Friday, July 10, 2015

‘ते’ उमगणे म्हणजे नेमके काय उमगणे?


आत्मिक साधनेबाबत बरेच गूढगुंजन केले जाते. त्या परिभाषेत न शिरता लौकिक पातळीवरच्या भाषेत व प्रश्नांत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या उमगण्याने मोठा फरक पडतो? ते आपण आज पाहू.

उदाहरणार्थ, कोणताही चाळा नसतानासुध्दा कंटाळा न येण्याची फॅसिलिटी आपल्यात आहे असा शोध लागला तर सारखे नवनवीन चाळे शोधण्याचा धडपडाट कमी होईल की नाही? मग हे उमगणे म्हणजे एक खूण मानावी.

अनावश्यक धडपडाट थांबणे म्हणजे काय हे कळावे म्हणून आपण पोहायला शिकण्याचे उदाहरण घेऊ. एका पद्धतीत माणसाला सरळ पाण्यात टाकून देतात. निसर्गतः तो धडपडाट करतोच. बुडू नये इतपत आधार अधून मधून देतात. दुसरी पध्दत म्हणजे सुरुवातीलाच फ्लोटिंग शिकवणे. फक्त नियंत्रित श्वास, शिथिल स्नायू आणि नाक वर राहील अशी पोझिशन सापडली की फ्लोटिंग आले. पाणी आपल्याला बुडवेल ही धारणाच झडली की न बुडणे हा मुख्य प्रश्न रहात नाही. फ्लोटिंग जमणारा विहरू शकतो. त्याच्या पोहोण्यात जो डौल आणि उमदेपणा(एलिगन्स) असतो. तो धडपडाटी पोहोण्यात नसतो. बुडण्याच्या भीतीप्रमाणे, कंटाळ्याची भीती जाणे ही ज्ञानाची एक खूण मानायला हरकत नाही.  

माणूस मृत्यूपेक्षासुध्दा, आपल्या नसण्याने काऽऽहीऽही बिघडणार नाहीये, या सत्याला जास्त भीत असतो. असण्याला समर्थन हवेच कशाला? आपली काहीही गरज नाहीये, तरीही आपल्याला असण्याचा जो चानस गावलाय, इसपर एक पार्टी हो जाय असे वाटणे, ही एक खूण मानावी. आपण जगात आगंतुक आहोत, हे पूर्ण मान्य केल्याने जे घरच्यासारखे वाटते, ते राउळी मंदिरी कुठेच वाटणार नाही.

आपल्याला कशा ना कशाचे कौतुक वाटते. पण लगेचच ती कौतुकास्पद गोष्ट आपल्यालाही करता यावी, आपल्या संग्रही असावी, निदान फोटोतरी काढून ठेवावा, असे लष्टक मागे लागतेच. कौतुकाने जर आपण इतके भरून गेलो की या धरून ठेवण्याच्या प्रेरणा जागृतच झाल्या नाहीत, तर ती ते उमगल्याची खूण मानायला हरकत नाही. हे कशाचे कौतुक वाटून होईल याला अजिबात महत्त्व नाही. ती गोष्ट इतरांना कौतुकास्पद वाटते की नाही हे तर चुकूनसुध्दा तपासू नये.

विनोदात काहीना काही विसंगती असतेच. पण विसंगती असूनही ती स्वीकार्य करून मांडली जाते. सतत सुसंगत राहण्याचा (किंवा विसंगती लपविण्याचा) भार क्षणात हलका होतो आणि उकळ्या फुटतात. पण म्हणजे विनोदावर हसणारा माणूस वाईट वागायला लागतो की काय? किंबहुना उलटच असते. ज्याला गोष्टी विनोद म्हणून घेता येत नाहीत तो माणूस कडवट बनतो. कटुता ही तिची तीच कापरासारखी उडून जाणारी गोष्ट! आपण डबाबंद करून कवटाळून बसतो, हाच मोठा विनोद आहे. यावर हसू येणे म्हणजे ते उमगणे. 

आपल्याला कसली ना कसली दुःखे तर होणारच. आपल्याला दुःख झाले की आपण दुःखी होणार हे ओघानेच आले. थांबा! इथे हा ओघ तोडता येण्याजोगा आहे. आपण इतरांचे लक्ष वेधण्यासाठी, सहानुभूती वा मदत मिळवण्यासाठी, इतकेच नव्हे तर आपण दुःखी झालो नाही तर इतरांना ते विचित्र वाटेल या दडपणापायी, दुःखी होण्याची सवय लावून घेतलेली असते.

आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला, अमुक केले नाहीस तर मी दुःखी होईन असे वेठीसही धरत असतो. स्वतःच्या चुकीबाबतही, मी जर दुःखी झालो नाही तर मी सुधारणारच नाही, ही भयानक अंधश्रध्दा स्वपीडक नीतिवाद्यांनी पसरवून ठेवली आहे. खरे तर आपण मूळ दुःखाला त्याच्या जागी सीमित करू शकत असतो. (अर्थात दुःख होण्यात, झालेल्या चुकीवरून धडा शिकणे हे विधायक कार्य असते ते निसटू देता काम नये.) पण वरील कारणांनी दुखवटा जाहीर करून आख्खे आपण दुःखी होऊन बसतो आणि हा एक निर्णय असतो. या निर्णयी क्षणाला सजग राहिले तर दुःखाचे दुखवट्यात रूपांतर करणे थांबवता येते. हे जमणे म्हणजेसुध्दा ते उमगल्याची खूण असते.

अनेक भावनांचे ओघ हे तोडता, वळवता येणारे असतात. काहीही होवो मी गाभ्यात आनंदीच राहीन हा एक निर्णयच असतो. हा आपणच घ्यायचा असतो आणि घेता येतो हा शोध लागणे म्हणजे ते उमगणे होय. 

इतरांना शिव्या न देणे हे नीतीत येते पण इतरांकडून आलेल्या शिव्या न घेणे हे शिकवलेच जात नाही. टेस्ट मॅच मध्ये जसे बॉल सोडण्यालाही वेल लेफ्ट म्हणतात तसे टोमणे इत्यादी सोडता येणे म्हणजे ते उमगणे असते.

इतरांशी खोटे बोलू/वागू नये हे नीतीत येते. पण स्वतःचे खरे स्वरूप स्वतःला दिसू देणे हे आत्मिक असते. दुरित हाही माझाच भाग आहे हे स्वीकारल्याशिवाय स्वस्थताही नाही आणि सुधारणाही नाही असे होऊन बसते. स्वीकार म्हणजे शरणागतीच हे एक चुकीचे समीकरण खोडून टाकले पाहिजे. तसे स्व-क्षमादेखील जमली पाहिजे. असे म्हणून मी  निगरगट्टपणाला लायसेन्स देतोय की काय? अजिबात नाही. निगरगट्ट लोक परवान्याची पर्वाच करत नाहीत. स्व-क्षमा आणि बनचुकेपणा यातला फरक ज्याचा त्यालाच/तिलाच दिसू शकतो. आपल्याला चाड आहे की नाही हेही आपले आपल्यालाच कळू शकते. हा खासगीपणा म्हणजे पळवाट नव्हे हे कळणे म्हणजेच ते उमगणे होय.

ते कधी धरून ठेवता येत नाही. ओढून आणता येत नाही. दुसरे कोणीही आपल्याला आपले ते मिळवूनही देऊ शकत नाही. आन्हिके, औपचारिकता, जप, तप, शास्त्रार्थ किंवा आणखी काहीही असो ते उमगण्यासाठी विशेष वेगळे काहीतरी करावे लागत नाही. नेहमीच्या जगण्यातच केव्हाही संधी असते.

ते एकदाचेच आणि कायमचे उमगत नाही. आपण पुनःपुन्हा त्याच्यातून निसटत रहातो. ते म्हटले तर उघड असते पण तरीही विसरायला होतेच. पुनःपुन्हा उमगत राहावे लागते असेच ते उमगणे असते.


असे क्षण क्वचितच लाभतात. पण काही परिणाम सोडून जातात. कृत्रिमरित्या जोपासून चांगले बनता येतेदेखील पण हे चांगलेपण कण्हत कुथत असेल. कोणत्याही क्षणी अलगद चांगले होता येणे म्हणजे ‘ते’ उमगणे असते.

'सोडवण्याचे' प्रश्न कोणते आणि 'सोडून देण्याचे' कोणते किंवा 'करण्याच्या' गोष्टी कोणत्या आणि 'होऊ देण्याच्या' कोणत्या हे कळणे म्हणजे सुद्धा `ते' उमगणे असते!

9 comments:

 1. वा…क्या बात. सहज जाता जाता काय काय सांगितलं आहेत. मनापासून आवडलेली काही वाक्य -
  बुडण्याच्या भीतीप्रमाणे, कंटाळ्याची भीती जाणे ही ‘ज्ञाना’ची एक खूण मानायला हरकत नाही.
  आपण जगात आगंतुक आहोत, हे पूर्ण मान्य केल्याने जे ‘घरच्यासारखे’ वाटते, ते राउळी मंदिरी कुठेच वाटणार नाही.
  कटुता ही तिची तीच कापरासारखी उडून जाणारी गोष्ट! आपण डबाबंद करून कवटाळून बसतो, हाच मोठा विनोद आहे.
  आपण दुःखी झालो नाही तर इतरांना ते विचित्र वाटेल या दडपणापायी, दुःखी ‘होण्या’ची सवय लावून घेतलेली असते.
  काहीही होवो मी गाभ्यात आनंदीच राहीन

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
 2. गायक समेवर येताना रसिकांकडून सहज दाद येते तशा अनेक "समा" या लेखामध्ये गवसल्या..

  ReplyDelete
  Replies
  1. लेख वाचुनच 'ते' गवसल्याचा भास झाला...

   Delete
 3. Hava read it over and over again and will need to do this often, हे मला गवसले.

  ReplyDelete
 4. मी हा लेख laminate करून माझ्या हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये लावणार आहे

  ReplyDelete
  Replies
  1. खरोखरच धन्यता वाटली. मानसोपचारांची गरज यावरही प्रसार व्हायला हवा
   माझा 'रासायनिक दुर्भाग्यावर मात'हाही लेख ब्लोगवर आहे.
   स्नेहांकित
   राजीव

   Delete