खरे तर बुद्धीचे पहिले कार्य भेद ओळखणे अर्थात विवेक हे असते. सार-असार, नित्य-अनित्य, असे अनेक विवेक प्रसिद्धच आहेत. सु-तर्क कोणता आणि कु-तर्क कोणता हे ओळखता येण्याला आपण विशेषत्वाने विवेक म्हणतो व म्हणूनच विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे शब्द समानार्थी वापरले जातात. जे बुद्धिभेद होऊ देऊ नका असे बजावत असतात ते मात्र बुद्धी हा शब्द विचारशक्ती या अर्थाने वापरत नसतात. ठरलेल्या निष्कर्षावर स्थिर रहाणे आणि इतर विकल्प पुढ्यात येउच न देणे याला, म्हणजेच विचारशक्ती बंद ठेवण्याला ते बुद्धी म्हणत असतात. अनुयायांची विचारशक्ती चालू झाली तर तो भरकटेल किंवा गोंधळेल अशा काळजीने आपण हे बोलत आहोत, असे जरी हे विचारविरोधी धुरीण दाखवत असले, तरी त्यांची खरी चिंता वेगळीच असते. अनुयायाची आपल्यावरील निष्ठा अक्षुण्ण राहिली पाहिजे यासाठी ते अनुयायाला अन्य-प्रभाव-प्रुफ बनवू पहात असतात.  

नैसर्गिक अपघाताने बुद्धिमंद असणारे अभागी थोडेच असतात. पण बुद्धिभेद नको हे सूत्र मानणारे बुद्धि-बंद लोक मात्र भरपूर आहेत. जेव्हा धुरीणांकडून एखादा प्रवाद जारी होतो तेव्हा यंत्रवतपणे तो फ़ॉरवर्ड केला जातो. गणपती दुध पितो’, हे अशा प्रसाराचे एक गाजलेले उदाहरण आहे.

फेसबुकवर सध्या अशीही एक माहिती फिरते आहे की हायजेनबर्ग हा शास्त्रज्ञ म्हणे मुळात भारतीय हिंदू होता. लॉर्ड माउंटबॅटनने म्हणे (१५ ऑगस्ट १९४७ ला) अशी अट घातली की ह्याला आमच्या ताब्यात द्या, तरच स्वातंत्र्य देऊ! मग त्याचे इंग्रजीकरण व ख्रिश्चनीकरण केले गेले. त्याने क्वांटम-थिअरीतले त्याचे योगदान म्हणे अगोदर हिंदू असताना कणादमुनींच्या आधारे केले होते. ही माहिती सोडणाऱ्याने, हायजेनबर्ग हा जर्मन होता. त्याचा शोध १९२९ ला प्रसिध्द होऊन त्याला १९३२ लाच नोबेल मिळाले होते. हेही लक्षात घेतले नाही. तसेच माउंटबॅटनपुढे स्वातंत्र्य द्यायचे की नाही हा प्रश्नच नव्हता तर ताबा कोणाकडे कसा सुपूर्द करायचा हा प्रश्न होता, हेही लक्षात घेतले नाही. अशा थापा मारून देशाभिमान जागृत होत नसून हीनगंडच अधिक पक्का होतो.  

गॅलिलिओने जर अरिस्टॉटलसुध्दा चुकू शकतो असे मानले नसते तर पुढे न्यूटनही झाला नसता. अंतहीन शंकेखोरपणाबाबत संशयात्मा विनश्यति हे म्हणणे ठीक आहे. पण वेगळेही सत्य असू शकते हा खुलेपणा जर नसता तर कोणतीही मानवी प्रगती होऊ शकली नसती. सिद्धांत चुकीचा ठरतोय या भीतीने जे समोर साक्षात उभे आहे तेही नाकारायचे हा हट्टीपणा नेहमीच नडला आहे.

आपली बुद्धी वापरूनच ती वाढवता येते. एखादा सिद्धांत जेव्हा अडचणीत येतो, तेव्हाच सैद्धांतिक पुनर्विचार होऊन त्या नव्या तथ्याला सामावणारा, अधिक परिष्कृत सिद्धांत सापडत असतो. बुद्धिभेद झालाच पाहिजे. गोंधळणे, बुचकळ्यात पडणे, अधांतरी वाटणे ही सारी जिवंतपणाची व बौद्धिक आरोग्याचीच लक्षणे आहेत. जर दुर्बुद्धी सुचली असेल तर तिचा तरी भेद करायला नको का? असे स्वा. सावरकरांनीही म्हटले आहे.

दुर्भाग्य असे की बुद्धिभेद नको या भूमिकेला गीतेत आधार सापडतो
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम्|
जोषयेत् सर्वकर्माणि विद्वानयुक्तः समाचरन्| (श्लोक ३.२६)


जे ज्ञानी असतील त्यांनी, जे अडाणी आणि कर्मासक्त लोक आहेत, त्यांचा बुद्धिभेद करू नये. (उलट त्यांना अडाणीच ठेवून) त्यांच्याकडून सर्व कामे मात्र करवून घ्यावीत असे हा श्लोक सांगतो.

याला जोडून आणखी उपदेश असे येतात.
जे प्रकृतीच्या गुणांनी झपाटलेले मंद लोक आहेत त्यांना सारे सत्य जाणणाऱ्यांनी चळवू नये. (३.२९)

 ज्ञानी व अनासक्त असलेल्या लोकांनी इतरांसमोर वागताना, आसक्त व अडाण्यासारखेच वागावे म्हणजे (लोकांची कर्मासक्ती तशीच राहून) रूढ समाजव्यवस्था चालती ठेवता येईल(चीकीर्षुर्लोकसग्रहम्)(३.२५)

 (कारण) श्रेष्ठ जसे आचरण करतात तसेच इतर करतात, श्रेष्ठ जे प्रमाण मानतात ते इतरही मानतात (३.२१)

यावरून बुद्धिभेद उत्पन्न होऊ द्यायचा नाही ही भूमिका मुळापासूनच कशी फसवी, राजकीय व धुरीण-केंद्री आहे हे दिसून येते.                


3 comments:

 1. Your argument is hundred percnt true.. one has to constantly watch out for dogmas which can trap u into Buddhiband state. Karuna

  ReplyDelete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. बुद्धीभेद करू नये या गीतेसारख्या ग्रंथातील मताचे माझे आकलन मांडतो.

  १. बुद्धीभेद करणे आणि ज्ञान देऊन शहाणे करणे या दोन भिन्न आणि कदाचित परस्पर विरूद्ध परिणाम करणार्‍या बाबी आहेत असं मला वाटतं. कोणतेही ज्ञान दुसर्‍याला देण्यापूर्वी त्याची ते ज्ञान आत्मसात करण्याची योग्यता आहे का हे तपासावे लागते. नाहीतर हेतू ज्ञान देण्याचा असला तरी समोरच्याचा बुद्धीभेद होण्याचा संभव असतो.

  २. गीता तत्वज्ञानाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर कर्मयोगाचा अधिकारी / पात्र असलेल्या व्यक्तीस कर्मसंन्यासयोग सांगितला तर त्याचा बुद्धीभेद होऊन तो करीत असलेले कर्मही सोडून द्यायचा आणि कर्मसंन्यास तर डोक्यावरून गेलेला. तेव्हा तेल गेले, तूप गेले हाती धूपाटणे राहीले अशी गत व्हायची.

  ३. माझ्या एका नातेवाईकास मूळव्याधेचा त्रास आहे. एका जागी बसण्याचे काम आणि शरीराने स्थूल त्यामूळे अॅलोपॅथी डॉक्टरने त्यास वजन कमी करण्यासाठी तेल-तूप वर्ज्य सांगितले. आणि आयुर्वेद वैद्याने मात्र रोज साजूक तूप खायला सांगितले. आता कुणाचे ऐकावे? तूप खावे की न खावे? की अधून-मधून खावे? की थोडे-थोडे खावे? या प्रश्नांनी तो हैराण झाला. याला मी बुद्धीभेद मानतो. मी त्याला म्हटले की तू एका कुणाचे तरी १००% ऐक नाहीतर काहीच साधणार नाही.

  ४. 'मी आईच्या पोटात कसा गेलो?' या तीन वर्षाच्या मुलाच्या प्रश्नाला खरं उत्तर देता येत नाही कारण तो ते ज्ञान ग्रहण करण्यास पात्र नसतो. खर्‍या ज्ञानाने त्याचा बुद्धीभेदच व्हायचा.

  ५. माझी लेक तान्ही असतांना रात्री दोन-अडीच पर्यंत जागी असायची. पुढे सकाळची शाळा सुरू झाल्यावर, सर्व उपाय करून थकल्यावर, आम्ही तीला बागूलबुवाची किंवा भुंग्याभाऊची भीती घालून झोपवू लागलो. थोडक्यात सत्य सांगणे सोडा, तीला असत्यच शिकवले. पण तीच्याकडून तीच्याच कल्याणाची क्रिया घडवून आणण्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत जाणीवपूर्वक तीला अडाणी बनविले व राहू दिले.

  ६. इयत्ता सातवीच्या पुस्तकात कागदावर पेन्सीलने एक टिंब काढा याला बिंदू म्हणतात व असे दोन बिंदू छेदणारी पट्टीच्या साह्याने काढलेली रेघ म्हणजे रेषा अशा धादांत खोट्या व्याख्या शिकविल्या जातात. पण सातवीतील विद्यार्थ्यांची ग्रहणक्षमता लक्षात घेता तेच योग्य वाटते.

  वरील उदाहरणांत हेतूपुरस्सर सत्य दडवले जाते पण त्यामागचा सद्हेतू लक्षात घ्यावा लागतो.

  ReplyDelete