Friday, July 24, 2015

एका नाण्याला किती बाजू असतात?


या प्रश्नाचे सहज-उत्तर दोन असे येईल. नाणे हे चपटे दंडगोल असते हे लक्षात घेऊन कोणी असेही म्हणेल की तीन बाजू असतात. दोन सपाट आणि एक दंडगोलाकार. अवकाशात किती बाजू असतात? असा सीमित प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे पाहिले तर उत्तर पुरेसे आहे.

आपण जेव्हा बाजू हा शब्द व्यापक अर्थाने वापरतो तेव्हा अंग किंवा पैलू असेही अर्थ होऊ शकतात. नाणे हे कोणत्या द्रव्याचे बनलेले आहे? याचे उत्तर अवकाश या अंगाच्या पलीकडे जाते.

नाणे हे किती संपत्तीचे प्रतिनिधित्व करते? याचे उत्तर द्रव्यात मिळत नाही. किंबहुना पाच रुपयाच्या नाण्याच्या धातूची किंमत ही पाच रुपयांपेक्षा खुपच कमी असायला हवी. अन्यथा ते नाणे वितळवून स्वतःच एक संपत्तीचा तुकडा म्हणून वापरले जाईल व नाणे म्हणून गायब होईल!

चिन्हार्थाचे प्रतिनिधीत्व करणारी एक चिन्हवस्तू हे नाण्याचे महत्त्वाचे किंबहुना मुख्य अंग आहे. विविध देशातील व काळातील नाणी जमविणाऱ्याच्या दृष्टीने नाण्याला एक संग्राह्यता मूल्य सुध्दा आहे.

नाणे टाकून काम होणारी जी यंत्रे व्हेंडिंग मशीन्स उदा सार्वजनिक टेलिफोन असतात. त्यात नाणे हे एकाच वेळी दोन भूमिका बजावते एक केलेल्या कॉलचे पैसे कंपनीला मिळावेत ही आणि दुसरी किल्ली प्रमाणे कुलूप उघडण्याची.

टॉस करताना केला जाणारा नाण्याचा उपयोग हा एक फासा म्हणूनही केला जातो.
लहान साईजचे नाणे चुकून एखाद्या बालकाच्या घशात गेले तर ते नाणे कोण कहर माजवेल.
तमाशात लावणी निवडताना या रुपयाचं म्हन्न काय हाय? यात प्रतीक म्हणून ते दौलतजादा या प्रकारचा निर्देश करतं.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ऑफिसात कोणतेही नाणे नसून सर्वच देशांना चालतील असे अमूर्त स्पेशल ड्रॉईंग राईट किती इश्यू करावेत यावर चर्चा चालू असते. जगातील सर्व सोने जरी ध्यानात घेतले तरी सर्व राष्टांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व राष्ट्रीय भांडवलाच्या पासंगालाही ते पुरणार नाही ही जाणीव झाल्यानंतर पैसा ही केवळ चिन्हवस्तू आहे हे सत्य सर्वांच्या मनावर ठसले आणि स्पेशल ड्रॉईंग राईट या सार्विक चलनाचा शोध लागला.

हे सगळे नाणेपुराण एव्हढ्याचसाठी की जीवनाला अनेक आयाम असतात व आपण कोणत्या आयामातल्या गोष्टीविषयी बोलतो आहोत हे स्पष्ट झाले नाही तर आयामिक घोटाळे होतात.

जड जग आणि जाणिवांचे जग यांना जोडणारे अनेक ट्रान्सड्यूसर्स आहेत व मेंदू हा त्यातील सर्वात महत्त्वाचा ट्रान्सड्यूसर आहे हे जितके खरे तितकेच मेंदू म्हणजेच जाणीव हे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे.

 कोणी जर मिरवणुकीचे वर्णन करताना असे म्हंटले की मिरवणुकीतले सर्व आयटेम आले पण अद्याप खुद्द मिरवणूक कुठे आली? तर तो आयामिक घोटाळा करत असतो.

कुत्र्याला पाहून भ्यालेल्या पाहुण्याला मालक म्हणतो, अहो तुम्हाला हे माहीत नाही का? की जो भुंकतो तो चावत नाही? यावर पाहुणा उत्तरतो मला माहीत आहे हो. पण हे त्याला माहितीय का? या प्रसिद्ध विनोद आहे. आयामिक घोटाळा हे विनोदांचे एक मोठेच आश्रयस्थान असते. जी कुत्री भुंकतात ती सहसा चावत नाहीत हे (खरे व खोटे) निरीक्षण असू शकते. त्याला माहीत आहे का? प्रश्नाने निरीक्षणाचे एकदम ब्रीदात रूपांतर होते.
आपण कुत्रे जमातीने असे मान्य केले आहे की जर आम्ही भुंकलो तर चावणार नाही. मी तर आत्ताच भुंकलोय मग आता मी चावणे बरोबर नाही अशी जाणीव कुत्र्याला आहे का? असा तो प्रश्न बनतो आणि साहजिकच हास्यास्पद ठरतो. निरीक्षणे आणि ब्रीदे या आयामिक दृष्ट्या वेगळ्या गोष्टी आहेत.
 हे घोटाळे टाळण्यासाठी अमुकत्वेकरून/अमुकत्वाने पाहता असा शब्द प्रयोग (इंग्लिश मध्ये क्वा बार्बर की क्वा पर्सन? असा क्वा नावाचा ऑपरेटर वापरतात.) केला पाहिजे.

मै सुलतानकी हैसियतसे आपको ये हुक्म देता हूँ| असे टिपू सुलतान त्याच्या मित्राला शेवटच्या क्षणी तू तरी सुरक्षित रहा म्हणून श्रीरंगपट्टणमधून बाहेर घालवताना म्हणाला. कारण मित्र या नात्याने सांगून पाहिले तर तो प्रेमामुळे ऐकेना.

"जबतक एक भाई बोलेगा तबतक भाई सुनेगा| जब एक मुजरिम बोलेगा तब एक पुलिस इन्स्पेक्टर जवाब देगा|" हा ‘दीवार’ डायलॉगसुध्दा अमुकत्वेकरून किंवा क्वा चेच उदाहरण आहे.
  
जैन दर्शनात जो स्यादवाद आहे त्याचे सार हेच आहे की एखाद्या गोष्टीविषयी विधान करताना नुसते आहे किंवा नाही म्हणून चालत नाही तर अमुकत्वे करून हो पण तमुकत्वेकरून नाही असे उत्तर द्यावे लागते.


चित्र म्हणून फालतू आहे हो पण अमुकची आठवण म्हणून जपून ठेवलंय असे वाक्प्रयोग करण्यात कोणतीही लबाडी नसते. उलट जीवन बहुआयामी असते व अर्थ हे आयामानुसार बदलते असतात याची सखोल जाणीव त्यामागे असते.  

No comments:

Post a Comment